जोडीदार.... प्रवास
तुझा माझा... भाग २४
मुलं मोठी झाली की त्याचं
असं स्वत:च विश्वं उभं राहत असते, त्यात पालकांना जागा नसते, पण पालकांच्या
विश्वात पाल्यांना जागा असते, त्याचं आतापर्यंतच आयुष्य पाल्यांच्या अवती-भवती
गुंतून असते. त्यांच्या मनातून ते कधीच निघत नाहीत. हेच तर पालकत्व आहे, एकदा सुरू
झालं कि कधीच संपत नाही, आणि ह्याच पालकत्वाच्या प्रवासात जोडीदारासोबतचा प्रवास
रंगत पुढे जातो.
आई बाबा सानूची वाट
बघत बोलत बसले होते तशी सानू माळ्यावरून खाली आली,
“आई झक्कास कॉफी
देतेस काय ग तुझ्या हातची, हल्ली मारिया पण मस्त करते माझ्या साठी. कामात असली की
घेवून येते ती.”
“हो का! मग तू घरून
काम करतेस काय ग?”
“हो करते कधी कधी,
पण सुमंत मला सोबत घेवून जात असतो त्याच्या, आता रशियाला चल म्हणून मागे लागला
आहे.”
“मग जातेस ना?”
“हो तीच तिकीट बुक
करत होतो आता आम्ही, मी त्याच्यासोबत जाते आहे, पण आठ दिवसात शिकागोला परत येणार.
तिकडे मी हवी आता ऑफिसमध्ये.”
बाबा जवळ येवून
बसले, “सानू कसं सुरू आहे ग सगळं तुझं, काळजी लागून राहते ग मला.”
“मजेत बाबा. काही
काळजी नाही, अरे मी जिथे तिथल्या लोकांनी त्यांची काळजी करावी, काय!”
“अग पण तुझी सासू
बोलत होती ना घरी काही गडबड आहे म्हणून .”
“आहे, पण मला काही
फरक पडत नाही, पण मी आणि सुमंत नसले तर त्यांना मात्र फरक पडू शकतो. असो ते सगळं
मी हळुवार हाताळेल, तशी सुरुवात झाली आहे, पण कसं आहे ना माणसं का अशी वागतात हे
आधी जाणून घ्याव ह्या विचाराची मी आहे. मूळ मुद्दा माहीत झाला की गोष्ट न चिरघळता
सुटते. बस वाट बघत आहे.”
“बरं बाई, काही
लागलं तर सांग ग, म्हणजे आम्ही काही करू शकत नाहीच पण निदान सल्ला, आशीर्वाद देवू
शकतो बाळा.”
“हुम्म्म, तुम्ही
काळजी घ्या दोघे, हेच करा आता.”
बाबा आता हळूच
म्हणाले, “आणि ते श्रीकांतच काय ग?”
“श्रीकांतचा इलाज सुरू
केलाय मी, आणि पुढल्या तीन महिन्याने मी आणि सुमंत येतोय इकडे आणि राहू मग सहा
महिने मग ती सगळी प्रोसेस होईल आणि मग त्याला घेवून जावू आम्ही.”
आई आता हळूच कॉफी
देत म्हणाली,
“सानू पण तुझं आपलं
झालं तर मग?”
“तर मग काय!
श्रीकांत माझा मोठा मुलगा म्हणून असेल ना.”
“अग पण त्याला
समजते सर्व.”
“बरं आहे ना मग....”
“त्याच्या मनात
काही यायचं ग.”
“आई, काही येत
नाही, उलट त्याला आई बाबा मिळतील हे काय कमी आहे का, आणि आलं त्याच्या मनात जरी
ना, तरी मी त्याला हाताळायला सक्षम आहे. येवून येवून काय येईल मनात त्याला मी
जन्माला नाही घातलं म्हणून ना, पण मी त्याच्यावर मायाच करेन. बघ तू माझा उत्तम आणि
लाडाचा मुलगा असेल तो.”
“अग बाई, पण
त्याच्या इलाजाला खूप पैसा लागेल ना?”
“लागू दे ना, कमी
काहीच नाही, सुमंतला फरक पडत नाही. मासाहेबांना पटलं नाही अजून पण आम्ही दोघं राजी
आहोत तर सुमंत म्हणतोय काळजी करू नकोस म्हणून.”
“हुमम, अवघडच आहे
बाई, तुला काय साधं राहायला जमत नाही काय ग, नवीन नवीन ओढवून घेतेस.”
“तीच तर मजा ग,
नाहीतरी ते आयुष्य काय.... आयुष्य कसं भरभरून असावं, नवीन नवीन रोज असावं.”
“हुम्म्म, बघा बाबा
नाहीतर पैसे द्या आणि नुसता इलाज करा ना त्याचा.”
