वॉर ऑफ टॅलेंट- भाग १

 

वॉर ऑफ टॅलेंट 



बघता बघता तीन महिने झाले होते समृद्धीला घोसला कंपनीत. तिचं काम चांगलं होतं, पण तिच्या भोवती चालणाऱ्या अदृश्य खेळांची तिला कल्पनाच नव्हती. कंपनीत बाहेरून पाहिलं तर सगळं शांत, व्यवस्थित वाटायचं, पण आतून ती एक रणभूमीच होती, द वॉर ऑफ टॅलेंट.

ऑफिस म्हणजे फक्त डेस्क, फायली, कॉम्प्युटर आणि टार्गेट्स यांची मांडणी नसते. ते एक रंगमंच असते. प्रत्येकजण आपली भूमिका करतो, कुणी चमकून नायकासारखा, कुणी कटकारस्थानं रचणारा खलनायक, कुणी तटस्थ प्रेक्षक, तर कुणी शांत सेवक. पण या रंगमंचावर खरी लढाई चालते ती  टॅलेंटची, कोण किती पाण्यात आहे, कोण किती वर जाईल, ह्याची चढाओढ सतत सुरू असते.

समोर हसरे चेहरे, मागे राजकारण. हे सर्व समृद्धीच्या लक्षातच येत नव्हतं. कॉलेजच्या दिवसांत तिने ज्या कॉर्पोरेट विश्वाची स्वप्नं रंगवली होती, ती पूर्ण करायची होती; पण हे सारे हेवे-दावे, या ईर्षा, आणि त्यात स्वतःचं स्व जपणं अजून तिला गवसलेलं नव्हतं.

प्रत्येक जण आपली जागा पक्की करण्यासाठी होता, त्याच्यावर काहीही जास्त काम येऊ नये ह्या प्रयत्नात, सतत काम दुसऱ्यांवर ढकलण्याची प्रवृत्ती सर्वत्र जाणवत होती... सारे जणू ही यशाची सीडी चढून पुढच्या पातळीवर जाण्यासाठी झगडत होते. मंजिरी... तिच्या नजरेतून काहीही सुटत नसे. ती नवीन लोकांना शिस्तीत आणायची आणि जुन्यांना तिच्या हाताखाली ठेवायची. त्यात पुढच्या पायरीवर जाण्यासाठी एखाद्याला पायाखाली चिरडावं लागलं तरी पर्वा नव्हती.

मंजिरी... ती एवढ्ची निपुण होती की तिच्यापुढे कुणाचे काहीच चालत नसायचे... तिच्या नजरेतून काहीही सुटत नसे. नवीन लोकांना शिस्तीत आणणं आणि जुन्यांना तिच्या हाताखाली ठेवणं ही तिची खासियत. पण तरीही, तिच्या मागे बरेच काही घडत होतं.

रोहन वेगळाच. स्वबळावर त्याने आपली जागा कमावली होती. मंजिरीला टक्कर देण्याची क्षमता एकट्याने त्याच्यात होती. पण मंजिरीचं वर्चस्व त्याला सतत खटकत असे. माधवची मंजिरीला मिळणारी साथ त्याच्या मनातल्या मत्सराला पेटवत होती. तसं कारण त्यालाही माहित होतं आणि त्यात त्याला आतून वाटायचेही की मंजिरी हुशार आहे, पण तरीही तिच्या चुका कुणीतरी उघड कराव्यात, तिला कोणी तरी खाली खेचावं, असं त्याला वाटत राहायचं. आणि त्यासाठी समृद्धीसारखी नवीन मुलगी त्याला सोपं टार्गेट वाटत होती.

मंजिरी इथवर तिच्या टॅलेंटच्या जोरावर आली होती, कंपनीच्या सुरवातीच्या कळात तिने घेतलेले सर्व निर्णय उत्तम ठरले होते. तिच्या कामाची सतत प्रशंसा होत होती. पण कधी रुळ बदलले, ती दुसऱ्या मार्गावर निघाली, हे तिला समजलं नाही. आणि मग ती अशा परिस्थितीत अडकली की जिथून सुटका शक्यच नव्हती. जेव्हा तिची चूक तिला गवसली, तेव्हा वेळ तिच्याकडे उरला नव्हता. आता ती चूक तिच्या मनात एक प्रश्नचिन्ह होऊन ठाण मांडून बसली होती.

