जोडीदार.... प्रवास तुझा माझा.... भाग ३९

 

जोडीदार.... प्रवास तुझा माझा.... भाग ३९

मोहिते निवास

“काय हो तुमच्या अमेरिकन लेकीचा फोन आला का?”

आई कुणाच्यातरी लग्नाची पत्रिका बघत बसली होती. अरुण फोन मध्ये शिरला होता, त्याने काहीच उत्तर दिलं नाही तर आरती जवळ येऊन बसली,

“काय हो कुठे आहात?”

“अग, शैलेश नाही राहिला ग.”

“अहो काय सांगता, आताच तर पंधरा दिवसाआधी तुम्ही सर्वांना आपल्याकडे बोलावलं होतं, तेही आले होते ना?”

“हो ग आला होता तो. पण..”

“मग काय झालं होतं त्याला.

“अग दोन दिवसाआधी बाथरूम मध्ये पाय घसरून पडला, घरी कुणीच नव्हतं, सुनबाई जेव्हा ऑफिस मधून आली, तेव्हा तिने हॉस्पिटलला नेलेलं, मी काल बोललो होतो ना आपण जाऊया म्हणून भेटायला, पण बघ ना आज गेला ग तो.”

“अहो पण.”

“अग, मागच हाड तुटला होता त्याचा, ऑपरेशन करतांनाच गेला ग.

“अग बाई फारच वाईट झालं हो. आता जायचं का आपण?

“हो, कर बरं तयारी, अंतिम भेटीला तरी जावूया. मी बाळूला सांगतो तो ड्राईव्हर अरेंज करून देईल.

“अहो सारखं त्याला काय सांगता, आता तुम्ही करा ना सवय, मागे तुम्ही नंबर घेतला होता ना, लावा ना त्याला. येईल तो.”

“अरे हो, तू तयार हो.  निघूया आपण.

दोघेही शैलेशकडे जाऊन आले, डोळ्याने बघून आले, जोडीदार तर त्याच्या आधीच देवाघरी गेलेला. मग कुणाला काय फरक पडणार होता. सगळी नाती नुसती नात्यासाठी राहिली होती. मुलगा सुनेने मानाचा मानपान सर्वांचा केला. आणि सारं काही त्याच दिवशी संपवलं होतं. सगळे कामाचे होते कशाला तेराव्या दिवसापर्यंत थांबून ठेवणार होते. फार कुणी रडून कोलाहल करणारं नव्हतं मग काही वाटत नव्हतं शैलेशकडे. इथलं कुणी आज गेलंय हे मानायला मन तयार नव्हतं. जेवणाचा कार्यक्रम असावा असा तो देखावा होता. त्यात कुणाचा तरी काय दोष ना, एक जोडीदाराच नातं तेवढं ह्यात होरपळून जातं आणि शैलेशची पत्नी तर नव्हतीच ना आता. परतीच्या प्रवासात आरती आणि अरुण गप्प झाले होते.

घरी आले, अंघोळी केल्या, दोघेही बसले. आरती म्हणाली,

“अहो, मी आधी गेले ना तर तुम्ही जीवाचे हाल करायचे नाही हा, तुमच्या लाडाच्या लेकीकडे राहायला जायचं. इकडे मुळीच राहायचं नाही. कोण करणार तुमचं हो.”

“ये अरु, असं काय बोलतेस ग....”

“मग काय तर हो, माणसं फार गुंतील असतात हो बायकोमध्ये, सारखी त्यांना बायको हवी असते, नुसता इथून तिथे पाण्याचा ग्लास द्यायला सुद्धा तुम्ही आवाज देते. आणि मी जवळपास नसले कि घाम फुटतो तुम्हाला.”

“मग कशाला जायचं तुला लवकर. राहा माझ्या सोबत.”

“अहो मी आपली सहज बोलले.”

“आणि मी गेलो तर.?”

“अहो असं काय बोलता हो.”

“मग आता कसं वाटलं, आणि तू बोलून गेली तर.”

“अहो.... मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय.”

