बॉस २ द #कॉर्पोरेट लॅडर.

 

बॉस २



आधीचा भाग इथे आहे बॉस भाग १

समृद्धी बाहेर आली तेव्हा तिच्या मनात एकच विचार घोंगावत होता, मंजिरी!! कोण आहे ही इथे? तिच्या डोळ्यांसमोर सतत तीच होती. राग, असहायता, आणि धूसर प्रश्न...उत्तरं मात्र अजूनही दूर होती. ही मला काम करू देणार नाही,” असा संशय तिच्या मनाला चावू लागला. क्षणिक अस्वस्थपणा तिला घाबरवत होता. त्या धुंदीतच ती  गणपतकडे गेली आणि त्याला कॉफी- बिस्कीट कॅबीनमध्ये घेऊन जायला बोलली. गणपत गुणगुणत होता, समृद्धीचा चेहरा बघून म्हणाला, “पोरी काही गोष्टींचा विचार करायचा नसतो, मोठी मानसं उगाच नाही असं वागत, कारण असते त्याला. त्याला समजायला तुला ही कॉर्पोरेट विश्वातील लॅडर का सीडी ते चढून तिथे पोहोचवे लागेल अन् त्याला लय वेळ आहे. तुला इनमिन झाले दहा दिवस, अजून काय समजलं असा उगाच गंभीर चेहरा करायला... घे कॉफी, आधी तुला आणि ही क्रीम बिस्कीटपण...”

तो मिश्कील हसत परत म्हणाला,  मंजिरी मॅडमचे आवडते आहेत. इथे ह्या डिपार्टमेंटला तिच्या आवडीनेच चालायचं, नाही तर चालण्यायोग्य राहणार नाहीस... मी वयाने मोठा आहे तुझ्यापेक्षा. हे बोललो कारण मी दुसरी मंजिरी बघू शकणार नाही इथे... कदाचित तू ती नसावी असे मी त्या शंभूदेवाला बोलतो.”

समृद्धी  अवघडली, शब्द अपुरे होते तिच्याकडे उत्तरासाठी. काहीच बोलली नाही, कॉफी हातात घेऊन जागेवर आली.

इकडे मंजिरी आणि माधव कॅबीनमध्ये बोलत होते, ते दोघेही गणपतची वाट बघत होते. गणपत आला त्याने टेबलवर सारं ठेवलं. तो निघून गेला आणि माधवने कॅबीनचा टीव्ही सुरु केला, तो कॉफी पिती समोर दिसणाऱ्या समृद्धीला बघत होता. तिचा तो डीप गळा आणि तिची ती कॉफी पिण्याची पद्धत, आणि चेहऱ्यावरची निष्पाप गोडी… माधवच्या ओठांवर एक मिश्कील हास्य उमटलं.

मंजिरी मात्र लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून काही नोंदी करत होती. काही वेळाने ती उठली, सरळ माधवजवळ आली.
माधव, तुझं काय सुरु आहे?”

तो हसत तिच्याकडे वळला, “तुझं काय सुरु आहे... आज शनाया दिसली मला तुझ्यासोबत... ही नवीन मुलगी का नव्हती तिकडे...”

मंजिरीने किंचित खिजवत उत्तर दिलं, “ती नवीन आहे एवढचं पुरेसं नाही का? पंधरा दिवसात तिला क्लायंटसमोर कसं उभं करणार? तिला, ना रुल्स माहित ना काही समजत, शिकेल तेव्हा करू पुढे. एवढं सोपं समजू नये तुझ्या सारख्या बिजनेस करणाऱ्याला...”

माधव मिश्कील हसला “मंजिरी... मंजिरी....”

मंजिरी त्याला विचारात बोलली, “आणि मोठ्या सरांचं काय रे हे नवीन... पार्टी बिर्टी जॉईन केलेली दिसते. त्या मुग्धा बाई दिसल्या मला त्यांच्यासोबत.... हे समजायला नको सरांना... कुठे कुणाला सोबत ठेवावं.”

माधव मिश्कील हसला, “तू बोलतेस हे... तू असतेच माझ्यासोबत सगळीकडे... विसरलीस... आणि इथे कोण बॉस आहे गं...”

तो तिच्या जवळ आला, तिच्या जवळ येत त्याने तिच्या परफ्युमचा सुवास घेतला, तशी तिने त्याची कॉलर धरली, “मग तुला काही हरकत आहे का?”

त्याने ती सोडवली, आणि परत समृद्धीला टीव्हीवर बघत हसला, तिच्या डोळ्यात बघत कुजबुजला, “नाही, तू खुशाल राज्य कर इथे, ह्या बॉसची बॉस आहेस ह्या कॅबीन मध्ये... आणि बाहेर त्या कॅबीन मध्ये सुद्धा...” तो परत हसत त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला.

मंजिरी क्षणभर गंभीर झाली., त्याच्या जवळ जात म्हणाली, “माधव तू कधी घरी बोलणार आहे...”

माधवने तिला थांबवलं, श्श्… होम मिनिस्टरचा कॉल आहे.”

