जोडीदार.. प्रवास तुझा माझा .. भाग 31

 जोडीदार.. प्रवास तुझा माझा .. भाग 31राणे पॅलेस
राणे पॅलेसमध्येही सर्व सानू आणि सुमंतची अतुरतेने वाट बघत होते. मासाहेबांनी श्रीकांतची खोली सुमंतच्या खोलीच्या शेजारी तयार करायला सांगितली होती. त्याच्या खोलीत हवं नको सगळं लागलं होतं.
सारंगचा शेवटचा यशस्वी प्रयोग फत्ते झाला होता, त्याने त्याचे थीसेस तयार केले होते, आणि जयाने तिचं मार्केटिंग स्किल लावून सारंगसाठी कंपन्यामध्ये सबमिट करण्यासाठी प्रपोझल तयार केलं होतं, तिलाही आता सानूशी फायनान्स बद्दल बोलायचं होतं.
सारंगीने तीचं काम परत सुरू केलं होतं. तिची वेबसाईट तयार झाली होती, तीही सुमंतची वाट बघत होती. निकोलसने स्टेविनला घरी परत बोलावलं होतं. तोही सुमंतची वाट बघत होता. मासाहेब जाम खुष होत्या. त्यांनाही सानूला मिठी मारण्याची आतुरता होती.
आज खूप दिवसांनी सारंगी माच्या खोलीत तिच्या सोबत गप्पा करत होती,
“मा, वहिनी कधी येते आहे ग? झालं असेल ना तीचं सगळं काम त्या मुलाला दत्तक घेण्याचं?”
“अग येते आहे ती, पुढल्या रविवारी फ्लाइट आहे त्यांची, आणि तो मुलगा काय म्हणतेस, श्रीकांत नाव आहे त्याचं, सानू त्याला श्री म्हणते.”
“श्री, मस्त नाव आहे, मा पण खूपच भारी डिसीझन ना ग?
“हो आता तीच असा घेवू शकते ह्यावर माझा विश्वास बसला, तिने घेतलेले सर्व निर्णय आपण बघत आहोत ना... काय ग निकोलस काय म्हणतोय?”
“काही नाही ग, सारखा म्हणतोय स्टेविनला तिकडे यायला, मॉमपण जसिकाला, तिकडे रहा म्हणून सारखी बोलत असते. आता निकोलसला मुलं होवू शकत नाहीत मग जसिका त्यांच्या लाडाची ना ग, मलाही म्हणाली दूसरा चान्स घे म्हणून.”
“घेणार आहे काय ग, म्हणजे बघा बाबा, माझं काही म्हणणं नाही आहे.”
“त्यावर माझं आणि स्टेविनच बोलणं झालं आहे, तसंही आम्ही घेणार होतोच पण मधल्या काळात काय काय झालं ते काय सांगायचं तुला, जावूच दे ना. पण आहे विचार, पण एवढ्यात नाही.. बघू.”
“बरं तुमचं दोघंच काय ते बघ, मला गोड बातमी दे म्हणजे झालं.”
सारंगी बराच वेळ मासाहेबांच्या खोलीत बसून तिच्या लॅपटॉप वर काम करत राहिली, मासाहेब असं तिला कामात मग्न बघून मनोमन खूप सुखावल्या होत्या. हल्ली त्यांनी सारंगीला असं बघितलं नव्हतं. सारंगी मासाहेबांना म्हणाली,
“मा माझी साईट तयार केली आहे मी, बघतेस काय ग, बघ ना जरा.”
“मला काय कळणार त्यातलं, दाखव, ये पण सानूला दाखव हा आली की.”
“हो दाखवेल तिला, तिच्याशी तर खूप काही बोलायचं आहे, पण तू आधी व्यूअर म्हणून तर बघ, माझं काम नव्याने सुरू करते आहे मी.”
“तो माझा चश्मा दे, हल्ली दिसत नाही ग?
“मा, म्हातारी झालीस तू, ते काय म्हणतात आपल्याकडे, बुढी... तू बुढी झालीस, घे लाव डोळ्याला.”
“ये कुणाला म्हणतेस ग बुढी, माझं काय वय झालं, आता कुठे माझ्या मोठ्याच लग्न झालंय, त्याची बायको अजून नवरी आहे.”
“पण नवरीने राणी म्हणून सत्ता हातात घेतली आणि सत्ता पार पालटली मा! आता तुझं कुणी ऐकणार नाही इथे! दादाच तर कुणी ऐकत नव्हतंच... पण दादाच्या बायकोचा दरारा भारी वाढला आहे इकडे. ती आहे नाही पण मला खात्री आहे सारी सूत्र ती तिकडून भारतातून हलवत असणार...”
