मी आणि जपान....

 


हल्ली एक वेडचं आलंय जगभर... वजन कमी करण्याचं. जणू सर्वांनाच एकदम कळलंय की आता आपल्याला हलकं व्हायचंय. कुठे डाएट, कुठे योगा, कुठे जिम, तर कुठे ‘नो-शुगर चॅलेंज’... कोणीही मागे नाही. वजन कमी करण्याचा सपाटा सूर आहे सगळीकडे... बरं वाटतं, निदान आपण स्वतःकडे लक्ष द्यायला लागलोत.

मी स्वतः २०१७ मध्ये वजन कमी केलं होतं. तेव्हा जाणवलं होतं, हो, शरीर हलकं झालंय, थोडा आत्मविश्वास वाढला होता. पण नंतर काय? चढ-उतार सुरूच राहिले. वजन अजूनही आहे संतुलित पण चालायचं... तरी माझ्या बाबतीत तर नेहमीचं समीकरण आहे, स्ट्रेस आला की वजन वाढणारच. तो स्ट्रेस काही हातात बसत नाही. तो निघून गेला तर चालेल, पण तोच तर माझा सगळ्यात घट्ट सोबती आहे. झालं मग, वजन कमी करण्याचं गणित कुठे जुळणार?

आता चाळीशी ओलांडल्यावर अनेक प्रश्न गाठतात. आरोग्य, जबाबदाऱ्या, थकवा सगळं एकत्र येतं. त्यात वजनाचा मुद्दा मात्र ठामपणे समोर उभा राहतो.

मी आणि अहो हल्ली फिरायला जातो, वजन तरी नियंत्रणात राहावं म्हणून. पण कधी? तर रात्री अकरा वाजता. कारण दिवसभर गडबड, कामं, आणि "चला आता जाऊया" म्हटलं की नाही-नाही म्हणता म्हणता अकरा वाजून जातात. मला तर त्या फिरायला जाण्याचाही स्ट्रेस वाटतो.

जपानमध्ये तेवढ्या वेळी रस्त्यावर कुणीच नसतं. पूर्ण सामसूम. असं वाटतं, सगळ्या इमारती कुणीतरी आणून इथे रचून ठेवल्या आहेत. ना त्या घरांमध्ये कुणी राहातंय असं वाटतं, ना कुठलाच आवाज. मला तर प्रश्न पडतो, हे लोकं त्सुनामीच्या भीतीने गाव सोडून गेलेत की काय!, इतकी निर्जीव शांतता. मी हसत-हसत बोलून दाखवलं तर अहो म्हणाले, “हे जपान आहे... शांतीप्रिय देश आहे... लोकं शांत जगतात.”

आपल्याकडे असं असतं का?
अगदी नाही.
रात्री अकरा म्हणजे खरं तर गाव शमतं, पण पूर्ण झोपत नाही. घराघरांतून टीव्हीचे आवाज येतात, कुठे मुलांवर रागावणारी आई, कुठे शेजाऱ्यांचं भांडण कानावर पडतं. काही लोकं तर उगाच अंगणात बसून येणाऱ्या-जाणाऱ्यांना न्याहाळत असतात. मग उगाच बोलणं, ओळखी काढणं आणि मग हळूच घरी तेवढ्या वाजता बोलावणं असं काही असतं... नाहीं का! गाव निदान जिवंत आहे असं वाटतं.

पण इथे? शुकशुकाट... रस्त्यावरही शांतता, घरातही शांतता. सगळं स्थिर. जणू जिवंत असूनही जीवन लपून बसलंय. अशा शांततेत रात्री अकरा वाजता आम्ही दोघं रस्त्यावर फिरायला निघतो. पावलांचा आवाजच जास्त मोठा वाटतो. मनातला स्ट्रेस कमी होण्याऐवजी, कधी कधी उलट वाढतोही.

मग मी मनातल्या मनात हसते, वजन कमी करण्यासाठी चालतोय, पण शांततेचं वजन मात्र जास्तच पेलतोय.”

जपान आणि मी ह्या सदरातून.... परत भेटूया

 

 

 

 

 

 

जपानी आहाराबद्दल खूप भरभरून बोलल्या जाते. आता इकडे राहून मलाही ते खायला आवडते. तरीही सर्व पदार्थ अजूनही खायची राहिली आहेत. काहींना खाण्याची आवड निर्माण होते पण खाण्याचे धाडस होत नाही. काहींची चव घेऊन मी कायमचा रामराम ठोकला आहे. तर काही माझ्या लिस्टमध्ये अजूनही आहेत. पण मला सुशी खायला आवडते...

