भाग 4-द गेम ऑफ अफेअर!

 भाग 4-द गेम ऑफ अफेअर!

सुधा पटकन म्हणाली, “न पटण्यासारखं काय हो त्यात, लोकांना करायचं राहिलं तर कुठलाही मार्ग असतो... अफेअरला प्रेम समजून बसतात हे असली लोकं.”

“तेही प्रेम असतं गं सुधा, भावना त्यांच्याही गुंतल्या असतात.”

राघवला परत लक्षात आलं होतं. सुधा त्याला रोखून बघत होती, तिला हसत बघत तो म्हणाला, “हो, तेही बरोबर आहे. अफेअर फेअर कसं असणार... बरोबर आहे तुझं.”

राघव जरा शांत झाला, जणू आवर घालत होता स्वत:ला, तसाही तो सुधाला कधी क्रॉस करत नसायचा. ती म्हणेल ती पूर्व दिशा हे त्याचं गणित होतं. तिच्या समोर तो हे गणित नक्की पाळायचा. जरा वेळाने मधुला म्हणाला, “पण मधु, आपला मंगेश नाही तसा. तू काळजी करू नकोस. मी असताना तो असं काही करणे शक्य नाही. माझी नजर असते त्याच्यावर.”

The Game of Affair

राघवच्या ओघात मनातून निघाल्या शब्दाने मधुही जरा घाबरली होती. मधु रडत होती, तर त्याने तिला अगदीच जवळ घेतलं. मधु आता राघवच्या खांद्यावर मान ठेवून रडत होती. सुधा हे बघून बाजूलाच झाली. मनात तर तिच्याही कालवा कालव सुरू झाली होती. आता तिला मधुचा खूप राग येत होता. तिने पुढे होऊन मधुला राघव जवळून बाजूला ओढलं आणि ती बसली. राघवला काहीतरी जाणवलं पण त्याने लगेच सुधाच्या खांद्यावर मान ठेवून तिला हाताने घट्ट मिठी दिली. मधु तिच्या नादात होती, तिला काही वाटलं नाही ती गुमान समोरच्या सोफ्यावर जाऊन बसली.

राघव, “मधु असं काही नाही आहे. तुझा तो बावळट नवरा तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन करतोय, म्हणून तो त्याची सेक्रेटरी रागिणीसोबत बोलत असतो. अगं सुट्या नाहीत ना, मग काहीतरी अॅडजस्ट सुरू आहे त्याचं. ऑफिसच्या कामासाठी जायचं तुझ्यासोबत असं काहीतरी. दुपारी बोलला तो मला. आणि रागिणीचं काय धरतेस, मनाने गोड आहे ती, विधवा आहे, भावासारखा जीव लावते आपल्या मंगेशला. मंगेश बोलला मला तिनेच त्याला हे सांगितलं आहे. नाहीतर तुझा तो मंगू त्याला कुठे सुचत असते असं काही.”

राघव सांगत होता आणि मधुच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. सुधाने तिला एक नजर बघितलं आणि राघवकडे बघत म्हणाली, “नशीब माझ्या बहि‍णीचं, तिला असा नवरा मिळाला, मलाही म्हणाला तो.”

आता मधु लाजत म्हणाली, “तायडे, तुला पण सांगितलं त्याने... मग मी काय शत्रू होते काय. सांगायचं ना. उगाच कुठे पोहोचली होती मी, वेडीच आहे मी.”

राघवने तिला जीभ दाखवली आणि चिडवत म्हणाला, “वेडीच तर आहेस तू, त्या बावळट नवऱ्याच्या प्रेमात.”

“जिजू... नवरा आहे माझा तो.”

“असं!”

The Game of Affair

राघवच लक्ष आता सुधावर गेलं, त्याने सुधाला आणखिनच स्वत:कडे ओढलं, “काय गं, नशीब काय तुझं कमी आहे! माझी राणी आहेस तू... अरे बाबा आम्ही जोरुचे गुलाम... आपण म्हणाल तो शब्द अंतिम राणी सरकार.”

सुधाने स्वत:ला त्याच्या मिठीतून सोडवलं, “पण काय रे ही रागिणी नवीन आहे का?”

“झालेत सहा महीने तिला ऑफिसमध्ये. मंगेशसोबत काम करते. होतकरू आहे. मी तिला त्याची सेक्रेटरी म्हणतो.”

“का?”

“अगं, सगळं सांभाळते ती, म्हणून... बघ ना नातं पण सांभाळायला निघाली आहे. पण मनाने प्रेमळ आहे. आता मला तिने तिकीट दिले होते एका शोचे. आपल्या ऑफिसमध्ये कुणी तरी आणून दिले होते. तिला जाणे अवघड वाटले असावे, आपल्या दोघांसाठी दिले होते तिने. मला ना वेळ राहत नाही... आणि तू एकटी गेली नसती. तिचं मन ठेवण्यासाठी मी सकाळी तिला सहज बोललो, शो मस्त होता असं.”

सुधाने ऐकून तर घेतलं पण तोंड वाकडं करत ती स्वयंपाकघरात शिरली, जाताच म्हणाली, “असं... ये तू खोलीत. शोचे दोन तिकीट आणतो आणि तसेच ठेवतो. बघते तुला.”

राघवने ऐकलं, “मधु आज काही खरं नाही माझं, बायको जाम भडकली आहे. तुला माहीत आहे काय गं काही?”

“नाही जिजू, पण जिजू, मंगेशच खरंच काही नाही ना?”

“मधु, मी म्हणतोय ना. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा... मंगेश साधा सरळ मुलगा आहे गं”

मधु परत राघवजवळ येऊन बसली, तिला असं बघून परत सुधाने आतमध्ये ताट जोरात आदळलं, मनात बोलली, “मेली कुठली, नवरा माझा आहे आणि ही उठसुट जाऊन बसते त्याच्याजवळ... चिपकते नुसती निर्लज्जपणे. काही लाज वाटत नाही हिला, आता काय बोलावं ह्यांना मलाच लाज वाटते.”

आणि मग ओरडली, “ए बाई, नाही आहे ना गं तुझ्या नवऱ्याचं काही आणि असलं ना तर असं माहीत होतं नाही... काय हो राघवराव?”

राघव आता गोंधळला, त्याने मधुच्या गळ्यातून हात काढला.

“न न, नाही ना... ब ब बरोबर बोलते ती. माहीत होत नसतं मधु.”

राघव आणि सुधाचं जणू काय सुरू होतं हे तेच सांगू शकत नव्ह्ते. सुधा राघवमध्ये काय शोधत होती हे तिला कळत नव्हतं आणि राघवला सुधाच्या शब्दात अडकायचं नव्हतं. तरीही राघव सुधाच्या असं बोलण्याने जरा बोलून गेला होता आणि नेमकं तेच सुधाला खटकत होतं... जरा वेळ शांतता होती खोलीत, राघव मनातून गोंधळला होता. त्याने स्वत:ला शांत करत स्वर शांत केला, “मधु काहीही नाही. तुला वाटतं तेवढ्या दिवस राहा इथे, तुझंच घर आहे. मंगेशला पण बोलवून घे.”

द गेम ऑफ अफेअर (Marathi Edition)

सुधा भाजी गरम करत होती, परत मनात बोलली, “धर्मशाळा आहे ना, आता दिलंय ना तिला गिफ्टमध्ये टू बीएचके घेऊन. जा ना म्हणावं लवकर... येते इथे जिजू जिजू करत नुसती, लहान आहे का आता ही!”

इकडे हॉलमध्ये मधु आणि राघव गुमान बसले होते. मधुने नेहमी प्रमाणे राघवचा कोट काढून दिला, तसा ती लहानपणापासून काढून द्यायची, मोजे काढायला सांगितले. जिजूला ढकलत तिने वाशरूममध्ये टाकलं, त्यांचे कपडे घेऊन ती उभी राहिली. राघव गुणगुणत बाहेर आला आणि म्हणाला, “अशी मेहुणी पाहिजे यार, काय मज्जा आहे माझी, बायको रुसून बसली तरी मेहुणी हजर आहे.”

सुधा परत ओरडली, “हो ना, मग तरीही गरज पडावी कुणाची...”

आणि ती ओरडत हॉलमध्ये आली, “ मधु, तुला काय कळत नाही काय गं आता लग्न झालं तुझं, हे असं कशाला करतेस? आहे ना मी करायला त्याचं.”

राघव मिश्किल हसला, म्हणाला, “ए, माझ्या एकुलत्या एका मेहुणीला काहीही बोलायचं नाही. ती किती वर्षापासून करते हे...  किती गोडवा आहे ह्यात, तुला नाही कळणार. मला माहीत आहे तिचं काहीतरी मागणं असेल. तू आमच्या दोघांच्या मध्ये बोलू नको गं.”

तो नाईट सूट घालून खोलीतून आला, “काय म्हणणं आहे मधुराणीचं आता आणि हा... तुला तुझ्या बहि‍णीचं ऐकण्याची गरज नाही... माझ्या मोठ्या मुलीसारखी आहेस तू, १४ वर्षाची तर होती, सारे लाड पुरवले आणि पुरवेल तुझे, हिचं ऐकणार नाही. काय पाहिजे आता. हमखास बोल.”

सुधा परत रागात स्वयंपाकघरात गेली, राघव परत मधुला म्हणाला, “काय म्हणणं आहे तुझं?”

“जिजू मी आता हा गोंधळ घातला, मग मंगेशशी कशी बोलू?”

“बोलूच नको, त्याला अजिबात माहीत होऊ देऊ नकोस की तुला ठाऊक आहे.”

“पण, मग...”

“रहा इथे, येईल तो घ्यायला. त्याला माहीत आहे तू इथे आहेस ते. आज तो खूप बिझी आहे. करेल तुला फोन. तो येईपर्यंत इथेच राहायचं.”

राघवने शेजारी ठेवलेलं त्याचं वॉलेट घेतलं, त्यातून दहा हजार काढले आणि मधुला दिले.

“हे घे, मस्त ड्रेस घे सुंदरसा, माझ्याकडून... अजून हवेत का?”

मधु राघवला येऊन बिलगली, तोच सुधा जेवणाचं घेऊन हॉलमध्ये शिरली, परत तिचा राग मस्तकात गेला. ओरडली, “जेवताय ना... की अजून काही बाकी आहे.”

राघव हळूच म्हणाला, “काहीतरी जळत आहे...”  

“जिजू, गप्प, काहीही काय तुमचं. जेवायचं ना.”

“नाही गं, मी जेवून आलोय, काही भूक नाही आणि तुला तर ठाऊक आहे उशिरा जेवलो की मग त्रास होतो मला.”

आता सुधाने भाजीचं पातेलं जेवणाच्या टेबलवर आदळलं, “म्हणजे, घ्या आता, सांगायचं ना, कशाला केला असता मी स्वयंपाक...”

“म्हणजे, तुम्ही आहात ना दोघी, मी बसतो इथे, घ्या जेवायला.”

राघव तिथेच सोफ्यावर बसला, सुधाने दोन ताट वाढून घेतली आणि रागात जेवायला बसली. मधु तिच्या फोनशी खेळत जेवत होती. ती पूर्णपणे शांत झाली होती. आता तिला मंगेशची वाट होती. सुधा प्रत्येक घास खाताना राघवकडे बघत होती. राघव फोनमध्ये डोकं घालून बसला होता, हसत होता, तर कधी सुधाकडे बघून डोळा मारत होता.

मध्येच म्हणाला, “अरे मी सांगायचं विसरलो, मधु तू आता दोन तीन दिवस इकडेच थांब गं मला दिल्लीला जायचं आहे, माझी महत्त्वाची मीटिंग आहे.”

“सुधा, माझी बॅग भरून ठेवशील उद्या.”

द गेम ऑफ अफेअर (Marathi Edition)

“कशाला? बॅग मधलं समान वापरतोस काय तू? कालची बॅग तशीच आहे...” सुधा परत वचकून बोलली.

राघव परत गोंधळला, काहीच बोलला नाही, फोनमध्ये गुंग होता आणि मग फोनवर बोलत तो बाल्कनीत गेला. हसून हसून बोलत राहिला. परत हॉलमध्ये आला. मधुच्या जवळची खुर्ची ओढून बसला, तोच मधुने एक घास त्याला भरवला, “वा मस्त झाली आहे भाजी...” राघवने स्तुती केली.

“काय चव आहे यार माझ्या बायकोच्या हाताला... जवाब नाही तुझा सुधा...”

मधु हसली, “जिजू, ही भाजी मी केली आहे. काय तुम्ही!”

“अरे, ओ, माझ्या मेहुणीने केली का...”

“जिजू काय हे, तायडी कुठे करते ही भाजी, मीच करते ना... तुमच्यासाठी... आपल्या दोघांना आवडते ही पनीरची सुखी भाजी...”

“अरे मग, आपल्या दोघांची आवड शाही आहेच.”

