जोडीदार.. प्रवास तुझा माझा.. भाग २९

 जोडीदार.. प्रवास तुझा माझा.. भाग २९



महिना झालेला श्रीकांत रूळला होता सानूसोबत, त्याला चालायला जरा अवघड जात होतं पण त्याच्यात आत्मविश्वास सानूने भरला होता. डॉक्टर बोलले होते काही दिवसात तो चालायला लागेल. आश्रमातिल संचालकाला आणि इतर सभासदांना पटलं होतं, सर्वानी ना हरकत पत्र सानू आणि सुमंतला दिलं आणि श्रीकांतला दत्तक घेण्याची कायद्याने प्रकिया सुरू झाली होती. आज सानू श्रीकांतला घेवून मोहिते निवासात काही दिवसांसाठी जाणार होती. सुमंत त्याच्या कामासाठी भारतातील इतर ब्रांचमध्ये विजिटला जाणार होता. त्याचा पूर्ण शेडुल फिक्स होता.
मोहिते निवासात आज परत सानू येणार ह्या वार्तेने उत्साह होता. राणीही उद्या येणार होती, बाळू आणि अनुच काही दिवसात इकडे दोन दिवसासाठी येण्याचा प्लॅन ठरला होता.
सानू सकाळी आली, आईने आरती तयार केली तिच्या साठी, श्रीकांत सानूसोबत होता, त्याचीही आरती ओवाळली आईने,
“ये बाळा, मोहिते निवासात तुझं स्वागत आहे.”
बाबांनी श्रीकांतला आधार दिला आणि तो आत आला, बाबा त्याला हळूच म्हणाले,
“नातवाला चालवणं शिकण्याचा योग आला मला, आता लवकर ह्या घरात धावत गोंधळ घाल म्हणजे तुझ्या आजीला आपण दोघे मिळून त्रास देवू.”
श्रीकांत हसला, तसा तो खूप कमी बोलत होता, पण बाबा त्याला घेवून बसले आणि हळूहळू तो बोलका झाला. सानू स्वयंपाक खोलीत आज स्वयंपाक करत होती आणि आई डायनिंगवर बसून लसून सोलत तिच्याशी बोलत होती
सानू स्वयंपाक खोलीतून ओरडली, “श्री पापड तळू का रे, खाशील, आजीच्या घरी मस्त असतात बघ.”
“मम्मा, दे ग, जाम भूक लागली आहे.”
सानूने मोठा ड्रम काढला, आईने तिला मदत केली, कुरळ्या, तांदळाची पापड काढून दिली, ड्रममध्ये खूप काही नव्हते, सानू म्हणाली,
“आयडे, का ग केली नाहीत का ह्या वेळी. कर श्रीला जाम आवडतात, माझ्या आत्यासासू त्याच्यासाठी खूप काही काही करून पाठवलं आहे.”
“अग बाई, आता इथे कुणी खात नव्हतं, तुम्ही लहान होते तेव्हा मी किती करायची ग, आता कंटाळा येतो मला, पण आता श्रीसाठी करेन हा... घेवून जा जातांना.”
“हो हो, कर ग, ती ज्वारीची पण कर, काय त्याचं नाव.”
“धापोडे... तुला ओली खूप आवडायची ना…. करते ग.”
“अहो आजोबा, दुपारी ज्वारी घेवून या, लेकीच्या लेकाला आणि तिला धापोडे खायचे आहे. जमेल ना?”
“मम्मा धापोडे काय ग?” श्री मधेच म्हणाला.
सानू, “उद्या आज्जीने केले ना की बघ, मग तुला इथे येण्यासाठी कारण मिळेल रे. तिच्या हाताला खूप भारी चव आहे.”
श्रीकांत परत आजोबांसोबत रमला, आज खूप दिवसांनी मोहिते निवासात माणसं वावरत होती.
दुपारी श्रीकांत झोपल्या नंतर, आई बाबा सानूसोबत जरा वेळ बसले,
बाबा, “सानू श्री रुढलाय ग, गोड आहे मुलगा.”
“हो बाबा, त्याच्या मनात एवढा आनंद आहे ना, कि काय सांगू. डोळे बोलतात त्याचे. बघा त्याला ना मी खूप शिकवेन, करेन तो... “
“हो ग बाई, पण तिकडे सगळं नीट आहे ना?”
“तिकडे.... अरे मस्त सुरू आहे.”
“अग पण काही तरी प्रोब्लेम होता ना तिकडे,” आईने दचकत प्रश्न केला.
“काही नाही हो, जरा भरकटेले होते सगळे, येतील वळणावर आणि मी तर वादळ आहे, अशी बाजी मांडून आले ना कि आता तिकडे गेले कि सगळे सरळ झालेले असतील. आम्ही इकडे येतोय म्हणून त्यांनी काही वेगळं मनात ठरवून ठेवलं असेल पण पार सारं बदलेलं असणार, त्यांना कळणारही नाही आणि ते मार्गी लागले असणार.”
आई हसली, “काहीही ग तुझं, असं काय केलंस ग?”
“काही नाही, समजून घेतलं आणि त्याचं त्यांना देण्यासाठी काही गोष्टी मी केल्या. बघूया काय काय होते ते, शेवटी कष्ट दिल्याशिवाय कष्ट करण्याची ताकद येत नाही, आणि समोरच्या माणसाचे कष्ट कळत नाहीत. हेच मी म्हणेल. आयत्या बिळात नागोबा होता येते पण बीळ बांधून त्यावर उभं राहायला काही औरच कसं लागतो, ती नशा काही औरच असते. आता तिकडे बीळ बांधणं सुरु आहे. लागुद्या कसं काही लागलं तर मी आणि सुमंत सोबत असणारच आहोत त्यांच्या. बसं पहल त्यांची हवी आहे.”
“तुझं बोलणं मला काही कळायचं नाही...”
“माझी आई, तू विचार करू नकोस, वादळ काय नुसतं नासधूस करत नसतं ग कधीकधी मनावर साठलेली धूळ सुद्धा उडवून घेवून जातं.... बघ माझं काम मी केलंय आता त्यांची पाळी... आणि प्रत्येकाने त्यांची पाळी खेळावी मी ह्या मताची.”
“राहू दे बाई, काही समजत नाही.”
बाबा आता चिडवत म्हणाले, “अग समजण्यासाठी डोकं लागतं ते आहे का तुझ्याकडे.”
“काय हो तुम्हाला काही बोलण्याची ढब नाहीच....”
“घ्या आता डोकं हिला नाही आणि ही मला ढब शिकवणार, तू आधी ते आंघोळ करतांना काढून ठेवलेलं डोकं जरा जागी ठेवून ये आधी...”
“बघ हा सानू कसा छळ मांडला आहे ह्या माणसाने, काहीही हा तुमचं हो, तुम्हीच बघा सारखे घूडगे दुखत असतात, हल्ली डोकं तिकडेच राहायला आहे ना तुमचं. देवू का दाबून?”
सानूला हसू आवरलं नाही, “आयडे, शिकलीस ग तू, आता बाबा तुमची काही खैर नाही, जमली तुमची जोडीदार, रंगीली तुमच्या रंगात...”
“हुम्म आता काय जोडीदार म्हणालीस, हो ती जे म्हणले ती पूर्व दिशा आता... हो जी राणीसरकार माझं डोकं हल्ली इकडे माझ्या घुडग्यात आहेच.... अह्हाहा काय दुखत आहे ग, ह्या श्रीने पण खूप दमवलं मला.”
“घ्या म्हणाले होते ना, बसा आता तो टायगर बांब चोळत....”
सानू परत जोरात हसली, “आयडे, बाबा तुझी घेत आहेत ग, तू ना खूपच भोळी आहेस, माझी आयडी अशीच राहा ग.”
आई बाबांच्या चेहऱ्यावर आज खूप दिवसाने मनातलं हसू आलं होतं. सानू फोन बघत म्हणाली,
“बाबा, आयडे, मला ना पाच वाजता आपल्या इथल्या ऑफिसला काही काम आहे, मी जावून रात्री आठ पर्यंत येईल. श्री...”
“अग ते काय बोलणं झालं, नातू आहे मोहित्यांचा... हमखास जा, असा तुझ्या आईला नाचवतो मा आज कि बघ तू.”
सानू खोलीत निघणार तोच ती परत आली, “बाबा शामल आज इकडे येणार आहे.”
आई, “ही कोण ग?”
“अग श्रीची इंग्लीश टीचर आहे, त्याला कुठे फाड फाड इग्रजी येते, ती त्याला शिकवत आहे अगदीच अमेरिकन स्टाईलमध्ये.”
“असं, किती वाजता येणार ती?”
“सहा वाजता... तिला चहा देशील फक्त. ती श्रीसोबत असेल आठ पर्यंत. त्यांना ही राणीची खोली दे.”
“ओके... काही काळजी करू नकोस.”
बाबा, “सानू खूप पुढचा विचार करतेस ग.”
“बाबा करावा लागतो, आणि श्री माझा मुलगा आहे, त्याला काही कमी पडता कामा नये, आणि ही कल्पना ना तुमच्या जावयाची आहे. त्यांनी शामलला हायर केलंय श्री साठी, उत्तम शिकवते ती. आणि श्रीनेही कॅच केलंय महिनाभरात.... पुढ्या चार महिन्यात तो जबरदस्त इंग्लीश बोलले, अगदीच सुमंतसारखा. अमेरिकन असेंटमध्ये. चला मला काही इमेल आहेत मी बघते आणि मग तयारी करते.”