दरम्यान, नवीन क्लायंट्सचा दबाव वाढत चालला होता, तोही कामात नवीन असल्याने काहीच अनुभव मर्यादित होता.  सर्व  जबाबदाऱ्या  घोसला कंपनीच्या स्टाफलाच पेलाव्या लागत होत्या. मंजिरी सतत चिडचिड करत असायची. त्या दिवशी तिला अचानक माहित झाले होते, तिने समृद्धीला थेट तिच्या कॅबीनमध्ये बोलवले, समृद्धीचं हृदय धडधडू लागलं. शनाया आणि कुशलने तिला धीर दिला पण शनायाच्या डोळ्यात लपवता न आलेला आनंदही दिसला.... समृद्धी कॅबीन मध्ये शिरली,

मंजिरीने थेट प्रश्न केला,” माधवच्या फोर्महाउसला तू गेली होतीस का?”

समृद्धी दचकली. डोळ्यांत पाणी उभं राहिलं. तसा मंजिरीने आवाज वाढवला....

“तू आली होती का?”

“नाही.... पण मला सरांनी बोलावले होते... मी आली होती तिकडे पण आत येण्याचे धाडस केले नाही मी. त्याचं ऑटोने परत निघाले.”

“ऐ बावळट... सीसीटीव्हीमध्ये दिसली तू... ती शनाया आणि बिपाशा तुझ्याबद्दल काय काय बोलत आहे माहित आहे तुला... अगं एकदा मला बोलायचं ना, मी माझ्यासोबत घेऊन गेले असते तुला....”

समृद्धी गप्प होती, काय झाले हे तिला सुचत नव्हते.

“पण मी काहीच ...”

“अगं बाई तू मागच्या दरवाज्यातून निघताना दिसत आहेस... अर्थ समजतो का तुला आणि तेही घाबरलेली... घोसला फार्म हाउस मधून निघत होतीस... आता सांग. तुझं काय करू मी....”

“काय झालं मॅडम? मॅडम, खरंच मी....”

“ठीक आहे जा. पण लक्षात ठेव, ह्या कंपनीत काम करायचे असेल तर माझ्याशी प्रामाणिक तू राहावी एवढचं मी बोलेल.... बाकी मी सगळ्या गोष्टी तुला बोलून दाखवू शकणार नाही... इथे कुणावरही विश्वास ठेवायचा नाही, समजलं! माझ्यावरही नको ठेवू, पण प्रामाणिक राहा... हुशार आहेस, पण नुसतं हुशार राहून चालत नाही गं कॉर्पोरेटमध्ये काम करताना... चारही दिशेने बघत आपली हुशारी जपावी... बसं वाहून जाऊ नको.... जशी आहेस ना तशीच रहा पण जपून. जा काम कर.. मी आहे.”

मंजिरीने आधी घोसला फार्महाउसचे सीसीटीव्ही फुटेज डीलीत करायला सांगितले. आणि शनायाला आत बोलावले,

शनाया, हा जो तुझा गॉसिप करण्याचा टॅलेंट आहे ना, त्याने तू कधी पुढे जाणार नाहीस. समृद्धी तुझ्यापेक्षा ज्युनिअर आहे, पण हुशार आहे. तिचं काम चोख आहे. चुका करत नाही. नाही समजलं तर प्रयत्न करते. आणि तू? तिच्या पायात अडथळे आणायचे प्रयत्न सुरु केले आहेस? तू.... तू  तिच्या मार्गात उगाच गॉसिप करून दगड पाडू नको... एकदा का ती हे तुझे दगड तुलाच मारायला शिकली ना तर तू घायाळ होशील... संपशील!!

मला बऱ्या पैकी माहित आहे तू त्या दिवशी समृद्धीला फोर्महाउस मधून मागच्या गेटवरून निघून जाताना बघितले होते.... काय बोलत आहेस तू बाहेर... तिला ह्या प्रोजेक्ट मध्ये काम मिळत आहे कारण ती घोसला फोर्महाउसच्या माधवच्या रुममधून निघाली... हे हलकट ती आली तरी होती का आत? ह्या असल्या बिनबुडाच्या अफवा पसरवण्याचा पगार देते का तुला कंपनी...”

शनाया काहीच बोलत नव्हती, उत्तर नव्हतं तिच्याकडे. तर मंजिरी परत तिला बोलली, “त्या बिपाशाच्या जोरावर उडू नको.... तिला कधी इथून काढेन ना मी तुला समजू देणार नाही. ह्यानंतर मला असे माहित झाले नां तर आधी तुला बाहेर करेन इथून... आपल्या घरच्यांना विचार कर.... आई आजारी असते तुझी, काळजी घे. लग्न कर लवकर... असल्या गोष्टीत पडू नको... निघ आता आणि समृद्धीपासून दूर राहायचं.”

शनायाला राग आला होता... ती तिच्या जागेवर आली. समृद्धी कामात मग्न होती. तिने समृद्धीला धक्का देत विचारलं, “चल कॉफी घ्यायची का?”

मग तिने तिला हसत बघत तिची स्तुती केली, अरे किती सुंदर टॉप आहे तुझा, कुठून घेतला मला पण हवा आहे.”

समृद्धीचा पडका चेहरा जरा उठला .तिलाही कॉफी हवी होती तिने मान हलवली आणि दोघीही पॅन्ट्री मध्ये बसल्या. आणि शनाया बोलायला लागली,

“ही मंजिरी कशी इथवर आली तुला माहित आहे का गं?”

समृद्धी दचकली,  तिच्यासाठी हा अनपेक्षित विषय होता, टॉपची माहिती न विचारता शनाया काय बोलत आहे हे तिला समजणे कठीण होते, अवघडत म्हणाली, “म्हणजे, हुशार आहेत त्या. कामात चोख वाटतात.”

“हुम्म्म... असचं वाटते सर्वाना, पण ‘ही’ ना माधव सरांची ‘ती’ आहे, म्हणून तर चढली आहे ह्या ऑफिस मध्ये. बाहेर हिला कुणी किंमत देणार नाही. सरांच त्यांच्या बायकोसमोर काहीच चलात नाही आणि इथ ही त्याचं काहीच चालू देत नाही हा तिचा टॅलेंट. मला तर माहित आहे ही सध्या माधव सरांवर लग्नासाठी प्रेशर देत आहे. तुला सांगू ही ना माधव सरांसोबत तिकडे बंगल्यावर असते... ते फार्म हाउस त्यांनी हिच्यासाठी तर बांधले आहे.

आता समृद्धी उठली, फार्म हाउसच्या नावाने भीती मनात भरली तिच्या, तसं शनायाएन तीला ओढत बसवलं,

“जाऊदे आपल्याला काय, तू काही तिचं मनावर घेत जाऊ नको. मला तर ती आता एवढी बोलली की काय सांगू... मी धीट उभी होते... माधव सर आहेत आणि आता तर रोहन सर आहेत मी त्यांना जाऊन हिच्याबद्दल सांगणार आहे. ही आहे म्हणून इथे कुठली दुसरी स्त्री प्रमोशन घेत नाही.”

समृद्धी हळूच म्हणाली, “मग त्या सावी मॅडम?? त्या मनेजर कश्या प्रोडक्शन डीटेल्स बघतात त्या. नुसत्या कामात असतात. वेळेत घरी जातात. बोललं तेवढं बोलतात.”

“ती चोमडी, शी इज सो टॅलेंटड डीअर... पण तिची अर्धी हुशारकी त्या मंजिरीला मसाज करणायत जाते. काय तिलाच नुसतं काम पडत असतं तिलाच माहित. आता काही सहा महिन्या आधी तर तिचे प्रमोशन झाले.”

“त्याचं लग्न झालं आहे ना?”

“हो, एक मुलगी आहे तीन वर्षाची. नवऱ्याच गारमेंट शॉप आहे... गरज आहे गं तिला.”

समृद्धी हळूच म्हणाली, “गरज सर्वाना असते गं... म्हणून काय...”

आता मात्र शनाया थबकली, तेवढ्यात कुशल तिकडे आला, आणि समृद्धीचा हात पकडून त्याच्यासोबत बसायला आग्रह करू लागला, शनाया लगेच बोलली, “ओ, सो यु लाईक हर... व्हाट अ चोइस कुशल... ओके कॅरी ऑन.”

ती निघून जाताच समृद्धी कुशलवर ओरडली, “हे मला असं आवडत नाही, सोबत काम करत आहोत. ठीक आहे. पण हे असं ओढणं मला चालणार नाही. तू कुणालाही तक्रार केली तरी हरकत नाही. तसही  तुझं सगळं काम मीच करते, उगाच क्रीडक्ट घेतो तू. “

कुशल स्तब्ध झाला होता, तिला शांत करत बोलला, “चिल... ओके... मला वाटलं तुला ...”

“काय वाटल? मी नवीन आहे म्हणून काही समजत नाही? आजच बोलते मी मंजिरी मॅडमशी. मला तुझ्यासोबत काम करायचं नाही.”

आज पहिल्यांदा तिने तिचा मराठी बाणा दाखवला होता. कुशलही जरा गडबडला होता.  आणि दुरून चोरून बघणारी शनायासुद्धा. 

#दकॉर्पोरेट लॅडर चे आधीचे भाग पेजवर आणि साईटवर आहेत!!
to be continued...
----पुढील भाग सोमवारी...
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.

पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI

Post a Comment

0 Comments