भाग 3-द गेम ऑफ अफेअर!

 भाग 3-द गेम ऑफ अफेअर! The Game of Affair

सुधाला राघवशी बोलायचं होतं पण राघव बिझी होता. असं रोज होत होतं. सुधाला तिच्या भावना बोलून दाखवायला, भांडायला कुणीच नव्हतं. ती राघवशी भांडली तरी ते एकतर्फी असायचं. राघव कधी तिला रागवत नसायचा की तिच्या बोलण्याला गंभीर घेत नसायचा. मनातली घुसमट तिची तिला खात चालली होती. चहा गाळला आणि घेऊन ती हॉलमध्ये आली. मधुला दिला आणि जरा तिच्या खोलीत शिरली. राघवच्या बॅगवर तिचं लक्ष गेलं, सकाळचं राघवचं बोलणं तिला आठवलं, तिने कप बेडच्या शेजारी मेजवर ठेवला, बॅग उघडली, बघून खूपच आश्चर्य वाटलं, बॅगमधलं काहीच सामान वापरलं नव्हतं. तसच होतं सारं. आता मात्र तिला ती शोची तिकिटे खरी वाटली, मग रागिणी शब्दाने तिच्या मनात वीज कडाडली. डोक्यात पार भुगा झाला, काय खरं काही सुचत नव्हतं. तर तिची नजर एका कॅरी बॅगवर पडली, दिल्ली मार्केट लिहून होतं. तिने ती हातात घेतली. त्यात लखनवी पॅटर्नचा सूटपीस होता, अगदीच सुधाला आवडेल असा. रंगही फिक्कट गुलाबी, सुधा मोहातच पडली, अंगावर लावून बघत होतीच तर मधु खोलीत शिरली, “अय्या, तायडे, काय सुंदर कापड आहे गं, भारी सुंदर दिसणार बघ तुला...”
तिने सामानाकडे बघितलं आणि म्हणाली, “जिजूने आणलाय ना तुझ्यासाठी! किती विचार करतो माझा जिजू, किती गं माहीत आहे त्यांना तुझ्याबद्दल आणि माझा तो मंगेश. मी आपली पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश म्हणत असते आणि हा कोण ती रागिणी की काय तिच्यासोबत प्रेमाचे चाळे करत असतो ऑफिसमध्ये. नशीब तायडे... जे माझं फुटकं आहे आणि तुझं बघ.”
सुधा स्मित हसत होती, रागिणी नाव अजूनही तिला त्रास देत होतं. त्यात तिला परत आरशासमोर ठेवलेल्या त्या शोचे तिकीट दिसले, लगेच अंगावरून काढून तिने ड्रेस पलंगावर फेकला. ड्रेस तिला खूप आवडला होता हे ती बोलू शकत नव्हती, बहि‍णीसारखं व्यक्त तिला होता येत नव्हतं. मधु त्या ड्रेसला हातात घेत परत म्हणाली, “तायडे, तुझ्याकडे असा एक ड्रेस होता, तू कॉलेजला असताना, आठवते का तुला?”

सुधाने नुसता होकार दिला, मधु पुढे म्हणाली, “तायडे त्या सुरजला जाम आवडायची गं तू, काय शिट्या मारायचा यार तो, तू तो ड्रेस घालून निघाली की...”
सुधाने तिच्याकडे रोखून नजर टाकली, मधु परत म्हणाली, “तायडे अशीच बघायची गं तू त्याला, बिचारा...”
सुधा पटकन म्हणाली, “कसला बिचारा गं? टापाटापी करत फिरायचा गं तो.”
“नाही ताई, आवडायची तू त्याला, एकटाच आहे अजूनही.”
सुधा शांत झाली, स्वत:ला प्रश्न केला तिने, उत्तर आलं, “तो आवडायचा मला, पण... काय फरक पडणार आता, तेव्हा कुठे बोलू शकले मी. आता तरी कुठे बोलत आहे.”
मधुच्या प्रश्नाने सुधा भूतकाळात शिरली होती. पण त्यातही राघवचा विचार येत होता. परत वाटलं राघव काही रागिणीच्या वाटेने जाणार नाही. ते प्रकरण तिकडेच थांबलं आहे, कायमच. ही रागिणी कुणी वेगळी असेल. उगाच काय विचार करत आहे. चक्क मनातून तिने रागिणीला काढून टाकलं. परत सुधा विचारात गावातल्या आणि कॉलेजच्या दिवसांत शिरली होती. गुमान शून्यात बघत हरवली होती. तिला असं बघून मधु म्हणाली, “तायडे, पडलीस ना त्याच्या विचारात? होताच तसा तो, काय गं?’’
सुधा भानावर आली, “काय तुझं भलतंच काहीही सुरू असते, विषय काय, बोलतेस काय.”
तिने अजूनही भावना व्यक्त केल्या नाही, मनाला आवरत ती मधुच्या नजरा चोरून परत परत त्याच दिवसात शिरत होती. मधु पुढे म्हणाली, “मागे आईकडे गेले होते मी, भेटला होता मला, विचारत होता तुझ्याबद्दल, सांगितल मी सर्व, जाम खूश होता तुझ्यासाठी. बोलले मी त्याला.”
“काय गं? काय बोललीस?”
“त्याने लग्न का केलं नाही म्हणून...”
“मग?”
“म्हणाला, नाही करायचं आता.”
“असं!”
“पण जाम खूश झाला होता तुझ्या गोष्टी काढून, अशी चकाकी आली होती ना त्याच्या चेहर्‍यावर की काय सांगू... म्हणाला होता, आता पुढे काही महिने तरी पुरे त्याला आनंदात जगण्यासाठी.”
“काहीही तुझं गं, पण लग्न केलं नाही त्याने!”
“हुम्म, तसच बोलला होता तो.”
“हो का...”
सुधाने सुस्कारा दिला आणि परत शिरली तिच्या कोषात. मधु कुठे थांबणार होती. तिने तिचं बोलणं सुरू ठेवलं.
“मग मी आईला विचारलं, तर ती म्हणाली, त्याने लग्न केलं होतं, पण बायकोचं लफडं होतं त्याच्या, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ती पळून गेली.”
सुधा कशी बशी परत तिच्या कोषातून बाहेर आली, तोंडावर हात ठेवत मधुकडे बघत होती. तर मधु तिला गयावया करत म्हणाली, “तायडे, तू भेट त्याला गावी गेली की, त्याचं मोठं दुकान आहे गावात आता. तसा झिपरा दिसत नाही गं आता, मस्त मिशी-बिशी ठेवतो, मस्त दिसतो, बॉडीपण मस्त बनवली त्याने. मी गेले होते मंगेशला घेऊन त्याला भेटायला.”
सुधाने तोंडावरचा हात बाजूला केला, ती एकदम म्हणाली, “मंगेशला घेऊन? काय वेड लागलंय का तुला!”
“हो, मग नवरा ना माझा, काय झालं सांगितलं तर!”
“म्हणजे तू माझ्याबद्दलही सांगितलं?”
“मग, त्याला तू आवडत होतीस हे सांगायला काय वाईट आहे.”
“तू ना कहर आहेस. अगं असं सांगायचं नसतं.”
“का? का नाही सांगायचं आलं मनात तर सांगितलं, कशाला मनात कोंबून ठेवू.”
“तुला कसं सांगायचं गं?”
“तायडे, नवरा बायकोच्या नात्यात पारदर्शकता नको? मंगेशने पण मला खूप काही सांगितलं होतं त्याच्याबद्दल. आम्ही सगळं बोलतो.”
भावनेत मधु बोलली पण जरा स्वर धिमा झाला तिचा, गप्प झाली. सुधा तिला लगेच बोलली, “मग हे काय नवीन सुरू आहे तुमचं? तुझ्याशी ना राघवच बोलू शकतो, राहिला कुठे हा?”
तिने थंड चहाचा कप उचलला आणि स्वयंपाक खोलीत आली, चहा परत पातेल्यात ओतला, गॅस सुरू केला, मोबाईल हातात घेतला, राघवचे दोन कॉल येऊन गेले होते. तिने कॉल परत लावला, कॉल कट झाला. सुधाने स्वयंपाक केला, मधु परत तिच्या कानाशी लागली, “तायडे, मंगेशचं मी काय करू गं?”
“काय? काय करायचं, काहीही झालं नाही, लाव त्याला कॉल बोलते मी. काहीही पोरकटपणा सुरू आहे तुझा.”
मधुने फोन लावला, मंगेशने उचलला नाही. मग सुधाने त्याला लावला, त्याने पटकन उचलला, “काय हो जावई बापू, का त्रास देताय तुम्ही आमच्या लेकीला?”
“त्रास! अहो ताई तिला विचारा ती कशी वागते, उगाच काहीही हो...”
“म्हणजे? माझ्या काहीतरी कानावर आलं आहे.”
“आलं का! आणि ती तिथे आहे का? म्हणून मी केव्हाचा घरी कॉल करतो आहे कुणीच उचलत नाही आणि हिने मोबाईल बंद ठेवला होता. आता सुरू केलाय कदाचित.”
“अहो, पण इथे करायचा ना मग.”
“ताई, एक मन म्हणत होतं माझं की ती तिथेच आली असणार, मग कामात राहिलो आणि नाही केला. आता आहे ना ती तिकडे, सांगा चार गोष्टी तिला... काय ते मोबाईलच्या नादी लागून उगाच काय काय बोलते ती. खरं सांगू का, माझं काहीतरी प्लानिंग सुरू आहे, लग्नाचा वाढदिवस येतोय ना जवळ. मग मीही ताणतोय सारं. सांगू नका तिला.”
सुधा हसली, ठीक आहे म्हणत तिने फोन ठेवला. फोन ठेवताच मधु म्हणाली, “तायडे, काय गं तू काही बोलली नाहीस त्याला आणि हसतेस काय अशी?”
“वेडाबाई शांत हो. अगं कामात आहेत ते. बोलतो म्हणाले...”
“हुम्म, तू ना, तशीच आहेस. येऊ दे माझ्या जिजूला, तेच माझी बाजू घेतील आता.”
“ए बाई तू काय लहान आहेस का?”
“आहेच मी माझ्या जिजूसाठी...”
सुधाला आता मनात मधुचाही राग येत होता, तिचा राघववरचा विश्वास तिला बोचत होता.
---
स्वयंपाक झाला आणि नमाला भरवत दोघीही टीव्ही बघत होत्या. तोच राघवच्या गाडीचा आवाज आला... सुधा आवाज येताच खोलीत निघून गेली. मधु आणि नमा धावत राघवकडे निघाल्या. राघव मधुला बघून जाम खूश झाला, राघवच्या गळ्यात हात घालून, नमा आणि मधु दोघीही आत शिरल्या. सुधा आता खोलीत त्या शोचे तिकीट आणि ते गिफ्ट बघून अजूनच कावरीबावरी झाली होती. तिला काहीच सुचत नव्हतं. उलट आज ती राघवसोबत भांडू शकत नव्हती. राघव आत शिरल्या-शिरल्या, हाक मारत ओरडला, “सुधू, आलोय गं मी, पाणी दे ना!”
सुधा खोलीतून निघाली नाही मग मधुने पाणी घेतलं, तिला असं बघून राघवने विचारलं, “मधुराणी, तू कशी इकडे? तुझ्या राज्याला सोडून?”
“जिजू, तो राजा काही माझा राहिला नाही आता, त्याला कुणी तरी भेटलं आहे.”
“असं! कोण गं?”
“माहीत नाही, सारखा फोनवर असतो, मॅसेज डिलीट करतो.”
आता मात्र राघव जोरात हसायला लागला आणि त्याने परत सुधाला आवाज दिला, “सुधू, बघ गं काय म्हणते आपली मधुराणी, मंगेशराव नादी लागले म्हणे कुणाच्या तरी...”
सुधा, खोलीत पुटपुटली, “तो काय लागणार कुणाच्या मागे, बिचारा सरप्राईज देतोय, तुझ्यासारखा नाही.”
राघवला सुधाचं उत्तर ऐकायला आलंच नाही, तर तो म्हणाला, “डार्लिंग काय झालंय, बोलायचं नाही का? अगं तुझा फोन आला तेव्हां मी मीटिंगमध्ये होतो गं, सॉरी सुधू.”
आता तो उठला आणि त्याच्या खोलीकडे निघाला, सुधा त्याने आणलेला ड्रेस घेऊन बसली होती, तो तिला येऊन बिलगला, “ए सुधू, आवडला ना तुला? मला माहीत होतं तुला हा रंग आवडणार, मस्त फिटिंग करून घे.”
“हुम्म, राघव मला बोलायचं आहे तुझ्यासोबत.”
राघव उठला, “बोलू गं, पण माझी ती मेहुणी आलीय ना, बसू दे जरा मला तिच्यासोबत, काय म्हणते तर बघतो. काहीतरी भांडण झालेलं दिसते. तुला काही बोलली का?”
“नाही मला कशी बोलणार, ती तर तुमची मेहुणी आहे ना.” सुधा नाक तोंड वाकडं करत म्हणाली.
आता राघव परत जोरात हसला, “मग, एवढीशी होती, चौदाची, माझ्या लाडात मोठी झाली ती, माझी लाडाची मेहुणी आहे. मला सांगणार नक्कीच.”
आता त्याने सुधाचा हात पकडला आणि तिला घेऊन तो हॉलमध्ये आला, जवळ घेऊन बसला. तोच मधु रडत बोलू लागली, “जिजू मी आता इथेच राहणार आहे. मला नाही जायचं त्या मंगेशच्या घरी...”
“अरे, पण ते तर तुझं घर आहे, मी दिलंय माझ्या मेहुणीला, त्याचं कसं?”
“जिजू मी नाही जाणार.”
“बरं, नको जाऊ, काय झाल सांगशील काय?”
सुधाने नमाला खोलीत जाऊन झोपायला सांगितलं. नमा पप्पाला पापा देऊन निघून गेली.
आणि मधु सांगायला लागली, “जिजू, मला जाम शंका आहे की, मंगेशच काहीतरी बाहेर सुरू आहे.”
“बरं, किती दिवसांपासून काही तुला माहीत आहे, म्हणजे महिने, वर्ष?”
“जिजू, आता कुठे मला माहीत झालं, तरी दोन आठवडे होतील.”
राघव हसला, “मधु अफेअर मुळात दोन आठवड्यात होऊच शकत नाही, महीने लागतात कुणी तरी दुसरं आयुष्यात शिरायला आणि वर्ष लागतात संबंध जुळवायला, सोपं नाही गं. हं, पण आता आजकालच्या मुलांचं काय, येतात जवळ आणि देतात सोडून, एका रात्रीची कथा, नंतर नसते कुणाला त्याची व्यथा... पण ते अफेअर नसतं गं, ती फक्त वासना असते.”
राघव बोलतानाही कुठे तरी शिरला होता. त्याचं बोलणं खूप भेदून गेलं होतं सुधाच्या मनाला. पण राघव ओघात बोलून गेला होता. मधुने प्रश्न केला, “मग अशी वासना दुसर्‍या स्त्रीसाठी असणे म्हणजे अफेअर नसू शकते का?”
“मला नाही वाटत, ते तर आपण कॉलगर्ल, वेश्या कुणाकडूनही भागवू शकतो, पण दुसऱ्या स्त्रीसोबत अडकणे नुसत्या ह्या गरजेसाठी हे नाही पटत. प्रेम, प्रेम असते गं, माणूस प्रेमाच्या शोधात असतो. कदाचित तो काही क्षणासाठी वासनेला प्रेम समजेलही, पण ती खूप काळ टिकत नाही. प्रेम तर माणसाला सुख देत असतं. खूप काही करण्याची उमेद देत असतं. हे असं प्रेम माणसाला आयुष्याच्या कुठल्याही वळणावर मिळू शकते. त्यात तो लग्न झालेला असो की ती विवाहित असो... प्रेम प्रेमच गं... आपण, आपला समाज त्याला अफेअर संबोधित असतो... कारण ती एका लग्नानंतरची गोष्ट असते.”
मधु नुसती ऐकत होती, “किती सुंदर बोलत आहात जिजू... तुमचा खूप जीव आहे सुधा ताईवर म्हणून असं बोलू शकता.”
सुधाचं नाव ऐकताच राघव जरा भानावर आला. विषय चर्चेचा झाला होता. राघव जणू त्या विषयात शिरला होता, सुधा राघवच्या बोलण्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करत होती आणि मधु मंगेश कुठे अडकला हे शोधत होती.
पुढील भाग लवकरच--- कथा क्रमा क्रमाने पोस्ट होईल... वेबसाईटवर असेल. The Game of Affair
@followers @topfans
आधीच्या भागाची लिंक पेजवर पिन पोस्ट (Pin Post) केलेली आहे. सर्व भाग तिकडे मिळतील.
राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त कादंबरी ऑनलाईन उपलब्ध आहे. तुम्ही विकत घेवूनही वाचू शकता.
कथा कशी वाटली नक्की कळवा...
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ.

Post a Comment

0 Comments