राघवचा परत फोन वाजला, तो परत उठला, मधु म्हणाली, “माझा जिजू, किती काम करतो, बिझीच असतो. पण मन ना असे जपतो की काय सांगावं! माझा दुसरा बाप आहे माझा जिजू... माणसं जपण्याची कला अवगत आहे ह्या देव माणसाला. बाप कधी आठवू दिला नाही पण बाप समोर बघते आहे मी”

मधुचे डोळे पाणावले होते. सुधा ताट उचलत म्हणाली, “बापापेक्षा तुझा मित्र जास्त वाटतो तो.”

मधुही लाडात म्हणाली, “मग, असू दे ना, किती काळजी करतो माझी. माझं एवढं काळजी करणारा कुणी आहे ही अनुभूति किती सुख देऊन जाते गं.”

“काळजी! डोक्यावर बसवून ठेवलं आहे तुला.”

“मग काय झालं, बाबा राहिले नाहीत, मग मी माझ्या बाबांना जिजूत शोधत आले आणि आता तोच माझा बाप आहे.”

“बसं बाई, अजून नको... जा नमाच्या खोलीत जाऊन झोप. तुझ्या नवऱ्याला कॉल करशील आठवणीने.”

“हुम्म, नाही करत जा... तू कर तुझ्या जावयाला...”

ती राघवला शोधत बाल्कनीत आली, राघव बोलत होता, त्याने दुरूनच मधुला त्याच्याकडे येताना बघितलं आणि फोन बंद केला. तिला कवेत घेऊन तो चालत हॉलकडे निघाला.

“काय गं, झोप आता, कसला विचार करायचा नाही. जा बघू... खूप वेळ झालाय... आणि तुला बोललो ना दोन तीन दिवस थांब इकडे. आपल्या मंगेशला सुद्धा बोलवून घे.”

मानेने होकार देत ती नमाच्या खोलीत निघून गेली. राघव हॉलमध्ये होता. सुधा तिथे नव्हती. तो त्याच्या खोलीत आला, सुधा बेड्शीट आवरत होती, त्याने तिचा हात धरला, म्हणाला, “सुधू, माझी बॅग तयार ठेवशील उद्या पाचपर्यंत.”

“का रे, तुझी बॅग रेडीच आहे, वापरली कधी तू!”

मगाशी प्रश्न सुधाने केलेला होता, पण उत्तर आता तयार होतं राघवकडे. राघवने तिचे केसं सावरले, तिच्या माथ्यावर अलगद ओठ टिपली, “सुधू, एका दिवसासाठी गेलो होतो, आंघोळ करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. हॉटेलमधले कपडे वापरले मी झोपताना, म्हणून बॅग तशीच राहिली... काय तुझं कसला विचार सुरू असतो.”

“अहो... हो का... माझं ना...”

राघवच्या स्पर्शाने जरा शहारली, सुधाने शब्द आवरले, सारं काही मनातलं शमलं आणि तिलाही उत्तर पटलं. राघवने तिला इशारा केला, “झोप आता, कसला विचार करू नकोस. मला उद्या लवकर निघायचं आहे.”

“अहो ऐका ना...”

“काय गं?”

“ते... मला ना...?”

“काय गं?”

“अहो...”

“तुझं काय सुरू आहे सुधू, कसल्या चौकश्या सुरू आहेत गं ह्या? काय म्हणायचं काय तुला? माझ्याकडे ना उगाच भानगडी करायला वेळ नाही. तू ना तुझ्या डोक्यात जे आहे ते आधी काढून फेक. तुला वाटते असे काही नाही. बघते आहेस ना तू मला, इथे जेवायला वेळ नसतो आणि तू काय आणि कसला विचार मनात घेऊन बसत आहेस.”

“अहो, पण... जाऊ द्या... माझंच काय ते माहीत नाही.”

“हुम्म... जाऊच देना सुधू, नकोच काही. झोपू दे गं.”

राघवने अंगावर ओढून घेतलं, एसी गार केला आणि झोपला.

सुधा मात्र अजूनही कासावीस झाली होती. तिला तिच्या वागण्याचं कसंस झालं होतं. तिने हात राघवकडे वळवले, त्याला कुशीत घेण्याची इच्छा झाली, पण राघव घोरायला लागला होता, तिने हात मागे घेतला. पडून राहिली, झोप काही येत नव्हती, काही वेळात उठली, काही वेळ बसून राहिली. मग मनातल्या भावना मनात कोंबल्या आणि किल्ली कुठे तरी दूर फेकून दिल्यासारखी ती गुमान परत झोपेच्या प्रतिक्षेत गप्प छताकडे बघत राहिली.

Post a Comment

0 Comments