जोडीदार.... प्रवास
तुझा माझा... भाग १४
सानूची फ्लाईट
टेकऑफ झाली होती, तसे तिचे विचारही उंच गगनाला भिडत होते, श्रीकांत आयुष्यात आणायचे
तिने जवळपास ठरवलं होते. सुमंतची साथ होतीच तिला आणि ती तिला कायम ठेवायची होती.
त्याच्या साठी तिला त्याचं होऊन राहायचे होते, त्याच्या मनात असणार्या गोष्टी अलगद
काढून आपल्या करायच्या होत्या. नात्याचा समतोल तिला साधायचा होता, आतापर्यंत ती
माहेरी त्या घराचा आत्मा होती आणि आता तिकडे शिकागोला असलेल्या कुटुंबात स्वत:च
स्थान कायम करायचं होतं. तिची भरारी त्या दिशेने सुरू झाली होती.
सुमंतच्या मनातही बरंच
काही सुरू होते, आता सानूला घर आणि ऑफिस सांभाळून घरातली विस्कटलेली नाती पुन्हा
गुंफायची होती. त्याच्या घरी काय सुरू आहे हे त्याला माहित होते, पण स्वभावाने
नाजूक असलेला तो कधी बोलत नव्हता, क्षणात त्याच्या मनात विचार आला,
“आपण सानुच्या
खाद्यावर बंदुक तर ठेवत नाही ना?”
गुमान पडून
असलेल्या सुमंतचे डोळे उघडले, सानू त्याला बिलगून, त्याचा हात हातात घेवून डोळे
मिटून गालात हसत होती, तिच्याकडे बघून त्याला परत शाश्वती झाली, आणि परत त्याने
डोकं मागे टेकलं, विचार परत सुरू झाला,
“नाही, सानूला नुसती
बायको म्हणून नाही तर माझी पार्टनर म्हणून उभं करायला हवं, निदान तिला मान नसला तर
वचक असायला हवी. तशी ती समर्थ आहे पण कायद्याने हक्क दिला तर तिला कुणी घालून
पाडून बोलणार नाही. नेतोय तिला माझ्या साम्राज्यात मग माझी जवाबदारी आहे तिचा
सन्मान जपण्याची.”
सानूने अलगद त्याचा
हात घट्ट केला, सुमंतने परत डोळे उघडले, सानूने अलगद डोकं त्याच्या खांद्यावर
ठेवलं, सुमंत जरा खाली झाला आणि तिची मान त्याने बरोबर केली. ती त्याच्यासाठी सात
समुद्रापलीकडे निघाली होती. तिला साथ देणे हेच त्याचं कर्तव्य होतं.
...
इकडे राणीला राजन घरी
घेऊन आला होता. राणीचे अश्रु थांबत नव्हते,
“अहो हे मला
अपेक्षित नव्हतंच.”
“अग पण काही हरकत
नाही, आपण दुसरा चान्स घेवू ना. आपण काय कुणाला बोललो नाही ना अजून, ही गोष्ट इथेच
संपली.”
“अहो पण आई ?”
“आई? काय? तिला
माहित नाही ना हे. मग काहीच काळजी नाही.”
“अहो आता कसं
सांगायचं.”
“सांग, मी आहे
तुझ्या सोबत, काय झालं तू एवढी का घाबरली आहेस?”
“अहो आईला माझा
महिना माहित असतो, आणि मागच्या आठवड्यात त्या मला विचारायला आल्या होत्या कि अजून
तुला पाळी आलेली नाही तर काही टेस्ट वगैरे कर म्हणून.”
“मी कानाडोळा केला
होता, पण आदल्या दिवशी म्हणजे ताई येवून गेली त्या दिवशी, आईने मला परत विचारलं होतं
पाळीबद्दल, आणि त्या स्वत: च आनंदी होत्या. मला म्हणाल्या होत्या, लग्नाच्या सहा
महिन्यातच त्याही प्रेग्नंट राहिल्या होत्या, मुलगाच होणार बघ. मी बोलले होते
त्यांना, कि जरा टेन्शन असलं कि माझी पाळी वाढते म्हणून, तर मलाच म्हणाल्या, कसलं
टेन्शन ग तुला, छोट्याश्या घरातून ह्या वाड्यात आलीस, लग्नानंतरही कॉलेज सुरू आहे,
तुझा नवरा आणि घरचे सर्व तुझी हाजी हाजी करत असतात. काही नाही, काळजी घे. मला
खात्री आहे परमेश्वरावर, किती वर्षाने लहान बाळाची पावलं खेळतील ह्या वाड्यात.”
राणी रडायला लागली,
राजन गुमान गप्प खुर्चीवर बसून होता. नंतर म्हणाला,
“राणी तयार हो,
जावूया डॉक्टरकडे. मग बोलू आईशी. मी आहे ना. तुला विचार करण्याची काहीच गरज नाही,
तो ह्या सेमिस्टरचा एक विषय राहिला आहे आणि पुढच्या सेमिस्टरची तयारी कर. “
“अहो पण, मलाही ठीक
वाटत नाही आहे ना, मीही गुंतले होतेच की.”
“का? मी काय कमी
आहे का? आधी माझं कर ना सारं.”
त्याने तिला
खाद्याला हात लावत उभं केलं, आणि नजरेने इशारा करत तयार व्हायला सांगितलं.
हॉल मधून बाहेर निघताना,
राजनच्या आईने विचारलं,
“अरे आताच तर आलात
बाहेरून, लगेच कुठे निघालेत दोघंही.”
राजन, “आई, जरा
बाघेर जातोय, काही मित्रांना भेटायचं आहे.”
“मग हिलाही नेतोस
काय भेटायला, तिला घरी राहू दे, कशाला उगाच दगदग तिला, तू हो ग आत, दूध गरम केलंय
तुझ्यासाठी.”
राणी थबकली, तर
राजनने तिला नजरेने इशारा केला,
“आई मित्रांना
भेटायचं आहे म्हणजे, आमची पार्टी आहे, माझे काही जुने मित्र आले आहेत, आताच सकाळी प्लॅन
झाला, त्यांच्या बायकाही येत आहेत. मग
राणी नको का माझ्या सोबत.”
आणि राजन हसला, “तू
येतस काय?”
“नाही ग बाई, काय
तुमच्या त्या गप्पा असतात, काहीच कळत नाही. पण राणी तू जपून हा.”
राणीने मान हलवली,
आणि राजन राणीला घेवून गाडीत बसला. राणी गाडीत बसताच म्हणाली,
“काय हे काय बोललात
तुम्ही. आपण काय पार्टीसाठी जातोय?”
“हो जातोय ना, माझा
मित्र खरच येतोय.”
“अग सकाळीच व्हाट्स
अप्पवर बोलून झालंय, आता तुझं ते रडणं सुरु होतं ना तेव्हांच. मी त्याला मेसेज
केला, ये भेटायला म्हणून. आणि तो लगेच हो बोलला. मग जातोय आपण त्याला भेटायला. चल
आवर स्वतःला, तुला बेस्ट कपलला भेटवतो.
आयुष्य कसं आपल्या मन मर्जीत जगायचं ना तुला दाखवतो, मग ही अशी मुळमुळू रडणार
नाहीस. आपली तर सुरुवात आहे. लग्न म्हणजे प्रेमाचा अंत नसतो राणी... सुरवात असते.”
राणी स्मित हसली, “असं,
मग सुरवात झालीच तर...”
राणीने तिचं मेकअप
कीट काढलं, आणि लिपस्टिक नीट करत होती.
राजन स्टेरिंग सांभाळत
म्हणाला, “राणी
ती फिक्कट पिंक लाव ना, ह्या ड्रेसवर मस्त दिसेल तुला.”
राणी हसली, तिने स्वतः ला नीट केलं आणि दीर्घ
श्वास घेतला. राणी आणि राजन एका रेस्टॉरंटमध्ये पोहचले. गाडी पार्क करून दोघेही आत
गेले. तोच राजनच्या मित्राने आवाज दिला,
“अबे ये राजन, पोहचलास काय बे, साल्या वेळेवर आलास.”
“अबे काय करू बे, लागली सवय.”
दोघेही मित्र आलिंगन देत
होते. तोच राजनचा मित्र सुमितच लक्ष राणीवर पडलं,
“अरे वहिनी साहेब, बऱ झालं तुम्ही ह्याला वळणावर
लावलं, नाहीतर हा, रयीस, कधीच वेळेवर येत नव्हता.”
राणी हसली, तिने नजरेने इकडे तिकडे बघितलं,
सुमितसोबत कुणीच नव्हतं, तर सुमित परत म्हणाला,
“अहो वहिनी, बायको आणि मुलगा आहेत
रेस्टॉरंटमध्ये, मी जरा हे सगळं घ्यायला आलेलो.“
त्याने एक कॅरीबॅग वर करत
दाखवली, ज्यात
मुलाच समान होतं. नंतर सर्व रेस्टॉरंटमध्ये
पोहचले,
राजनने राणीची ओळख करून
दिली, सुमित
आणि रागिणी राजनचे बालमित्र होते, अगदीच बारावीनंतर त्यांनी
लग्न केलेलं, कुणाची साथ नसताना दोघांनी सारं काही उभं केलं
होतं, त्याच्या लग्नाला बारा वर्ष झाली होती, आणि ह्या बारा वर्षात त्यांच्याकडे जो अनुभव होता तो अजूनही बऱ्याच
जणांकडे नव्हता. राजनही त्याच्या संपर्कात
आताच आला होता जेव्हा सुमितजवळ त्याचा वाढणारा बिजनेस होता. सुमित आणि रागिणीच
नातं कही वेळा तुटण्याच्या मार्गावर आलं होतं तरीही तुटलं कधीच नाही. आज ते सर्व
मित्रांसाठी एक आदर्श पती पत्नी होते.
रागिणीला बघताच राणी
तिच्या जवळ आली, आवक उभी
होती तर रागिणीने तिला मिठी मारली,
“राजन गोड आहे तुझी
बायको.”
“हुम्म गोड तर आहे पण जरा
हळवी आहे रे, हिला ना
कळत.....”
सुमितने आधी त्याला
थांबवलं, “मित्रा,
कुणासमोरही बायकोबद्दल काहीच बोलायचं नाही, तिला
वाईट वाट्याला नको. वाटलंच तर गुण शेअर कर, पण.... दुसरी बाजू तुला सांभाळायची
आहे. मित्र म्हणून सल्ला तुला. बघ पटला तर... मी
तर तोंडावर बोलेल.”
त्याने त्याच्या बायकोला
हाय फाय दिला.
“तुझा सल्ला घेतला मित्रा.”
राजनने गोष्ट बदलली,
“मग बायको कुणाची आहे.
राणी ना एमबीए करत आहे. यंदा दुसऱ्या
सेमिस्टरला आहे. नौकरी कराची आहे तिला. बघ तुझ्या बिजनेसमध्ये इंटरशिप जमली तर, बसं सांगून ठेवतो.”
एमबीए म्हणताच सर्व गोष्ट बदलली,
गप्पा रंगत गेल्या. रागिणीने राणीच्या मनातलं ओळखलं होतं, तिने तिला समजावलं,
“राणी एमबीए करून घे आधी, मग विचार कर, घरी कोण काय म्हणत ते सर्व ऐकून घ्यायचं, उलट कधीच
बोलायचं नाही, सर्वांना वेळ उत्तर देते. माझी सासु तर मला
सून म्हणून स्वीकारायलाही तयार नव्हती, अजूनही तिला माझं सारं
खटकतंय, पण मी जगणं सोडलं नाही आणि हेच उत्तर आहे सर्वांना. आणि ह्या मधात काही
गोड झालच तर मार्ग निघतील नां, बसं समोर येईल ते स्वीकारण्याची
तयारी ठेवायची.”
राणीच्या नाजूक चेहर्यावर
स्मित हास्य आलं होतं. जेवण आलेले, रागिणी मुलाला भरवत होती. सुमितने त्याचं जेवण
संपवलं आणि मग तो त्याच्या मुलाला भरवायला लागला, रागिणी जेवायला
लागली. काहीही न बोलता प्रश्न सुटला होता. राजन स्मित हसला,
“खूप काही
शिकण्यासारखं आहे तुमच्या पासून, नाहीतर मी अश्या कही
मित्रांना ओळखतो जे स्वतः जेवून घेतात आणि गप्पा करत बसतात, बायको
मोठ्या मोठ्या पार्टीतून उपाशी घरी जाते आणि त्यांना माहितही नसते.”
“अरे पण तू आज आमच्या
शहरात कसा?” राजनने
सुमितला प्रश्न केला.
“रागिणीचा भाऊ राहतो, त्याच्या मुलाचा वाढदिवस होता.
एवढ्या वर्षाने मानाने बोलावलं, मग आलेलो. संध्याकाळ पर्यंत
निघू आम्ही.”
“मग रे सारं नीट ना? “
“हो रे, सारं काही नीट, कारण आम्ही दोघ फिट! ह्या छोट्या मोठ्या कुरकूरी
हाताळायला सज्ज आहोत.”
सारेच हसले, दुपार झाली होती. सुमित आणि
रागिणीला काही शॉपिंग करायची होती. मुलगाही त्रास देत होता. सारेच निघाले. राणी
आणि राजन रिफ्रेश झाले होते. घरी आले तेव्हां राजनची आई आणि बाबा हॉलमध्ये बसून
गप्पा करत होते.
राणी तिच्या खोलीत निघून
गेली, राजन
तिथेच बसला, आई त्याच्या कानाशी लागत म्हणाली,
“काय रे काही बोलली का
राणी, काही गोड
बातमी?”
“तिच्या सर्वच गोष्टी गोड
असतात, पण तू
ज्या गोष्टीच्या मागे आहेस ना तो माझा आणि तिचा निर्णय असेल. तू जो विचार करतेस तो
तिथेच थांबव. तिला एमबीए पूर्ण करू दे. उगाच नुसते
ग्रह करून तिला त्रास देवू नकोस आणि स्वतः ला करवून घेवू नकोस.”
बाबा पेपरमधून डोकावत
म्हणाले,
“काय ग,
काय बोललीस काय तू सुनबाईला?”
“काही नाही हो, आपलं...”
बाबा आईकडे नजर रोखून
राजनला म्हणाले, “राजन तू जा खोलीत, तुझा प्रश्न आणि उत्तर कळाले मला. ह्यानंतर असं
होणार नाही. मान्य, तो तुझा आणि राणीचा निर्णय असेल, आम्ही
फक्त वाट बघू शकतो.”
राजन काहीच बोलला नाही, सोबत घेवून आणलेलं सॅनिटरी पॅड
त्याने हातात घेतले आणि हॉल मधून निघून गेला.
हॉलमध्ये बाबांनी आईला
प्रश्न केलाच नाही, फक्त उत्तर दिलं,
“राणीसरकार,
राजा राणीच्या खेळात ढवळा ढवळ करू नका. आपल्याला जी मुबा मिळाली
तीही विसरू नका. वैभव हातात आलं म्हणून भूतकाळ विसरू नका. बाकी आपल्या सोबत आम्ही
तेव्हाही ऐकत होतो आजही उभे आहोत. आणि माझा मुलगा बायकोसोबत उभा आहे ह्याचा अभिमान
आहे मला. राणीकडून ते अपेक्षित ठेवा कि ती राजनच्या सोबत असायला हवी, तिथे कमी पडली तर नक्कीच बोला. बाकी ते दोघं आनंदी असले तर मग पुढचा आनंद
आपल्या पदरी पडायला काही वेळ लागणार नाही.”
राजनची आई काहीच बोलली नाही, हातात घेतलेले लोकर तिने ड्रोवर
मध्ये ठेवलं आणि तिचं पुस्तक वाचायला घेतलं, दुपार ओसरली
होती. सोफ्यावर पडून पडून ती थकली होती. इतक्या वेळ घरात अजूनही शांतता असल्याने
सारेच गप्प होते, तोच काही वेळाने तिने राणीला आवाज दिला,
सारेच परत चकित झाले,
“राणी, राणी, इकडे
ये ग जरा.”
राणी तिच्या खोलीतून लागलीच
आली, आई तिला
म्हणाली,
“अग चहा
ठेवतेस ना, आज अम्मा सुट्टीवर आहे. तुझ्या हातचा ठेव ग. मस्त
कडक.”
राणीही हसली, बाल्कनीतून बघत असणारं राजन परत
खोलीत गेला. सारं कसं परत वाटेवर आलं होतं.
नाती अशीच असतात, भरकटत जातात, जोडीदाराची साथ नेहमीच हवी असते अश्या भरकटणाऱ्या वाटेवरून खेचून वाटेवर
आणण्यासाठी...
कथेचा पुढचा भाग लवकरच.---
0 Comments