लता आणि ललित च्या लग्नाला १४ वर्ष झाली हाती. लवकरच १५ वा वाढदिवस, घरच्यां मध्ये आणि जवळच्या मित्र मंडळी सोबत साजरा करायचा अस त्याचं ठरलं. म्हणायला दोघांचीही तयारी जोरात होती पण ललित एका ठिकाणी बसून सारखा ऑर्डर मारत होता.
त्याने लताला मोबाईल चार्जिंगला लावायला सांगितला. तिने तो धावपडीतच चार्जिंगला लावला आणि कामाला लागली. तासभऱ्याने ललित बाहेर जाण्यासाठी निघाला आणि त्याने मोबाईल हातात घेतला, बघतो तर काय, मोबाईल ची बॅटरी पार डेड झाली होती. ललित लगेच चिडून बोलला,
"कितीदा सांगितलं तुला मोबाईल नीट चार्जिंग ला लावायचा ते. आता काय करायच मी. कुठलीच गोष्ट तू बरोबर करत नाही."
त्याने मोबाईल परत चार्जिंगला लावला आणि अर्ध्या तासाने घरातून निघाला.
लताला फार वाईट वाटलं. लग्नाच्या एवढ्या वर्षा नंतरही ललित सारखा तिला तुला हे येत नाही, ते येत नाही असा अजूनही बोलतच होता. कधी कधी तर समोर कोणी असलं तरी तो तिला बोलायचा. आज कोण जाणे तिला सहनच झालं नाही. जणू १४ वर्षापासूनच तिच्या मनात उकळत होतं. तिने सरळ स्वतःची बॅग भरली आणि घरातून निघाली. जाताना तिने ललितला दिसेल अश्या ठिकाणी चिठ्ठी ठेवली.
ललित घरी आला तेव्हा लता त्याला कुठेच दिसली नाही, त्याने मुलाला विचारलं तर तो आपल्याच दुनियेत मस्त... TV बघत. आईला विचारलं तर उत्तर भेटलं, कि ती काही वेळेआधी टेबलवर बसून काहीतरी लिहीत होती. तिला फोन लावला तर तो स्विच ऑफ येत होता. उलट तिलाच बोलणं सुरूच होतं त्याचं,
"धड चार्जिंगला लावताच येत नाही.. तर, फ़ोन मध्ये बॅटरी कशी असणार? बावळट तसाच मोबाईल सोबत घेवून गेली असणार."
असं बोलतच त्याने गाडीची चाबी नेहमीच्या ठिकाणी ठेवली. त्याला तिथेच लताने लिहिलेली चिठी दिसली. दात पूर्ण उघडत त्याने तो उघडली,
प्रिय ललित,
मला आत्तापर्यंत सहन केल्या बद्दल मी तुझी फार आभारी आहे. तुला जो माझ्यामुळे त्रास झाला तो मी परत घेवू शकत नाही.
मी माझ्या आई वडिलांकडे लाडात वाढलेले आहे, माझ्या आईवडिलांनी माझ्या कुठल्याच गोष्टीला एवढं घालून पाडून बोलले नाहीत, माझ्या छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीच कौतुकच केलं, चुकली तर प्रेमाने समजावून सांगितलं. आज ७ दिवसाने लग्नाला चक्क १५ वर्ष होत आहे पण तू अजूनही मला मी आत्ताच लग्न होऊन आली, अशीच वागणूक देतो. सुरवातीला लग्नाच्या नवलाईत आणि प्रेमाच्या धुंदीत मला फारसं जाणवलच नाही, पण, जरा पंधरा वर्षाचा हिशोब कर.
हो मला नाही आहे सवय, रूममधून बाहेर आल्यावर लाईट बंद करण्याची, नाही लावत मी कपाट बरोबर. नाही आहे माझा कपड्यांचा चॉइस चांगला. नाही राहत माझा किचन साफसूफ. नाही लावता येत मला साखरेचा डब्बा बरोबर.
हो, घाबरते मी १० लोकांत बोलायला. आहे मी वेंधळी, नाही जमत मला बऱ्याच गोष्टी, तर काय! तू काय मला बदलविण्याचा ठेका घेतलाय का?
नाही बदलायचं मला, ती मी आहे आणि अशीच राहणार, तुला मला असंच स्वीकारावं लागेल. आणि मी नाही ना तुझ्यावर डिपेंडेंट. मी जॉब हि करायचा, घरही सांभाळायचं आणि तू प्रत्येक वेळेस माझ्यातल्या चुका शोधून मलाच बदलविण्याचा सपाटा लावलाय. प्रत्येक दिवस तुला काहींना काही कारणाने मला बोलायचं असते. अगदी मुला समोरही तुझ्या जिभेला लगाम नसते. त्यालाही आपल्या टोळीत सामावून माझी टिंगल उडवत असतो तू. मुलगाही तुझं अनुसरन करून मला काही दिवसात असच बोलणार. तुझ्या आई बाबांनी तर मला अधिच मूर्खात काढलंय, त्त्यांच्यासाठी तर तू त्यांचा बिचारा मुलगा आहेस जो मला सहन करतोय. आणि आता मुलगाही तुझ्या तालिमीत ट्रेन होतोय.
तुझ्याशी लग्न करतांना असा काही करार नव्हताच कि, मी फक्त तुझ्याच तालावर नाचायला पाहिजे. लग्नाच्या आणा भाका घेतांना तू माझी काळजी घेशील असं बोलला होता. इथे तर माझ्या काळजी व्यतिरिक्त तू सर्वच गोष्टीच छान काळजी घेतोस, अगदीच कपाट बरोबर लागलंच नाही ह्याची सुद्धा तुला काळजी असते.
मी का बदलायचं प्रत्येक वेळेस, फार कंटाळा आला आता तुझ्या एकाच एक डायलॉग्स चा, 'तुला हे येत नाही, ते येत नाही,' 'हे असं कर, ते तस कर', 'कितीदा सांगायचं तुला', बावळटच आहेस, 'तुझ्या तर बुद्धीचा विकासच झाला नाही'. अरेरे …. आता नाही.
लग्नाला झालीत १५ वर्ष, मुलगा माझा १३ वर्षाचा आहे आणि करू शकतो स्वतःच सगळं, तुझ्या आई बाबांचं मीच करायला पाहिजे असा काही कायदा नाही, राहिला प्रश्न तुझा तर तू मला सुधारण्याचं काम सोडून दे आणि काळजी घे सगळ्यांची.
मला खंत वाटते कि तू मला अजूनही मनापासून स्वीकारलं नाहीच.
असेल तुला माझी गरज तर ह्या माझ्या अटी आहेत त्या तू त्या न बदलता तश्याच्या तश्या स्वीकार कर, नाहीतर मी परत येणार नाही.
अटी -
मी एकाजागी बसून ऑर्डर मारते तू लग्नाच्या वाढदिवसाची तयारी कर... बघ किती करावं लागत ते.
पंधरा दिवस घर सांभाळून नौकरी करून दाखव, बघ कशी तारेवरची कसरत करावी लागते ते.
मला बदलविण्या पेक्षा स्वतः बदल, स्वतःच काम स्वतः कर. मी तुला तुझ्या प्रत्येक लहान मोठ्या चुकांसोबत स्विकारलं आहे, कधीच तुला बदलविण्याचा प्रयत्न नाही केला, मग मी ही तश्याच वागणुकीची अपेक्षा करूच शकते.
मी जशी आहे तशीच स्वीकार, नाहीतर मी तुला माझा निर्णय सांगितला आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मला घ्यायला ये नाहीतर माझं राहिलेलं सामान पाठवून दे.
तुझीच प्रिय नसलेली पत्नी
मग बरोबर आहे ना लताच, तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
...........
माझ्या नवीन कथेसाठी पेजला लाईक नक्की करा .. खाली लिंकला क्लिक करून तुम्ही पेज लाईक करू शकता. धन्यवाद!! https://www.facebook.com/manatlyatalyat/
©उर्मिला देवेन
तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोसाहन देतील
फोटो साभार गुगल
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव!
धन्यवाद!!! 🙏🙏
0 Comments