बॉयफ्रेंड...
समृद्धी, फाइल्स
लावत बसली होती. चार वाजले आणि कॅबिन मध्ये बॉसची एंट्री झाली. इथे सारेच बॉस वाटत
होते आतापर्यंत समृद्धीला. पण आता जो आला होता तो सर्वांचा बॉस होता. त्याला बघून
तिच्या अंगावर काटे आले होते, मनात वाटलं होतं, “ह्याला भेटण्यासाठी मी त्याच्या
कॅबीनच्या बाहेर बसून होते? मंजिरी मॅडमने बरं केलं मला इकडे बोलावून.”
ती मनात पुटपुटत होती तर समोरच्या
कुशलवर तिचं लक्ष गेलं, ती स्मित हसली, तसा तो म्हणला,
“बॉस आलेत,
तुला भेटायच होतं ना...”
समृद्धीने तिथेच काम करत
असलेल्या मंजिरीकडे बघितली, आणि काहीच बोलली नाही. मंजिरीजवळ पीवून आला,
“मॅडम,
साहेब आलेत.”
“हो दिसले ना... त्यांना
कॉफी घेऊन जा. मी येते.”
समृद्धी हळूच म्हणाली, “मॅडम….
“
तिला तसंच थांबवत, मंजिरीने
बॅग मधून लिपस्टिक आणि आरसा काढला,
ओठावर लिपस्टिक घट्ट केली, केस
आवरत ती म्हणाली, “काम कर,
काही भेटायची गरज नाही. तिकडे
जेवढं कमी भेटशील ना तेवढं तुझ्यासाठी उतमं. गुमान मान खाली टाकून काम करायचं.
अजून नवीन आहेस इथे... आणि जुनी होऊ नकोस एवढचं लक्षात ठेव.”
मंजिरी तिचा लॅपटॉप घेवून
कॅबीनमध्ये निघून गेली. ती जाताच रम्या तिकडे आली, “ही
ना अशीच आहे. हिला कुणाची प्रगती बघवत नाही. पण आपले बॉस त्यांच्या नजरेतून नाही
चुकायची तू. वाट बघ तुला ते स्वतः बोलावतील. आपण सगळे दिसतो त्यांना त्यांच्या
कॅबीनमधून. मोठा कॅमेरा आहे इकडे, तिकडे आपण टीव्हीवर दिसतो.”
समृद्धी हसली, “मी
समृद्धी.”
“मी रम्या,
इकडे दोन वर्ष झालीत मला इकडे. आता रुद्र सरांच्या खाली काम करते. रुद्र सर स्वभावाने छान
आहेत. पण ही नागीण जास्तच विषारी आहे. तेव्हा काळजी घे.”
रम्या बोलून निघून गेली.
समृद्धीला तिचं बोलणं पटलं होतं. मंजिरी खटकली होती पण तरीही तिच्याबद्दल तिला
काहीतरी मनातून वाटत होतं, जे शब्दात येणं अजूनतरी जमणार नव्हतं. तिच्या कामात
तिने वेळ घालवला. मोबाईलवर तिला सुहासचा मेसेज दिसला, “सब तयार है! कधी येतेस...”
नुसत्या त्या मेसेजने
तिच्या गालावर लाली पसरली होती. आता ह्या सुहासने असं का करावं ह्या विचारत यी
होती. तो ऑनलाईन असूनही तिने उत्तर दिलं नाही. त्याच्या विचारात तिला आजचा हा दिवस
कधी संपतो असे झाले होते.
सहा वाजले तरी कुणीही
आटपत नव्हतं. कुशल आणि रुद्र कॉफीसाठी निघून गेले होते. मंजिरी अजूनही बॉसच्या
कॅबीनमधून आली नव्हती. समृद्धीने सगळीकडे नजर टाकली. रम्याही जागेवर नव्हती.