“श्री…:” आई जरा हळूच म्हणाली.
“त्याला झोपूदे ग, एक दीड तास मी झोपायला सांगते त्याला, पायाला त्रास होतो ना चालून चालून, पण काही दिवस अजून, एकदा कि स्वत:हून चालायला लागला कि तो जसा करेल तशी त्याला मुबा.”
बाबा आणि स्मित हसले, सानू जवाबदार झाली होती. स्वयंपाक करायला लागली होती, प्रत्येकाच हवं नको बघत होती. तिच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास भरला होता.
ती निघून गेली आणि जरा आई बाबा मागच्या अंगणात बसले, आई बाबा गप्पच होते, आणलेली ज्वारी आई निवडत होती, बाबाही मदत करत होते, हळूच म्हणाले,
“सानू किती बदलली आहे ग... “
“हा बदल आनंद देणार आहे हो, वाटलं नव्हतं ती असंही करू शकते.”
“ही सगळी सुमंतने दिलेली स्वतंत्रता आहे तिला, तो तिला आपल्या पेक्षा जास्त समजून घेवू शकतो. मी तू नाही समजून घेतल्या तिच्या श्री साठीच्या भावना पण तो समजला... तिचा निर्णय त्याने मान्य केला आता तो तिच्या कुठल्याही निर्णयात सोबत असणार ह्यासाठी शाश्वती पटली मला. श्रीचा निर्णय खूप मोठा आहे आरती...”
“हो ना, त्याला आई वडील मिळाले, त्याच्या चेहर्यावर किती आनंद आहे हो, हुशार आहे मुलगा... बस आता सगळं नीट होवू देत. “
“होईल ग, सानू आणि सुमंत आहेत ना सगळं बघतील.”
“अहो, पण ही चान्स घेणार आहे ना ?”
“घ्या~ आता हे मला कसं माहीत, पण ती असं तर बोलली नाही ना, मग आपण वाट बघूया ना, तिच्या त्या गोड बातमीची.. आणि मी तर आता आजोबा झालोय श्रीचा...”
इकडे सानूने सर्वाना फोन करून आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाची प्लनिंग सुरू केली होती. अनु अंकित शनिवारी पोहचणार होते. राणी उद्यापासून मोहिते निवासात राहणार होती. राजन शनिवारपासून राहणार होता. सुमंत शुक्रवारी मुंबईत पोहचणार होता.
आई बाबा त्यांच्या खोलीत होते, बाबांनी आईसाठी निळी पैठणी आणली होती आणि आईने त्यांच्यासाठी टोपी विणली होती. दोघेही खोलीत होते,
“अरु, किती वर्ष झालेत ग तू माझ्या सोबत आहेस.”
“अग बाई, मी नाही म्हणाले काही.”
“हुमम, मी बोललो ना, आता तुझे शब्द काय आणि माझे काय, एकच ग...”
“हो, तुम्हीपण तर मला झेलत आहात ना? माझी किरकिर आणि सगळं तुम्ही सहन केलं हो.”
“अरे त्याशिवाय आपला दिवस जात नाही, तू एवढं चविष्ट जेवण बनवतेस पण त्याला पचायला तुझ्या दोन शिवा आणि बोलणी खाल्ली नाही ना तर पचत नाहीत ग मला.”
“असं होय!”
“आणि हल्ली कशी तू मला बोलत नाहीस ना म्हणून हा अॅसिडिटीचा त्रास सुरू झाला आहे ना.”
“असं का!! अहो ही टोपी बघा ना जरा फिट बसते का तुम्हाला ?”
“आण, आणि नाही फिट झाली तर काय तू परत उकलणार आहेस?”
“त्यात काय, तुमचं माप तर घेतलं होतं पण आता सानू इकडे आहे ना डोकं चालता चालता मोठं झालं असेल म्हंटल.”
“किती फालतू जोक करतेस ग तू, ही बघ जमली, ह्या हिवाळ्यात होते मला वापरायला. आता तू पैठणी नेस ना ग?”
“आता, रात्रीचे किती वाजले आहेत.”
“मग मी घातली ना टोपी, दाखवली तुला घालून, रात्रीचे अकरा वाजत आलेत आता.”
“ते काय टोपी होती, वरच्या वर घालायची होती.”
“मग पैठणी पण वर घालून बघ ना.”
“हुमम, काही ऐकायचे नाही तुम्ही.. द्या ते पाकीट इकडे.”.
आरतीने पैठणी नेसली, अरुणने ती टाचून दिली, रात्री अकरा बाराच्या जवळपास आई बाबा फोटो काढत होते आणि दारावर थाप पडली.
कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments