#माय_डिअर_व्हॅलेंटाईन!



 #माय_डिअर_व्हॅलेंटाईन

तुझ्याशी प्रत्यक्ष बोलतांना सुटून जात मनातलं..

आणि भलतीकडेच वाहतो सूर,

मग येतो भावनांना पूर आणि शब्दांना महापूर.

परत सर्व शांत होत, जुळतो परत नवा सुरु,

राहून जातो मग मनातच साठवणींचा काहूर ....

असो,

जेंव्हा तू साखरीसारखा गोड असतोस, मी समजते, काहीतरी घडणारं आहे.

जेंव्हा तू कारल्यापेक्षा कडू असतोस, मी समजतें, काहीतरी घडलं आहे.

खरं कि नाही ?

पतीपत्नीच्या नात्याला कुठल्याच नात्याची सर येत नाही, हो कि नाही नवरोबा! हो तुला नवरोबाचं म्हणेल मी कारण तू माझा नवरा नवसाचा असलास तरी आता तू पक्का नवरोबा झालाय.

तो तुझा डोलदार रुबाब, फ्रेंच कट दाढी, डोळ्यावर अति हुशारपणा दाखवणारा चष्मा, नुसत्या पांढऱ्या शर्टाचं वेड, पाच महिण्याच बेबी असलेलं पोट आणि सतत नको त्या कारणासाठी ताणलेली छाती.

माझ्या कुठल्याच गोष्टी न ऐकणारे कान, चोरून माझं सौंदर्य टिपणारे डोळे पण चुकणंही स्तुतीसाठी न उलणारे ओठ. प्रत्येक गोष्टीत मुलांना पाठीशी घालणारे शब्द, मुलासाठी माझ्याशीच भांडणासाठी असणारा तुझा वेळ. पडला कागद न उचलणारे तुझे हात, पाय ताणून पसारा करणारा तू आणि बसल्या जागून ऑर्डर मारण्यासाठी निघणारा आवाज.

मोठं मोठे प्रोजेक्ट हॅन्डल करतोस पण साधी मुलीच्या वाढदिवसाची थीम तुला कळत नाही. जरा काही म्हटलं कि लाडात येवून म्हणणारा तू, " तुझ्या शिवाय माझं काय झालं असतं ग, तूच बिघडवलंय ग मला"

आणि मग मिठीत घेवून ओठ माथ्यावर टिपत म्हणणं, "तुझ्यावर मी आजही तसाच प्रेम करतो."

झालं, हाच तुझा फायनल मस्का असतो वेळ काढून घेण्याचा... आणि माझे शब्द मानतच गोठतात. म्हणून तू नवरोबा झाला आहेस.

आज जरा या व्हॅलेन्टाईन्स डे च्या निमित्याने ह्या सुंदर लाल गुलाबांच्या गुछ्यासोबत लिहिलेलं हे पत्र नक्की जपून ठेव. माझ्या अनंत भावना विरघळून मी त्याला शब्द दिले आहेत... तसाही तू कधी ऐकणार नाहीस. मला माहित आहे हे वाचल्यावरही तू एक फक्त तिखट स्माईल देशील, कारण तू नवरोबा झाला आहेस.

खरं कि नाही!

तुझी नि माझी टॉम अँड जेरीची जोडी कितीतरी मस्त्या करूनही बहरतच चालली आहे. तुझ्या माझ्या संसाराच्या वेलीला हळूहळू दोन फुलं लागली आणि सगळंच सुगंधित होवून गेलं... तू कधी मला अगदीच जवळचा मित्र वाटतो तर कधी जन्माचा वैरी... दोन विभिन्न विचारांचे आणि शरीराचे व्यक्ती आपण, एकाच नात्यात विश्वासाच्या मोहक रेशमी धाग्याने गुंतल्या गेलोय... "ये मोह मोह के धागे, तेरी उँगलियों से जा उलझे....." 

आणि आता..." तू तू है वही, दिल ने जिसे अपना कहा, तू है जहा मै हू वहाँ, अब तो यह जीना तेरे बिन है सज़ा "

तुलाही प्रश्न पडला असेल कि ह्या ईंटरनेटच्या दुनियेत कधीही मी तुला वॉट्स अप डार्लिंग म्हणू शकते, मग वेडेपणा का? काय आहे ना नवरोबा, तुझ्याशी बोलतांना विषय कुठून सुरु होतो आणि कुठे जावून संपतो हे मला आजपर्यँत न कळलेलं गणित आहे. आणि मग त्या वॉट्स अप, फेसबुक, ट्विटर वरही आपण भांडतोच. पण काय ना तुझी माझी गत सारखीच, काय करता?, जाणार कुठेतुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना. त्यातल्या त्यात पाण्यात राहून मगराशी वैर कोन घेणार. एकमेकांशी कितीही ठरवलं, हळूच गाडी रुळावर येतच आपली, दोन पैसेंजर आहेत ना. मग?

असो, तुझी तारीफ करायला मी असं काही लिहिणार नाही, ज्यांनी तू हरब्याच्या झाडावर चढशील. हो...हो, मी कुठे नाही म्हणते.... म्हणूनच तर तुला नवसाचा नवरा बोलले ना. तू ना माझ्या आयुष्यातला प्रेमाने प्रेम करत लाडात वाया गेलेला माणूस आहेस.

मी ना तुझ्या रक्ताची, ना गोत्याची, तरीही तुझं ना माझ्यापासून पानंही हलत नाही. बघ नामी तुझ्या धमन्या धमन्यांतून वाहते म्हणूनच मी तुझी नस नस जाणते. मला माहित आहे तू हे बोलणार नाहीस कधी. काय ना आता तू नवरोबा झालाय.

तुला आयुष्याची लढाई लढतांना बघतील मी, तुझ्या शुन्यातून विश्व् निर्माण करण्याच्या कलेला माझा मानाचा सलाम. तुझ्या प्रत्येक यशामध्ये सहभागी होते मी, पण तुझ्या यशाचं श्रय मला घ्यायचं नाही पण साक्षीदार मात्र होतेच. तू खरंच खूप वेगळा आहेस. असं तुला अगदी हसबंड मटेरियल म्हणता येणार नाही कारण तू परफेक्ट नाहीस... नवरोबा आहेस... हा तू कधी परफेक्ट वेळेची वाट बघत नाहीस तर त्या वेळेला परफेक्ट बनवतोस.. खरंच"जग घुमिया थारे जैसा ना कोई .."

तुला माहित आहे जेव्हा आपण लग्नाआधी भेटायचो तेव्हा आपण काही कारणासाठी भांडायचो. पण लग्न झालं, आणि कायदयाने परमिशनच दिली. आता आपण कुठलंच कारण नसतांनाही भांडतो..खर ना?

आणि मग परत प्रेमात "दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है...... "अशी परिस्थिती होते.

आणि मग कारण सापडलं नाही कि आपल्या मध्येच शर्यत लागते कोण आधी सॉरी म्हणेल ह्याची. तरीही तुझ्या त्या स्वयपाक खोलीत उगाच येरझारा आणि माझं उगाच तुझ्या मागे मागे करणं पण सॉरी हा शब्द जणू हरवला असतो, नाहीका?

म्हणूनच मला तुला सांगायचं आहे डिअर नवरोबा, तू मला आता आधीसारखा पॅम्पर करत नाहीस, आधी तुला माझ्या चुकीतही नवीन काही दिसायचं पण आता तुला माझ्यात डझनभर चुका दिसतात, तू त्या सुधरण्यासाठी मला बोलतोस. मी मान्यही करते. कधी सुधरतेही, पण खरं सांग त्या चुका होत्या का? मी तर आजही म्हणेल, मी बरोबरच होते त्या प्रत्येक परिस्थितीत.

प्रिय नवरोबा, तू थकून भागून कामावरून आलास कि मला अजिबात विचारू नकोस, किमी काय करते दिवसभर? मी जर उत्तर द्यायला लागली ना तर तुला ते कळणार नाहीच आणि तू एकूणच थकशील. मला असंही विचारू नको कितुझ्याकडे दिवसभर वेळ असतांना तू हे काम का केलं नाहीस? तुला चांगलंच माहित आहे, तुझे हे दोन जासूस घरात फिरत असतात. आणि माझ्यावर सतत पारख ठेवून असतात, जे तुला आल्याआल्या सगळं सांगून मोकळे होतात. जरा त्या दोन गोड शयतांनासोबत घरात राहून, घरची काम करून बघ, मग विचार वेळ कुठे जातोशॉपिंग करताना मला विचारू नकोस कि, मी का एवढा वेळ घेतेकारण तुला शॉपिग म्हणजेच माहित नाही नवरोबा. जेवतांना बिलकुल विचारायचं नाही कि मी हि भाजी का केली ? जरा स्वयंपाक घरात शीर, तुला कळेल रोजच्या भाजीचा प्रश्न काय असतो ते..

आणि हा खूप महत्वाचं मला बदलविण्याचा विचार सोडूनच दे. मी अधीच खूप काही बदललंय, घर, नाव, पत्ता, मग माझी खरी ओळख नको बदलूस.

डिअर नवरोबाघर मॅनेजमेंटची डिग्री कुठेच मिळत नाही. तरीही स्त्रीया त्यात रँकर असतात. मी एकाच वेळेस खुप काही करू शकते, स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, नातेवाईकांना फोन, तव्यावर पोळी असते आणि दिमाखात पार्टीची कल्पना. सोपं नाही रे..घर नावाची मोठी कंपनी चालवणं इथे तर मीच बॉस आणि मीच काम करणारी असते. घर, मुल, नातेसंबंध, सणवार, अतिथी, सर्व मलाच बघावं लागते. तू तर फायनल रिमार्क देतोस कारण आता तू नवरोबा आहेस.

डिअर नवरोबातुझ्यावर प्रेम आहे माझं, ह्याचा अर्थ असा नाही कि मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला सहमत असेल किंवा तू मला गृहीत धरावं. तो माझा अतूट विश्वास आणि अतोनात प्रेम आहे. जो मला तुझ्याकडे ओढतो. मी तुझ्यासोबत होते, आहे आणि राहील. आतापर्यंत फक्त माझा जीव गुंतला होता तुझ्यात पण आता माझ्या जीवांचा जीवही गुंतलाय तुझ्यात.

माझ्या छोट्याश्या विश्वाचं तू विश्व आहेस. माझी सुरुवात तू आहेस... माझं प्रेम तुझ्यापासून सुरु होत आणि संपतही तुझ्यावर"मेरे प्यार की उमर हो इतनी सनम तेरे नाम से शुरू, तेरे नाम पे खतम.."

हा, गैरफायदा घेवू नकोस, सिहिणींशी गाठ आहे. तू हव्या तेवढ्या डरकाढ्या फोड बाहेर, पण घरात मात्र माझीच गर्जना असणार.

आणि हे नातं फक्त तुझं नि माझं आहे, म्हणून मला कुणी दुसऱ्यावरून बोलू नकोस, ते कुणीही येणार नाहीत तुझं माझं नातं निभवायला, इथे आपणच एकमेकांचे आहोत. हो हो अगदीच माझ्या माहेरचे आणि सासरचे सुद्धा, त्यांना काय?, वेळ काढून घेतात आणि आपल्यात फुट पाडण्याच काम करतात. खर तर आपल नातं आहे म्हणूनच सगळी नाती आहेत. हे जगातलं एकमेव नातं आहे जे खरंच तुझं नि माझं आहे... अंता पर्यंत.

एक अनोळखी नातं, पण, आपली स्वतःची जबरदस्त ओळख बनवतं,

रक्ता पलीकडलं, पण, दोघांच्याही धमन्यांन मधून रक्त बनून वाहतं ,

भूतकाळ नसलेलं, पण भविष्यासाठी भक्कम असलेलं,

नाजूक, पण न तुटणार,

जगातलं अतिशय पवित्र नातं, मनापासून ते शरीरापर्यंत निभवलं जातं,

कधी दोस्त तर कधी दुश्मन म्हणून आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत सोबत असतं,

पती पत्नीचं नातं........

समजलं ना नवरोबा.... आणि हा आजची पार्टी तू द्यायची व्हॅलेंटाईन आहेस माझा.

हैपी व्हॅलेन्टाईन्स डे माय_डिअर_व्हॅलेंटाईन!

तुझीच लाडाची, खतरनाक बायको! 

 

काय मित्र मैत्रिणिनो खरं आहे ना? मग करा शेअर तुमच्या व्हॅलेंटाईन सोबत... आणि हा अभिप्राय नक्की कळवा... 

  

©️उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

धन्यवाद! 🙏🙏

फोटो साभार गुगल

-------------------------

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

धन्यवाद!!

 

Post a Comment

0 Comments