बाकीच्या तिच्या कुणी ओळखीच्या नव्हत्या. आता निघायचं कसं हा प्रश्न तिला पडला
होता. बसची वेळ होत होती. हळूहळू ऑफिस
रिकामं होत चाललेलं. समृद्धी मात्र अजून लॅपटॉपमध्ये डोकं घालून काम करत बसलेली.
तर परत मोबाईलवर नोटीफीकेशन दिसलं, सुहास विचारात होता, “कधी येतेस...” आता ती
टाईप करणार तेवढ्यात मंजिरी बॉसच्या कॅबीनमधून बाहेर आली,समृद्धीने
भीतीने फोन लपवला. मंजिरी मात्र न थांबता तशीच सिगारेट पिण्यासाठी निघून गेली.
समृद्धीने तिचं आजचं काम केलं होतं. तिला निघायचं होतं पण विचारायचं कुणाला ह्यात
ती घुसमटली होती. तिला घरी जाण्याआधी सुहासला भेटायचं होतं.इकडे वेळ झाला तर त्याला भेटणे शक्य नव्हते. सुहासचे मेसेज वर
मेसेज येत होते. तो तिची नेहमीच्या टिकाणी वाट बघत होता.
मंजिरी सिगार ओढून तिच्या
जागेवर आली. तिला बघून खेकसली, “ऐ काम झालं का आजचं?”
“हो मॅडम...”
मंजिरी का कुणास ठाऊक लगेच शांत झाली, थोडं कडक पण हसून म्हणाली, “गुड! पण लक्षात ठेव, इथे काम कधीच संपत नाही. घरी जाणं विसरलीस, तर जगायला काही उरणार नाही. निघ तू आता, लवकर निघायचं, तसं इकडे घरी जाण्याचा काही वेळ नसतो, पण सवय लाव, काम करून लवकर निघायचं. उद्या तुला एम्प्लॉईज ग्रुपला टाकते, तिकडे रोज कामाचा तपशील, एन्ट्री आणि आउट टाकायचा, काम करायचं आणि निघायचं.”
मंजिरी बोलून परत बॉसच्या कॅबीनमध्ये गेली. समृद्धीने तिची बॅग आवरली आणि निघाली. तिला बाहेर निघायच कसं हेही कळत नव्हतं. पण कशीबशी एक्जिट सिंबोल बघत आणि सुहासला भेण्याच्या नादात लिफ्टपर्यंत आली, आणि लिफ्ट मधून रम्या बाहेर आली, “हे, निघते आहेस?”
“हो गं,
मला ना जरा काम आहे.”
“त्या नगिनने सोडलं का तुला?”
“जा म्हणाल्या त्या.”
“ओ..,
तशीच आहे ती. स्वतः थांबून बॉसला
इम्प्रेस करते. बरं, जा तू, तशीही तू नवीन आहेस. मला तर खूप प्रगती करायची
आहे. बाय.”
रम्या मिरवत निघून गेली.
समृद्धीला परत कसतरी वाटलं, पण तिला तिचा नौकरीच्या पहिल्या दिवसाची संध्या सुहाससोबत घालवायची होती. तसं
दोघांच आधीच ठरलं होतं.
ऑफिसमधला पहिला दिवस
संपला तरी समृद्धीच्या मनातले प्रश्न संपले नव्हते. थकलेली, दमलेली
ती सुहासकडे पोहचली.
सुहास, “समू
किती गं वेळ, आता जरा वेळ आली नसतीस ना तर वेडा झालो असतो मी.”
“नको ना रे असं म्हणू. मी आज वेडी झाले आहे.... तू
सुरु नको होऊ आता.”
“अरे... असं काय झालं...बर चल, निघूया.”
“कुठे?”
“अगं नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये, तू
पार्टी देतेस ना?”
“हो हो,
पण थकली रे मी.”
“चल आपली आवडती कॉफी घेऊ, मग
थकवा जातो तुझा.”
सुहासने गाडीची किक मारली, समृद्धी
बसली आणि जशी ती त्याला बिलगली,
सारं काही विसरली.
