इंटरव्ह्यू #दकॉर्पोरेटलॅडर
नोव्हा टेकच्या हॉलमध्ये मोठमोठे स्क्रीन, चमकणाऱ्या लाईट्स आणि प्रोजेक्शनची तयारी सुरू होती. उद्योजक, पत्रकार, इन्व्हेस्टर्स आणि क्लायंट्स अशा सगळ्यांचा जमाव हळूहळू भरत होता. घोसला इंडस्ट्रीकडून मंजिरी, माधव, रुद्र आणि संपूर्ण कोअर टीम आली होती.
मंजिरीच्या मनात एकच विचार घोळत होता,“आज फक्त नोव्हा टेकसाठी नाही, तर संपूर्ण मार्केटला आपली क्षमता दाखवायची आहे.”
माधवने तिच्याकडे पाहत शांतपणे विचारलं, “तू तयार आहेस ना?”
मंजिरीने डोळ्यांनीच होकार दिला, पण मनात एक हलकासा ताण होता.
लोन्चींग सुरू झालं. स्टेजवर मंजिरीने आत्मविश्वासाने सादरीकरण सुरू केलं. तिच्या शब्दांना तिच्या डोळ्यांतली आग साथ देत होती. रुद्रने टेक्निकल डेमो हाताळला, सावीने प्रेझेंटेशन केलं. संपूर्ण टीमने एकमेकांना इतकं चांगलं पूरक केलं की नोव्हा टेकच्या सीईओने टाळ्या वाजवत स्टेजवर येऊन थेट हात मिळवला.
“मंजिरी, धिस इज बियॉन्ड अवर एक्स्पेक्टेशन्स.” तो हसत म्हणाला.
“धिस इज ऑल माय टीम्स एफर्ट्स.” ती हसत उत्तरली, तिच्या तेवढ्या शब्दाने सर्व टीम जणू आत्मविश्वासाने उभी होती. माधवला तिची हीच बाजू आवडत होती. सर्व काही करूनही तिने कधीच सर्वांसमोर क्रेडिट घेतलं नव्हतं.
क्षणभरासाठी सगळं स्थिर झाल्यासारखं वाटलं. घोसला इंडस्ट्रीला अधिकृत मान्यता मिळाली होती. हॉलच्या आवारात छोटीशी पार्टी होती. सगळे तिकडे प्रोफेशनल लोकं गप्पा करत चहा कॉफी घेत होते. साविच्या जुन्या कंपनीचा बॉस तिच्या कडे आला,
“सावी यु डीड वेल, तू परत कंपनी जॉईन करू शकतेस. तुझा लीड पोझिशनसाठी इंटरव्ह्यू इथेच झाला समज, मला आनंद होईल तू जर जॉईन केलं तर. किती हाईक हवी तुला. आपण बोलू त्यावर.”
सावी स्मित हसली, “सर, धन्यवाद... पण अजून काही विचार नाही माझा सिव्चचा.”
“ओ, मग मंजिरीच्या हाताखाली अजून किती दिवस राहशील, स्कील सेट उत्तम आहेत तुझे मग चान्स घ्यायला काय हरकत आहे. हवं तर मी...”
सावीने त्यांना थांबवलं, “सर इथे हाईक आणि चान्सचा काहीच प्रश्न नाही... मला वातावरण उत्तम मिळाले आहे, ग्रो करण्यासाठी स्पेस आहे, मंजिरी, माझी बॉस म्हणून उत्तम आहे.”
तो मिश्कील हसला, “मग तुला काय तिच्यासारखे व्हायचे आहे.”
तीही मिश्कील हसली, “तिच्यासारखं मी कधीच होऊ शकत नाही... ती कामात चोख आहे. तिच्या कडून फक्त मी शिकू शकते... आणि लोकं काय बोलतात ते मला माहित नाही... आणि काही गोष्टी ज्याच्यात्याच्या खाजगी असतात, त्याच्याशी मला काही करायचे नाही... बाकी तुम्ही मंजिरीला उत्तर देऊ शकता का असं?”
“वेल,.. मी माझं काम केलं, निर्णय तुझा आहे. सांग कधी विचार झाला तर... मी ओपन आहे तुझ्यासाठी.”
त्याने हसून मार्ग बदलला, तशी मंजिरी सावी कडे आली, “सावी मला निघायला हवं, आज काही इंटरव्ह्यू ठेवले आहेत. तू आणि रुद्र आवरून या... आणि हा, तू तुझ्या सवडीने ये.”
ऑफिसमध्ये परतल्यावर वातावरण पूर्ण बदललं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, पण त्याचवेळी पुढच्या आव्हानाची जाणीव होती.
मंजिरी तिच्या कॅबिनकडे चालली होती, तेवढ्यात रिसेप्शनजवळ थांबली. काचेमागे इंटरव्ह्यूसाठी आलेली काही मुलं-मुली खुर्च्यांवर बसलेली होती.त्यांच्या डोळ्यात अपेक्षा होती, चेहऱ्यावर हसू आणि मनात प्रश्न. मंजिरी थोडा वेळ तिथंच थांबली. तिला तिचा पहिला इंटरव्ह्यू आठवला. त्या वेळी तीही ह्याच खुर्च्यांवर बसलेली होती, हृदय धडधडत, हातात फाइल, आणि भविष्याची स्वप्नं डोळ्यात.
थोड्यावेळाने HR आला आणि मंजिरीने इंटरव्ह्यू सुरु केले, त्यात सागरचा रिझ्युमे तिला आवडला, त्याला थेट तिने प्रश्न केला,
“धिस इज अ प्रायव्हेट कंपनी, बारा-बारा तास काम करावे लागणार, तुला चालेल का?
“हो, माझ्या कामाला आदर मिळाला तर नक्कीच.”
मंजिरी हसली, त्या एका उत्तराने तिला परत एक नवीन चेहरा मिळाला होता, ती हसत म्हणाली, “सागर, तू मागच्या कंपनीतून का बाहेर पडलास? तिथे आदर मिळत नव्हता का?”
तो काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला,
“मॅडम, काम आवडलं होतं. पण महिन्यानंतरही पगार मिळत नव्हता. बारा पंधरा तास काम करूनही मेनेजर पुढ जाऊ देत नव्हता... हे सांगायला मला वाईट वाटते आहे पण सामान्य घरच्या मुलांना काही गोष्टी जमत नाहीत. पण ह्याचा अर्थ असा नसतो की ते त्या करू शकत नाही, संधी हवी असते, बसं तिच मी शोधत आहे.”
मंजिरीच्या हातातली पेन थांबली. त्याच्याकडे बघत तिने परत त्याचा रिझ्युमे वाचला, जरा वेळ शांतता होती खोलीत, त्याच्या
रिझ्युमेच्या शेवट्या वाक्याने तिला त्याची निवड करण्याचे कारण दिले, “आय बिलीव्ह इन सिन्सिअरिटी मोअर दॅन स्पीड.”
ती हसली तिने रिझ्युमे HR ला साईन करून दिला, आणि म्हणाली, “सागर, यू विल बी पार्ट ऑफ द घोसला इंडस्ट्री नाऊ... अभिनंदन, मला लोक फक्त पैशासाठी नाही, तर ओळखीसाठी, अस्तित्वासाठी, आणि सन्मानासाठी काम करणारे हवे.”
त्याच्या डोळ्यातलं पाणी लपवणं अवघड झालं. तो उठून म्हणाला, “थँक यू मॅडम.”
तशी मंजिरी स्मित हसली, “आणि हा सागर, बारा पंधरा तास काम केलं तर कंपनी त्याची काळजी नक्की घेईल. माझा स्टाफ असणार तू एवढं लक्षात ठेवायचं आणि महत्वाचे म्हणजे, मला कामचुकारपणा अजिबात चालणार नाही.”
“मी माझं सर्वोत्तम देईन मॅडम.”
त्याचा भोळेपणा आणि डोळ्यातली आनंदाची चमक मंजिरीला कोण जाणे आपलीसी वाटली. तो बाहेर गेला, आणि मंजिरी खिडकीतून त्याच्याकडे पाहत राहिली. कदाचित हा इंटरव्ह्यू सागरचा नव्हता, तो मंजिरीचा होता, स्वतःशी केलेला. नंतर तिला कुणी पसंत पडलं नाही. मुलखती संपवून ती बाहेर आली. माधव आलेले होता त्याच्याशी गप्पा कराव्या म्हणून ती त्याच्या कॅबीन मध्ये शिरली. बराच वेळ दोघे बसून स्वतःच्या आणि पुढच्या नवीन प्रोजेक्टच्या गप्पा करत होते.
