जोडीदार.... प्रवास तुझा माझा! भाग ४
सानू आणि राणी आज दिलखुलास हसत होत्या. त्यांना हसत बघून बाबांनाही आता मनातलं बोलावसं वाटलं, डोळ्यावरचा चष्मा अलगद काढत ते म्हणाले,
“लेकींच्या जवळ बसून आरतीच्या चुगल्या सांगायला काय मजा असते तुम्हाला काय माहित पोरींनो, आता हा योग पुढे कधी येणार? सानू, तू अमेरिकेत तुझ्या विश्वात मग्न, राणी बेटा तू राजनसोबत राजवाड्यात आणि हा तुमचा बाप इथे ह्या मोहिते निवासात ऐकटाच असेल ग. मला समजून घेणार कुठे कुणी असेल आता, आता काही माझी खैर नाही मुलींना... तुम्ही तर जाणता, मोहित्यांची परंपरा, ह्या निवासात नेहमी राणी सरकारांचा हुकूम... आणि मी पडलो गुलाम.... “
“बाबा आईला काळजी आहे तुमची, आणि मी कुठे जात आहे, इथेच तर आहे, हाक मारली कि येईल बघा आईला खडसवायला. आपण ताईला ऑनलाइन कॉल करू... आपली टीम मोठी आहे.”
राणी बाबांच्या कुशीत शिरत म्हणाली. सानूही अलगद शिरली.
लेकींशी गप्पा करत अरुणचे डोळे डबडबले होते. शब्द अलगद बोबडे झाले होते. आंवढा दाटून आला होता. भावना गुंतल्या होत्या आणि मग आंवढा गिळणे कठीण झालं होतं.
मनाने बाबांशी गुंतलेली सानू बाबांच्या कुशीत त्यांच्या शरीराची हालचाल अनुभवत होती. त्यांच्या मनात सुरू असलेली ओढ तोड आणि हळूच गिळल्या जाणारा हुंदका तिला जाणवत होता. तोचाही हुंदका आता दाटला होता. आणि बांध फुटला, ती रडायला लागली. राणीलाही काही सुचत नव्हतं. तोच आई खोलीत शिरली,
“काय हो इथे काय करत आहात? तिकडे तो डेकोरेशन वाला पैसे मागत आहे. जा बघू. आरतीची नजर अरुणवर पडली आणि तिने शब्द गिळले, अहो हे काय! किती वाट होती आपल्याला ह्या क्षणाची, सानूच लग्न आहे, आपल्या सानूच.”
“हो ग तेच तर, आनंद अश्रुचा वर्षाव आहे हा, माझी लाडाची पोरं, बघ ना सात समुद्रा पलीकडे राज्यासोबत चालली आहे. तिच्या सुखद वाटेत आनंद अश्रुचा पाऊस पडतोय.”
आरती सानूला बघून म्हणाली,
“ये वेडाबाई, काय रडतेस काय!, अरे तिकडे तुला खूप काही करायचं आहे. आता त्या घरात राणीची एंट्री होणार आहे, खऱ्या राणीची. सुमंत रावं स्वभावाला खूप मृदू आहेत असं ऐकलं आहे मी मावशी कडून, म्हणून तिकडे सगळं सुमंत रावांच्या माथे भारी मजा करतात म्हणे. तुझ्या सासूबाई पण खूप चिंतेते असतात, आणि तू त्यांना ह्या सगळ्या परिस्थिती आशेच किरण वाटतेस, बोलल्या मला, मला बाई खूप भरून आलं होतं. माझी सानू आहेच तशी, सर्वाना सोबत घेवून चालणारी आणि योग्य मार्ग दाखवणारी. काय, सत्ता सांभाळा आता तिकडे.”
बाबा आता अश्रू पुसत म्हणाले,
“मग मुलगी कुणाची आहे, अरुण रावांच्या नावाची गर्जना आता अमेरिकेत होणार...”
“मग काय आणि तुम्ही मुलीला रडवलंय.”
“नाही ग, आनंद अश्रू हे, चल बाळा आवर सगळं, उद्या हळद आहे. सुमंत राव पोहचले कि सांग मला, मी जातीने फोन करेन त्यांना, मुलीकडले आहोत सर्व बघायला हवं.”
“चल ग काहीही हो तुमचं” बाबा आईला चिडवत म्हणाले.
“काय?”
“बायको.”
“असं”
“आरती चलतेस ना?”
“हा... “
“काही खर नाही बाबा आता माझं, मोहित्यांच्या सुना, म्हणजे लयभारी... राज्यकर्त्या, माझ्या मुलीचं प्रेमळ आहेत....” बाबा खोलीतून बाहेर येत म्हणाले.
बाबा खोलीतून निघताच राणी सानूची नजरभेट झाली, पाणावल्या डोळ्यांनी, राणीने सानूला गच्च मिठी मारली,
“तायडे काहीच काळजी करू नकोस ग, सगळं ठीक आहे आणि ठीकच असणारं. तू झोपं बघू, नाहीतर झोपं झाली नाही म्हणून चिडचिड होईल तुझी आणि मग मेकअप पण काम करणार नाही. घ्या, मी काय तुला सांगते. तुचं तर माहीर आहे मेकअप करण्यात.”
बोलता बोलता राणीने दिवे विजवले आणि दोघीही झोपी गेल्या, स्वप्नात शिरत झोपेच्या खुशीत शिरल्या.
एकाच घरात तीन संसाराचा डाव मांडल्या गेला होता. अनु हळूहळू ह्या डावाच्या परीक्षा पार करत मनात शिरत होती. राणीला तिचं राज्य अजूनही मिळालं नव्हतं, तिची सुरवात होती आणि सानू तिच्या राज्यात राणी म्हणून एन्ट्री करणार होती. सगळ्यांना त्यांचं स्वतःच अस्तित्व सर्वांसोबत राहून जपायचं होतं.
खरं तर स्त्रीच्या आयुष्यात ह्यापेक्षा मोठी कसोटी कुठलीच नाही. सर्वांच अस्तित्व तिलाच जपावं लागतं आणि मग त्या ओढा ओढीत स्वतः च अस्तित्व जपणं म्हणजे कसोटीच ना... माहेरी कसं सर्व आपलं असतं, खरं तर तोही एक समज असतो आपला, पण असतच असं जरी मानलं तरी माहेरी स्वतः च अस्तित्व जपणं सोपं असतं.
असो, माहेर कुठे शेवटपर्यत असतं, मुलींना तर परकं घर आपलं करावं लागतं. मोठी लढाई असते ती, समोर आपलेच असतात जे कधीच आपले नसतात पण तरीही मनांना जिंकण्यासाठी सतत कार्यरत राहावं लागतं.
सकाळी पहाटेच, सानूचा फोन वाजला, सुमंत पोहचला होतो, सानूने लगेच उचलला,
“हा हा... हम आ गये अभी.... काय राणी, झोपं लागली नाहीच वाटते.”
“नाही रे, काल रात्री बाबांशी बोलत होते.”
“बऱ, सगळं ठीक ना?”
“हो रे, सगळं ठीक, आणि नसेल तरी मला कुठे कुणी सांगणार...”
“ये, असं काय म्हणतेस, आपण लगेच ओळखू काही असलं तर, अरे महारत आहे आपल्याला, काहीच लपून राहत नाही कुणाचं आपल्या समोर.”
“चल, तुझ्याशी नातं जुळलं आणि मी बोलणं विसरले कि काय असंच झालंय.”
“आणि मी बोलायला लागलो.”
“काळजी नको करूस, जिथे तू बोलणार नाही तिथे मी तुझ्या वतीने नक्की बोलेल आणि तू...”
“आणि मी तुझ्या वतीने लव यु... वाट बघते मी. आई वाट बघत असतील तुझ्या कॉलची. कर त्यांना आता.”
“जी हुकुम राणीसरकार...”
“ये काय रे, आणि माझी मावशी?”
“हे काय त्यांचच लगेज घेतोय, काय काय आणलंय तुझ्या मावशीने, काय माहित बुवा, अख्खा अमेरिका आणलाय कि काय माहित नाही.”
“ओ माय गॉड!”
“आता तू त्यांचा डाइलॉग नको बोलू... तो त्यांनाच मस्त जमतो. चल लगेज आलंय. मी आईला कॉल करतो. लव यू...”
सानूने हळूच एक नजर बाहेर टाकली, चांदण्या अजूनही नभात होत्या. चंद्र परतीच्या मार्गाने वळत मंद होतं चालला होता. सूर्याची किरणं धरणीवर यायला जणू तयार होत होती, पक्षी जागे झाले होते. रम्य सकाळ सानूला प्रसन्न करत होती. हातावरच्या मेहेंदीला बोटाने काढत ती सुमंतचा विचार करत होती. आज हळद होती तिची, तशी ती ह्या रिती भातीवर फारसं काही विश्वास ठेवणाऱ्यातली नव्हतीच पण आयुष्य पण ना, वळणा वळणाने आपल्याला त्याच्या सोबत वळवत जातं, ह्या तीन महिन्यात सानू जेवढी सुमंतच्या जवळ झाली होती तेवढीच ती आई बाबांसाठी भावनिक.
इकडे आराध्या मावशी पोहचली होती आणि हॉलमध्ये गोंधळ सूर होता, सानू लगेच हॉलमध्ये आली, मावशीला येवून बिलगली,
“ओ माय गॉड, किती सुरेख दिसत आहेस ग सानू, लग्न अगदीच मनावर घेतलेलं दिसतय तू, चेहरा अगदीच खुलला बघा माझ्या लाडोबाचा. मेहेंदीही बघू?”
“मावशी काय ग, ही बघ.” सानूने हात पुढे केले.
“काय मस्त रंगलीय बाबा, हुम्म... सुमंत रावं आहेतच ना, बघतोय आम्ही त्याला, त्याने तर तिकडे अर्ध्या अमेरिकेत तुझ्या नावाचा गजर केलाय, तुला भेटायला आतुर आहेत सगळे. कसा अगदीच आतुर आहे तो तुला बायको म्हणून घेण्यासाठी, नाहीतर लग्नाला तयार नव्हता ग.” आराध्या मावशी सानूचा लाड करत सर्वांसोमार म्हणाली.
सर्व क्षण जणू आनंदी होते... हसरे चेहरे आणि हसरा प्रतिसाद... कौतुकाचा वर्षाव आणि हळव्या मनांची गुंतागुंत अलगद वाढत होती. घरात सारेच सानूसाठी खूप खूप आनंदी होते.
आईने आराध्याला पाणी दिलं आणि म्हणाली,
“नशीब काढलं माझ्या लेकीने, घरात तिचा दरारा होताच आता तिकडेही ती राज्याची राणीचं असणारं ह्यात काहीच दुमत नाही. तिच्या सासूच्या खूप आशा आहेत तिच्यावर, सगळं तिने हातात घ्यावं असचं म्हणत असतात, आता आपल्याला काही आतल्या गोष्टी माहीत नाही बुवा पण वाटतं तिकडे काहीतरी गडबड आहे. पण सानूवर माझा विश्वास आहे तसा त्यांचाही. कधी विचारही केला नव्हता मी असा, माझी सानू आणि....”
“म्हणजे ग तायडे, सानू हकदार आहे ह्या सर्व गोष्टीची. आणि ती करेल सगळं, तिकडला गोंधळ तर ती अलगद सोडवेल. आता आमचा सुमंत साधा भोळा, काही कुणाला बोलत नाही, कामात मग्न आणि सारे मग मस्त. बघू काय ते, ते बघतील दोघं. आता ती चर्चा नकोच.”
“हो ग बाई, तुलाच ह्याच श्रेय ग, चल हो तू तुझ्या खोलीत, थकली असशील. अंजू पण तिडकल्या खोलीत आहे. भेट तिला. आणि जावई संध्याकाळी पोहचणार आहेत ना?”
“हो हो, ते येतील, त्यांची महत्त्वाची मीटिंग होती मग ते आता निघतील. आम्ही तर सुमंत सोबत पोहचलो.”
बाबा तिला चिडवत म्हणाले, “ओ माय गॉड, हिने माझ्या जावयाची वाट लावली असणार.”
“ओ जिजाजी असं काही केलं नाही मी. तो तर स्वप्नात होता, त्याला काही ऐकू येत नव्हतं. ओ माय गॉड, जीजू तुम्ही ना.... तायडे ह्याचं काही कर ग.”
आरती तोंड मुरडत म्हणाली, “आता काय करू बाई, मीचं हरले. तुला सांगू, मीचं ग मीचं होते म्हणून ह्या माणसासोबत एवढे वर्ष काढले... नाहीतर...”
अरुण मधेच म्हणाला, “अरे फम सुरु झालं वाटते, चॅनल बदलावं लागले, चला आपल्या आपल्या कामाला लागा.”
“आणि काय ग माझी साली होती ना काही वर्ष, ते वजा कर तुझ्या त्या वाक्यातून, अरे साली आधी घालवली होती है! आणि अशी साली तर आपल्याला जन्मोजन्मी मिळो.... पण बायको बदलली तरी हरकत नाही... काय ग अरु.”
“जीजू, आज मूड मध्ये आहात तुम्ही, मी थकले आहे, बघते मी तुम्हाला नंतर.”
बोलतच मावशी तिच्या मुला आणि मुलीसोबत खोलीत शिरली, अंजू आधीच छकुली सोबत तिथे होती. आराध्याच्या येण्याने आता घरात सारं कसं ओ माय गॉड झालं होतं.
कथेचा पुढचा भाग लवकरच.
---
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
लिंक- https://chat.whatsapp.com/IUtIE0RJdnE94Jna0UTviJ
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल
0 Comments