बॉस !!!
समृद्धीला ऑफिस जॉईन करून दोन आठवडे झाले होते. अजूनही ती ऑफिसच्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकली नव्हती. तिला सगळ्यांकडून बाहेरच्यासारखीच वागणूक मिळत होती. साधी, भोळी दिसायची म्हणून कुणीही काहीही काम तिच्याकडे ढकलून द्यायचे.
स्वप्नं मात्र मोठी होती तिची. कामात बारीकसारीक गोष्टींचीही नोंद ठेवायची, पण तरीही कुणाच्या नजरेत येत नव्हती.
त्या दिवशी ऑफिसमध्ये जरा जास्तच धामधूम होती. मंजिरी आत येताच जोरात ओरडली,
“हॅलो ऑल! मला काम हवं आहे. इथे टाइमपास करायला कोणी आलं असेल तर रिजाइन लेटर माझ्या टेबलवर ठेवा. बाहेर हजारो लोक चेंगराचेंगरी करत आहेत आपल्या कंपनीत येण्यासाठी, आणि इथे तुम्ही एसीमध्ये आराम करत बसलात?”
“गणपत! सगळ्यांना गरमागरम कॉफी दे. आणि ऐक, इकडे अजिबात फिरकायचं नाही. कुणीही आवाज दिला तरी.”
तीव्र नजरेने सभोवताल बघत मंजिरीने समृद्धीकडे बोट दाखवलं,
“ऐ समृद्धी, तू माझ्यासोबत राहायचं.”
“हो मॅडम,” समृद्धी घाबरत म्हणाली.
इतक्यात बिपाशा तिथे आली, तिच्या नेहमीच्या आत्मविश्वासाने म्हणाली,
“हे गाइज, आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. सो लेट्स डू इट.”
तिने समृद्धीकडे पाहिलं आणि मिश्कीलपणे विचारलं,
“ही कोण?”
मंजिरी शांतपणे म्हणाली,
“बिपाशा, प्लीज. ही आहे समृद्धी.”
“पण लुक अॅट हर यार!” बिपाशा खवचटपणे म्हणाली.
मंजिरी थोडी चिडलीच,
“मला काही फरक पडत नाही. मला फक्त कामाशी मतलब आहे. सांगितलं तेवढं ती करते.”
“पण यार... तुझा एक स्टेटस आहे. हाऊ कम यू...?”
“बिपाशा, शिकेल ती. वेळ द्यायला हवा. मुलगी स्मार्ट आहे.”
बिपाशा अजूनही हट्टाने म्हणाली,
“मी तर म्हणते शनयाला ठेव सोबत. ही... ही दिसतेच इतकी चीप.”
मंजिरी तिच्याकडे रोखून बघत म्हणाली,
“तू तुझं सजेशन स्वतःजवळ ठेव. मला काम करणारी माणसं हवीत. ओठांवर दहा वेळा लिपस्टिक लावणारी नाही. आणि आता जा, तुझं काम बघ.”
बिपाशाने तोंड वाकडं केलं. जाताना समृद्धीवर एक घाणेरडा कटाक्ष टाकला. समृद्धीच्या डोळ्यात पाणी तरळलं.
मंजिरीने ते पाहिलं.
“ऐ, ते अश्रू पुस! आणि पगार आला की काहीतरी चांगले कपडे घे. उगाच ती आणि शनया तुझ्या नावाने गॉसिप करत असतात. मला फरक पडत नाही, पण तुला पडेल. ऑफिसमध्ये दिसणंही महत्त्वाचं असतं. जसं इथे सगळे घालतात तसं घाल. आणि एक बोल सर्वांशी पण अंतर ठेवून. जास्त जवळीक नको.”
समृद्धीने परत एकदा तिचा टॉप बघितला, तो तिचा आवडता टॉप होतो. सुहासने खूप प्रेमाने घेतला होता तिच्यासाठी. आज मुद्दाम तिने प्रेझेन्टेशन असल्यामुळे घातला होता. सकाळी तो घालतांनी तिने काढलेली फोटो तिने सुहासला पाठवले होते आणि त्याच्या कॅमेन्टच्या आनंदात आज ती ऑफिसला आली होती, पण इकडे तिला कुणी बघितलंही नव्हतं...
इतक्यात कुशल तिच्या टेबलजवळ आला,
“मंजिरी मॅडम, हे कॉटेशन बघा ना. एका छोट्या कंपनीचं आहे, एस अँड एस नावाचं.”
मंजिरीने कटाक्ष टाकला, “तूच बघ रे. असलं छोटं काम मला विचारत जाऊ नकोस. कितीचा आहे तो कॉन्ट्रॅक्ट... पन्नास हजार ना? देवून टाक. नवीन कंपनी आहे, करेल काम. आपल्याकडे पुरेसं मोठं काम आहे. आज तर पाच हजार कोटींची डील होणार आहे, त्याकडे लक्ष दे.”
“समृद्धी, प्लीज ते कॉंट्रॅक्ट घे आणि शिक्का लाव कंपनीचा. दे कुरीकॅर करून त्या एसअंडएसला.”
बोलताना मंजिरीने स्वतःला नीट केलं, लाल भडक लिपस्टिक परत लावली. माधव घोसला आज लवकर आले होते. मंजिरी त्याच्या कॅबीनमध्ये बिनधास्त शिरली. बराच वेळ ऑफिसमध्ये शांतता पसरली.
समृद्धीने सुहासला मेसेज केला की कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. दोघेही खुश होते. काही वेळापूर्वी बिपाशाने बोललेलं मनावर घेतलेलं, पण सुहासशी बोलताच ती परत खुलली होती.
थोड्या वेळाने बिपाशा शनयाला घेऊन आली आणि समृद्धीला टोचून म्हणाली,
“ऐ सलवार, शिक ना थोडं! मंजिरीसोबत राहतेस, ती कुठे, तू कुठे? पाहिलंस का, ती माधव सरांच्या कॅबिनमध्ये आहे. आणि तू? कधी भेटलीस का सरांना?”
रुद्र शांतपणे म्हणाला,
“बिपाशा मॅडम, सगळे मंजिरी मॅडम नाहीत. सगळ्यांना घर आहे, नाती आहेत.”
बिपाशा हसली,
“हे मंजिरीसमोर बोलशील का? मग मी तुला प्रमोशन देईन.”
“मला नको तुमचं प्रमोशन. मंजिरी मॅडम कामाची किंमत जाणतात. त्या करतील माझ्यासाठी.”
“कधी? चल माझ्यासोबत... मी तुला...”
“बिपाशा मॅडम, प्लीज तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला जा ना, इकडे का येता हो?”
“ऐ हँडसम! तुला माहीत नाही मी इकडे का येते ते. साली ती मंजिरी येवढा मोठा एरिया घेऊन बसली आहे आणि मी माधवची मामे बहीण असून सुद्धा तिकडे वेबसाइट डिपार्टमेंटला आहे.”
“मंजिरी मॅडम काम करतात.”
“मला नको सांगू तू, ती कुठलं काम करते, आता एक तास जास्त झालाय तिला माधव सरांच्या कॅबिनमध्ये.”
तेवढ्यात मंजिरी ओठं नीट करत कॅबिन मधून आली, तिला बघताच, बिपाशा तिच्याकडे आली,
“हे डार्लिंग, सो, ऑल डन, रेडी फॉर द प्रेझेंटेशन.”
“ऐ, हो बाजूला, रेडी नाही तर काय! तुझ्यासारखी नुसते अपडेट करत नाही मी. काम करते.”
तिने शनयाला आवाज दिला, “शनया तू माझ्या सोबत राहा, आणि समृद्धी तू इथेच कॅबिनमध्ये थांबायच.”
हे ऐकताच बिपाशा मिश्कील हसली, तर परत मंजिरी म्हणाली,
“समृद्धी तू आताच जॉईन केलसं, शनया इथे खूप आधीपासून काम करते. तू आधी शिक मग बघू.”
शनया खूप खुश झाली होती पण समृद्धीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. रुद्रच्या लक्षात आलं होतं की नेमकं माधव सरांच्या कॅबिनमध्ये काय झालं असावं. मंजिरीचं वागणं त्याला जरी बाहेरून कठोर वाटायचं, तरी त्याला तेच आवडायचं. ती वेगळी होती, तिचं वागणं कुणालाच पूर्णपणे समजत नसलं तरी रुद्रला जाणवत होतं की ती समृद्धीला स्वतःच्या पद्धतीने जपते आहे. पण ते उघडपणे कुणाला कळणार नव्हतं.
माधव कॅबिनमधून निघून सरळ सेमिनार हॉलकडे गेला आणि त्याच्या मागोमाग संपूर्ण टीम गेली. समृद्धी मात्र तिच्या टेबलावर शांतपणे बसून फाइल्स नीट करत राहिली. तिच्या डोळ्यांत प्रश्न होते पण आवाज मात्र गोठून होता.
कुशल तिच्या जवळ येऊन हळूच म्हणाला,
"हम्म… ही मंजिरी मॅडम ना अशीच आहेत. पण तू नको काळजी करू. ती तुझी बॉस आहे खरी, पण आपले अजून मोठे बॉस आहेत. तुला नक्की चान्स मिळेल. थोडा वेळ जाऊ दे. आता काय दोन आठवडे तर झाले आहे तुला इथे. ती मंजिरी किती दिवस अडकवून ठेवणार तुला."
समृद्धीने काहीच उत्तर दिलं नाही. ती डोकं खाली घालून फक्त कामात बुडाली.
तोच गणपत तिकडे आला.
"मंजिरी मॅडम नाहीत ना इकडे... चहा, कॉफी हवी आहे का कुणाला?"
समृद्धीला हवंच होतं, पण कुशल आणि समोर बसलेली सवी काय बोलतील म्हणून ती गप्प बसली. गणपतने मात्र काही न विचारता तिच्या टेबलावर कॉफीचा कप ठेवला.
"घ्या मॅडम. आणि काळजी करू नका. मंजिरी मॅडमसोबत काम करताय तुम्ही, खूप शिकायला मिळणार आहे. त्यांना मोठ्या बहिणीसारखं माना. खरंय, त्या कठोर आहेत, पण मनाने खूप छान आहेत."
समृद्धीने गुमान कॉफी घेतली आणि पुन्हा कामात मग्न झाली. तरीही मनात सतत विचार सुरू होता. आधी तिला सोबत ठेवायला तयार असणारी मंजिरी, अचानक शनयाला प्रेझेंटेशनसाठी घेऊन गेली होती. हे का झालं, याचं उत्तर कुणी देणार नव्हतं तिला.
दोन तासांनी मिटिंग संपली. सगळे परत त्यांच्या जागेवर आले. मंजिरीने तिची नेहमीची सिगरेट काढली आणि बाहेरच्या कोपऱ्यात ओढायला गेली. तेवढ्यात जुली समृद्धीजवळ आली,
"समृद्धी, तुला मोठ्या साहेबांनी बोलावलं आहे."
हे ऐकून रुद्र पटकन जागून उभा राहिला. त्याला ताबडतोब काळजी वाटली आणि त्याने मंजिरी कुठे आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. शनया मात्र हसत समृद्धीकडे आली,
"सो… मी म्हणाले होते ना, बॉसची नजर सगळ्यांवर असते. जा, जाऊन भेटून ये."
समोर बसलेली सवीने हे ऐकून नकळत नाक मुरडलं आणि परत तिच्या कामात बुडाली. पण रुद्र, कुणाल आणि कॅबिनमधले अनेक डोळे समृद्धीकडे लागले होते.
समृद्धी उठली. तिच्या ओठांवर हलकंसं हसू आलं होतं पण हृदयात धडधड वाढली होती. ती सावकाश पावलं टाकत माधवच्या कॅबिनमध्ये पोहोचली.
माधव पाठमोरा बसला होता. ती आत येताच त्याने खुर्ची फिरवली आणि हसत म्हणाला,
"येस, कम मिस समृद्धी. व्हॉट अ लव्हली नेम… सीट प्लीज, बी कम्फर्टेबल बेबी."
समृद्धी अवघडत बसली. तिने जबरदस्तीने स्मितहास्य दिलं. माधव पुन्हा म्हणाला,
"मी प्रेझेंटेशनला तुला पाहिलंच नाही. मी तर आवर्जून मंजिरीला सांगितलं होतं की नवीन स्टाफला चान्स द्यायला हवा. ते महत्त्वाचं आहे...राईट!"
बोलता बोलता तो उठून तिच्या जवळ आला. इतकं धिप्पाड व्यक्तिमत्व एवढ्या जवळ उभं बघून समृद्धी क्षणभर बावरली. तिचे शब्द अडखळले. तिच्या पाठीवर थोपटत माधव म्हणाला,
"खूप शिकायचं आहे तुला. सो बी बोल्ड. मी तुला नक्की चान्स देईन. काही काळजी करू नकोस. तुझ्या नजरेत काम करण्याची जिद्द मला दिसते आहे. आय लाईक इट."
समृद्धी आधीच त्याच्या त्या स्पर्शाने अजूनच बावरली, मनाला काटे आले होते पण शरीर तग धरून होतं. समृद्धीला काही सुचलं नाही. सहजतेने ती उठली आणि आदराने त्याच्या पायाला हात लावला. पण माधवने लगेच तिचा हात धरला आणि म्हणाला,
"अगं हे नको करू. मी माझ्या स्टाफला नेहमी समान दर्जा देतो." म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला, घट्ट केला, तर इतक्यात दार ठोठावलं गेलं. मंजिरी आत आली. तिने नजर रोखून माधवने समृद्धीच्या धरलेल्या हाताकडे बघितलं. तसा माधवने हात सोडला. ती लगेच म्हणाली,
"समृद्धी, मला सरांशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तुझं काय ते आपण नंतर बोलू."
मग सरांकडे पाहत ती म्हणाली,
"काय सर, मी असताना तुम्हाला स्टाफकडे लक्ष द्यायची काय गरज आहे."
आणि दोघं हसले. समृद्धी हळूच उठून निघत होती, तेव्हा मंजिरीने तिला थांबवलं, डोळे रोखून तिने तिला म्हंटल,"गणपतला सांग, दोन कॉफी आणि बिस्किटे घेऊन यायला. आणि टेबलवर नवीन फाईल्स ठेवल्या आहेत, तुझं काम कर."
समृद्धीला राग आला. तिच्या मनात विचार आला, "माधव सर काहीच बोलले नाहीत. इथे खरंच बॉस कोण आहे? माधव सर की मंजिरी?"
बॉसच्या बॉससमोर असतानाही बॉसिंग मात्र मंजिरीच करत होती. हे तिला समजणे कठीण झाले होते.
----पुढील भाग लवकरच ...आधीचे भाग पेजवर आणि साईटवर आहेत.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
@followers@topfans#उर्मिलादेवेन #मनातल्यातळ्यात #मराठी #मराठीstoriesories Marathii #कथा मन माझे मराठी
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by pixabay
0 Comments