“मग पसंत कुणाची आहे!”
“काय भारी पसंत मा, कुठून शोधलं ग आपल्या त्या न लक्ष देणाऱ्या दादासाठी.”
“मग शोधातच होते मी, किती कष्ट पडले तुला काय माहित, असा फोटो सुमंत समोर ठेवला आणि असं त्याने हो म्हंटल...”
“मा!!!”
सारंगी जरा वेळ मासाहेबांकडे आवक होवून बघत राहिली आणि मासाहेब सुद्धा.
“अग हो.... खरच ना, अग बाई, माझ्यातर लक्षात आलं नाही, त्याने कसं काय एका फोटोवर होकार दिला ग.”
“म्हणजे तू दादाची पसंत त्याच्या समोर ठेवून त्याला विचारलं, काही समजलं का?”
“अग बाई, मी माझ्या भाव विश्वात सानू माझी पसंत समजत होते आणि ती तर त्याची पसंत आहे. म्हणून ग, जोड्या ना तिथून ठरतात आणि आपण इकडे ओढताड करत असतो जुळवण्यासाठी.... किती वर्ष थांबला सुमंत शेवटी त्याचा जोडीदार त्याला मिळाला. “
“मा, पुरे आता वहिनी पुराण, तिची काही तोड नाही ग, काहीच न करता सारंकाही समजून घेत सहज सारी बाजी पालटवण म्हणजे काय डोकं लावलं यार तिने.... वादळ आहे असं मी माझ्या काही सोर्सेसकडून मला समजलं होतं. पण हे असं शीतल शांत पण सारचं उडवून नेवून नवीन बदलणार वादळ पहिल्यांदा बघते आहे.”
“नाही ग, तिला खूप वाईट वाटायचं तुम्हा सगळ्यांना बघून, तिने खूप रिसर्च केला तुम्हा सर्वांवर... आल्या आल्या ती कुणावर बरसली नाही कि काही बोलली नाही, मला तर वाटत होतं कि काही करू शकणार नाही... पण बघ ना सारंग आणि जया पूर्वी सारखे कामात असतात. आणि तू बघ स्वत:ला...”
“मा, मला समजलं आहे, दादाने जी रिस्क घेतली नव्हती ना ती वहिनीने घेतली आहे. निकोलसने सांगितलं मला... तिने सरळ मदत केली नाही कारण ते मला पटणार नव्हतं. स्टेविन म्हणाला मला, ताईला माणसं समजतात, मन कळतात, ती माणसांना जोडून बिजनेस करते, बिजनेस बघून माणसं जोडत नाही. राणे इंडस्ट्री खूप मोठी होणार ताईने जॉईन केल्यानंतर.”
“हो, ग सुमंतच खूप प्रेम आहे सर्वांवर पण त्याने तुमच्याकडे तुम्ही उभं राहावं म्हणून प्रयत्न केले नाही. मी आहे बघून घेईल असचं बोलत राहिला. त्रास होत होता त्याला पण, चालते ना चालू द्या करत राहिला.”
“मा त्याने खरच सर्वांचे शेअर काढून घेतले काय ग आणि वहिनी तेवढी पार्टनर आहे का?”
“हो, पण मला नाही वाटत सानू तसं होवू देईल. ही कंपनी ह्यांची होती. मग सुमंतने परत सर्व उभं केलं, तो नाही म्हणत होता मला तुमचे शेअर काढून घेण्यासाठी, पण मी पण त्या वेळी घाबरले होते घरातलं वातावरण बघून. सानू भरल्या घरातून आलेली मूलगी आहे, तिला जर त्रास झाला असता तर...”
“बरं , जावूदे, बघ माझी वेबसाइट आधी...”
दोघीही रमल्या, मासाहेब आज खूप आनंदी होत्या सारंगीसाठी. तीचं आणि स्टेविनच नातं परत बहरत होतं.
सावंत वाडा…..
“राणी ये राणी, राणी बाळा, सुनबाई, आहेस कुठे?”
राणी आणि सुमंत आज परत देवघरात अडकले होते, राणी सुमंतच्या मिठीतून निघून पटकन बाहेर आली,
“काय हो बाबा, काय हवंय तुम्हाला?
“राणी बाळा, तुझा निकाल आलाय ग, नेटवर, विषय सगळे निघाले तुझे, ७०% मार्क्स पडले तुला. आण पेढे आण बघू आधी, आणि मला पटकन दे ही खोलीतून येण्याआधी.
“तेवढ्यात आई बाहेर आली, हुम्म्म ऐकू आलय मला, काही पेढा बिढा मिळणार नाही, जा राणी आण ग आपण ह्यांच्या समोर खाऊया.”
तोच राजनही देवघरातून बाहेर आला, त्याला तिथून येतांना बघून आई म्हणाली,
“तू तिकडे काय करत होतास रे?”
“अग आई देवी पावली ना मला तिकडे, मग...”
“काय?”
राणीने डोळे मोठे करून राजनला बघितलं, बाबांचं लक्ष तिच्यावर आणि राजावर पडलं, ते चिडवत म्हणाले,
“आम्ही काही पाहीलं नाही बाबा... मी पण जोरूचा गुलाम आहे. आता माझा मुलगा तसा असेल तर आनंद आहे मला. बाकी बातमी शिळी ऐकवली वाटते मी.”
राणीने पेढ्यांचा डबा आणला होता, ती परत राजनकडे डोळे मोठे करून बघत म्हणाली,
“बाबा आशीर्वाद द्या.”
“अरे बाळा खूप मोठी हो आणि आमच्या राजनला सांभाळ बरं का? देवघरात पेढा ठेवला ना?”
राणीने लाजत पेढा आईला दिला, आणि मग राजनला, राजनने अजून एक मागितला, आणि डोळाही मारला.
“बाबा, बसा बसा सगळे, गप्पा करूया.”
राजन, “बाबा आता ते आपल्या कंपनीच काम मी राणीला समजावून सांगेल, तुम्ही पण हिला साईटवर घेवन जा अधून मधून. सगळं कळू द्या हिला आता. मीही लक्ष देतो आणि जसा जम बसते मी हा जॉब सोडून देईल.”
“बरं, आता राणी गाडी शिकली आहेच, तिला घेवून जाईल मी. आणि सगळं समजवून सांगेल.”
आई मधेच म्हणाली, “अहो आताच तिचा निकाल लागला, जरा घरी लक्ष देवू द्या. “
बाबा, “कशाला तू काय करतेस आता, तुझी हेडमास्टरकी आहे ना सुरु मग तिने का काही करू नये.”
“अहो तसं म्हणत नाही मी...”
“मग कसं... तुला काय म्हणायचं ना ते राहू दे तुझ्या जवळ. सावंतांची सून आहे, आजवर सगळ्या सावंत घराण्याच्या मुली उत्तम शिकल्या, नौकरी करतात, बिजनेस सांभाळतात, मग आपली सून का मागे राहावी.... मी तर म्हणतो उद्याच घेवून जातो मी राणीला आपलं ऑफिस दाखवून आणतो.”
“ठीक आहे. राणी आज मग काय मेनू सांगितला तू अम्माला.”
राणी आणि आई बोलत बसल्या होत्या तर आईने राणीला प्रश्न केला,
“काय ग तुझी बहिण सानवी कधी पर्यंत आहे इकडे. बरेच महिने राहिली ग .”
“हुम्म, ह्या वेळी श्रीकांतची दत्तक प्रोसेस होती ना म्हणून, राहणं गरजेच होतं नियमानुसार. आणि त्यांचा व्याप खूप आहे. जीजूचे बरेच प्रोजेक्ट सुरु आहेत भारतात.”
“हुम्म, मागे आली होती तर केवढी बदलली दिसली ना सानवी, आधी कशी असायची आता कशी दिसते. पेशवाई आली आहे तिच्या बोलण्यात. नाही, तशी ती आधीही समजून घेणारी होती पण तो पेशवाईपणा तिच्यात दिसतो हा आता. बोलणं, वागणं, हसणं सारंकाही नवीन वाटलं ग मला. भारी आत्मविश्वास आहे तिच्यात. असेल का नाही, सुमंतराव पण ना तीच ऐकतात म्हणे. त्यांनी तर पार्टनर म्हणून जाहीर केलंय ना सानवीला. चला, जोडीला जोड आहेत. आणि रंग उजळला ग सानवीचा, हो ना?”
“आई, ती गव्हाळ आहे पण सुंदर आहे, आणि आता लग्न, प्रेम, नाती... तशीही ती नाती जपण्यात माहीर होती आणि आता तर ती राज्याची राणी आहे. मग ते तेज तिच्यात दिसणार ना हो. तायडा डिसर्व करते आई हे सगळं, तिने खूप केलंय सर्वांसाठी. आजही ती आई बाबांच सगळं बघेत.”
राणीकडे सानू बद्दल बोलायला खूप काही होतं. तिची तायडा होतीच तशी तिच्यासाठी. बोलता बोलता रागिणीचा फोन आला, आईने उचलला, तिलाही राणीच्या निकालाची बातमी दिली. रागिणीनेही तिची ड्यू डेट सांगितली आणि आईची इकडे गडबड सुरू झाली. रागिणी सात दिवसांत इकडे येणार होती.
कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments