नवीन टार्गेट...

 नवीन टार्गेट... #दकॉर्पोरेट लॅडर



नोव्हा टेक आणि घोसला इंडस्ट्रीसाठी आजचा दिवस म्हणजे खूप काही घेऊन येणारा होता... नोव्हा टेकच्या टीमला काम आवडले तर पुढचे सर्व प्रोजेक्ट घोसला इंडस्ट्रीकडेच पक्के होते. मंजिरीने खूप तयारी केली होती. मॉडेल्सने त्यांच काम चोख केले होते, मार्केटिंग स्टाफने स्वतःला झोकून काम केलं होतं. आज नोव्हा टेकच्या सीईओने सर्व लीडरचची मिटिंग बोलावली होती. उद्याच्या लोन्चींगची तयारी त्याला नजरेखालून घ्यायची होती.
मंजिरी सकाळी आठला ऑफिसला पोहोचली. अजूनही रात्रीचा थकवा डोळ्यांत होता. टीमच्या टेबलांवर अजूनही उघड्या फाईल्स, प्रेझेंटेशनचे प्रिंटआउट्स. रिकाम्या कॉफीच्या कपांचा ढीग तसाच होता. मंजिरीने हलकेच श्वास घेतला , तिच्या कॅबीनकडे ती वळली. गणपत तिची वाट बघत तिकडे आधीच पोहचला होता. त्याने ती येताच तिच्या आवडत्या क्रीम बिस्कीटसोबत तिला कॉफी कॅबीनमध्ये नेऊन दिली. आणि तिकडेचं उभा राहिला. मंजिरी कामात येवढी बिझी होती की ती कॉफी घेत नाही आहे हे त्याच्या लक्षात आले.
मॅडम, कॉफी थंड होईल, घ्या,” त्याने हळू आवाजात सांगितलं.
मंजिरीने नजर उचलली नाही. ती लॅपटॉपवर ई-मेल्स तपासत होती. ती काही बोलणार तोच त्याने तो कप अगदी तिच्या हातात दिलाच, ती हसली, नंतर त्याने लगेच बिस्कीटची प्लेट पुढे केली,
“घ्या खाऊन पूर्ण, मी तुम्हाला आवडते म्हणून पफ्स पण कॅन्टीनला बोलून ठेवलेत, पहिला फेर झाला की गरमगरम घेऊन येतो. मस्त खाऊन घ्या अन् जोमात कामाला लागा... आता सगळे दहा पर्यंत येतील तवा मग वेळ मिळणार नाय ना...
मंजिरी काम करत कॉफीचे घोट घेतले, हातातले बिस्कीट संपले की गणपत प्लेट पुढे करत होता.. तिने कॉफी संपवली आणि तो कॅबीन मधून निघाला. तिने गणपतला आवाज दिला, “तुम्ही पण गरम समोसे घेऊन या तुमच्यासाठी, सोबत खाऊ आपण... मग सगळे आले की तुम्हाला धावपळ असेल आज. मला तुम्ही सोबत हवे आहात माझ्या आज पूर्ण दिवस.”
गणपत स्मित हसत होकार दिला आणि निघाला. गणपतने मंजिरीचं नात काळजीचं होतं.... मंजिरीसाठी तो एक नुसता कर्मचारी नव्हता, तर ऑफिसच्या गोंधळातला एक साधा, पण खात्रीशीर आधार होता. कदाचित त्याला ती कळत होती...
काही वेळात सर्व स्टाफ ऑफिसला पोहचला होता. समृद्धी आज दहा मिनिट उशीरा आली होती. ती सकाळी घरी लवकर निघायचं बोलून सुहासला भेटायला गेली होती, पण तो अचानक त्याच्या गावी कामासाठी निघून गेल्याने काही बोलणं झालंच नव्हतं. तिचं मन आधीच अस्थिर होतं. उलट आज तिची भेट सत्यजितशी झाली होती ज्याच्याशी तिच्या लग्नाची बोलणी तिचा भाऊ करत होता. त्याचा शांत स्वभाव आणि बोलणं तिला नाही म्हटलं तरी भावलं होतंच. त्याचा मोकळेपणा आणि वागण्या बोलण्यातला विश्वास तिला विचार करायला भाग पडणारा होता. तो सकाळी तिच्याशी बोलायला आला तिच्या घरी आला होता पण तिला आज लवकर ऑफिसला पोहचायचे आहे हे माहित झाल्यावर तो फक्त दहा मिनिट तेवढा तिच्याशी बोलला. पहिल्या भेटीची चॉकलेट तेवढी त्याने दिली... समृद्धीच्या मनात एक विचित्र ढग दाटला. सुहास महत्वाकांक्षी, अधीर. सत्यजित शांत, संयमी. ह्या दोन टोकांच्या मध्ये ती कुठं उभी आहे ह्या प्रश्नात ती आज ऑफिसला उशिरा आली होती. तिच्यासाठी स्वतःला ह्यातून बाहेर काढणे हेच पुढचं टार्गेट होतं आणि समृद्धीसाठी तर ते सत्यजितवर खर्च झालेले दहा मिनिटच तिला ऑफिसला उशिरा पोहचण्यासाठी कारणीभूत होते जणू
त्यात आधीच तणावाखाली असलेल्या मंजिरीच्या नजरेला हे सुटणं शक्यच नव्हतं. समृद्धी दिसताच तिने तिला बोलावून घेतले,
‘मला आज कशातच उशीर चालणार नाही... झाला तर घरी जायला कर... नाहीतर ह्या प्रोजेक्ट मध्ये काम करायचे नाही. मला कामचुकार लोकं सोबत नकोत.” हे ती बोलत होतीच तर रोहन तिच्या कॅबीन मध्ये ओरडत आला,
“ऐ मंजिरी, समजतेस काय गं तू स्वतःला, मालकीण आहेस ह्या घोसला इंडस्ट्रीची.”
तापलेल्या मंजिरीने सरळ उत्तर दिलं, “आणि जर मी मालकीण आहे हे प्रू केलं तर सोडशील का कंपनी...”
रोहन गडबडला, “ऐ, काहीही बोलू नको... माझं नावं नाही आजच्या नोव्हा टेकच्या मिटिंगसाठी... घे बघ...”
“मला बघायला वेळ नाही... काम करायला नको तुला आणि मिरवायला कशाला हवं रे.. फुकट क्लायंटच्या ऑफिस मध्ये sandwich खायला कशाला हवे तुला...
“मी माधवसरांना बोलेल.”
“मी कालच बोलले... तू बाहेर आहे ह्या प्रोजेक्टच्या... तुला जे करायचे ते तू कर... माझ्या कॅबीन मध्ये आज उद्या येऊ नको...”
रोहन बडबडत निघून गेला. मंजिरी समृद्धीकडे वळली, तशी ती म्हणाली, “मॅडम मी अर्ध्या तासात फाईल पाठवते...”
“नो... नो, इथेच बसं आणि कर, आज मी एकही चूक खपवू शकत नाही... आज पेमंट मिळणार आहे नोव्हा टेककडून... चूक मी मान्यच करू शकत नाही... चल सुरु कर.”
आता समृद्धीला फक्त मंजिरी समोर दिसत होती आणि काम...
दुपारी माधव आला, आणि मग मंजिरी, बिपाशा, रुद्र आणि सोबत गणपत नोव्हा टेकच्या सीटी ऑफिससाठी निघून गेले. इकडे ऑफिस मात्र कामात मग्न होतं. समृद्धी टेबलावर बसून स्लाईड्स एडिट करत होती. पण लक्ष तिचं सुहासच्या मेसेजवर होतं. मनाला एकाग्र करत ती काम करत होती तसा सत्यजितचा मेसेज आला,“खूप उशीर होऊ देऊ नको. स्वतःची काळजी घे.”
समृद्धीने नाक तोंड वाकडं केलं पण दुसऱ्या क्षणी तिला जाणवलं की तिला हलकं वाटत आहे, नुसत्या त्या मेसेजने तिच्यात उत्साह शिरला. त्यावर उत्तर देण्याचे धाडस झाले नाही तिचे.
सहा वाजले होते तरीही ऑफिसमधून कुणीही आज हलत नव्हतं. मंजिरी आणि माधव अजून पोहचले नव्हते. वाट त्यांची सर्वाना होती. पण कामात मग्न सारे होते. सर्वाना त्याचं टार्गेट पूर्ण करायचं होतं. आजच्या टार्गेटने सर्वांच ह्या प्रोजेक्टचं भवितव्य ठरणार होतं. कोण गळणार आणि कोण पुढे निघणार ह्याचा निर्णय आता मंजिरी आल्यावर लागणारा होता.
आठ वाजले होते, आणि सर्वांच्या टेबलवर कोल्ड्रिंक आणि स्नेक आले. जरा स्टाफ हलका झाला, तसा गणपत मंजिरीचा लॅपटॉप आणि bag घेऊन आत शिरला. सावी तशी सरसावली, पुढे आली, “गणपत?” आवाज देत तिने इशाऱ्यात विचारलं. त्यानेही हाताने सगळं ठीक आहे असा इशारा केला. तशी मंजिरी माधवसोबत बोलत हसत आत शिरली.
हे गाईज, लेट्स मीट इन द कॉन्फरन्स रूम, महत्वाचे बोलायचे आहे.”
सगळ्यांच्या अंगावर शहारा गेला... सगळे लॅपटॉप घेऊन रूम मध्ये शिरले. माधवला एक ऑनलाईन कॉल होता तो त्याच्या कॅबीन कडे निघाला, मांजरी थकलेली दिसत होती तरीही उत्साह कायम होता तिच्यात, समोर सर्वांचे चेहरे थकले होते. त्यांना बघत मंजिरी हसत म्हणाली,
“थँक यू आल. तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नव्हतं. आम्ही पुढचे दोन वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट साइन केले आहेत. उद्या लोन्चिंग आहे आणि त्यानंतर पुन्हा नवं काम.”
सगळ्यांनी जणू रोखून धरेलेला श्वास सोडला आणि सारा थकवा क्षणात क्षीण झाला... मंजिरी खुर्ची ओढून बसली, सगळ्यांना तिने बसायला सांगितले.
“रुद्र, तू पुढे हे ऑपरेशन बघशील. सावी, तुला नवीन स्टाफ मिळेल पुढच्या महिन्यात सोबतीला तेव्हा तुझी टीम तयार कर नवीन प्रोजेक्टसाठी. पूर्ण मार्केट अनाल्य्सीस करायचा आहे, उद्याच्या लोन्चींग नंतर सगळे आकडे बदलणार आहेत. सो बी प्रीपेअर... कुशल, तुझा कामचुकार आता माफ केला कारण तुझ्यात क्षमता आहे, म्हणून मी तुला चान्स देत आहे. तू आणि मुकुंद बिपाशाला सर्व अपडेट देणार आहात ह्यापुढे, सर्व चार्टस आणि डेटा तुझ्या हाताखालून तिला मिळायला हवा म्हणजे ती साईट अपडेट करणार... कामांचा तर तुला मलाच अपडेट द्यावा लागेल. आणि हो समृद्धी तुझ्यासोबत काम करणार नाही. समृद्धी तू सावीला जॉईन करायचं, तिचं काम शिकून घे.
मंजिरी परत रुद्र कडे वळली, रुद्र प्रोजेक्टसाठी लागणारे सर्व ट्रेनिंग लवकर संपव, तु नवीन प्रोजेक्टला लीड करणार आहेस.
हे ऐकून कुशल आणि शनाया जरा एकमेकांकडे बघून कुजबुजले, कुशल हळूच बोलला, “माझ्या मागच्या सर्टिफिकेटचा पेमेंट झाला नाही अजून आणि ह्याला ही अजून काय काय देते. आपल्याला ना यार असा मस्का लावणं येत नाही.”
शनाया लगेच बोलली, “म्हणूनच तर आपण मागे आहोत ना, ही मंजिरी आपल्याला पुढे जाऊ देत नाही.”
“हुम्म... आता एवढं काम करवून घेतलं आपल्याकडून काय मिळणार मोबदल्यात.... नवीन टार्गेट...”
नवीन टार्गेट हा शब्द कसा मंजिरीने ऐकला, हो कुशल नवीन टार्गेट, आणि उद्या लोन्चींग नंतर सोमवारपासूनच कामाला लागा... मलाही डेडलाईन द्यायला आवडत नाही... माझ्यावर तशी वेळ आणू नका....
“शनाया तू डिझाईन बघणार आहेस तर तशी तयारी कर... मला गॉसिप नको आहे काम हवं आहे. मग सगळं मिळणार.”
शनायाने स्मित होकार देत. काहीही बोलणं टाळलं. क्षणभर खोलीत शांतता पसरली. सगळ्यांना कळलं यश मिळालं आहे, पण आता खरी कसोटी सुरू होणार आहे.
त्या रात्री ऑफिस रिकामं झालं. माधव आणि मंजिरी एकटे बसले होते. तिच्या डोळ्यांत थकवा होता, पण चेहऱ्यावर तेज झळकत होतं. कारण आज फक्त एक कॉन्ट्रॅक्ट नाही, तर घोसला इंडस्ट्रीचं भविष्य तिने परत जिंकून आणलं होतं.
माधव आणि मांजरी परत ऑफिसमध्ये एकटे होते. मंजिरीच्या चेहऱ्यावर थकवा चक्क दिसत होता पण त्यातही तिच्यात उत्साह अजूनही स्पष्ट दिसत होता.
#दकॉर्पोरेटकॉर्पोरेट लॅडर चे आधीचे भाग पेजवर आणि साईटवर आहेत!!
to be continued...
----पुढील भाग लवकरच....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI

Post a Comment

0 Comments