संध्याकाळी मंजिरीने सर्वांना कॉन्फरन्स रूममध्ये बोलावलं.
“गेल्या दोन महिन्यांत तुम्ही काय मेहनत घेतली आहे, ते मला माहित आहे. पण आता पुढे नवं टार्गेट आपल्यासमोर आहे. नोव्हा टेकसाठीचा प्रोजेक्ट हा पहिला टप्पा होता. आता आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पाऊल टाकायचं आहे.”
सगळे आश्चर्यचकित झाले.“इंटरनॅशनल?” शनायाने मोठ्या डोळ्यांनी विचारलं.
“हो,” मंजिरीने शांतपणे उत्तर दिलं. “नोव्हा टेकने मेल पाठवला आहे. त्यांना युरोपियन मार्केटसाठी पार्टनर हवा आहे. आपल्याला तो प्रोजेक्ट हाती घ्यायचा आहे.”
तिने सावीला आवाज दिला, ती तिकडे नव्हती, रुद्र पटकन बोलला, “मॅडम सावी तिच्या मुलीला घ्यायला लवकर निघून गेली आज, तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बिझी होत्या. तिने प्रयत्न केला पण मग मीच बोललो तुमच्याशी मी बोलतो म्हणून.”
“ठीक आहे, मी उद्या बोलते तिच्याशी, आणि एक नवीन मुलगा जॉईन होणार आहे लवकरच.”
रुद्र मान हलवत होता, तशी शनाया समृद्धीला हळूच बोलली, “बघ हा रुद्र ना असाच आहे. आणि ती सावी बघ लवकर निघून गेली. तुला मला जायचे असते तर आपली वाट लावली असती ह्या मांजरीने....”
समृद्धीने तिच्याकडे बघितले, “अगं शब्द तर बरोबर वापर... बॉस आहे ती आपली., मांजर काय बोलतेस...”
“बॉस की बॉसची ती... मांजर नाही तर काय... हिला काय वाटते आम्हाला कळत नाही. ”
समृद्धीने हिचं काहीच होऊ शकत नाही असा भाव चेहऱ्यावर आणला आणि गप्प झाली. तिलाही आजच्या यशस्वी लोन्चींगचा आनंद होता आणि ती आता मंजिरी आणि नवीन स्टाफ सोबत काम करणार होती. सावी तिला तिचेही काम शिकवणार होती. तिला आनंद होता. पण मनात अजूनही अस्वस्थपणा कायम होता तो सुहासमुळे. त्याचं काय करावं तिला आता सुचत नव्हतं, मंजिरी बोलली तसं सोडून द्यावं की मार्ग काढावा हा प्रश्न तिला पडला होता.
शेवट्या कॉल नंतर सर्व निघून गेले होते. मंजिरी कॅबिनच्या खिडकीतून शहराकडे पाहत होती. खाली दिव्यांची गर्दी, वर अमर्याद आकाश.
“हे सगळं अजून सुरुवात आहे,” ती स्वतःशीच पुटपुटली.
कारण खरं तर नवं टार्गेट हे फक्त प्रोजेक्ट नव्हतं. ते प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याचंही होतं.
कोणी स्वतःला सिद्ध करणार होतं, कोणी आपलं हरवलेलं स्थान परत मिळवणार होतं, तर कोणी नव्या स्वप्नांकडे पहिले पाऊल टाकणार होतं.
आणि मंजिरीसाठी?
तिचं नवं टार्गेट म्हणजे घोसला इंडस्ट्रीला अशा उंचीवर नेणं, जिथे ती स्वतःलाही कधी कल्पना करू शकली नव्हती. तिच्यासाठी हे गाठणं म्हणजेच स्वत:च्या मनातला प्रचंड गोंधळ थांबवणं होतं. ती कुठे आहे हे तिला कधीच कळत नव्हतं तरीही ती सगळीकडे होती हेच तिच्या यशाचे कारण होते....
#दकॉर्पोरेटलॅडर चे आधीचे भाग पेजवर आणि साईटवर आहेत!!
to be continued...
----पुढील भाग लवकरच....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI
0 Comments