रिझाईन... द कॉर्पोरेट लॅडर- भाग १५

 रिझाईन... द कॉर्पोरेट लॅडर



ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी सारं कसं उत्साही वाटत होतं. सूर्याची किरणं हलकेच काचेच्या भिंतीवर पडत होती, आणि त्या सोबतच ऑफिसमध्ये दैनंदिन हलचालींचा गोंधळही सुरू होता. प्रत्येक टेबलवर फाईल्स, नोट्स आणि लॅपटॉप्सची पंक्ती होती. काही कोणी फोनवर बोलत होते, तर काही आपल्या कामात मग्न. पण त्या सगळ्यातच एक वेगळा आत्मविश्वास जाणवत होता.
मंजिरी सकाळी थोडी उशिरा पोहोचली, पण आजचा दिवस तिला जणू अजून अधिक निर्णायक वाटत होता. हॉलमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते, पण तिथेच एक छोटासा ताणही होता. कदाचित हा ताण कॉर्पोरेट जगाचा कणा असतो, तो असायलाच हवा असतो फक्त त्याचं रुपांतर ताण तणावात व्हायला नको असते. मंजिरी कामात चोख आणि शिस्तीत कडत असली तरी तिला नेहमी वाटायचे की तिच्या स्टाफमध्ये तणाव नसावा कारण त्याचा कामात परिणाम होतो.
कॅबिनमध्ये पोहोचताच गणपतने तिच्या साठी कॉफी आणून टेबलवर ठेवली. मंजिरीने त्याला हलके स्मित दिलं, आणि मग तिने लॅपटॉप उघडला. आज तिच्या मनात फक्त काम आणि पुढील योजनाच होत्या. काका तिथेच होते मग मंजिरी कॉफी घेत लगेच बोलली,
“काका, गरज होती ह्याची मला... धन्यवाद!”
“मॅडम, काळजी घे, नाहीतर सुट्टी घ्या ना दोन दिवस, डोळे सांगत आहेत झोप झाली नाही तुमची.” तो काळजीत बोलला.
तिने कॉफीचा सिप घेतला, “ सुट्टी! नको रे बाबा, घरी राहून करू काय? कंटाळा येतो मला खोलीत... जाऊद्या, माधव साहेब आले आहेत का?”
“हो, आज ते लवकर आले, आणि त्या समृद्धी मॅडम आणि रोहन सर आहेत ना त्या आहेत कॅबीन मध्ये.”
मंजिरी आश्चर्यचकित म्हणाली, “ओ... असं काय झालं. ठीक आहे, या तुम्ही. मी बघते.”
मंजिरीने कॉफी संपवली, मेल बघत होती तर तिला रोहनचा रिझाईनचा मेल दिसला, जरा वाईट वाटलं, रोहन सारख्या हुशार माणसाने घोसला कंपनी सोडायला नको असेच तिला वाटले आणि त्याचं माधवच्या कॅबीन मध्ये असण्याचं कारण सापडलं... पण समृद्धी तिकडे का हे अजूनही समजत नव्हतं. आज अजूनही मुलाखती होत्या, तिला उत्तम लोकं हवी होती टीममध्ये. सगळा डेटा बघून काही CV तिने वेगळे केले आणि HRला पाठवून दिले. सगळी दुपार तिची बिझी जाणार होती. त्यात आता ह्या रोहन चंद्राचं काय प्रकरण आहे हे तिला माहित करून घ्यायचे होते. मनात पुटपुटली, “जाते तर जाऊ दे, तसाही जास्त शहाणा आहे...पण हुशार... ”
ती उठली आणि सरळ माधवच्या कॅबीनकडे वळली, तशी तिला समृद्धी काम करताना तिच्या जागेवर दिसली, मनात वाटलं की परत आली का... पण तिने काहीच समृद्धीला प्रश्न केला नाही.
ती कॅबीन मध्ये पोहोचली तेव्हा रोहन आणि माधव पगाराबद्दल बोलत होते. ती गप्प जाऊन बसली, रोहन तिला बघून म्हणाला,
“माधव सर मला माझ्या कामात कुणाचीही ढवळाढवळ नको..”
माधवने मंजिरीला डोळ्याने खुणावलं. आणि म्हणाला, “रोहन सगळं ओके आहे ना, की अजून काही हवं आहे तुला. म्हणजे ह्या पुढे तू स्वतंत्रपणे प्रोजेक्ट सांभाळणार आहेस... पण ऑथॉरिटी मंजिरीकडेच असेल एवढचं... कदाचित त्यात मी काही बदल करणार नाही. मी आधीच युरोप प्रोजेक्ट मध्ये बिझी आहे. सो... तेवढं बघ. तुझी टीम तयार कर.”
मंजरीने रोहनकडे बघून गोड स्मित हास्य दिलं. तो कॅबिनमधून निघून गेला. तशी ती म्हणाली, “माधव कशाला थांबवलं त्याला, जाऊ द्यायचं ना.. नवीन डीलेवेरी हेड नेमला असता ना त्या कॉस्मेटिक प्रोजेक्टसाठी.”
माधव हसला, “मंजिरी, तुला आठवते, तू मी आणि रोहन सोबत काम करत असायचो... त्याने तुला लग्नाची मागणी घातली होती आणि तू नाही बोलली होतीस... कदाचित ती सल अजूनही त्याच्या मनात आहे. नको वाकड्यात जात जाऊ त्याच्या. त्याला स्वतंत्र बघू दे तो प्रोजेक्ट. मला हुशार माणस गमवायची नाही आहेत गं”
मंजिरी हसली, “नकार दिला म्हणून आज एका मुलीचा बाप आहे... सुखी आहे. आणि मला आवडते रे त्याला त्रास द्यायला.”
“असं काही बोलू नको... काम उत्तम आहे त्याचं.”
“हो.. त्या गोष्टीला मी नकार कुठे देते पण त्याचा मला सारखं खाली पाडण्यासाठीचे प्रयत्न बघवत नाही रे. मागे त्याने मी तोंडावर पडावी म्हणून मुद्दाम काम केले नव्हते.”
“ते माहित आहे मला... आणि तुला त्याने काही फरक पडणार आहे का... जरा टोलेरंस ठेव.”
आता मंजिरी अगदीच हसली.... “माधव समृद्धी कशाला आली होती कॅबीनमध्ये.”
“हुम्म.. तिला तो घेऊन आला होता, म्हणत होता ती त्याच्या टीममध्ये हवी त्याला. मी नकार दिला आहे, तू बघ.”
“बाकी काही ना?”
“नाही... पण तिला चान्स दे ना तू, हुशार आहे ती, प्रोजेक्ट मध्ये जबाबदारी दे, काय लहान सहान काम सांगतेस.”
“संयम... नाही आहे तिच्यात अजून, काम उत्तम आहे पण घाई करते ती... शिकू दे,,, आणि इथे दोन दोन वर्षांपासून लोकं काम करत आहेत, त्यांना कुठल्या प्रोजेक्ट मध्ये अजूनही मोठी जवाबदारी मिळाली नाही आणि तिला कशी देणार... बाकीचे ओरडतील ना... आणि म्हणतील मग कॉर्पोरेटची सीडी चढली म्हणून... हल्ली ना लोकांच्या तोंडावर झाकण नाही. तशीही माझी प्रगती इथे बऱ्याच लोकांना खुपत असते. मी कुठलाच चुकीचा मार्ग घेतला नाही, तुझं आणि माझं नातं ह्यात कधीच हा कॉर्पोरेट आला नाही हे सांगायला आता मला वेळ नाही, लोकं काय बोलतात ते बोलू देत...”
“मंजिरी आपला विषय तो नाहीच, तू तुझ्या कामामुळे आज इथे आहेस. मी बोललो ना आधीही ही तुझी कंपनी आहे. आणि म्हणूनच प्रियाने आपल्याबद्दल तिच्या कानावर येऊनही विश्वास ठेवला नाही.... तिला माहित आहे तू तुझ्या कामात कशी चोख आहेस ते. आणि मी आहे ना तुझ्यासोबत. रोहन सारख्या लोकांचा विचार करायचा नाही... त्यांच्या हुशारीचा आणि कामाचा उपयोग करून घ्यायचा....”
“हो, तसच आता, माधव आज आपण दोघे बाहेर जाऊया ना...”
“हो, मी बोलणार होतो, थकली दिसत आहेस तू, जाऊया.. जरा फ्रेश होशील, पण आता मला निघायचे आहे एक मिटिंग आहे, तुला घ्यायला येतो सात वाजता.”
“वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!!”
“अरे माझी उत्तम पार्टनर आहेस तू ह्या बिजनेसमध्ये.... वेळ द्यायला हवा ना...”
मंजिरी गोड हसली,माधवने तिला हलकीशी मिठी मारली, आणी काय हवं होतं मंजिरीला, त्याचे हात हातात घट्ट करत ती म्हणाली, “आज काही मुलाखती आहेत, आटपून घेते आणि तुला कळवते.”
माधव निघून गेला आणि मंजिरी त्याच्या कॅबीन मध्ये आज त्याच्या खुर्चीवर बसून बाहेर बघत होती. तशी तिला बाहेर बिपाशा दिसली, ती शनायाशी काही बोलत होती. मंजिरीने लक्ष दिलं नाही ती डोळे मिटून बसून राहिली, तहसी काही वेळात बिपाशा तिकडे माधवला आवाज देत आत आली, मंजिरी ओरडली, “ए नॉक करून यायचं हे माहित नाही तुला?”
बिपाशाही वचकून म्हणाली, माझा भाऊ लागतो माधव त्याच्या कॅबीनमध्ये यायला मला नॉक करण्याची गरज नाही... तू का इथे.”
“विचार करते आहे ही कॅबीन कधी माझी होते तो...” मंजिरी मिश्कील हसली,
बिपाशाने जसं तिचं बोलणं हवेत घेतलं, आणि म्हणाली, “ स्वप्न तुझे, रोहनला परत ठेवून घेतलं माधवने, तू तर त्याला काढायला निघाली होती...”
“मी कशाला काढू, त्याच्या कामाने त्याला रोखलं... आणि माझा मुद्दा तुला कळवा एवढी तू हुशार नाहीस... काय काम आहे ते बोल आणि निघ.”
बिपाशा परत जोर लावून बोलली, “रिझाईन दिलं होतं त्याने, त्याला हाईक दिली माधवने... काही तर असेल...”
“कामात चांगल्या लोकांना गमवत नाही घोसला कंपनी तुला महित नाही... तू देणार आहेस का रिझाईन सांग आता साईन करते...”
बिपाशा चिडली आणि रागाने लाल कॅबीनच्या बाहेर आली. तशी ती समृद्धीच्या समोर आली, तिला बघताच बोलली, “काय बघून ह्या असल्या स्टाफला ठेवून घेतलं त्या मंजिरीने काय माहित.तिला सारे नमुने हवे आहेत. तिच्या मतानुसार वागणारे.”
समृद्धी ऐकून नाराज झाली होती. सहा महिने झाले होते पण अजूनही ती इकडून तिकडे काम करत होती. तिच्या जागेवर बसून विचारात होती, डोळ्यासमोर स्क्रीन, पण तिचं मन वेगळ्याच स्क्रीनवर चालू होतं. ह्या घोसला कंपनीमुळे सुहास दुरावला होता आणि अजूनही तिला कुठलीच पोस्ट नव्हती. तिने तीन प्रोजेक्टला सपोर्ट दिला होता, पण तिचं नाव रिपोर्टमध्ये कुठेच नव्हतं. मंजिरी सगळ्याचं कौतुक करायची, पण लिस्टमधून तिचं नाव वारंवार नसायचं.
त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमध्ये सर्व जण हसत बोलत होते. कॉफी मशीनजवळ शनाया आणि सावी नव्या प्रोजेक्टबद्दल चर्चा करत होत्या. रुद्र काहीतरी समजावत होता.समृद्धी मात्र आपलं ईमेल इनबॉक्स चाळत होती. रिझाईन देऊन दुसरीकडे जॉब बघावा असे मनात आले होते तिच्या. ती हळूच ‘न्यू मेल’ उघडली, सब्जेक्ट टाकला, रिझाईन मेल लिहिली, परत थांबली, कर्सर ओळीवर थांबला. तेवढ्यात मांजरीचा मेल आला, तिने पटकन उघडला, तिचं नावं कुठे आहेका म्हणून वाचला, नावं होतं पण अजूनही.... पोस्ट नव्हती.
आधीचे सर्व भाग पेजवर आणि साईटवर आहेत.
to be continued...
----पुढील भाग लवकरच....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
@followers@topfanss #उर्मिलादेवेन मन माझे मराठी #marathi
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI

Post a Comment

0 Comments