‘मोह” तुझा मी आवरू कसा! 'द टेम्प्टेशन' - भाग १

 


मोह… 'द टेम्प्टेशन’ -भाग १
"मोहन सोफा ह्या इकडे भिंतीकडे लावू या ना."
"हो गं, तुला जिथे हवा तिथे कर, माझं ऐकणारं आहेस का तू? "
"म्हणजे रे! काहीही पर्मनंट नसतं, आज माझ्या मनाने, नाही पटलं मागे पुढे तर तुला हवा त्या ठिकाणी लावू ना! "
"हो माहित आहे, अजूनतरी तो दिवस आला नाही कधी."
"ए, काय रे! किती मस्त वारा सुटलाय, मला ना हे अशेच मोठाले परदे हवे होत, मस्त वाटतंय रे! "
मालिनी अलगद खिडकीजवळ उभ्या असणार्या मोहनला मागून बिलगली, मोहन दहाव्या माळेवरून खाली बघत होता. जरा दचकला, पण मालिनीचा स्पर्श लागताच सावरलाही, प्रेमाने भरारी घेतली, मनाचा वसंत फुलला, अलगद वळून त्याने तिला गच्च मिठीत घेतलं, तिच्या गालावर पडणाऱ्या लटा त्याने अलगद बाजूला केल्या आणि म्हणाला, " आहा, स्वारी आज खुश वाटतं, मग काय बेत आहे आज, आज मेजवाणी आम्हांला. "
मालिनी अगदीच कुशीत गच्च शिरली, "हे! काहीही काय रे! "
आणि हळूच मोहनच्या कानात म्हणाली, "तू तर माझ्यासाठी रोज मेजवाणी असतोस रे. "
मालिनी मिठीतून अलगत निघाली आणि मोहन तिला पकडायला तिच्यामागे लागला. नवीन कोऱ्या पाड्यांच्या मागे लपत मालिनी आणि मोहन प्रेमाची लपाछपी खेळत होते. आणि मोहनने मालिनीला अलगद पकडलं, तिला उचललं आणि घेऊन गेला नव्या कोऱ्या बेडरूममध्ये.
दिव्याचा प्रकाश मंद झाला होता आणि प्रेमाचा प्रकाश संपूर्ण घरात पसरला होता. रात्र चढत होती आणि प्रीत शिखरावर होती.
उभारल्या भावना, मंतरलेल्या क्षणाला...
भंगली ती साधना,स्पर्श हा सुखावला.
मनाचा बेधुंद पिसारा, तणावर पसरला,
श्वासाच्या अग्नीत, प्रितकुंड चेतला,
भेभान त्या रात्री चांदणं अंथुरला
बाहुपाशात मग मिलन सुख भेदला!
मोहन आणि मालिनी नुकतेच नवीन फ्लॅटवर आजच शिफ्ट झाले होते. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी हा एवढा लॅविश फ्लॅट स्वबळावर घेतला होता.
मोहनने मालिनीला मामेबहीणीच्या लग्नात बघितलं आणि तिच्या प्रेमात पडला होता. स्वतःहून मागणी घातली त्याने तिच्या घरी जाऊन आणि त्याच्या घरच्यांनीही त्याच्या निर्णयाला शिक्का मारला.
मोहन उतावळ्या स्वभावाचा आणि मालिनी तेवढीच शांत, हळुवार हाताळणारी.
मोहन गोष्टी केल्यानंतर विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा, तर मालिनी गोष्टी आधी सर्व विचार करून करायची आणि झालेल्या गोष्टीवर ती कधीच वेळ घालवायची नाही.
मोहनला मुलांचा मोठा लळा, पण मालिनीला स्वतःची जागा हवी होती, मग जरा प्लॅनिंग सुरू होती. मालिनीची सरकारी नोकरी होती, तर मोहन मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता.
मालिनी अस्सल घरगुती स्त्री होती, नाती, नवरा आणि नोकरी यांत रमणारी. नवऱ्यावर अतोनात विश्वास ठेवणारी. मोहन मात्र लगेच भरकटनारा, पण मालिनीवर प्रेमाने स्थिरावलेला.
आज दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. राजा-राणीचा संसार सुरू झाला होता.
सकाळी दहाची वेळ होती. मोहन आणि मालिनी जर उशीरच उठले होते. बाहेरून आणलेला चहा पित सामानाच्या पसाऱ्यात बसले होते दोघे. मोहनला रात्रीचा क्षण नि क्षण आठवत होता आणि तो मालिनीला चहाच्या प्रत्येक सिप मध्ये परत त्याच नजरेने न्याहाळत होता. राहवलं नाही त्याला, आणि भावनांनी शब्द घेतले,
"अजून मनाची रात्र तरुण आहे.
तू अशी दूर दूर का ग,
प्रीतीचा ऋतू असतांना
घे ना जवडी जरा ग!
मिठीतही माझ्या म्हणतेस
स्वर्ग मिळतो तुला ग
मी तुझ्या समोर असतांना
तू अशी दूर दूर का ग,
"अजून मनाची रात्र तरुण आहे "
"काय मालिनी, कालची मेजवानी मस्त होती का?"
"ए! चल रे, तुला ना तेच दिसतं नेहमी."
"चल मग, मी तर आताही तयार आहे."
"ओये! आधी सामान लाव. मी जरा स्वयंपाक बघते."
"कशाला करतेस गं! माझी तर भूक तूच मिटवू शकतेस."
"हो का? राहिलं मग! माझं तर पुरे ह्या चहा-बिस्किटवर."
...आणि एवढ्यात दारावर बेल वाजली.
दोघेही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत थांबले. मालिनी उठली आणि तिने दार उघडलं.
दारात रागिणी उभी होती. तिचे टपोरे सुंदर डोळे, चाफेकळी नाक, हनुवटीवर तीळ, लांब कुरळे केस, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ... आणि नेहमीप्रमाणे चापूनचोपून नेसलेली साडी. तिच्या मंगळसूत्राला आळी मारत ती हलक्याफुलक्या आवाजात म्हणाली,
“मी रागिणी, समोरच्या फ्लॅटमध्ये राहते."
मालिनी गोड हसली. रागिणीच्या बोलण्यातल्या लाघवीपणाचा आणि त्या तेजस्वी चेहऱ्याचा मोह पडत होता तिला. काही पर्या नसल्यातरी रागिणी काही वेगळीच भासत होती. तिच्या आसपासचं वातावरणच उजळून निघाल्यासारखं वाटत होतं.
रागिणीने डोकावत विचारलं, "तुम्ही कालच आलात ना राहायला? काही लागलं तर सांगा हं! या फ्लोअरला फक्त आपले दोनच फ्लॅट आहेत, म्हणजे शेजारी शेजारीच आहोत आपण!"
"हो, हो ना! या ना आत."
"नको गं, तुमचं स्वयंपाकघर लागलं नसेल ना? हे बघ, मी पोहे करून आणलेत. खा बरं! आणि स्वयंपाक मीच करते तुमच्यासाठी."
"अहो, नको! पोहे आणलेत, तेवढंच खूप झालं. उगाच तुम्हाला त्रास."
"अगं काही नाही होत, मी ठेवला सुद्धा."
रागिणी हसत निघून गेली. मालिनी तिला नकार देऊच शकली नाही. तिने स्वतःशीच गोडसं हसत मान हलवली. कदाचित त्या रागिणीच्या गालावरच्या खळीत मालिनी फसली होती. तिच्या मोहक चेहऱ्यासोबत तिच्या मनाचं सौंदर्यही मालिनीला भुरळ घालत होतं.
पुढचा भाग लवकरच पेजवर... प्रस्तुत कथा ‘व्हॉईस… अंतरमनाचा 2022’ ह्या कथा संग्रहातून...
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, लिंक शेअर करा.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार ai
https://www.facebook.com/manatlyatalyat

Post a Comment

0 Comments