“आणि मी राहू शकतो का मग, तू गेली तर मी पण येणार मागे तुला त्रास द्यायला.”

आरती आणि अरुणने आतापर्यंत थांबवून ठेवलेले अश्रु मोकळे केले होते. कुणीही कुणाचं नसतं ह्यावर आज त्यांचा विश्वास बसला होता. सुखाच्या क्षणात सगळे सोबत असतात आणि शेवटच्या क्षणात उरतो तो जोडीदार ह्याची जाणीव झाली होती.

अरुण आणि आरती समोरून संपूर्ण आयुष्य धावत निघून गेलं काही वेळात, अरुण हळूच म्हणाला,

“अरु, उगाच रागवलो होतो ना मी तुझ्यावर, जेव्हा माझा नवीन चष्मा तू चुकून तोडला होता तेव्हां, तुझा चुकून पाय पडला होता, तुला लागलंही होतं पायाला, दोन दिवस चालता येत नव्हतं तुला आणि मी उगाच तुझ्याशी अबोला धरला होता.”

“नाही हो, मीपण बघितलं नव्हतं आणि पाय ठेवला. त्यावेळी चष्मे पण काचेचे असायचे ना, आजकाल पडले तरी फुटत नाहीत. आणि तुम्हाला कुठे माहित होतं माझ्या पायाला काच रुतली होती म्हणून.”

“म्हणजे पायाला काच लागली होती तुझ्या. मला वाटलं होतं जरासं लागलं असेल. आणि तुझं माझं त्या दिवशी आईवरून जरा बोलणं झालं होतं मग मी लक्ष दिलं नव्हतं.”

“जावूद्या हो, मी विसरले, मीपण तर तुम्हाला किती बोलले होते जेव्हा माझी आई वारली होती आणि तुम्ही मला आज जावू उद्या जावू भेटीला म्हणून बोलत होता, आई तशीच मला न भेटता गेली आणि तुम्ही सुट्टी मात्र घेतली नाही म्हणून मी किती बोलले होते तुम्हाला, नंतर समजलं की तुमच्या सुट्ट्या नव्हते आणि पैसे काटल्या गेले असते म्हणून तुम्ही नाताळ आणि त्याला लागून येणार्‍या रविवारची वाट बघत होता आणि आई मध्येच अचानक गेली.”

“पण अजूनही खंत आहे ग मनात, मी तुझ्या आईच्या अंतिम भेटीला तुला नाही नेवू शकलो. तू मात्र माझ्या आईची शेवट पर्यंत सेवा केलीस.”

“राहूद्या हो, आता कशाला जुन्या गोष्टी काढायच्या. आता आपण आपले,”

हो ग पण आज वयाच्या ह्या वळणार जेव्हा आपल्यासोबत आपले मुलं नाहीत ना तेव्हा जाणवते, आपण आपल्या जोडीदारासोबत कसं वागलो म्हणून. पण आता मला तुला जपायचं आहे.”

“आणि मला तुम्हाला.”

आरती आणि अरुणने मिळून आज स्वयंपाक केला, दोघाच्या औषधी घेतल्या. आणि गुमान श्रीदेवीचा चालबाज सिनेमा  बघत बसले.

सानुला सहावा महिना लागला होता आणि आईची परत घाई सुरू झाली होती. त्या दिवशी सानूचा फोन आला, बाबा तिच्याशी बोलत होते, मागून आई इशार्‍यात त्याला इशारा करत होती. तर बाबा सानूला म्हणाले,

“सानू कधी येत आहेस बाळा मग इकडे. पहिलं बाळंतपण आहे तुझं. माहेरी येणार ना? आता तू मोठी पेशवेबाई, राणी आहेस तुझ्या राज्याची पण आम्ही आई बाबा आहोत. येणार ना बाळा?”

