जोडीदाराची उपेक्षा करू नका... #उर्मिलादेवेन

जोडीदाराची उपेक्षा करू नका... #उर्मिलादेवेन


वयाची पन्नासावी पार केली होती त्याने, जरा मोकळा आणि स्वत: मध्ये राहू लागला होता मंदार, त्याला एकट्यात वेळ घालवणे, मोबाईलवर ग्रुपसवर छान संदेश पाठवणे, मित्रांच्या गपांमध्ये रमणे त्याच्याबरोबर बाहेर वेळ घालवणे, ऑफिसच्या कामासाठी बाहेर राहणे, आता आवडायला लागले होते. पत्नीचा सहवास नुसता त्याला कामापुरता हवा असायचा, मुलंही मोठी झाली होती, मोठ्या मुलीचे लग्न झाले होते, मुलगा दुसऱ्या शहरात शिकायला होता.
मालिनी मात्र मंदारमध्येच गुंतून होती, तिचा दिवस आता मंदारचे काम करण्यात जायचा, त्याला काय हवं नको ती बघत असायची, तिच्याकडेही आता वेळ होता, पण मागच्या कितीतरी वर्षापासून सर्वांपासून सुटलेला संवाद आता परत सुरू करणे अवघड झाले होते. माहेर आता राहिले नव्हतेच. आई बाबा गेल्यानंतर वहिनी दादाने राहतं घर विकलं होतं, वहिनी नौकरीवर असल्याने बोलणं झालं तरी तिचा उजवे डावेपणा असायचा. दादाला तर वेळच नसायचा. आता उरले नवऱ्याचे नातेवाईक, त्यांनी कधी मालिनीला जवळ केलंच नव्हतं, कामापुरते सगळे होते, पण आता त्यानाही कामे उरली नव्हती. त्यांच्या कामात ते मग्न होते. दीर भावजय त्याच गावात होते, मोठ्या कष्टाने दोघांनी त्याचं साम्राज्य उभं केलं होतं, त्यांचा व्याप मोठा होता मग मालिनी त्यांच्या बरोबरीत कुठे बसलीच नाही. तिकडे गेली तरी ती घरातलं काम करण्यापुरती असायची.
नणंदेने खूप करवून घेतलं होतं, तिचे दोन बाळंतपण मालिनीने केले, नंणदेला कौतुक होतं मालिनीच पण आता तेही काळानुसार सरलं होतं आणि तशी गरजही नव्हती मग तिची ये जा कमीच झाली होती.
मालिनी दिवसभर घरी घरचे काम करत असायची, तिने आता कामवाली बंद केली होती, संध्याकाळचा वेळ तिला मंदारसोबत घालवायचा असायचा, आधीसारखं गप्पा करत बसायचं असायचं, त्या दिवशी ती वाट बघत होती, तिने आज कच्चा चिवडा केला होता. मंदार नेहमीप्रमाणे त्याच्या धुंदीत आला, हात पाय धुतले, आणि बसला मोबाईल घेवून,
“अहो चिवडा, तुम्हाला आवडतो ना.. आपण आज....”
“हुम्म, मस्त झालाय, जरा माझा लॅपटॉप घे तर, हे ग्रुपवर ना काहीही टाकतात, ह्यांना वेळेत उत्तर द्यावे लागते.”
मालिनीचे शब्द ओठातून मनात परत गेले, मंदार लॅपटॉप घेवून बसला, तो रात्री दहाला उठला,
“काय साले हे लोक, काही कळत नाही, तरी काहीही पोस्ट करतात.”
मालिनी थकून झोपायला निघून गेली होती, मंदार खोलीत डोकावत म्हणाला,
“जेवण मिळणार आहे कि नाही आज.”
मालिनी पलंगावरून उठून म्हणाली, “आधीच मी वाढून ठेवलं आहे. मी नाही थांबू शकत हो दहा पर्यत, मला लवकर जेवायला डॉक्टर बोलले आहे ना.”