एप्रिल मध्ये माझी एक मैत्रीण सहकुटुंब जपानला फिरायला आली होती. त्यांना सुशी खायला आम्ही कुरा सुशी ह्या रेस्टॉरंट घेऊन गेलो होतो. कुरा सुशी म्हणजे "कन्वेयर बेल्ट सुशी" (conveyor-belt sushi) रेस्टॉरंट्सची मोठी शृंखला. तिकडे टेबलांसमोर लांबट पट्ट्यांवर फिरणाऱ्या प्लेट्सवर विविध सुशी डिशेस दिसतात. प्रत्येक प्लेटला झाकण लावलेलं असतं, ज्यामुळे ताजेपणा टिकतो. हवी ती प्लेट तुम्ही उचलली की ती लगेच तुमच्या खात्यात नोंदली जाते.

मात्रिणीच्या मुलांनी तर आवडीने सुशी खाल्ली पण तिची आणि तिच्या नवऱ्याची  मात्र तारांबळ उडाली होती. जपानी फूड किती आरोग्यसाठी हेल्दी आहे हे आपण कितीही वाचले, जाणले असले तरीही एकाऐक ते खाणे अवघड आहे. असो, मुद्दा हा की जपानी आहार का एवढा हेल्दी म्हटल्या जातो ह्याचा विचार करण्यासारखा आहे. त्यांच्या आहारामुळे ते दीर्घायुष्य आहेत हे मान्य करावे लागेल...

मी ना सारखी रेस्टॉरंट्समध्ये गेली की जपानी लोकांना बघत असते, अहो रागवतात पण काय करता, जिथे आपण नुसत्या हवेने फुगतो तिथे हे लोकं कसे फिट असतात हा प्रश्नांच्या उत्तराचा मोह काही केल्या माझ्या मनातून निघत नाही. असं नाही की हे लोकं भरपूर खात नाहीत. मला तर नेहमी माझ्यापेक्षा जास्तच खातांनी दिसतात. वाटते मग ह्यांच्या जीन्समध्येच फिट राहण्याचा गुण असावा... असा माझा स्वतःला समजावण्याचा अंदाज... पण आहाराचे बारकावे बघितले तर इथे जपानी जेवण कमी तेलात, मसाल्यात आणि अगदी सध्या पद्धतीचे असते. आता त्या सुशी मध्ये आहेच काय, जपानी तांदळाचा भात आणि वर कच्चे मासे जसं सॅल्मन, ट्यूना, मॅकरल किंवा थोडे शिजवलेले श्रिंप, ईल, ह्यात काकडी, ॲव्होकॅडो, अंडं, किंवा टेम्पुरा सारखे प्रकारही वापरले जातात. आणि सोबतीला काही सॉस असतात. आता हे सुशी तत्वज्ञान कधी नंतर सांगते.

सुरवातीला मला ह्याचं असं बेचव खाणं अजिबात आवडायचे नाही पण आता वाटते फिट राहयचे असेल तर आधी मास्याल्यांचा त्याग करणं म्हत्वाचं. सोया सॉस आणि भात खातांना मी काही ओळखीच्या लोकांना बघायची तेव्हा मलाच मळमळ वाटायचे पण आता तोच सोयीचा वाटतो. माझी लहान तर आवडीने खाते. तसं आपलं भारतीय अन्न संपन्न आहे पण आपण तेल आणि मसाल्यांच्या अति वापराने वाया गेलो आहोत. तेल आणि मसाला वापरला की पदार्ध चविष्ट होतो हेच समीकरण जणू चिपकून आहे आपल्याकडे. एखाद्या पदार्थाच्या मूळ चवीची आणि  त्याची गुणधर्माची आपण सारी वाट लावतो. पण आता वजन कमी करायचे म्हंटले तर ह्या दोन वस्तूंची मैत्री त्यागावी लागले हे ही नक्की... हल्ली मी भारतीय आणि जपानी असं इंदोजपान फूड बनवते... कधी रेसेपी शेअर करते, बघा करून.... पण जवाबदारी घेणार नाही...

पण मी एक गोष्ट नक्की शिकली, की जपानी आहार म्हणेज साधा, प्लेन... पदार्थाची मूळ चव जपणारा आणि म्हणूच आरोग्याला लाभ देणारा... कुठे मिरचीचा तडका नाही, कुठे मसाल्यांचा गोंगाट नाही. भात, मिसो सूप, थोडं लोणचं, भाज्या वाफवलेल्या किंवा उकडलेल्या, आणि एक मास्याचा तुकडा, किंवा मिट, चिकन... एवढं जेवण त्यांना पुरेसं वाटतं.

मग तुमचं काय म्हणणं आहे ह्यावर....

Post a Comment

0 Comments