मंजिरी न काही बोलता कॅबीनमधून निघून आली. रुद्रच्या टेबलजवळ जरा वेळ थबकली. तो उठला, तशी ती बोलली, रुद्र, मला पूर्ण टीम कॉन्फरन्स रूममध्ये हवी आहे. दहा मिनिटांत.” ती निघणार तोच परत थबकली तसा रुद्र बोलला,

“रोहन सर येत आहेत, सकाळी फ्लाईट आली आहे त्यांची... जरा वेळ होईल बोलले होते. मी कॉल करून विचारतो.”

मंजिरीने रुद्रकडे एक नजर रोखून बघितलं आणि ती सरळ तिच्या नेहमीच्या कोपऱ्यात गेली आणि सिगारेट पेटवली. धूर हवेत तरंगत राहिला, आणि ऑफिसभर शांतता पसरली.

आता कुठलं वादळ येणार ह्याच्या विचारात सर्व स्टाफ होता.  रोहन आणि मंजिरी आजपासून परत ऑफिसमध्ये  सामोरासमोर असणार होते. 

मंजिरी कॉन्फरन्स रूम मध्ये शिरली, “सो गाईज, उद्यापासून मोर्निग कॉल नियमित वेळेवर होईल, जरा ह्या डीलच्या कामात व्यस्त होते म्हणून होल्डवर ठेवली होती कामं. आता झपाट्याने कामाला लागायचे आहे. मला वेळेत काम हवं, नाही झालं तर मुद्देसूद साप्ष्टीकरण हवं आणि तेही नाही झालं तर मग....”

तेवढ्यात माधव आत शिरला. सर्व उभे झाले, मंजिरीसुद्धा.... तो बसला आणि मंजिरी परत बोलायला लागली. तिने आज सर्वांचा क्लास घेतला होता, मागच्या पंधरा दिवसापासून अडकून पडलेली काम तिला आज पूर्ण हवी होती. उद्याचा नवीन टास्क तिने सर्वाना सांगितला होता. माधव तिच्या सूचनेला दुजोरा देत होता. त्यानेही काहीही टिप्पणी न करत तिला क्रोस केले नव्हते. हे बघून परत समृद्धीच्या मनात प्रश्न पडला, ही एवढी मोठी कंपनी मंजिरी चालवते की घोसला... ती सुन्न होती. तशी मंजिरी तिला बोलली, “एस समृद्धी, तुला काही प्रश्न आहेत का? कुठे हरवली आहेस. मी काय बोलले जरा मला सांगशील काय... तुझं लक्ष नाही आहे माझ्या बोलण्याकडे....”

रुद्रने विषय मोडण्यासाठी एक फाईल मंजिरीच्या हातात दिली... तशी समृद्धी भानावर आली, काही वेळ तिला मनात जमवाजमव करायला मिळाला, मंजिरीने परत तिला इशारा केला, समृद्धीने हलक्या स्वरात उत्तर दिलं. माधव लगेच बोलला,

“मंजिरी, मुलगी हुशार आहे... बघ नक्की प्रगती करणार ही... आय मस्ट से, शी हॅज प्रेझन्स ऑफ माईंड… कूल, मंजिरी...”

तेवढ्यात दारावर नॉक करत  रोहन स्वीट घेऊन शिरला, माधवने त्याचं स्वागत केलं, तो आज रशियावरून आला होता, तिकडे नवीन युनिट सुरु झालं होतं कंपनीचं, त्यासाठी तो गेलेला होता. तो सारं काही मंजिरीला न सांगता माधवला सांगत होता. आणि स्टाफ स्वीट खात त्याला ऐकत होता. शेवटी माधव म्हणाला, “मंजिरी ह्याच काय पेंडिंग ते बघ, रीपोर्ट घे सगळा. यु आर द बॉस फॉर रशिया युनिट टू... रोहन यु नो राईट... मला निघायचे आहे लवकर. ते आज विधानसभेचे टेंडर निघणार आहेत. मी बोलतो तुझ्याशी सविस्तर.”

मंजिरी स्मित हसली, “सो, रोहन... आपण नंतर बोलूया... तू जाऊ शकतोस, थकला असशील... उद्यापासून काम सुरु करायचे आहे. मी बोलवते तुला नंतर.”

रोहनला हा त्याचा परत अपमान वाटला, मंजिरी माधवसमोर त्याला हे बोलत होती. त्याने मुठ बांधली आणि गुमान निघून गेला.

मंजिरीने सर्वांकडे बघत नुसतं स्मित हास्य दिलं... तिने सगळ्या स्टाफला निघायला सांगितलं. माधव आणि मंजिरी परत  कॉन्फरन्स रूममध्ये होते.

“सो मंजिरी, ही समृद्धी मला तुझ्यासारखी वाटते गं,”

“हुम्म... पण तू तिला माझ्यासारखं समजू नको...  एवढंच....”

मंजिरीने परदे ओढले, आणि माधवलाही, “माधव माझी चिडचिड होतं आहे, तू कधी तुझ्या बायकोला सांगणार आहेस.”

“हे मंजिरी चिल... तुला माहित आहे तिला तुझ्याबद्दल थोडं माहित आहे कदाचित...”