“मग मला वाढ, जेवतो आता, अशी लावली ना एकाएकाची, बसं, सगळे ग्रुपमधून निघून गेले.”
मालिनी तिकडेच बसून राहिली, आणि मंदार परत त्याच्या मित्राच्या फोनवर बोलत जेवत राहिला.
वर्ष निघून गेली, आता मंदारच्या रिटायरमेंटला वर्ष राहिलं होतं, त्याचं पूर्ण प्लॅन तयार होतं. मालिनी मात्र आता एकटेपणाला कंटाळली होती, मधल्या काळात मुलाच लग्न झालेलं तेवढा तिचा वेळ निघून गेलेला, पण मुलाने त्याच्या नौकरीच्या ठिकाणी त्याच्या बायकोला नेलेले आणि घर परत खाली झाले होते. आता मुलगाही कमीच बोलायला लागला होता. मुलीचा तर आधीच व्याप वाढल्याने तिला कधी कधी वेळ मिळायचा आईशी बोलायला. मालिनी मनातून एकटी पडली होती. तिचा असा स्वभावही नव्हता कि नव्याने परत सुरु करेन, मंदारच्या सुरुवातीच्या काळात तिने जे जे केले त्यात तिचे सर्व काही पणाला लागले होते. त्याच्यासोबत भटकत भटकत ती हरवून गेली होती. मित्र मंडळींच्या संपर्कात ती कधीच नव्हती, तिच्यासाठी तिचं घर आणि नवरा सर्वस्व होतं.
अचानक तापाच कारण घडलं आणि मालिनी मंदारला सोडून निघून गेली. त्याला असा खूप मोठा धक्का बसला नव्हता. मुलगा मुलगी, नातेवाईक सर्व रितीभाती आटपून निघून गेले होते. मंदार त्याच्या ग्रुपवर मित्रांमध्ये अधिसारखा होताच पण दिवस जसे जसे जात होते त्याला जाणवायला लागलं होतं. मालिनी त्याच्यासाठी काय काय करायची ह्याची त्याला जाणीव होत चालली होती. ती घरात असताना तिची उपेक्षा करणारा तो आज तिला आठवून रडत होता. त्याने सगळं काही केले होते पण मालिनीला ओळखणे राहून गेले होते, आणि आता ते कधीच शक्य नव्हते. त्याच्या शेजारी बसून त्याला हवं नको बघणारी आज त्याच्या जवळच्या टेबलवरच्या फोटोत होती, जेव्हा जवळ होती तेव्हा ती तास तास त्याच्याशी बोलण्यासाठी वाट बघत आहे हे तो विसरून त्याच्या विश्वात असायचा. स्वत:ला सक्षम समजणारा, समजून चुकला होता कि तो किती निर्भर होता मालीनीवर. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर तिचं लक्ष होतं, त्याच्या एका आवाजावर ती त्याच्यासाठी हजर असायची, आज त्याला तिची गरज भासत होती. सर्व असूनही तो अधूरा होता, जोडीदाराची उपेक्षा त्याला आता सलत होती. तिच्यासोबत वेळ घालवला असता तर निदान अजून काही वर्षे ती सोबत असती आणि आयुष्याची उतरती कडा अजूनही आवडती झाली असती ह्या विचारात त्याला आता ती हवी होती. पण.....
आज तिची उपेक्षा त्याला आयुष्यातून उपेक्षित करवून गेले होती.
मित्र मैत्रिणींनो, जोडीदाराची उपेक्षा करूच नये, त्याचं अस्तित्व हेच आयुष्य जगण्याच आधार असतं, आयुष्यात उपेक्षा करायची झालीच तर त्या सर्व गोष्टींची करा ज्या आपल्या कधीच नसतात,. नाहीतर उर्वरित आयुष्य मंदार सारखं एकटं काढावं लागेल.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/नावासोबत शेअर नक्की करा!
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments