द अदर वुमन - भाग ३, आवडती नावडती!!

 द अदर वुमन - भाग ३, आवडती नावडती!!





पहिला भाग इथे वाचा-  द अदर वुमन - भाग १, आवडती नावडती!!

तिसरा भाग पुढे वाचा-

आयुष्यातील सर्वात मोठी बातमी कुणाला सांगू अन् कुणाला नाही असे झाले होते अरुणाचे. आईला फोन करावा असे झाले, पण दुसऱ्या क्षणी जाणीव झाली, सांगायचे काय? कुणाच बाळ आहे हे कसं सांगणार होती ती. आणि आईला सांगितलं तर विषय वाढेल ह्याची भीती होतीच. मग वाटले माहेरच्यांनी नाते तर तोडले आहे मग त्यांना सांगून, न सांगून करायचे काय. जरा वेळ आनंदातही अश्रू आले. मनाला शांत करत तिने तिला सुधीरला सांगायची हिंमत केली. थरथरणाऱ्या हातांनी अरुणाने नंबर डायल केला. फोनची प्रत्येक रिंग तिच्या छातीत धडधड वाढवत होती. आणि त्याने फोन उचलला, " हॅलोss... कशी आहेस गं? किती दिवसांनी फोन केलास. मी तर समजलो आता तू कायमची रागावलीस माझ्यावर."
"सुधीर, कसा आहेस? "
"आली का माझी आठवणं, किती कॉल करतोय तुला...”
अरुणा हलकंसं हसली, “अरे तसं नाही...”
“हो... मीपण जरा बिझी होतो... भेटायचं का? खूप दिवस झालेत गं."
"सुधीर, ए, ऐक ना, तुला गोड बातमी द्यायची आहे. "
"कुठली?”
ती काही सांगण्याआधीच तो परत उत्साहात बोलला, “ आपण कुठे भेटतोय? तुझा काही नवीन प्लॅन... व्हा!! खूप दिवस झाले गप्पा नाही झाल्या आपल्यात... आणि हो, माझं काल बोलणं झालं एका गाण्यासाठी... करायचं का सोबत?"
तो काय बोलत होता तिला ऐकूही येत नव्हतं, जरा डोळे मिटले आणि हळूच म्हणाली, “सुधीर... मला हे बाळ हवंय रे...”
"कुठलं बाळ? काय बोलतेस तू?"
"अगदी तुझ्यासारखं दिसणार... गोरंस... तुझ्या डोळ्यांसारखे डोळे असणार... तुझं बाळ!"
सुधीर काही क्षण गप्प झाला, आणि आणि मग हसत म्हणाला, "हा काय बावळटपणा आता?"
आता अरुणाचा आवाज थरथरला, "सुधीर... मी आई होणार आहे तुझ्या बाळाची."
आता मात्र कुणीही बोलत नव्हतं, नुसत्या श्वासांचे आवाज मात्र फोनवर संवाद घालत होते. आणि त्याचा आवाज बदलला, “काय बोलतेस तू? आपण तीन महिने भेटलोही नाही. हे कसं शक्य आहे?”
“अरे, खरं सांगतेय मी.”
“अशक्य!! काहीही बोलतेस तू.”
आता तिचा आवाज तुटत होता, "अरे हो... "डॉक्टर म्हणाल्या तीन महिने झालेत. मी बाहेर पडल्यापासून घरी पोहोचेपर्यंत मी त्या बाळाच्या प्रेमात पडले रे. पहिला फोन तुला केला... आणि तू..."
"शक्यच नाही... अरु, आपण नेहमी काळजी घेतली आहे. मग हे कसं शक्य आहे?"
तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, "मला माहित आहे... त्या दिवशी तू विसरला होतास. आणि मग..."
त्याचा आवाज आता कठोर झाला, "काहीपण बोलू नकोस... माझं नाही ते बाळ. आणि माझ्या माथी कुणाचंही बाळ मारू नकोस.”
क्षणभर तिचा श्वासच थांबला, “सुधीर... काय बोलतो आहेस तू?”
तो निर्विकारपणे बोलत राहिला, “ खरं आहे ते. कोण जाणे, तू एकटी राहतेस... कुणाचं असेल काय माहित मला. माझी आणि तुझी आता किती महिने भेटही झाली नाही."
अरुणाला पुढे काही ऐकू आलं नाही. ज्या माणसाच्या बाळासाठी ती स्वप्नं रंगवत होती... ज्याच्या प्रेमाची तिला अपेक्षा होती... तोच माणूस आज तिच्या चारित्र्यावर प्रश्न उभा करत होता. तिने पुढे काहीही न बोलता फोन ठेवून दिला.
संपूर्ण रात्र रडत राहिली. सकाळी तिची उशी भिजलेली आणि डोळे सुजलेले होते. पण मनातला प्रश्न मात्र तसाच राहिला होता... आता पुढे काय? सकाळी पुन्हा सुधीरचा फोन आला. अरुणाचं मन अजूनही आशेवर टिकून होतं. तिने परत खूप उत्साहात उचलला की त्याच काही मत परिवर्तन झालं असेल, कदाचित त्याला चूक कळली असेल.
"सुधीर... तुझंच रे हे पिल्लू!"
तिचं काहीही न ऐकता तो बोलला, "अरु, मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांशी बोललो आहे. तू आत्ता, आजच तिकडे जायचं आणि ते बाळ पाडायचं.. मला त्या बाळाशी काहीही देणंघेणं नाही. आणि ते कुणाचं आहे हेही मला माहित नाही आणि माहित करून घ्यायचं नाही... तशी मी तुझी मदत करतोय ह्यातून निघण्यासाठी. आवडतेस तू मला. मला तू हवी आहेस."
अरुणाच्या हातातून फोन निसटायची वेळ आली होती, ती हुंदके देत म्हणाली. "अरे राहू देत ना रे... तुझ्यासारखं असेल रे ते... तुझे डोळे असतील. आपण त्याला गाणं शिकवू. तू म्हणतोस तसं स्टेजवर उभं करू..."
तो मध्येच ओरडला, "हे बघ, उगाच गुंतू नकोस. तुही गोत्यात येशील आणि मी पण."
ते शब्द ऐकताच अरुणाच्या डोळ्यांतले शेवटचे अश्रूही कोरडे पडले.
तो परत शांत आवाजात म्हणाला, "अरु... आता निघ तू, मी गाडी पाठवत आहे. "
अरुणाने फोन ठेवला आणि बराच वेळ मोबाईलकडे बघत बसली. डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते. सुधीरने बाळ नाकारलं होतं... तिच्यापुढे अनेक प्रश्न होते. पण उत्तर नव्हती. एकटी ती आधीच होती आणि आता पुढे काय ह्या विचारात अजूनच एकटी पडली होती. त्या एका निर्णयाने तिचं संपूर्ण जग कोसळलं होतं. झालं ह्यात ती दोषी होती हे मान्य केलं होतं जणू तिने. मन आता सारिकाच्या विचारत अडकलं होतं. तिची मुलं आठवत होती. आपण कांगावा केला आणि हक्क मागितला तर किती आयुष्यं उद्ध्वस्त होतील, हा विचार तिच्या मनाला पोखरत होता.
इकडे तिनेही आताच कुठे सारं विसरून नवीन आयुष्य सुरु केलं होतं आणि हे अचानक आलेलं वळण तिला उध्वस्त करणार होतं. या बाळाचं काय करावं हे तिला काही केल्या कळत नव्हतं. तेवढ्यात गाडी बाहेर आली हे तिच्या लक्षात आलं. शेवटी स्वतःला सावरत ती उठली. तयार झाली आणि सुधीरने सांगितलेल्या डॉक्टरांकडे ती निघाली.
हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तिच्या पायांतच बळ उरलं नव्हतं. सगळं धूसर दिसत होतं. रिसेप्शनसमोर उभी राहून ती सैरभैर नजरेने आजूबाजूला पाहत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला, सुधीरचा मॅसेज आलेला, त्यात नंबर होता, तिने थरथरत्या हातांनी तो नंबर डायल केला. तिने तो डायल केला आणि थरथर स्वतःच नाव सांगितलं. काही वेळाने समोरून एक डॉक्टर तिच्याकडे चालत आली. चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती तिच्या. जवळ येऊन म्हणाली, "तुम्ही अरुणा ना! या इकडे, या माझ्यासोबत. साहेबांनी सर्व सांगितलं आहे मला, काही घाबरू नका."
अरुणाचा आवाज अडखळला. क्षणात तिला वाटले सुधीरने असं काय सांगितलं असणार... ती मुकाट्याने डॉक्टरांच्या मागे चालू लागली. पण प्रत्येक पावलागणिक तिचा हात नकळत पोटावर जात होता... जणू तिच्या आत वाढणारा तो छोटासा जीव अजूनही तिला प्रश्न विचारत होता.
एका खोलीत ती पोहोचली जी. डॉक्टरांनी तिला बसायला सांगितलं. तेवढाच तो संवाद त्यांच्यातला. अवघडत अरुणाच्या तोंडून शब्द फुटले,
"अहो पण.. "
"काही त्रास होणार नाही, तुम्ही इथेच थांबा, कुणालाही काही कळणार नाही, मी तुमची पूर्ण काळजी घेईल."
"तुमची फी?"
"अहो, ती आधीच दिलेली आहे... त्याची काळजी तुम्ही करू नका... जरा शांत व्हा."
आणि मग तिने नर्सला आवाज दिला, "नर्स, जरा मॅडमला पोझिशनला घ्या, सोनोग्राफी करू आधी."
अरुणा जरा घाबरतच आतल्या खोलीत गेली, नर्सने सांगितल्या प्रमाणे सोनोग्राफीसाठी तयार झाली.
डॉक्टर आत आली, सोनोग्राफीत बाळाला अगदीच बघून म्हणाली, "अरे अरे ... जेमतेम तीन महिने पूर्ण झालीत कदाचित... कठीण आहे. अरुणा मॅडम, हे बाळ आहे तुमचं, बघून घ्या एकदा, काही क्षणात राहणार नाही."
अरुणाच्या छातीत हुंदका दाटून आला, त्या सोनोग्राफीच्या स्क्रीनवर दिसलेला तो छोटासा ठिपका बघत ती पुटपुटली, "माफ कर रे... तुझी आई खूप कमकुवत निघाली बघ.”
तेवढ्यात डॉक्टरचं हळूच पुटपुटनं अरुणाच्या कानावर पडलं, "कशाला करता असले उद्योग कोण जाणे.. नाहक जीव जाईल बाळाचा.. लोकांना बाळ होत नाहीत आणि नाईलाजास्तव आम्हाला ह्या असल्या लोकांच्या प्रेशरमुळे असलं करावं लागतं.”
डॉक्टरने हातमोजे काढत नर्सकडे पाहिलं, “नर्स, चला मॅडमला ऑपेरेशन रूममध्ये घ्या आणि तयारी करा, मी आलेच जरा नाश्ता करून. सकाळपासून सुधीर साहेबांनी फोनवर फोनकरून नाश्ता करायलाही वेळ दिला नाही..."
अरुणा जाम घाबरली होती, जरा ड्रेस बरोबर करत होती तर नर्सने दवाखान्याचे कपडे आणून दिले, आणि वचकून म्हणाली, "घाला हे, आणि या आतमध्ये.”
हॉस्पिटलचे कपडे पाहून अरुणाच्या हातापायातलं बळच निघून गेलं. तरीही अरुणाने ते थरथरत कपडे चढवले. डोळ्यांत भीती होती, मनात गोंधळ होता आणि छातीत एक अव्यक्त वेदना. मोठ्या हिमतीने तिने पाऊल पुढे टाकलं आणि ऑपरेशन रूमकडे निघाली.तेवढ्यात तिची नजर डॉक्टरांच्या टेबलावर ठेवलेल्या सोनोग्राफीच्या प्रिंटकडे गेली. पावलं जागच्या जागी थांबली. नकळत हात पुढे गेला. थरथरत्या बोटांनी तिने तो फोटो उचलला. मनात साचलेलं दुःख डोळ्यांतून वाहू लागलं. तिने अलगद त्या छोट्याशा प्रतिमेवरून हात फिरवला. तो फक्त काळा-पांढरा फोटो नव्हता... तो तिच्या आत वाढणाऱ्या जीवाचा पहिला चेहरा होता. तिच्या आणि सुधीरच्या प्रेमाची पहिली खूण होती. डबडबलेल्या नजरेने ती त्याकडे पाहत राहिली. आणि मग नकळत तिला सुधीर आठवला. त्याचं हसणं... त्याचा आवाज... त्याचा तो रुबाब, गोरासा चेहरा... त्याचं मोठंसं नाक... सगळं एकामागून एक डोळ्यांसमोर उभं राहिलं. आणि मग तिच्या कल्पनेत तो छोटासा ठिपकाही बदलू लागला.
तोच नर्सने आवाज दिला, "मॅडम, चला आत. डॉक्टर मॅडम येतीलच आता."
अरुणाने डोळे पुसले. सोनोग्राफीची प्रिंट अजूनही तिच्या हातात होती. मनावर खूप ताबा ठेवून उत्तर दिलं, "नाही येत जा... नाही करत मी ऑपेरेशन.”
नर्स गोधळली, “काय?” अरुणाने लगेच खोलीत जाऊन कपडे बदलले. आणि बाहेर येत ओरडली,
“हो, नाही करत मी ऑपरेशन. मला हे बाळ हवंय. माझं बाळ घाणेरडं नाही. जो तू तेव्हाची मला अशी वागणूक देत आहेस. घाणेरडे विचार असतात. मी आणि माझं बाळ नाही गं घाणेरडं... माझं प्रेम होतं आणि ह्या बाळावरही आहे. त्याला नसेल व्हायचं बाप... पण मला आई व्हायचं आहे... हे बाळ नुसतं माझं नाही का होऊ शकत?"
ती झटकन उठली, तिची पर्स उचलली, आणि बाहेर पडण्यासाठी वळली. तोच तिला डॉक्टर समोरून येताना दिसली, "अगं, काय करतेस, ऑपेरेशन आहे ना तुझं? हो आतमध्ये."
अरुणा थांबली. आतापर्यंत खाली झुकलेली तिची नजर पहिल्यांदाच सरळ डॉक्टरांच्या डोळ्यांत जाऊन भिडली. त्या क्षणी ती आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःसाठी उभी राहिली, “नाही, नाही करायचं मला काही.”
डॉक्टर अवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिल्या. अरुणाने थरथरत्या हाताने सोनोग्राफीची प्रिंट छातीशी धरली, “माझं बाळ आहे हे. मी का मारू त्याला. ज्यांनी तुम्हाला सांगितलंय ना त्यांना सांगा जे सांगायचं आहे ते. मी होणारी आई आहे बाळाची मी असं काहीही करणार नाही."
ती वळली आणि निघू लागली, तर डॉक्टरांनी तिचा हात धरला, "बस इथे... ह्या पुढची पूर्ण ट्रीटमेंट मीच करणार तुझी.. बस! तू खंबीर राहा. नाहीतर मी ह्या बाळाला बाळ नसणाऱ्या पालकांना देऊ का?"
अरुणा जवळजवळ ओरडलीच, "नको... आणि का हो? बाप नाही स्तीकारत वर काय आई नाही राहिली का मी त्याची?”
क्षणात तिचे दोन्ही हात पोटावर गेले, “माझं बाळ आहे, मी समर्थ आहे. मी सांभाळेन त्याला. मी निघते.”
डॉक्टरांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, ती पुढे म्हणाली,
“बस, हेच ऐकायचं होतं मला... तुला कुठलीही मदत लागली तर बिनधास्त माझ्याकडे ये. हे बाळ माझ्या हॉस्पिटलमध्येच जन्म घेणार, तुझी अशी हिंमत बघून, जबाबदारी आता अर्धी माझीही आहे. काळजी घे."
इतका वेळ स्वतःला सावरून ठेवणारी अरुणा अखेर कोसळली. तिने पुढे होऊन डॉक्टरांना घट्ट मिठी मारली. निघताना सर्वात आधी तिने सुधीरचा मोबाईल नंबर डिलीट केला आणि बाळाच्या आनंदात घरी आली. तिने निर्णय तर घेतला आई होण्याचा पण...
पुढे काय होईल अरुणाचे, सुधीरचे काय होईल वाचूया अंतिम भागात...
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
@followers @topfans

Post a Comment

0 Comments