“नाही तसं होणार
नाही, आणि तू विचार करू नकोस, अरे पैस्यावरून आठवलं, बाबा हे माझं एटीएम कार्ड
आहे, वापरा, काळजी करू नका, लग्न झालाय पण तुमची जवाबदारी अजूनही माझी आहे.
सुमंतशी आधीच बोलले होते मी. मला रीतसर पगार मिळत राहील जो तुम्ही दोघांनी इकडे
वापरायचा. घराचे हप्प्ते सुद्धा माझ्या खात्यातून जसे जात होते तसेच जाणार आहे.”
“अग मी बाळूशी
बोललो होता...”
“आणि मी पण बोलले,
त्याचा नवीन जम आहे. मी सांगितलं त्याला काही काळजी करू नका. घ्या हे कार्ड आणि
वापरा... तसंही माझ्या काही कामाचं नाही तिकडे.”
“नको ग, बाळूने
दिले आहेत ग पुरेसे माझ्या खात्यात.”
“ते राहू द्या
तसेच.”
“हो पण आता आमच्या
दोन जीवांना एवढं काही लागणार नाही ग. आणि बाळू दोन वर्षात इकडे येणार आहे त्याचा
प्रोजेक्ट संपला की....”
“हो, मला बोलला तो,
तो परमनंट इकडे काम शिफ्ट करणार आहे. पण साध्या त्याच्या करियरसाठी तो प्रोजेक्ट
महत्वाचा आहे. आणि तीन वर्ष पण होवू शकतात, किंवा वर्षभरात तो येवू शकतो. ते काही
नाही, तुम्ही आधी वापरत होताच ना, मग आताही बिनधास्त वापरा.”
“बरं, ठेवतो मी,
लागलेच तर वापरेन ग.”
“वापरेन म्हणजे,
सगळं खाणं पिण नीट करायचं, आता काही काटकसर करायची नाही, त्याची काही गरज नाही.
मनाला येईल ते घ्या आणि मनाला येईल ते करा. मी किंवा कुणीही हिशोब विचारणार नाही
आहे तुम्हाला. आणि मी ड्राइवेर बघून ठेवायला सांगितला आहे कैलासला, तो घेवून येईल
दोन तीन दिवसात. बाळू त्याच्याशी बोलून घेणार आहे. कुठे जायचं असलं की त्याला
बोलवायच आणि आपल्या गाडीने जायचं.”
“अग बाई कधी करतेस
ग तू ही सगळं.” आई डोक्याला हात लावत म्हणाली.
बाबा हसले, “अग ती
ना मल्टीटास्किंग आहे ग... आताही ती बोलत असली तरी काही वेगळाच विचार करत असेल.”
सानू, बाबा वेळ होत
आहे, मला निघायला हवं.”
बाबा, “आम्ही यायचं
का ग?”
“नको उगाच त्रास...
“
“बरं मग तू कॅप
बोलावली आहेस का?”
“हो येईल, ही काय
आताच बोलता बोलता बुक केली मी.”
बाबा हसले, “बघ
आरती म्हणालो होता ना, ही मल्टीटास्किंग आहे म्हणून. “
“अग बाई, चल मग आवर...”
सानू आईला येवून
बिलगली, आईच्या डोळ्यात अश्रुनी गर्दी केली होती. बाबाही त्यांना येवून बिलगले,
आणि म्हणाले,
“काळजी घे बाळा,
काळजाचा तुकडा आहेस आमच्या, आम्हालाच माहित तू एवढ्या दूर असतेस ग.”
“बाबा काही काळजी
करू नका, मी दूर असले तरही इथे जवळ असते तुमच्या मनात, तुम्ही आवाज जरी इथे दिला
ना तरी मला तिकडे ऐकायला येईल..”
सानू स्वत: आवरायला
निघून गेली आणि आई बाबा हॉलमध्ये गप्प बसून राहिले. मग ते हळूच आरतीला म्हणाले,
“जायचं काय ग आपण
एअरपोर्टपर्यंत, त्याच कॅपने परत येवू ना, चल आज तुला चौपाटीवर घेवून जातो, कही
वर्ष झालीत आपण दोघे गेलो नाही ना.”
“अहो ती नाही बोलली
ना.”
“तिचं काम आहे
बोलणं, कर तयारी पटकन, मी पेंट शर्ट घालतो लवकर... जावूया आपण.”
आरती उठली आणि
तयारीला लागली, सानू आवरून खोलीतून येईपर्यंत बाबा आणि आई दारात तयार होते,
“सानू आम्ही येतोय
ग सोबत, ह्याच कॅपने परत येवू घरी, त्रास कसला बाळा.”
“बरं, चला मग....
पण वाटेत मला श्रीकांतला भेटायला जायचं आहे. चालेल ना.”
“हो हो, आम्हीपण
भेटून घेवू ना त्याला. आता तुझा मुलगा म्हणजे आमचाही नातू ना.”
सानूला सोडून आई
बाबा दोघेच आज खूप वर्षाने चौपटीवर फिरायला गेले होते. बाबांनी आज शेंगदाणे घेतले,
आणि वाळूवर बसून दोघे ते खात बसले,
“अरु कीती वर्षाने
आपण परत इथे दोघे बसलो ना, नाहीतर नेहमी मुलं असायची सोबत. तुला आठवते काय ग,
मुंबईत आपण आलो होतो तेव्हा तू कितीदा माझ्या मागे लागली होतीस इथे येण्यासाठी. मग
आईची परवानगी काढून मी तुला इथे घेवून आलो होतो, तेव्हा हेच शेंगदाणे मी एक
रुपयाला घेतले होते आज दहाचे झाले...”
“हुम्म्म पण
त्यांना खूप चव होती हो, हे मशीन मधून केलेले आहेत कदाचित, आणि पाकीट बघा ना, लेबल
पण आहे...”
“हो ग, अग इथे एक
गजरा वाला असायचा ना...”
“हो का, असेल हो,
मला बाई आठवत नाही...”
“तुला तर काही आठवत
नसते हल्ली, निदान मी तरी आठवतो ते ठीक आहे.”
“अहो, तुम्ही काय
आठवणीत ठेवण्यासारखे आहात, आता डोळे जरी गेले ना तरी मी स्पर्शानेही ओळखू शकते
तुम्हाला. तुमच्या नुसत्या हालचालीने मी ओळखू शकते....”
“मी पण ग, आपण दोघे
आहोत म्हणून जीवन जीवन वाटते ग... नाहीतर आयुष्यभर मुलांसाठी मर मर केली आणि सगळे
सोडून निघून गेले बघ. आता आपण दोघेच राहिलो...”
“अहो आले का तुम्ही
परत त्याच ट्रक वर, आता त्यांच्या प्रगतीला आपण थांबवू शकतो का? आणि आपली मुलं
निदान बरी आहेत. ते वेंगुरकर आहेत ना?”
“हो त्याचं काय?”
“अहो त्यांना
त्यांची मुलं पैसेही पाठवत नाहीत म्हणे, ग्रुपवर पैसे गोळा करत होते सगळे
त्यांच्यासाठी, हल्ली पेन्शन पण मिळत नाही हो, सगळी वाट लागते बघा उतरत्या वयात,
सुखाच्या क्षणात मुलं असतात, गोड गोड दिवस असतात आणि आता...”
“तेही अरु, आता
आपणच आपले, पण झालं काय वेंगुरल्याला.. “
“अहो ते दादा आजारी
आहेत म्हणे.”
“असं, माझा कसा
चुकला तो मेसेज. जावून येवू आपण, करू मदत, आता परमेश्वराच्या कृपेने आहेत
आपल्याकडे भरपूर पैसा... करू त्याला मदत.”
“परमेश्वरच्या नाही
हो आपल्या मुलांच्या.... आणि आपल्या संस्कारांच्या मुळे.”
“सगळं तुझ्यामुळे
अरु... खूप खूप धन्यवाद माझी मुलं अशी घडवल्या बद्दल...”
अरुनच्या डोळ्यात
पाणी आलं होतं, आरती पदराने पुसत म्हणाली,
“काय हो हे, हल्ली
ना तुम्ही हळवे झाला आहात, मगाशी एअरपोर्टपण डोळे भरून आले होते माझे. सानू मला
कोपऱ्यात घेवून म्हणाली, बाबांना सांभाळ म्हणून.”
“अरे, नाही तर, ती
तर मला म्हणाली होती तुला सांभाळ म्हणून...”
“राहूद्या.... चला
निघूया, घ्या बरं कॅप बोलवा.”
दोघेही घरी निघाले
होते. मनात मुलांच्या चिंता होत्या. त्या काही जाणार नव्हत्या. त्यांची मुलं
त्यांच्या त्यांच्या मार्गाने त्यांच्या त्यांच्या जोडीदारासोबत उत्तम मार्गावर
होती. पण ह्या जोडीदारांना तरीही त्यांची आणि त्यांच्या जोडीदारांची काजळी होती.
तसं ते दोघ काय करत होत्या त्यांच्यासाठी, त्यांच ते करत होते पण तरीही त्यांच्या
ह्या जोडीदाराच्या प्रवासातील त्यांची मुलं सह प्रवासी होते. खरा प्रवास तर अरुण
आणि आरतीचा होता.
0 Comments