भाग ८ - द गेम ऑफ अफेअर

 

भाग ८ - द गेम ऑफ अफेअर



-राघव उठला, त्याने कपडे केले.

“मोहिनी आवरून घे पटकन, निघायचं आहे. आपण तिकडेपण सोबत आहोत.”

मोहिनीने शरीराला मोडलं, म्हणाली, “राघव लव यू. नशा चढली तुझी मला.”

“ती आता आयुष्यभर आहे... आता जरा बाहेर ये त्यातून.”

“रघु... डार्लिंग...”

ती तशीच उठली आणि राघवला परत बिलगली, “राघव कधीपर्यंत असं नातं असणार रे आपलं?”

“जोपर्यंत श्वास आहे. तुला हरकत आहे का?”

“हरकत नाही रे पण...”

“आता हा ‘पण’ मध्ये का?”

“आपण प्रेम करतोय ना रे रघु?”

“शंका नाही मला...”

“पण ह्याला समाज अफेअर समजतो.”

“पर्वा नाही मला.”

“हुम्म, ह्याची चर्चा होते रघु. कुणी चांगलं बोलत नाही रे.”

“उगाच प्रेमाच्या सुंदर प्रतिमेला बदनाम करणारा शब्द म्हणजे अफेअर... पण ते प्रेम नसतं का गं?”

राघव जरा हळवा झाला होता. मोहिनी शब्दात गुंतली होती. हरवलेली बोलली, “अफेअरमध्ये वासना असते नुसती, असं बोलल्या जाते रे, प्रेम कुणाला दिसते त्यात? ह्याची तर नुसती चर्चा असते ओठांवर.”

राघवने दीर्घ श्वास घेतला, “चर्चा तर प्रेमाची पण होते!”

“ती आदराने रे, आपल्यासारख्या संबंधांना आदर मिळत नाही, ह्याला मिळतो फूसफूसण्याचा आवाज.”

“जान, तू कधी पासून विचार करायला लागली हा सर्व...”

“काही नाही, मनात आलं बोलले.”

ती राघवकडे बघत होती, सारं विसरली, त्याची ती भारदस्त प्रतिमा तिला तिच्या नयनात कायम बंद करावी वाटली. त्याच्या चेहर्‍यावर असलेलं अनंत समाधान तिला परत त्याच्यात घेऊन आलं. तो त्याचा नेकटाई बांधत होता. मोहिनीने मागून त्याच्या कानाला ओठांनी स्पर्श केलं. राघवने डोळे मिटले आणि तिला परत ओढून बाहुत घेतलं, “जान, अजून नको ना छळू गं, अजून रात्र बाकी आहे.”

 “ए, काय रे, तू तिकडे रात्रभर काम करणार आहेस. माहीत आहे मला.”

“तू पण करणार आहेस ना माझ्यासोबत!”

“मग हे काम नाही होणार ना.”

“पण आता परत हे काम केलं तर तिकडे काम होणार नाही जान... आवर, निघायला हवं. रमाकांत परत दार वाजवेल.”

राघव तयार झाला होता. त्याने मोहिनीचे कपडे उचलले, तिच्या हातात दिले. तिला वाशरूमच्या दारापर्यंत त्याने कीस करत आणलं आणि दार उघडून आत जाण्याचा प्रेमाने इशारा केला. मोहिनी वाशरूममध्ये गेली. तीही तयार होऊन बाहेर आली. तिला असं फ्रेश बघून राघवने परत तिला फ्लाईंग कीस दिला. ती जवळ आली, त्याला राहवलं नाही. तिचे केसं सावरत त्याने तिच्या ओठांना परत हळूच चावा घेतला. आणि दोघांनीही परत एकमेकांना गच्च मिठी मारली. राघवने त्याची बॅग तयार केली. परत दार नॉक झालं, राघव सामान आवरत म्हणाला, “रमाकांत काका, या आत.”

तसा रमाकांत आत आला आणि कुठेही न बघता सगळं आवरायला लागला. तो गुमान सारं आवरत होता. राघव आणि मोहिनी खात-खात कामाबद्दल बोलत होते. आता त्यांनी बाकीच तसंच ठेवलं आणि गडबडीत निघून गेले. रमाकांतने सारं आवरलं. खोली नीट केली, खाण्याचं उरलेलं सोबत घेतलं त्याने. सांगितल्याप्रमाणे गाडी बंगल्यावर ठेवायला निघून गेला. गाडी बंगल्यावर लावली आणि तो किल्ली ठेवायला नेहमीच्या ठिकाणी आला. त्याला बघून, सुधा तिकडे आली, “रमाकांत काका, साहेब गेले का दिल्लीला?”

“हो बाईजी, मी इकडे आलो आणि ते निघाले तिकडे विमानासाठी.”

“एकटेच गेले काय साहेब?”

“आता ते मला ठाऊक नाही बाईजी, पण एक मॅडम होत्या त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये. नंतरच काय ते मला आठवत नाही. मला गाडी बंगल्यावर ठेवायला सांगितली.”

“अच्छा.”

“हो जी बाई जी. येतो मी,”

रमाकांत तेवढं बोलून निघून गेला. खरं तर त्याच्या खूप काही लक्षात राहत नसायचं. त्याचा स्वभाव चुकीच्या गोष्टी सांगण्याचा नव्हता. राघवचं त्याच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे हे त्याने स्वत:हून कधी शोधून काढण्याचा प्रयत्न केला नव्हता. तो त्याच्या घरचा एकटाच होता कमावणारा. मुलगा त्याच्या बायकोच्या खूनाच्या आरोपात तुरुंगात होता. त्याची तीन मुलं सांभाळत आयुष्य निघत होतं त्याचं. त्यांच्या चिंतेत त्याला कशाचं काही करायचं नसायचं. एकनिष्ठ होता राघवशी. वेळ प्रसंगी नेहमी राघव त्याच्या पाठीशी उभा असायचा. त्याच्यासाठी राघव देवमाणूस होता. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी ह्या नादात तो कधीच सुधा आणि राघवच्या मध्ये बोलला नाही. दोघांचाही त्याच्यावर विश्वास होता. रमाकांत त्याच्या घरी परतला. सुधाला प्रश्न पडला, “कोण असेल राघवसोबत?”

राघव मोहिनीसोबत दिल्लीला निघून गेला होता आणि सुधा स्वत:ला शोधत राघवला उलगडत होती.

---

सुधा राघवसोबत कोण असावं ह्या विचारात बागेत फिरत होती. जेमतेम ती ऑफिसच्या सर्व स्टाफला ओळखत असायची, पण हल्ली कोण नवीन जॉईन झालं ह्याचा तिला काहीही सुगावा नव्हता. विचारात लगेच तिच्या मनाने उत्तर दिलं, “माधवी असावी.”

तसा तिला राघवचा राग आला होता, पण माधवीचा विचार शिरला आणि तिला माधवी आठवली, मनात म्हणाली, “ही माधवी तर राघवला भाऊ मानते. किती करतो राघव तिच्यासाठी. मधु म्हणते ते बरोबर आहे, राघव देव माणूस आहे. आता हा रमाकांत काका, किती वर्षांचा राघवसोबत काम करतो. पण कधी काही ऐकायला आलं नाही राघवबद्दल त्याच्याकडून. बिचारा, त्याचा मुलगा बायकोच्या खुणाच्या आरोपात तुरुंगात आहे.”

विचारात ती व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर येऊन बसली. तिला रमाकांत काकाचा मुलगा आठवला. जणू भासत होतं तिला की, ते दोघं तिच्यासमोर काम करत आहेत. ती भूतकाळात शिरली. राघव आणि सुधाचं लग्न झालं आणि त्या वर्षापासून रमाकांतने काम करणं जरा कमी केलं होतं. त्याचं वय झाल्याने त्याला दिसत नव्हतं कदाचित. आता तो राघवसोबत ऑफिसमध्ये असायचा. लहान मोठं काम करायचा, त्याचेही राघव त्याला पैसे देत असायचा.

सुरेश, त्याचा मुलगा बंगल्यावर काम करत असायचा. गाडी दिवसभर त्याच्याकडे असायची राघवची. स्वभावाने शांत होता त्याच्या बापासारखा. त्याचं आणि राघवचं लग्न जेमतेम त्याचं वर्षी झालं होतं. लग्नाच्या वर्षाआधीच बाप झाला होता. त्याला पहिला मुलगा झाला होता आणि राघवला मुलगी. सुरेशचं त्याच्या बायकोवर म्हणजे लतिकावर खूप प्रेम होतं, जणू तो तिच्याशिवाय राहत नव्हता, मग काय, दुसरी मुलगी आणि तिसरी मुलगीही लागलीच झाली. ती तर राघवची आई तिच्या मागे लागली आणि तिचं ऑपेरेशन झालं. लतिकाही राघवच्या घरी काम करायची, सुंदर होती, दिवसभर बंगल्यावर ते दोघं काम करत असायचे. सुरेश गाड्या पुसायचा, ती पाणी आणून देत असायची. घरात लहान मोठं कामही ती करत असायची. अंगण झाडणं, कचरा काढणं, बाहेरच्या अंगणात पाणी शिंपणं, कधी कधी तर ती अंगणात रांगोळी घालायची. घरात फुलं सजवायची आणि सुरेश तिच्या मागे मागे असायचा. तिची मुलं अंगणात खेळत असायची, घर कसं भरलेलं वाटायचं. राघवची आई सुधाला तिच्यावरून कधी कधी बोलायचीही, की लतिकाला कशी भराभर दिवस गेलीत म्हणून. सुधालाही तिचा हेवा वाटायचा, तिच्या बऱ्याच प्रयत्नांनंतरही तिला दुसरा चान्स घेता येत नव्हता. लतिकाला पाच वर्षात तीन मुलं होती, तरीही ती सुंदर दिसायची. कुणीही तिची स्तुती करताना बोलून जायचं,

“सुरेशच नशीब, एवढी सुंदर बायको मिळाली त्याला.”

सुरेशलाही कौतुक होतं त्याच्या बायकोचं. खूप जपायचा तो तिला. का कुणास ठाऊक हळूहळू तिच्यासाठी पजेसीव होत चालला होता. त्याला ती त्याच्यासोबत असायला हवी असायची. पण लतिकाला खूप काही करायचं असायचं. तिला पार्लर शिकायचं होतं. मोठी मोठी स्वप्नं होती तिची. राघवच्या आईला ती आवडायची मग राघवच्या आईने मदत केली आणि तिने पार्लर शिकण्यासाठी दाखला घेतला. गाडी सुरेशकडे असायचीच, तो तिला सोडून द्यायचा आणि घ्यायलाही जायचा. दिवस जात होते आणि त्या दिवशी त्याला लतिका एका माणसासोबत बोलतांना दिसली. त्याने चौकशी केली, तर तिने उडवाउडवीची उत्तर दिली. मग त्यानेही मनातून काढून टाकलं. तिनेही स्वत:ला जरा आवरलं. पण परत काही दिवसांनी ती त्याला बाजारात दिसली. आता मात्र त्याने तिला तिथेच रोखलं, “लतिका कोण हा? तुझ्यासोबत दुसर्‍यांदा दिसला मला? ओळख करून देणार आहेस की नाही गं?”

लतिकाने हसत उत्तर दिलं होतं, “माझ्यासोबत शिकायला आहे, मुलांच्या बॅचमध्ये, मग कधी कधी सोबत निघते मी ह्याच्या, सामान वगैरे घेण्यासाठी. तेवढीच सोबत होते मला रिक्षा शेअर करताना.”

लतिकाने न गडबडता शांतपणे उत्तर दिलं, तीही सुरेशला ओळखून होती, घाबरली असती तर इथेच बिंग फुटलं असतं ह्याची तिला जाणीव होती.

“असं का! बरं, मग तू मागे मला का नाही सांगितलं?”

“काय सांगायचं होतं त्यात. कामापुरतं होतं मग. म्हणून मी नाही सांगितलं.”

“पण तू इथे काय करत आहेस.?”

“आम्ही ना हे काही क्रीम घ्यायला आलो होतो.”

नंतर तिने त्या मुलाशी म्हणजे सागरशी ओळख करून दिली.

“अरे, नाव तर सांगितलच नाही, सुरेश, हा सागर आणि सागर हा माझा आवडता नवरा.”

सागर मिश्कील हसला, सुरेशला पायापासून डोक्यापर्यंत बघत म्हणाला, “आवडता...”

तो बोलताच त्याचं बोलणं खटकलं सुरेशला, तर तो परत म्हाणाला, “अहो, ही किती सांगत असते तुमच्याबद्दल, नशीबवान आहात तुम्ही अशी गोड गुणवान बायको मिळाली तुम्हाला.”

सुरेश फक्त हलकासा हसला. सागर दिसायला रुबाबदार, देखणा होता, पण सुरेशला आतल्या गाठीतला वाटला होता. सामान घेऊन झाल्यावर सुरेश लतिकाला सोबत घेऊन गेला. तसाही सुरेशला सागर खटकला होता. काहीसा विचित्र वाटत होता. सोबत घरी परत निघताना तो लतिकाला म्हणाला, “लतिका, मला तो सागर चांगला मुलगा वाटत नाही, त्याच्याशी जास्त बोलत जाऊ नको गं काहीतरी विचित्र वाटला तो मला.”

“का रे, मला तसा काही वाटला नाही आणि माझं बोलणंच किती असते, हाय हॅलो एवढ़ंच, आपल्याला काय करायचं!.”

“ते ठीक आहे पण काही प्रॉब्लेम आहे का त्याला.”

नंतर लतिका काहीच बोलली नाही, तिने तर त्याच्या बोलण्याकडे लक्षही दिलं नाही, ती तर मग्न होती, आज सागरने तिला हातातली घडी गिफ्ट केली होती, ती तीच बघण्यात गुंतली होती. सुरेशने मुद्दा तिथेच सोडला कारण लतिका काही लक्ष देत नव्हती. खरी कथा तर काही वेगळीच होती. लतिकाचा तो लग्नाआधीचा प्रियकर होता. जो तिला, अचानक एका दिवशी पार्लरमध्ये दिसला आणि मग जे घडत गेले त्यावर तिचा काहीच ताबा नव्हता. तिने आता तात्पुरता मोठ्या हुशारीने विषय सुरेशसमोर गुंडाळला. सुरेशचा तसाही खूप जीव होता तिच्यावर, रात्रीही तो बोलत होता मग तिने तिच्या प्रेमाने त्याला गुमान मिठीत घेत त्याची ओठ बंद केलीत. विषय सरकला होता जरा वेळेसाठी, पण...

आता सुरेशला लतिकाच्या पार्लर कोर्सच्या पूर्ण होण्याची वाट होती. तसाही तो तिला रोज सोडायला आणि घ्यायला जायचा. कधी कधी तर मध्येही तिकडे काम असलं की मुद्दाम तिच्या पार्लरकडे फिरकायचा. ती दिसली की त्याला शाश्वती व्हायची. त्या दिवशी असाच अचानक तो पार्लरमध्ये आला, पार्लरच्या मॅडमकडून समजलं की लतिका आज तर आलीच नव्हती आणि कारण होतं की तिची मुलगी आजारी होती. सुरेश जरा गोंधळला. त्यालाही कळलं नाही, त्याने परत खोदून चौकशी केली, मग त्याने सागरबद्दल विचारलं, तर समजलं, सागर नावाचा कुणीही इथे नाही, पार्लरच्या मॅडमने मुलांच्या पार्लरची वही चेक करून स्पष्ट सांगितलं, “अहो, ह्या ग्रुपमध्येही नाही कुणी सागर, आहे आमच्याकडे मुलांची बॅच, पण असं कुणी नाही इकडे.”

सुरेशने परत विनंती केली, मग तिने विजिटर लिस्ट बघितली आणि म्हणाली, “हा, आहे ना, पण हे इथे एक दिवसंच आले होते. नंतर नाही.”

सुरेशला आता लतिकाची काळजी वाटू लागली. तो तिथून निघाला आणि तिला सारखा फोन करू लागला. तिचा फोन बंद येत होता. तो पूर्ण गडबडला, संध्याकाळ झाली होतीच तो घरी परतला, तर लतिका मुलांसोबत खेळत होती. तिचा फोन समोर होता. त्याने हातात घेतला, बंद होता बॅटरी नसल्याने. सुरेश तिला बघून शांत झाला, त्याने काही विचारलं नाही, वाटलं उगाच आपण काहीही विचार करत आहोत, पण ते कारण त्याला छळत होतं. त्याची मुलगी आजारी नव्हती आणि मग लतिका का तिकडे नव्हती. त्याने लतिकाला काहीही विचारलं नाही आणि स्वत:च ह्या गोष्टीचा पाठपुरावा घेण्याचं ठरवलं.

Post a Comment

0 Comments