बॉयफ्रेंड- भाग 2- द #कॉर्पोरेट लॅडर.

 बॉयफ्रेंड- भाग 2- द #कॉर्पोरेट लॅडर.

आधीचा भाग

सुहासला समृद्धीची काळजी कळत होती. पण त्याचा नायलाज होता. तो लगेच तिच्या
शी लग्न करू शकत नव्हता. क्षणभर शांतता होती दोघात. कॉफी संपली होती आणि सुहासने विषय बदलण्याचा प्रयत्न केला,

मग, अजून काय हवंय... काही खाणार का? तुझ्या तर ऑफिसला लंच मिळतो यार.... मस्त मजा आहे तुझी.”

“कसली मजा रे, पहिल्या दिवशी वाट लागली माझी. मला तर माहित नाही लंच मिळतो ते, आज तर मला काही सुचत नव्हतं.”

“आज तसाही पहिला दिवस, काय सारं कसं भूलभूल्या वाटत असणार... होईल सगळं नीट.. ऐ आज सीलेब्रशन बनते ना, चल ना खोलीवर. मी सगळं जुळवून आलोय. कुणी येणार नाही तिकडे आज.”

कसा रे तू... आणि काय मेसेज करतोस असले...”

त्यात काय! तुलाच करतो, वाटलं, बोललो. चल ना...”

"कसा आहेस रे तू..."

तुला हवा तसा, अगदीच तुझा, तुझ्या मागे मागे असणारा, तुझा मजनू... अजून काही...”  

समृद्धी काहीच बोलली नाही, सुहासने बिल दिलं आणि दोघेही निघाले. सुहासने गाडी त्याच्या मित्राच्या खोलीकडे वळवली, वाटेत पडणाऱ्या सिग्नलला तिला एक गाडी दिसली. त्यात ती सकाळीची बाई बसली होती. तीच ते अद्भुत रूप बघून समृद्धी परत हरवली, सिग्नल सुटला आणि समोर असणाऱ्या गाड्या भराभरा निघाल्या, सुहास, ती कोण होती रे? किती सुंदर आहे ती बाई.”

कोण गं, मला तर ह्या जगात तुच सुंदर दिसतेस.”

आणि तो गुणगुणायला लागला, “तू मेरी परम परम सुंदरी....”

समृद्धी परत त्याला बिलगली. पण तिचा तो चेहरा काही केल्या समृद्धीच्या नजरेआड होत नव्हता. राहून राहून तिचं ते अलगद चेहऱ्यावर येणारे केसं आवरण तिला आठवत होतं. कोण होती ती सुंदर स्त्री, आणि एवढ्या महागड्या गाड्यातून कशी फिरत होती, तिला समजत नव्हतं.

मित्राची खोली आली, त्याने गाडी लावली आणि समृद्धीला घेऊन तो खोलीत शिरला. तशी ती त्याला बिलगली, अगं, थांब ना, मी तयार होता...”

काय रे, माझा मग मूड जातो. आज पार थकले आहे मी... हा थकवा ह्याच बाहूत शांत होतो.”

असं! आता काही वेळा आधी काय म्हणाली होतीस?”

पण आता मला तू हवा आहे...”  

काही वेळात दोघांनी ऐकमेकांना स्वतःच्या स्वाधीन केलं होतं. अलगद सुहासच्या छातीवर डोकं ठेवत ती जरा विसावली होती. खोलीतील अंधुक प्रकाशात दोघांचे  श्वास एकमेकांत मिसळत होते. थोडावेळ कुणीच बोललं नाही, फक्त शांतता होती. मग समृद्धी हलकेच म्हणाली,

बास झालं रे आता… करूया आपण लग्न. मला नोकरी लागली आहे. तुझं काम चालू आहे. दोघं मिळून मोठं करू आपण. मी घरी बोलते लवकर. नाही ऐकलं घरच्यांनी तर… आपण स्वतः करू लग्न. असं बर वाटत नाही. प्रेम आहेच, निदान जागा आपली हवी, असा तू नेहमी मित्रांना सांगून आपल्यासाठी सगळं जुळवून आणतोस.”

सुहास तिच्या केसांतून बोटं फिरवत म्हणाला, “समू, मीही हाच विचार करत होतो. पण अजून मी काही उभं केलं नाही. अजून स्वतःची ओळखही नाही तयार केली. तुझ्या दादाच्या नजरेत मी फक्त एक ठेकेदाराचा मुलगा आहे. तो मान्य करेल असं वाटतं तुला?”

तो मान्य करो वा न करो, मी ठरवलं आहे,” समृद्धीचा आवाज ठाम होता. “आता असं बरं वाटत नाही. रोज आपण असे  काही क्षण घालवतो आणि मग परत वेगळं होतो. प्रेम लपवून जगणं थकवतं रे प्रेमाला.”

सुहासने तिचं चेहऱ्यावरून सरकलेलं केसांची बट अलगद कानामागे केली. “माझं स्वप्न आहे, समू… स्वतःची कंपनी. नाव मोठं....”

समृद्धीने त्याच्या ओठंवर बोट ठेवलं, सुहास मला माहित आहे सारं... पण मला ह्यातलं काहीही नको, तू हवा आहेस.”

“मग प्रश्नच मिटला, तू आहेस माझ्या सोबत. बस तू आता खूप काही शिक तिकडे, कोण काय बोलतं सगळं नीट ऐकायचं. बॉसशी बोलायचं. अश्या कंपनीमध्ये ना बॉस लोक खूप वेगळे असतात.”

ते काही माहित नाही, पण माझी बॉस जाम वेगळी आणि आतल्या गाठीची  आहे.”

वेगळी आहे, म्हणजे... स्त्री आहे?”

हो....”

ऐ.... लवकर बदलली पाहिजे ती, स्त्रिया ना दुसऱ्या स्त्रीला पुढे जाऊ देत नाहीत गं.”  

हुम्म्.... पण बरी आहे ती.”

काही बरी नसते. ती करत असेल बॉसच्या मागेपुढे, तू शिक हा तसं, बघ वर्षभरात मॅनेजर झाली पाहिजे तिकडे. वाटेल ते करायचं, शिकायचं. मग बघ, कोण ती तुझी बॉस काहीही करू शकणार नाही.”

हुम्म्म, चल वेळ होतोय, दादा वाट बघत असेल.”

आवर तू, मी सोडतो तुला तिकडे.”

समृद्धीने परत तोंडाला बांधून घेतलं आणि ती सुहाससोबत चोर पावलांनी निघाली.

दोघेही परत गाडीने निघाले होते, सुहास तिला तिच्या घराजवळच्या चौकात सोडणार होता, समोर सिग्नल होता म्हणून त्याने गाडी एका गल्लीतून टाकली, तोच समृद्धी म्हणाली,

अरे, सकाळी मी इकडेच त्या स्त्रीला बघितलं होतं.”

अगं, तू इकडे काय करत होती?”

अरे रस्ता त्या लाल दिव्याच्या गड्यांसाठी मोकळा केल्याने बस अडकली होती मग मी ह्या पुढच्या चौकात येण्यासाठी इकडे आले होते.”

ऐ बाई, इथून पुढच्या दुसऱ्या गल्लीत अजिबात जायचं नाही.”

का रे?”

अगं तू इथेच तीन किलो मीटरवर राहतेस माहीत नाही तुला?”

काय रे?”

अगं रेड लाइन एरिया आहे तो,”

आह.. ती सकाळची बाई...”

आता लागला तुझा लाइट.”

अरे पण किती सुंदर आहे ती, नाही रे, उगाच आली असणार ह्या कामात ती.”

राहु दे गं, काही सांगता येत नाही, आजकाल नुसत्या त्या गल्लीचाही वापर करतात हे हाय क्लास वाले.”

सुहासने गाडी एका लहानश्या गल्लीत टाकली, तसा तो त्यांचा नेहमीचा स्पॉट होता, समृद्धीला सोडण्याचा,

समू, बघ, तू ना मन लावून काम कर. शिक तिकडे काय काय होते ते, ह्या महिन्यात मी काही टेंडर भरत आहे. छोट मोठं काम मिळत मोठं मिळेल आपल्याला. पण तू तिकडे तुझ्या बॉस कडून जमेल तेवढं शिक. अरे एकदा का माझ्या कंपनीने जम घेतला की तुला नाही करू देणार कुणाची चाकरी. राणी होशील साऱ्या ऐश्वर्याची.”

समृद्धी हसली, “आणि नाही झाली तर, मग काय मी तुझी राणी नाही.”

तसं नाही, तू माझ्या दिलाची राणी आहेसच ना.. पण विचार कर एस अँड एस कॉर्पोरेशनची मालकीण म्हणून.”

“हाहाहा, आता हे एस अँड एस काय?

“अबे, समृद्धी अँड सुहास यार...”

म्हणजे तुझं सर्व ठरलं तर.... “

अरे म्हणजे, रजिस्टर होत आहे उद्या परवा. आहेस कुठे!!”

समृद्धी हसली, “सुहास, सगळं चालायचं रे, मी आहे तुझ्या सोबत पण मी काय म्हणते, तू बोल ना घरी, मीपण बोलते. जेवढ्या लवकर आपण एकत्र येऊ तेवढं योग्य वाटते मला.”

हो हो, आला तुझा मुद्दा लक्षात पण विचार कर ना, जेव्हा आपली कंपनी उभी राहील मी तुला किती महागड्या गाडीतून तुझ्या माहेरी सोडायला येईल...”.

सुहास जमिनीवर ये, माझा आज फक्त पहिला दिवस होता. अजून खूप काही बाकी आहे.”

अगं, हो, पण मी ही स्वपन उघड्या डोळ्याने बघतोय, अर्थात मी काम करणार त्यासाठी, बस तुझी साथ हवी आहे. देशील ना?”

मी आहे रे तुझ्यासोबत. राहू दे, निघते मी. तो बघ तो पानवाला बघतोय आपल्याकडे. निघायला हवं.”  

सुहासने तिच्या हातांना घट्ट पकडून तिला शाश्वस्त केलं आणि ती निघाली, ती दूर जाईपर्यंत सुहास तिच्या पाठमोऱ्या आकृतिकडे बघत राहिला. मनात त्याच्याही आलं,

समृद्धी म्हणते ते खरं आहे... मी बोलतो घरी, काय म्हणतील, हो नाहीतर नाही... निकाल तर लागेल. करतो रजिस्टर लग्न.ही नाही तर काही नाही यार... हीच पाहिजे मला आता प्रत्येक क्षणाला... लव्ह यू समु...

त्याने गाडीला किकी मारली आणि तोही निघून गेला.

 

सगळे भाग इथे आहेत सिरीज

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...


Post a Comment

0 Comments