दोघेही शॉपमध्ये बसून
कॉफी पित होते, “समू,
कसा होता पहिला दिवस, जाम
मस्त फील होत आहे मला, तू यार... घोसला कंपनीत आहेस. मलाही तशीच कंपनी
उभी करायची आहे. माझं स्वप्न आहे समू.”
समृद्धीने त्याचा हात
धरला, “हो रे, करूया.”
“तू ना सगळं शिकून घे, मी
रेजिस्ट्रर करतो आहे आपली कंपनी. छोट मोठं काम आहे माझ्याकडे. सुरू करतो मी, पण
तू तुझा जम बसव तिकडे.”
“हुमम...”
“अरे घोसलाचे मालक आता राजकारणात पण आले यार, म्हणजे
सगळे सरकारी टेंडर तिकडे जाणार... ह्या मोठ्या लोकांच असच असते.”
“हुम्म...”
“मलाही मोठं व्हायच आहे. आपण कधी होणार गं...”
“हुम्म..”
“काय हे हुम्म हुम्म सुरू आहे तुझं. काय कसा होता
तुझा पहिला दिवस?”
“ऐ, ऐक ना,
आपण घरी कधी सांगायच?”
“सांगू या गं,
घाई काय त्यात. आता कुठे तू
जॉबला लागली. अजून माझा काही ठिकाणा नाही. मी अजूनही त्या साने बिल्डरच्या
हाताखाली काम करतोय. मला माझी कंपनी रजिस्टर करायची आहे. मग बघू....”
“अरे हो... पण वेळ जातोय ना.”
“जाऊ दे ना,
वेळ ओढून आणता येतो.”
“बघ,
मला ही नौकरी दादाने ओळखीने लावून दिली. त्यात त्याचा काहीतरी
उद्देश असणार. आता नाही बोलला तो पण बोलेले. मला माहित आहे. त्याचा मित्र आहे एक.”
“मग?”
“मग काय,
तुला समजत नाही.”
“मला फक्त तू समजतेस, आपण सोबत आहोत.”
“ते आहोत रे,
पण असं चोरून कधीपर्यंत?
“ऐ,
थांब ना आता जरा. करतोय ना मी.”
समृद्धीने त्याचा हात
पकडला, “सुहास,
मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार
नाही, समजलं.”
सुहास आणि समृद्धीचं नातं
पाच वर्षांचं झालं होतं. दोघं एकत्र होते,
पण घरात कुणालाच त्याची चाहूलही
नव्हती. सुहास घरचा मोठा मुलगा. लहान भावंडं,
आईवडिलांची अपेक्षा, आणि
आपल्या खांद्यावर पडलेली जवाबदारी ह्यामुळे तो कायम गंभीर, ध्येयवेडा
होता.
त्याउलट समृद्धी घरची धाकटी, लाडात वाढलेली, आयुष्याकडे हलक्याशा खेळकर नजरेने पाहणारी.
पण या भिन्न
स्वभावांमध्येच त्यांच्या नात्याचा गोडवा होता. सुहासचं मोठं होण्याचं, नाव
कमावण्याचं स्वप्न समृद्धीला स्वतःचं वाटायचं. त्याच्या प्रत्येक आकांक्षेत तिने
स्वतःची उमेद मिसळली होती. मात्र,
तिने स्वतःला त्यात वाहवत
द्यायचं नाही, ही एक जाणीव तिच्या मनात घट्ट होती.
त्याच्यावरचं प्रेम तिला डोळ्यांतून आणि छोट्या छोट्या गोष्टीतून सतत व्यक्त करायचं होतं, पण स्वतःची स्वतंत्र छटा टिकवून. बघूया कॉर्पोरेट जगात पाय ठेवल्यावर समृद्धी त्याचं स्वप्न खर करण्यासाठी जगते की स्वतःच्या अस्तित्वाला महत्व देत पुढे निघते...
© उर्मिला देवेन
0 Comments