फर्स्ट डे ऑफ वर्क! #“कॉर्पोरेट लॅडर….”
समृद्धीचा आज पहिलाच ऑफिसचा दिवस
होता. तिच्या मनात कालपासूनच हलकंसं थरथरंनं दडलेलं होतं. रात्री उशिरा पर्यंत
तिने बॅगमध्ये सगळं सांभाळून ठेवलं होतं. एमबीए संपल्यावर ओळखीने मल्टिनॅशनल कंपनीत ट्रेनी म्हणून लागल्याचं ऐकल्यावर सगळ्या घरात
उत्साह पसरला होता. घोसला मल्टिनॅशनल इंडस्ट्रीज ऑफ इंडिया ही देशातील टॉप कंपन्यांपैकी एक होती. ही कंपनी
म्हणजे प्रतिष्ठा, नाव, पैसा आणि संधी यांचं एकत्रित रूप. मार्केटमध्ये कंपनीची मोठी चर्चा
होती आणि तिचे शेअर्स सध्या प्रचंड तेजीवर होते. तिथे नोकरी मिळवणं म्हणजे लोक
वर्षानुवर्षं वाट पाहत असत. त्या कंपनीत काम करणं म्हणजे अनेकांसाठी स्वप्न होतं.
समृद्धीला वाटायचं,“हे खरंच घडतंय का माझ्याबरोबर?”
समृद्धीच्या तोंडी अजूनही कंपनीचं
नाव नीट पटलं नव्हतं, पण सगळीकडे तिच्या यशाची चर्चा सुरू
झाली होती. घोसला मल्टिनॅशनलमध्ये काम करणे म्हणजे प्रतिष्ठेचा विषय मानला जात
होता.
अंतिम वर्षात समृद्धीला उत्तम
मार्क्स मिळाले होते. तिचं इंग्रजीसुद्धा खूप चांगलं होतं. तिचा मोठा भाऊ शिक्षक
होता आणि त्याचा एक विद्यार्थी या कंपनीत एचआर विभागात होता. त्या ओळखीमुळे भावाने
तिला तिथे ट्रेनी म्हणून लावून दिलं.
आज समृद्धी खूप स्वप्नं मनात घेऊन
ऑफिसला निघाली होती. कंपनीची बस होती, पण
अजून तिला रूटची नीट माहिती नव्हती. एचआरशी बोलून सारं काही ती आज ठरवणार होती. उत्साहात
पहिल्याच दिवशी तिने ठरवलं होतं की प्रवास वेळत कसा करायचा, हे आज अनुभवातून ठरवायचं.
बसस्टॉपवर उभी राहिली तेव्हा तिच्या
मनात उत्सुकतेचा झरा वाहत होता. नवीन सहकारी कसे असतील, ऑफिसचं वातावरण कसं असेल, एचआर
काय काय सांगेल, कसं स्वतःला सादर करायचं, हे सारं ती
मनातल्या मनात रिहर्सल करत होती. पण अचानक परिस्थिती बदलली. रस्ता मोकळा
करण्यासाठी पोलिसांच्या गाड्या आल्या, सायरन
वाजू लागले, लोकं इकडेतिकडे पळू लागली. काही
क्षणात संपूर्ण रस्ता रिकामा झाला. सामान्य लोक बाजूला थांबले. समृद्धीची बस
मागच्या स्टॉपवरच अडकून पडली होती. आता ती वेळेवर येणं अशक्य दिसत होतं आणि समोर
अजिबात हालचाल नव्हती.
समृद्धीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास
जरा ढासळला. “आता काय करू? पहिल्या
दिवशी उशीर झाला तर एचआर काय विचार करेल? हीच
पहिली छाप राहिली तर?” ती घाबरून आसपास नजर टाकू लागली. ऑटो
दिसत नव्हते, टॅक्सी नव्हती, अगदी दुचाकी थांबवायचं म्हटलं तरी वेगात सगळे
पुढे निघून जात होते. एचआरने खास सकाळची वेळ तिला दिली होती, कंपनीबद्दल सर्व सांगण्यासाठी. वेळेवर पोहोचणं
खूप महत्त्वाचं होतं. पण तिच्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता. रस्ता मात्र पूर्ण
रिकामा आणि मोकळा पडला होता. तिच्या मनात अचानक दोन आवाज भांडू लागले. एक म्हणत
होता, “हे काय मोठं आहे? पहिल्या
दिवशी थोडा उशीर झाला तर काही बिघडत नाही. परिस्थिती तुझ्या हातात नाही.” दुसरा
आवाज म्हणत होता,“नाही, पहिला दिवस म्हणजे पहिली छाप. हे
आयुष्यभर लक्षात राहतं. तुला काहीतरी करून वेळेत पोहोचायलाच हवं.”
ती तिथेच थबकून राहिली. आकाशात ढग
हळूच पसरत होते. तिच्या मनातल्या विचारांच्या गोंधळाला ते ढग जणू अधिक गडद करत
होते. स्वप्न आणि वास्तव यांच्या सीमेवर उभी राहिलेली समृद्धी, पुढच्या क्षणाला काय निर्णय घेणार होती, हे तिलाही समजत नव्हतं.
पोलिसांच्या ताफ्यासोबत काही क्षणात
लाल दिव्यांच्या चार गाड्या भरधाव वेगाने रस्त्यावरून गेल्या. त्यातलीच एक मोठी,
चमचमीत गाडी बस स्टॉपच्या आतल्या रस्त्यात वळली. समृद्धी
आधीच कंटाळून त्या रस्त्यातून दुसऱ्या चौकात जाण्यासाठी निघाली होती. अचानक ती
गाडी तिच्या अगदी समोर येऊन थांबली. क्षणभर तिला काहीच कळेना. ती घाबरली, गोंधळली आणि पटकन मागे झाली.
गाडीचं दार हळूच उघडलं. समृद्धीचा
गळा कोरडा पडला. तिने इकडे तिकडे नजर फिरवली आणि घशाला कोरड पडलेला श्वास ओला
करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. तिचं हृदय जणू थांबलं होतं. पण, आश्चर्य म्हणजे, गाडीतून कुणीच बाहेर आलं नाही. काही क्षण शांतता पसरली. इतक्यात
समोरच्या गल्लीतून एक अतिशय सुंदर स्त्री चालत पुढे आली. तिचे मोकळे काळसर केस
वाऱ्याने हलत होते. निळ्या गर्द रंगाची रेशमी साडी तिच्या देखण्या
व्यक्तिमत्त्वाला अजूनच मोहक भासत होती. तिच्या चालण्यात एक राजेशाही दिमाख होता. ती
गाडीच्या दारासमोर आली. आतून एक गोऱ्या रंगाचा, नाजूक पण ताकदवान वाटणारा हात पुढे आला. हातात सोन्याचा कडा चमकत होता,
आणि त्या हातावर विसावलेली काही लांब, काळसर केसं… जरा विचित्र वाटलं समृद्धीला. त्या
सुंदर स्त्रीने क्षणाचाही विलंब न करता त्या हातात हात दिला आणि गाडीत चढली.
गाडीचं दार जोरात आपटून बंद झालं आणि
गाडी मागच्या गल्लीतून वळून परत मुख्य रस्त्यावर आली. काही क्षणात ती नजरेआड झाली.
गाडीचा आवाज अजूनही कानात घुमत होता, त्यातच
पुन्हा लाल दिव्यांच्या गाड्या भरधाव पुढे जात असल्याचा आवाज हवेतून उमटला.
समृद्धीला कळेना हे नेमकं काय घडलं.
काहीतरी गूढ तिने पाहिलं होतं, पण
त्या क्षणी तिच्याकडे थांबून विचार करण्याची मुभा नव्हती. आज तिला ऑफिसला उशीर
करायचा नव्हता. ती तर दोन तास आधीच घरून निघाली होती.
