द गेम ऑफ अफेअर... भाग २

द गेम ऑफ अफेअर... भाग २


आता तिला राघवची वाट होती. बारा वाजले होते दुपारचे पण तिचं मन आणि डोळे घडीवर अडकून बसले होते. कशात मन नव्हतं, तोच तिची बहीण बॅग घेऊन घरात शिरली, रडत होती, काहीच बोलत नव्हती, सुधाला काही समजायला जागाच नव्हती.

“मधु का रडते आहेस? मला जरा सविस्तर सांग ना. मला कसं कळणार गं?”

“तायडे, मला इथे काही दिवस राहायचं आहे. तू जिजूला काय ते सांग, पण मी नाही जाणार. जिजूचा आधीच ओळखीतला आहे मंगेश उगाच त्याला बोलावून घ्यायचे ते. तू सांग, मला नाही जायचं, मी इकडे राहणार आता महिनाभर तरी, मग मी माझं काय ते बघेन.”

“अगं हो, तुझंच घर आहे आणि जिजू काय तुझ्या शब्दाबाहेर नाहीच ना. तू बोल त्यांना. तुझं ऐकतात ते माझ्यापेक्षा. पण मला काही कळू देणार आहेस की, तेही तू जिजूला सांगशील?”

सुधाचा स्वर हेही बोलताना चढला होता. आता तिला राघवचं मधुशी गोड-गोड बोलणंही न आवडायला लागलं होतं, पण लहान बहीण घरी आली होती. मग मनाला आवरत तिने मधुची समजूत काढत ठणकावून विचारलं, “सांगतेस, की मी करू फोन मंगेशला? तो मला सांगेल, खात्री आहे मला... आता तू तर मला सांगायची नाही आणि तुझा तो तुला लाडावून ठेवलेला जिजाजी काही येवढ्यात येणार नाही. मग मी काय करू?”

“तायडे, मंगेश ना माझ्याशी नीट बोलत नाही गं. काय त्या ऑफिस मधल्या बायका असतात ना त्यांना कसं खूप वानवत असतो. मला तर वाटते त्याचं काहीतरी प्रकरण सुरू आहे. काल मी पकडलं त्याला, काय तर धडाधड व्हॅट्सऍपवरचे मॅसेज डीलीट करत होता. विचारलं तर म्हणाला, तुझ्या काही कामाचे नाहीत.”

“असं का! नसतील ना तुझ्या कामाचे.”

“अगं पण का डिलीट करायचे गं?”

“बरं, मग?”

“मी मग रात्री त्याचा मोबाइल बघितला, तर कुण्या रागिणीचं अकाऊंट होतं आणि सगळे मॅसेज डिलीट होते.”

“कशाला नुसत्या त्या मॅसेज वरून संशय घ्यायचा गं.”

“नाही ताई, मी तशी नाही. काहीतरी आहे गं, सारखा तिच्याशी बोलत असतो व्हॅट्सऍपवर. मी जवळपास असली की, त्याचा सूर बदलत असतो. तायडे, फसले गं मी... जिजू नाही बोलला होता मला पण मी केलं त्या मंगेशशी लग्न.”

“कशाला विचार करतेस गं, तसं काही नसेल.”

“तसं वाटते आपल्याला, पण ह्या असल्या बायका असतात ना ताई, तुला काय सांगू, माझ्या शेजारी राहणारी ती सानिका, तिच्या नवऱ्याच त्यांच्याच ग्रुपमधल्या बाईशी असचं रात-रात बोलणं सुरू असायचं. गोष्टी अगदीच प्रेमापर्यंत आल्या होत्या. ती बाई म्हणे तिच्या नवऱ्याच्या मागे बाळ हवं म्हणून लागली होती... शी! आता काय खरं नी काय खोटं... तिने त्याला भेटायला बोलावलं होतं... पण सानिकाने त्या दोघांना रंगे हात पकडलं, मॅसेज करताना! सानिकाने चांगला दम दिला नवऱ्याला आणि त्या सटवीलाही... नवरा आता अगदीच मुठीत तिच्या. पण ती सटवी... अजूनही मोकाट, शोधत असेल अजूनही कुणाला... असल्या बायको ना ताई जातीनेच खालच्या दर्ज्याच्या, हसता काय, गोड-गोड बोलतात काय... आणि शिकार शोधतात.... अवदसा कुठल्या, एका माणसाने मन भरत नाही त्याचं. ह्यांचे नवरे कसे असल्या चालू बायकांना घरात ठेवतात कोण जाणे. ताई माझं तसं तर नसणार ना गं? मी तर राहणारच नाही त्या मंगेशसोबत कधीच.”

सुधाही तिचं ऐकून परत विचारात फ़सली. रागिणी नाव तिच्या कानात सारखं घुमत राहिलं. मनातून विचार जात नव्हता. मधु रडत होती, ती बडबडत होती, तिचे शब्द आता सुधाला समजत नव्हते. ती तिच्यावर ओरडत म्हणाली, “ए गप्प, गुमान गप्प हो. काय सोंग आहे तुझं! तूच तशी आहेस. उगाच त्याच्यावर काही बाई संशय घेऊ नको.”

सुधा चक्क ओरडली पण तिच्या मनाला तोच प्रश्न परत पडला... पण बहीण समोर होती परत स्वत:ला आवरत म्हणाली, “ओळखीतला मुलगा आहे मंगेश. मी तर त्याला तुझ्या लग्नाआधी पासून ओळखते. हे ओळखतात. तो काही असा वागायचा नाही आणि त्याची अशी हिंमत पण होणार नाही.”

जसे तोंडातून शब्द सुधाच्या बाहेर आले तशी मनात पाल चुकचुकली, “राघववर कुणाचं लक्ष नसतं मग... अगं बाई... जाऊ दे.”

ती मधुला बघत होतीच तर ती म्हणाली, “तायडे नाही ना गं, मला म्हणतो, तुला काय करायचं, कामाचं बोलत असतो मी. कसलं काम गं घरी आल्यावर. मी सांगते जिजूला आता.”

सुधाने तिला चांगलंच रागवलं होतं, पण मनात तर तिच्याही कालवा-कालव सुरू होती. आता ती काय सांगणार होती मधुला... संशयाचा भूत तिने समोर बघितलं होतं. मग तिला आता स्वत:चा परत राग येत होता. मधुला कसेबसे सांभाळत तिने गप्प केलं. तिला जेवायला वाढलं. तीही जरा शांत झाली, तर परत सुधाच लक्ष त्या तिकिटावर गेलं. मनातच बडबडली, “माझं ना, सारं काही गडबडलं आहे, काहीही विचार करते मी. राघव दिल्लीला गेला होता हेच खरं आहे. त्याची आज फायनल मिटींग आहे, बोलला तो. आणि काय ती रागिणी कुणी दुसरीही असू शकते. जगात काय ती एकच आहे!”

समोर ठेवलेलं पाणी ती प्यायली परत मनातले शब्द ओठांवर आले, “पण हे तिकिट्स कसे मग?”

समोर मधु हुंदके देत जेवत होती, पटकन म्हणाली, “तायडे, कसले तिकीट गं, तू मला काही बोलली काय?”

भानावर येत सुधा उतरत्या स्वरात म्हणाली, “नाही गं बाई, तुला कशाला बोलू काही... तू जेव, भाजी वाढू का तुला?”

मधु जेवून झोपली, पण सुधाची जशी झोप उडाली होती. तिचा अजूनही जीव त्या घडीच्या काट्यांवर होता. पण आज ती राघवशी काही बोलू शकणार नव्हती हेही तिच्या लक्षात होतं.

---

द गेम ऑफ अफेअर...

चार वाजायला आले होते. मुलीची शाळेची बस यायची वेळ झाली होती. तिने जरासं स्वत:ला आवरलं. ओढणी घेतली, बाहेर ऊन होती मग गॉगलपण डोळ्यावर लावला. ती निघाली, सोसायटीच्या आवारातून ती निघत होती आणि जवळपास गेटजवळ आली, तोच तिची नजर समोर उभ्या असणार्‍या त्याच्यावर पडली. नमाला त्याच्यासोबत बघून सुधा भराभर रोड क्रॉस करून तिच्याजवळ गेली. तो नेहमीप्रमाणे हसला, हसताना त्याच्या गालावर पडणारी ती खळी आजही मोहक भासत होती. सुधाची नजर नेमकी आज त्या खळीवर पडली, तसे तिचे भाव बदलले, रागात आली होती, पण तो शांतपणे म्हणाला, “अहो आज बस जरा लवकर आली, तुम्ही आलेल्या नव्हत्या मग मी थांबलो नमितासोबत.”

नमा आईला येऊन बिलगली. सुधा काहीच बोलली नाही, खरं तर तिला त्याला धन्यवाद द्यायचा होता, पण शब्द ओठांवर परत मागे गेले. त्यानेही अलगद मान हलवली, मुलाचा हात धरला, म्हणाला, “नाही, असू द्या, धन्यवादाची काही एक गरज नाही हो, माझ्या मुलीसारखी आहे ती.”

सुधाने गॉगलमधूनच त्याला डोळे वटारून बघितलं, नमाचा हात पकडला, रस्ता ओलांडला आणि निघून गेली. गेटवर पोहचली, का कोण जाणे तिने मागे वळून बघितलं आणि अलगद तिचा हात त्याला दाखवला. त्याने प्रतिउत्तर देत बाय-बाय केलं. पण दुसर्‍या क्षणाला सुधाला उगाच आपण हात उंचावला असंही वाटलं.

सहा वाजले होते. नमाची आवडती मावशी आली होती, मग आज आनंदी होती ती. ती मधुसोबत खेळत होती. मधुही कधी मोबाईल बघत होती तर कधी तिच्याशी बोलत रमत होती. विसरली होती जरा वेळ मंगेशला. सुधा मात्र मनातच गोंधळून गेली होती. तिला राघवशी बोलायचं होतं. पण मधु आलेली... मोबाईल हातात घेतला आणि लावला. राघव महत्त्वाच्या बैठकीत होता, त्याने उचलला नाही. सुधाने चहा ठेवला. विचारात ती तशीच गॅसजवळ उभी होती. परत रागिणी तिच्या विचारात शिरली, तिला आता आठवलं, राघव ते दोघं फिरायला गेले असताना एकदा त्याने त्याला रागिणीने का सोडलं म्हणून सांगितलं होतं.

दोघेही महाबळेश्वरला आईच्या सांगण्यावरून परत दुसर्‍या हनीमूनला गेले होते. उंच माथ्यावर उभे होते. राघवचा हात तिच्या हातात होता, तो तिला म्हणाला होता, “माझ्या आईची निवड आहेस तू पण माझी राणी आहेस गं. माझ्यावर विश्वास दाखवला तुझ्या ‍वडिलानी, आपण दोघं मिळून वाढवू आपली ही कंपनी. रागिणीच्या वडिलांनी मला नकार दिला आणि रागिणी पार बदलली गं, आई म्हणते ना तेच खरं आहे. प्रेम माणसाने पैसा बघून करू नये. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि आपली प्रगती सुरू झाली, आता थांबायचे नाही...”

रागिणीचा विषय निघाल्यामुळे सुधाने प्रश्न केला होता, “अहो पण काय झालं मग त्या रागिणीचं?”

राघवनेही स्पष्ट सागितलं होतं, “प्रेम होतं माझं तिच्यावर, पण प्रेमाचा रंग दिसला आणि मग नको झाली ती... आता माझ्या प्रेमात आणि मनात तू आहेस.”

तरीही सुधाने त्याला विचारलं होतं, “आता कुठे आहे ती?”

“अमेरिकेत आहे, दोन मुलं आहेत. नवरा रग्गड कमावतो. तिकडेच स्थायिक झाली आहे. तिच्या नवऱ्याला भारतात यायचे नाही आहे आणि आता तिलाही यायचे नाही असे माहीत झाले माझ्या मित्राकडून. जाऊ दे, मरू दे... मला तू भेटलीस आणि माझ्या मनातल्या प्रेमाला परत अंकुर फुटला आहे. तुझं सुंदर रूप मला ना असं नेहमी नजरेत भरून घ्यायला आवडते.”

सुधाला विचारात तिची प्रतिमा स्वयंपाक खोलीच्या खिडकीत दिसली, आपण अजूनही सुंदर आहोत हे तिला जाणवले. आणि तिला राघवच बोलणं आठवलं. त्याच्या त्या शब्दांमध्ये ती गुंतली होती आणि परत आजच्या सकाळच्या प्रसंगात ती शिरली. ओठात पुटपुटली, “हल्ली काय झालंय राघवला कळत नाही, प्रेमाच्या गोष्टी तो करतच नाही, सारखं काम असते त्याला. प्रेम आहे की नाही काय माहीत, की प्रेम झालंय त्याला त्याच्या कामासोबत?”

चहा कधी बुडाला लागून जळला तिला कळलंही नाही. वासाने बाल्कनीत गप्पा करत असलेल्या मधु आणि नमा खोलीत आल्या. मधु ओरडली, “तायडे, कुठे लक्ष आहे. सगळा काळा धूर पसरला आहे गं.”

ती धावत आली आणि आधी गॅस बंद केला. पातेलं बेसिनमध्ये टाकलं, नळ सुरू केला. म्हणाली, “काय गं कुठे हरवलीस?”

सुधा, “काही नाही, लक्षच राहलं नाही गं.”

“कसला विचार करतेस?”

आता नमा मावशी जवळ आली आणि म्हणाली, “मावशी, हल्ली मम्मा असंच काहीही करते गं, आज तर ही पप्पावर खूप ओरडली. बिचारा माझा पप्पा गुमान ऐकत असतो मम्माचं.”

“बाळा, तसं नाही म्हणायचं, ते त्यांच दोघांच प्रेम आहे.” मधुने नमाला स्वयंपाक घरातून बाहेर काढत म्हटलं. सुधा आता पुटपुटली, “प्रेम, आणि ह्या अशा माणसासोबत! मला तर वाटलं होतं मी ह्यांची पहिली लग्नाची बायको आहे. पण...”

मधु परत खोलीत आली, “काय गं, काय, पहिली बायको म्हणजे?”

सुधा भानावर आली, “अगं म्हणजे ती आहे ना माझी सवत?”

मधु आश्चर्याने म्हणाली, “म्हणजे जिजू...”

सुधा बोलणार होतीच तर नमा परत तिची पुस्तकं घेऊन खोलीत आली, “मावशी, सवत म्हणजे, पप्पाच ऑफिस...”

मधु हसायला लागली, सुधाच्या जवळ आली, “तायडे, जिजूचं भारी प्रेम आहे तुझ्यावर आणि त्यांची काय गं मजाल, एवढी सुंदर बायको असताना कुणाकडे बघण्याची, इथे माझ्यासारख्या सावळ्या बाईच्या नशिबी असं येतं गं? तुझ्यावर तर जिजू मरतात... जीव की प्राण आहेस तू त्यांचा. तुला राणी सारखे ठेवतात ते. तुझ्या शब्दाबाहेर नसतात गं.”

सुधा काय बोलणार होती, मधुच्या डोळ्यात अश्रू बघत स्वत:ला सांभाळत तिला सांभाळायला सरसावली, “मधु, तसं काही नाही आहे मंगेशच, तू तसा विचार करू नको. तू चहा घेणार का? मला हवा आहे बाई, तल्लफ आली आता.”

तिने पातेलं हातात घेतलं आणि चहा ठेवला, मधुला तिने नमाला बाहेर घेऊन जाण्याचा इशारा केला. परत तिने मोबाईल हातात घेतला, राघवला लावला, राघवने उचलला, म्हणाला, “काही अर्जंट?”

सुधा काहीच बोलली नाही, तो लगेच म्हणाला, “तुला मी नंतर कॉल करतो...”

कॉल कट... 

Post a Comment

0 Comments