“मग पूर्ण कधी सांगणार आहेस तू... की मी बोलू मोठ्या सरांशी...”

“मंजिरी, ह्या कंपनीत अर्धी पार्टनर आहे ती, हे तुला महित असावं...”

आता मंजिरी चिडली, तिने माधवला सोडलं, “अरे पण मी कंपनीचे शेअर उंचावून ठेवले आहेत, काम मी करते जीव ओतून. एवढं समजत नाही तुला.... तू सांगणार, की मी बोलू...”

माधव गप्प होता, दोघेही कुठेतरी शून्यात जरा वेळ होते.  मंजिरीने दीर्घ श्वास घेतला आणि  परत विषय बदलायचा प्रयत्न केला...

 “आणि माधव, ती नवीन मुलगी... तिच्यापासून दूर राहायचं. नाहीतर ही गोष्ट मी मोठ्या सरांना आणि तुझ्या त्या प्रिय बायकोला जाऊन सांगेन... कदाचित तू विसरलास तुझी ती प्रिया माझी मैत्रीण पण होती....”

“होती?”

“हो होतीच म्हणव लागेल ना, दहा वर्षाआधी तीही तुझ्यासोबत ऑफिसला यायची. आता ती राणी आहे घोसला एम्पायरची....आणि मी अजूनही....”

“बोल पुढे.... “

मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलं होतं....  विषय परत फिरून इथेच आला होता. माधव तिच्या पुढे येऊन उभा झाला, “बघ ती तेव्हाही माझी बायको होती, आजही आहे... ती तेव्हाही मालकीण होती आणि आजही आहे..... तिची जागा ना मी बदलू शकत, ना ती स्वतः कदाचित तू विसरतेस ही ऑफसची हद्द सुटली की ती माझ्या आयुष्याची बॉस आहे आणि त्या बॉसला तुझ्यातला बॉसही काही बोलू शकत नाही. तू कदाचित साऱ्या जगाची बॉस होऊ शकतेस पण तिची नाही... तू तिला माझ्या आयुष्यातून निघण्यासाठी सांगू शकत नाही... आणि मी ते करू शकत  नाही.... ज्या जमिनीवर ही एवढी वीस माजली इमारत उभी आहे ना ती तिच्या बापाने तिला  दिली होती.... ती आधारस्तंभ आहे तिला पाडणं म्हणजे हे घोसला एम्पायर उध्वस्त होणं... आणि कदाचित तूही....”

आता मात्र मंजिरी हताश बसली.... अश्रू पुसले. माधव तिच्या पुढे परत उभा झाला, “मान्य आहे तू माझ्या सोबत मागच्या दहा वर्षापासून आहेस पण ह्यात माझी एकट्याची सहमती नव्हती ना, आणि मी तुला मोबदला दिला आहे, हे ऑफिस तुझं आहे, तू हवं तसं वाग इकडे. माझी बॉस आहे तू इथे... मी तुझ्या शब्दाबाहेर नाही... आणि आपण चुकलो असं मी म्हणार नाहीच... पण....”

“पण मी बायको नाही होऊ शकत तुझी.... मग मी कोण आहे रे.... आणि....”

ती बोलता बोलता थांबली. सिगारेट काढली, डोळ्यात पाणी होतं पण आता तिला रूमध्ये गुदमरत होतं. ती तडक निघाली, बाहेर येताच कुशल तिला समृद्धीच्या जवळ बसलेला दिसला. समृद्धी अवघडत वागताना तिला जाणवली पण आता तिला सिगार ओढायची होती तिने त्यांना बघूनही दुर्लक्ष केलं.

मंजिरी बाहेर आली आहे हे सर्वाना माहित झाले होते. सर्व कामाला लागले होते. माधव ऑफिसमधून निघून गेला होता. कुशल समृद्धीला कॉफीसाठी विचारात तिच्याशी बोलत जवळीक साधण्याच्या प्रयत्नात होता. उद्यापासूनच्या टास्कमध्ये कुशल आणि समृद्धी सोबत काम करणार होते म्हणून काय तर त्याची तिच्यासोबत डेस्कवर मिटिंग सुरु होती. समृद्धीच्या मोबाईलवर नोटीफीकॅशन आलं, तसा तो बोलला, “बॉयफ्रेंड?”

ती अवघडली, “नाही.... जास्त फ्रेंड...काही नाही...”

“ओ, मग ठीक आहे... तू बघ, आपण कॉफी सोबत घेऊया दहा मिनिटाने... ओके!“

आज समृद्धीला परत नवीन बॉस मिळाला होता, कुशलचं बॉसिंग तिला आवडलं नव्हतं, पण तो तिचा सिनिअर होता हे विसरून चालणार नव्हतं. आणि तिच्यासाठी सगळे बॉसचं होते इकडे हेही तिला मनातून काढायचं नव्हतं... केसांची बट गुंडाळत मनात विचार शिरला, “मी इथली बॉस व्हायला किती काळ लागेल...”

----पुढील भाग लवकरच ...आधीचे भाग पेजवर आणि साईटवर आहेत.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.

पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by pixabay

Post a Comment

0 Comments