भरा-भरा पावलं टाकत ती पलीकडच्या
चौकात पोहोचली. पण मन मात्र अजूनही त्या स्त्रीच्या आठवणीत अडकलं होतं. "कोण
होती ती अप्सरेसारखी स्त्री? कुठून
आली होती? त्या गाडीत बसलेला हात कोणाचा होता?"
प्रश्न तिच्या डोक्यात गुंजत राहिले. लाल रेशमी
साडी, रेखीव चेहरा, मोहक डोळे... त्या अद्भुत सौंदर्याची झलक इतकी ठसली होती की तिच्या
डोळ्यासमोरून ती दूरच जाईना. जणू क्षणभरासाठी स्वप्नवत दृश्य पाहिलं होतं.
ऑटो थांबला आणि समोर घोसला मल्टिनॅशनलच्या भव्य गेटवर ती उभी राहिली.
तेवढ्यात एक ऑटो दिसला. तिने हात
दाखवला आणि पटकन बसली. काही वेळात ती घोसला मल्टिनॅशनल इंडस्ट्रीजच्या भव्य गेटवर पोहोचली. उंच इमारतींचा समूह,
सभोवताली फिरणारे सिक्युरिटी गार्ड्स, आत जाणाऱ्या कर्मचार्यांची लगबग—सगळं काही तिला
भारावून टाकणारं होतं. गेटवर फॉर्म भरून, चौकशी
करून आणि तात्पुरती पास मिळवून ती आत गेली. ओढणी सावरत ती लिफ्टकडे निघाली.
पहिल्या दिवशीची घाबरगुंडी अजून शाबूत होती, पण उत्सुकता जास्त होती.
एचआर डिपार्टमेंटमध्ये पोहोचल्यावर
तिला कळलं की तिच्यासारखे अजून पाच-सहा ट्रेनीज होते. सगळ्यांची ओळख करून देण्यात
आली. एकेकजण आपल्या कॉलेज, डिग्री,
आणि स्वप्नांबद्दल सांगत होता. एचआरने सगळ्यांचं
स्वागत केलं आणि इंडक्शन सुरू झालं. कंपनीबद्दल, तिच्या इतिहासाबद्दल, नियमांबद्दल
माहिती दिली गेली. दुपारचं जेवणही एचआरच्या वतीने होतं. वातावरण हलकंफुलकं होतं,
पण समृद्धीच्या मनात मात्र ती लाल साडी, ते पांढऱ्या सोन्याच्या कड्यासह पुढे आलेले हात
आणि ती गाडीचा दार जोरात बंद होण्याचा आवाज सतत फिरत होता. दुपारच्या जेवणानंतर
आयकार्डसाठी फोटो, फिंगरप्रिंट्स, सिग्नेचर्स आणि
सगळ्या औपचारिकता आटोपल्या. समृद्धीला
थोडा दिलासा वाटला. आता ती प्रत्यक्ष तिच्या मार्केटिंग डिपार्टमेंटकडे जाणार होती. एचआरने स्मितहास्य करत सांगितलं, "आजपासून तुम्हाला प्रत्यक्ष डिपार्टमेंटमध्ये काम
बघायला मिळेल. समृद्धी, तुम्हाला मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये पाठवतोय."
लिफ्टमध्ये उभी राहिल्यावर मात्र
सकाळचं ते गूढ दृश्य पुन्हा तिच्या मनात ठळक झालं. जणू अजूनही त्या लाल साडीच्या
स्त्रीची झलक तिच्या डोळ्यासमोर उभी होती…
मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये पाऊल
टाकताच तिला जाणवलं, इथे वेगळीच धावपळ आहे. संगणकांवर
वाकलेले कर्मचारी, भिंतींवर मोठमोठे प्रोजेक्ट चार्ट्स,
आणि सतत वाजणारे फोन. तिला एका नवीन विश्वात
आल्यासारखं वाटलं, एचआरने तिला बॉसच्या कॅबीन पर्यंत
सोडलं आणि तो सेक्रेटरीला सांगून निघून गेला.
मंजिरी मागच्या दहा वर्षांपासून तिथे
कामाला होती. कोण काय करतो, कसं
करतो, कुठे काय चालतं, सगळं तिला माहित होतं. आज बॉस कॅबिनमध्ये नाही
हेही तिला माहीत होतं. तिने एक शिट्टी मारली आणि समृद्धीला डोळा मारत मोठ्याने
म्हणाली,
“अटेन्शन, माय
डिअर फ्रेंड्स, आज आपल्याकडे एक नवी एन्ट्री झाली
आहे.”
मग तिने समृद्धीकडे बोट दाखवत
खोडकरपणे हसत म्हटलं,
“ऐ सलवार कमीज, इकडे ये. सांग तुझं नाव, गाव,
पत्ता... मराठीत बोल गं, आम्हाला समजतं.”
सगळे खळखळून हसले. समृद्धीने घाबरत
एक नजर कॅबिनकडे टाकली, तेव्हा मंजिरी पुन्हा म्हणाली,
“अबे यार, तो
टापू अजून आला नाहीये. ये इकडे. आला की ही जूली सांगेल ना तुला. तू इकडे ये,
थोडं आमचं मनोरंजन कर. च्यामारी, वैताग आलाय ह्या डेडलाइनचा. कालपासून ऑफिसमध्ये
पडलेय मी. आम्ही रात्रभर मेहनत करायची आणि हे बॉस साहेब बोसगिरी करायला चार वाजता
उगवणार.”
इतक्यात गणपतराव म्हणजे
डिपार्टमेंटचा पिऊन तिथून निघत होता. त्याने हसत म्हटलं,
“बॉसचं काम चारपासून सुरू होतं आणि माझं चार वाजता
संपतं. काय म्हणता?”
मंजिरीने त्याच्याकडे रागाने पाहिलं.
“गणपत, माझा
मूड नाही तुझी मस्करी झेलण्याचा. आधी त्या फाइल्स इकडे घेऊन ये.”
समृद्धी अजूनही तिच्या जागेवरून उठली
नाही, तर मंजिरी पुन्हा मोठ्याने म्हणाली, “ऐ
सलवार, भाव खाऊ नकोस. तो तसाही तुझ्याशी
भेटणार नाही. तू काय मॅनेजर म्हणून आली आहेस का इथे? माझ्या हाताखाली काम करशील, त्याच्या
नाही. तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. दूर राहा तू. चल इकडे.”
तिने गणपतरावला आवाज दिला, “गणपतराव,
या सलवार मॅडमसाठी टेबल तयार करा. माझ्या समोर
लावा. माझ्या कामातून शिकेल ती. त्या फाइल्सही ठेवा त्याच टेबलवर. ट्रेनी आहे ही,
मॅनेजर नाही. इथे मी आहे हेड, हे लक्षात ठेवा.”
मग ती इतरांकडे वळली, “हे गाइज, कुणाला
काही हरकत असेल तर सांगा. नाहीतर आपली एनओसी टाका इथेच. उगाच तिकडे बॉसच्या खोलीत
शिरून चोंबळेपणा केला तर मला खपणार नाही. मेहनत आम्ही रात्रभर करून नशा चढवायची
आणि हे जातात तिकडे सकाळी, नशा
उतरल्यावर परत चढवायला.”
सगळे गप्प झाले. मंजिरी काय बोलत
होती कुणाला कळत नव्हते, आणि काही विचारण्याचे धाडस कुणात नव्हते.
मंजिरीच्या
कॉमेंटवर पिन ड्रॉप सायलेन्स होता. तिला कोण
उत्तर देणार होतं. माधव घोसला बॉस होता की ती हे कळणे अजून तरी ऑफिस मध्ये कुणाला
जमले नव्हते.
वाचूया पुढल्या
भागात समृद्धीचा ऑफिसच्या पहिल्या दिवशीचा दुसरा भाग... गुरुवारी पेजवर आणि साईटवर
सुद्धा....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या
प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक
शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी
एवढीच इच्छा आहे.
@followers @topfans #उर्मिलादेवेन #मनातल्यातळ्यात
पुढील
अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's
app ग्रुपही
जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार ai
0 Comments