“अहो बाबा, मी तिकडे आले तर होणार्‍या बाळाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार नाही ना, त्याच्या भविष्यासाठी मला इकडे राहावं लागेल. बेबी झालं कि महिन्या भरात तिकडे येतोय आम्ही. माला पण आता इकडे करमत नाही त्यांची तर सारखी प्रकृती खराब असते. जरा बदल म्हणून मासाहेब आणि आम्ही येतोय. जयापण येणार आहे माझ्यासोबत. आणि सारंगी सुद्धा. आम्ही सगळे तिकडे महिनाभर मस्ती करणार आहोत. आराध्या मावशीपण येणार आहे आमच्यासोबत.”

सानू एवढं भरभरून बोलत होती कि बाबा काहीच बोलू शकले नाही. आईच्या सगळ्या गोष्टी मनात राहिल्या. सानूचा फोन झाला आणि आई बाबा परत जरा वेळ शांत झाले. आईने घर आवरायला घेतलं होतं पण आता काही त्याची गरज नव्हती. बाबाने दीर्घ श्वास घेतला, आणि म्हणाले,

“अरु आता नवीन पिढीच्या नवीन गरजा ग, आपल्याला वळावं लागेल ना, नाहीतर...””

“नाहीतर आपण वाईट...”

“जावूदे ग ...”

“चला बारसं तरी करणार आहे का आपल्याकडे, कि तिच्या राणे बंगल्यात?”

“अरु आता चिडू नकोस, इकडे येत आहे म्हणते ना ती, मग आता ती कुठेही करो, आपल्याला आपल्या नातवाला भेटायला मिळणार ना मग झालं ग.”

“हुम्म्म”

“मी खुष आहे, अग सानू, आपली सानू, वादळ, एका बाळाला जन्म देणार आहे, अजून आय हवंय तुला.”

“मीही खूप आनंदी आहे हो, म्हणून काही स्वप्न बघीतली होती ना, आता श्री तिचा मोठा मुलगा, जन्म नाही दिला त्याला तिने पण आता होणारं बाळ मग तिचं डोहाळे जेवण वगैरे मी विचारात घेतलं होतं, हे बाई नागरिकत्व काय ते माझ्या मेलीच्या डोक्यात आलं नाही. जावूदे मी आराध्याला सांगते सानूचं सगळं करायला.”

“मग आता कशी बोलली तू. अग सानू आपली सानू, कालपर्यंत तू तिच्या नावाने ओरडत होतीस, लग्न करत नाही म्हणून, आणि आज बघ ती एका मुलाची आई आहे, आणि दुसर्‍याला जन्म देत आहे.”

“बसं माझ्या राणीच्या नशीबात हे सुख लवकर येवू देत म्हणजे झालं.”

“हुम्म्म, आता गाडी ह्या रुळावर आली, बघ लागून अनुपण आहे शेजारी. घसरशील त्या रुळावर.”

“अनु बोलली मला, ती सांगेल मला.”

“असं, म्हणजे सूनेच सगळं माहित असते तूंला.”

“मग, बघताय ना मुली, माझी सून कामाची, आणि हो ती तर मागे म्हणाली होती मला, आम्ही लवकर येणार म्हणून.”

“आणि अंकित जर्मनीला जातोय त्याचं काय झालं.”

“जातोय ना, ती पण जाणार आहे, पण त्या नंतर ती बंगलोरचा जॉब सोडतो बोलली, आणि इकडे बघणार म्हणाली, आणि अंकितचा प्रोजेक्टपण इकडे आहे त्या नंतरचा.”

“चला कुणाशी तरी पटते तुझं.”

“काय म्हणालात.”

“काही नाही.”

अरुण आणि आरतीने स्वत:च्या मनाला समजावलं आणि सानूची वाट बघत होते. राणीला मात्र ह्या महिन्यात सुद्धा अपयश आलं होतं. अंकित जर्मनीसाठी निघून गेला होता. अनुने काही दिवस तिच्या आई बाबांना बंगलोरला बोलावलं होतं. ती सानू इकडे येईपर्यंत थंबणार होती. अजून तीन महीने तिचा जॉब होता. नंतर ती मोहिते निवासात राहणार होती.

@everyone
कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल-

Post a Comment

0 Comments