जोडीदार.. प्रवास तुझा माझा.. भाग २०

 जोडीदार.. प्रवास तुझा माझा.. भाग २०



जया सानूच्या उत्तराने गडबडली होती. तिला ती साधी सुधी नाही ह्याची जाणीव त्या पाच मिनिटात झाली होती. ती ओठातल्या ओठात बडबड करत तिच्या खोलीत आली, सारंग खोलीत लोळून होता,

“काय हो, तुम्हाला किती वेळा म्हणाले, ऑफिसला जात जा म्हणून. तुम्ही ना, आता ही बया ऑफिससोबत घरही तिच्या ताब्यात घेणार असं वाटते.”

“जावू दे ग, नवीन आहे, उडू दे जरा. आपल्याला इथून कुणीच काढू शकत नाही. दादा तसा नाही. ती काय काही दिवस करेल... आणि कंटाळून मार्ग बदलले. आपण इथले राजे आहोत.”

“नाही हो मला नाही वाटत तसं, तुम्हाला बोलले होते हो, दादाला पैसे मागा आणि तुमचा प्रोजेक्ट सुरू करा. आता तर आपले शेयरपण दादाने ठेवले नाहीत कंपनीत, मग करायचं काय, दोन मुलं आहे आपल्याला.”

“मला पर्वा नाही, मी करतो काहीतरी, हिला असं दादाच्या नजरेत पडतो ना की तू बघ... “

“अहो तसलं काही होणार नाही, दादा आता तिचे जोडीदार आहेत. मला तर वाटतं ते तीच ऐकणार....”

“हेही बरं ना, दोघंही काम करा म्हणावं, आपण काही करायचं नाही, मी तर झोपतो आता.

“अहो काही खरं दिसत नाही मला...”

“मी बघतो ग, तू काळजी करू नकोस.”

“बघा तुम्ही पण मला नाही वाटत, ती बिजनेस वूमन वाटते मला. मानेपण कुठून शोधलं हिला आणि इथे आणलं काय माहीत... मला तर आपले दिवस संपल्या सारखे वाटते.”

“तू काळजी करू नको, जा तिच्या सोबत, दाखव तिला आपली मजल किती आहे ते.”

मोहिते निवास-

सानूला जावून जेमतेम तीन दिवस झाले होते. घरात आता अंकितच्या बंगलोरला जाण्याची घाई लागली होती. आज त्याला निघायचे होते. खोलीत त्याची बॅग अनु भरत होती, अंकित शेव्हिंग करत होता.

“अंकित, हे मी इकडे तुझ्या सोबत असणाऱ्या बॅगमध्ये चार्जर वगैरे ठेवत आहे. ह्या मोठ्या सुटकेसमध्ये काहीही नाही. आणि हा, गेल्या गेल्या फोन कर. तिकडे महाराष्ट्रीय रेसट्रोरेंटमध्येच जेवण कर”.

“अग, कधीची सूचना देत आहेस. मी काय लहान बाळ आहे. एवढंच आहे तर चल ना सोबत.”

अंकितने अनुचा हात ओढला आणि तिला बाहुत घेतलं, शेव्हिंग क्रीम अनुच्या गालाला लागली, ती पुसत अनु म्हणाली, “हुमम, पार विचित्र आहेस तू...”

“काय मला दोन शिंग आहेत?

“हो फुटले आहेत आता...”

“असं, थांब लवकर खोली बघतो तिकडे आणि घेवून जातो मग बघतो तिकडे तूला...

तेवढ्यात दार वाजलं, अनुने धावत जावून दार उघडलं, आई त्यांच्या खोलीकडे आली होती, हातात लाडूचा डबा होता, म्हणाली,

“बॅगेत बघ ना जागा असेल तर ठेव.”

“आई तुम्हीच द्या ठेवून, अंकितला खूप आवडतात तुमच्या हातचे बेसनाचे लाडू, आणि मलाही शिकवा लवकर...”

अंकित बाथरूम मध्ये जात ओरडला,

“हिला चांगलं शिकवून ट्रेन करून ठेव आई, तिकडे मला कोण भरवणार मग...”

त्याने बाथरूमच दार बंद केलं. अनु मात्र जरा आईकडे बघून स्मित हसली,

“अहो आई, त्याच काय मनावर घेता, तुमच्या हातच्या लाडवाची चव मला जमणार आहे का?”

आईने अलगद डोळे पुसले आणि म्हणाली,

“जावूदे ग बाई, मी काय म्हणते, झाली का ह्याची सर्व पॅकिंग, सर्व नीट ठेवलं ना, अग बाई मी काय विचारते, बायको आहेस त्याची, त्याच्या गरजा तुला माझ्यापेक्षा जास्त कळतात. मी आईची माया देवू शकते पण तू त्याला सर्वकाही देवू शकतेस, आईपण सुद्धा...”

“नाही हो आई.”

अनुने आईला सर्व  पॅकिंग दाखवली, तेवढ्यात बाबाही खोलीत शिरले,

“झालं का आवरून बाळूच?”

अंकित बाथरूममधून आला होता आणि कपडे बदलत होता,

“हो बाबा, हा काय आता वीस पंचवीस मिनिटात निघतो एयरपोर्टसाठी.”

“बर कॅप बोलवायची आहे का?

“कशाला बाबा, तुमच्या सुनेला ड्राईविंग कशासाठी शिकवली.”

अनु, “बाबा तयारी करा, आपण सर्व जावूया ना... मी आपली गाडी चालवते. ह्याला तिकडे एयरपोर्टला सोडू आणि मग आपण बाहेर जेवण करू आज, काय!”

“असं  म्हणतेस, बर चल ग आपण तयार होवू खाली.”

बाबा आणि आई खाली तयारी साठी निघले, आई बाबांना म्हणाली,

“अहो, कशाला म्हणालात, त्यांच काही ठरलं असेल ना! येईल ती त्याला सोडून घरी, आपण कशाला मध्ये.”

“काय आरती एवढंच ओळखतेस काय ग अनुला, एकदाच आपला पोरगा तसा विचार करू शकतो पण ती नाही करायची.”

इकडे खोलीत अंकित अनुला मिठीत घेत म्हणाला,

“कशाला बोललीस ग, आपण तिकडे कॉफी शॉप मध्ये वेळ घालवला असता ना, फ्लाईट तर रात्री आठची आहे. माझं प्लानिंग होतं, तुझ्यासोबत जेवण्याच तिकडे.... “

“कसा रे तू, काही होत नाही, सोबत जेवूया. त्यांनाही जरा बरं वाटेल.”

“हुम्म्म, बरं आता तरी वेळ आहे ना.”

अंकितने तिला अंगावर ओढलं आणि मग प्रेमाची अनंत बरसात तिथेच झाली, अनु प्रेमाच्या रंगाने लाल झाली होती आणि अंकित तृप्त झाला होता. अनुच लक्ष घडीवर पडलं,

“अरे अंकित वेळ होईल ना.”

“आताच बोललो ग, रात्री आठची फ्लाईट आहे म्हणून, आरामात पोहचतो आपण. घे आवर.”

अनुने स्वत:ला आवरलं, अंकित त्याच्या बॅग्स घेवून खाली गेला, बाबा सोफ्यावर बसून वाट बघत होते. अंकितने अंजू आत्या बद्दल विचारपूस केली,

“बाबा अत्तू दिसत नाही आहे, अजून आली नाही का बुटिकवरून.”

“अरे आताच तिचा फोन येवून गेला, तिला उशीर होईल बोलली, छकुली तिच्यासोबत आहे म्हणून सांगितलं तिने.”

“असं होय, हल्ली उशीर होतोय तिला.

“हुम्म कामात असते, बिझी झाली आहे, आणि तो तिच्या सोबत आदर्श काम करतोय ना, त्याचं आणि तिचं काम सुरु असते. बरा मुलगा आहे. गरीब आहे पण मेहनती आहे.”

“हुम्म्म... मी करतो फोन अत्तूला.”

 म्हणत तो बहारे निघाला, आणि त्याने अंजूची रीतसर चौकशी केली.

अनु तयार होऊन आली होती, अंकितने गाडी काढली, बाबा आणि त्याने सामान गाडीत टाकलं. आणि आई बाबा मागच्या शीटवर बसले. अनुने गाडी चालावणार होती, अंकित तिच्या शेजारी पुढे बसला.

सर्व एयरपोर्टला पोहचले आणि अंकित म्हणाला,

“पोहचलो सुखरूप बाबा!

तोच बाबा बोलली, “अरे तुझ्या पेक्षा उत्तम चलवते ती गाडी. बरोबर आणली तिने, ना स्पीडमध्ये ना काही, वेळेत आलोय आपण.”

सहा वाजले होतेच अंकितने चेकइन केलं, अनु आई बाबांना घेवून एका रेसट्रोरेंटमध्ये आली, सर्वानी जेवण केलं आणि घरी आले. नव वाजले होते, अनु सारखी फोन बघत होती. आई बाबांच लक्ष होतं तिच्यावर, तेवढ्यात तिचा फोन वाजला, अंकित बंगलोरला पोहचला होता. अनुने बाबांना आणि आईला निरोप दिला आणि आनंदात त्याच्याशी बोलत ती तिच्या खोलीत निघून गेली.

काही वेळ आई बाबा गप्प बसून राहिले मग बाबा हळूच म्हणाले,

“गोड आहे सुनबाई. पण हीपण जाणार ना तिच्या नवऱ्याकडे.

“हुम्म्म, ते दोघं आनंदी आहेत म्हणून हा आनंद, हे विसरायचं नाही अरुणरावं. तिचं नातं बाळूशी आहे. आपण नंतर येतो. लवकर जमवा जमाव करून घेवून जायला हवं तिला अंकितने.”

“तुझंही बरोबर, तिचं लग्न त्याच्याशी झालंय, ह्या घराशी नाही, तो जिथे ती तिथेच असायला हवी, आपल्याला ती कितीही हवीशी असली तरी...  बाकी तू मी आहोत आता एकमेकांचे सोबती.”

जरा छातीत कळ आली होती बाबांच्या, पण त्यांना सांगायचं नव्हतं आरतीला, म्हणाले,

“तू झोप ग मी जरा अंगणात फिरून येतो.”

“अहो, जास्त वेळ राहू नका, लवकर या.”

बाबा अंगणात आले आणि फिरत होते, तोच अनुला बाल्कनीतून दिसले, ती अंकितशी बोलत होतीच, तिने फोन ठेवला आणि खाली आली, सोबत औषधी घेवून आली,

“बाबा झोपा तुम्ही, अजून झोपले नाही का? सगळं ठीक आहे ना?”

“बाळा जरा दुखत आहे ग छातीत. म्हणून इकडे फिरत होतो.”

“मला वाटलंच, मी सोबत घेवूनच आले औषधी. तुम्ही बसा बघू,”

अनुने बाबांना अंगणातल्या बाकाबर बसवलं, आणि औषधी दिली, जरा वेळ ती इकडल्या तिकडल्या गप्पा करत राहिली. बाबांना आता बरं वाटत होतं, दुखणं थांबलं होतं. ती बाबांना घेवून खोलीत त्यांच्या खोलीत आली, आईला तशी जाग आली,

“काय ग काय झालं?

“अहो काही नाही, बाबा बाहेर फिरत होते, आता थंडीपण खूप वाढली आहे. मी घरात घेवून आले. तुम्ही झोपा. आणि बाबा काहीही लागलं तरी आवाज द्या. मी आज इकडे शेजारच्या राणीदीच्या खोलीत आहे.”

ती बाबा झोपेपर्यंत तिकडेच थांबली, आईला मात्र जरा गडबड जाणवली. पण नकोच विषय आता म्हणून ती गप्प होती, अनु खोलीतून निघणार तोच ती हळूच म्हणाली,

“सगळं ठीक ना ग अनु?”

“हो आई, मी बाबांना औषधी दिली आहे, काही नाही जरा छातीत दुखत होतं त्यांच्या, मगाशी नको म्हणाले तरी त्यांनी जरा आवडीच म्हणून जास्त जेवले ना, बस असिडीटी झाली. आता बरे आहेत. बोलवा मला काही लागलं तर मी इकडेच झोपते आज.

दिवे विजले होते. आणि घर काळजीत पडलं होतं ,घरातले पिल आज घरात नव्हते. घर पूर्णपणे अनुच होतं. मोहिते निवासात आता सत्ता बदलली होती. त्या घराला आणि घरातल्या प्रत्येकाला अनु हवी होती आणि हे सारं घडत गेलं ते अंकितच्या तिच्यासोबत असल्याने. ती त्याला हवी हवीशी होती मग तिला प्रत्येकाला हवीशी होणारच होती. जोडीदाराने जोडीदाराला समजून घेतलं तर जोडीदार जोडीदाराची सर्व नाती मनापासून जपतो. कारण सर्व नाती आयुष्यात येतात ते त्याच्या आयुष्यात येण्यामुळेच...

कथेचा पुढचा भाग लवकरच.---

तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
लिंक पहिल्या कॉमेंटला आहे. whats app channel
https://www.whatsapp.com/channel/0029Va8KEVk5kg7FQqeLjX0b

कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल/in.pinterest.

Post a Comment

0 Comments