“कॉर्पोरेट लॅडर….” लास्ट पार्ट


 संध्याकाळची वेळ होती. समृद्धीने तिची बॅग उचलली. पायऱ्या उतरतानाच तिला जाणवलं, आज परत काहीतरी नव्यानं सुरू झालं होतं.

मोबाईल हातात होता, पण कोणाला फोन करावा असं वाटत नव्हतं. मनात मंजिरीचा चेहरा फिरत होता… त्या डोळ्यातलं हरवलेपण, ते नकळत तुटलेलं हसू. तिला आठवत राहिलं. काय आहे ना... यशाचा क्षण अनेकदा एकटाच येतो… आणि त्या एकटेपणाचं ओझं समृद्धीला आज पहिल्यांदा स्पष्ट जाणवत होतं.

हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर ती थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. शनाया आता थोडी स्थिर आहे,” डॉक्टर म्हणाले, “पण अजूनही तिला भावनिक आधाराची खूप गरज आहे. तुमच्यासारखं कोणी तिच्या पाठीशी उभं राहणं खूप महत्वाचं आहे.”

समृद्धीने मान हलवली. ती शनायाच्या रूममध्ये गेली. खिडकीजवळ बसलेली शनाया शांतपणे बाहेर बघत होती. चेहरा अजूनही थोडा निर्विकार… पण डोळ्यांत पूर्वीपेक्षा थोडी जास्त जाणीव जाणवत होती...

आज उशीर झाला,” समृद्धी हळूच म्हणाली.

शनायाने तिच्याकडे पाहिलं… आणि हलकंसं हसली. तू व्यस्त असतेस… पण येतेस. ते पुरेसं आहे. तुझा आधार होता म्हणून आज मी निदान जिवंत आहे... ज्यांना जवळचं मानलं त्यांनी गरजेच्या वेळी पाठ फिरवली आणि तू...”

त्या एका वाक्याने समृद्धीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, आणि शनाया सुद्धा रडली. दोघी बराच वेळ शांत बसल्या. मग समृद्धी म्हणाली, आज मला नवीन जबाबदारी मिळाली… People-centric delivery.”

शनाया काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली.
तुला तीच मिळायला हवी होती. लोकांशी माणूस म्हणून वागणं… तू ते कधीच सोडलं नाहीस गं...इथून पुढे मी तुझ्यासारखं वागायचं ठरवलं आहे.”

“नाही गं तू तुझंपण सोडू नको पण कुणाशी वाईट वागू नको, एवढचं पुरेसे आहे. लवकर बरी हो, ऑफिस जॉईन करायचे आहे. तुझी आई सारखी विचारात असते मला. तू बरी झाली की आपण सोबत जाऊन येऊ तुझ्या गावी. आणि हा मी तुला माझ्या टीममध्ये घेणार आहे.”

शनायाने तिचे हात धरले, मिठी मारली. काही वेळात सुमितचा कॉल तिला आला, शनायाची नजर मोबाईलवर पडली, तशी ती बोलली, “सुमित घोसला?”

समृद्धीने स्मित हसत उत्तर दिले, “हो, सरांचा मुलगा....चल येते मी...”

समृद्धीने निघताना सुमितचा कॉल उचलला आणि ती बोलत निघाली. शनाया तिला बघत हळूच पुटपुटली, “हा राजकुमार तू डिझर्व करते समृद्धी. मी खूप आनंदी आहे तुझ्यासाठी. तू बोलली नाहीस पण तुझा चेहरा त्याचा कॉल उचलताना सारं काही मला सांगून गेला.”

समृद्धी हॉस्पिटलच्या आवारात सुमितशी बोलत होती, सुमित आता एअरपोर्टला होता आणि उद्या भारतात येणार होता. आणि उद्याच त्याला समृद्धीच्या भावाला भेटायचे होते. दोघांचा निर्णय पक्का होता. सुमितशी बोलून मोकळी झालेली समृद्धी तिच्या भावाकडे निघाली. वाटेत तिने भाऊ आणि वहिनीसाठी कपडे आणि अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या. दारात समृद्धीला बघताचा भावाचा राग कुठल्या कुठे पाळला होता. तिच्या आनंदात घर आनंदी होतं. सुमितचा विषय तिचे घरी काढला, वहिनीने साथ दिली आणि सारं कसं व्यवस्थित झालं. वहिनी तर रात्री बारा वाजेपासूनचं घर आवरायला लागली होती. काय नको काय नाही ह्याचं गणित तिचं सुरु झालं होतं, घोसला कंपनीचा भावी मालक घरी येणार होता समृद्धीसाठी. दादा आणि आणि वहिनी रात्री दोन वाजेपर्यंत घर आवरत होते, लहान मुलीने केलेला पसारा आणि घरच्या वस्तू आवरण्यात त्यांना काहीच भान राहिले नव्हते.

इकडे घोसला परिवारात आनंद होता, घोसला कंपनीचा वारस कंपनी हातात घेणार होता. आबासाहेबांनी जंगी पार्टी ठरवली होती. सर्व जवळच्या लोकांना आमंत्रण होते. त्यांना फक्त माहित होते की सुमितने समृद्धीला भावी बायको म्हणून निवडले आहे म्हणून. आणि त्यांच्या सांगण्यावरून सुमित आधी समृद्धीच्या घरी जाणार होता. आणि ही गोष्ट अजूनतरी माधव आणि प्रियाला माहित नव्हती. ते दोघेही मुलासाठी आनंदी होते आणि त्याला भेटण्यासाठी आतुर.

मंजिरी दुखावली होती पण तरीही तिला का कुणास ठाऊक समृद्धीसाठी बरे वाटत होते. तिचा तर भ्रम तुटला होता, समृद्धीने जी कॉर्पोरेट सीडी चढली होती ती तिने कधीच तिच्या नजरेतून बघितली नव्हती आणि यशाचा मार्ग असा असतो हे तिला समृद्धीने नकळत समजावून सांगितले होते. बियर पीत ती पार विचारात बुडाली होती.

---

शनिवार होता. समृद्धी तिच्या पाच वर्षांच्या भाचीसोबत खेळत जणू वेळच मोजत होती. वहिनीला तर आज काहीच भान नव्हतं, आणि दादाचा एक डोळा समृद्धीच्या त्या हळूच लाजणाऱ्या, सुमितच्या वाटेकडे लागलेल्या नजरेवर होता. मनोमन खुश असलेला तो आज घरात बायको म्हणेल ते सगळं काम निमूटपणे करत होता.

दुपारच्या जेवणानंतर समृद्धी सतत फोन पाहत होती; लॅपटॉपवर फ्लाईटचं स्टेटस पुन्हा पुन्हा तपासत होती. जशी सुमितची फ्लाईट लँड झाली, तशी ती तयार व्हायला लागली आणि वारंवार मोबाईलकडे पाहत राहिली.

तसा फोन वाजला, मी निघते एवढं बोलून ती निघाली. एक तासात सुमित तिच्या घरी आला, दादा वहिनीशी भेटला आणि मग हळूच म्हणाला, “मला समृद्धीशी लग्न करायचे आहे आणि मला त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे.”

एवढ्या वेळचे दादा ह्याच शब्दांची वाट बघत होते, त्यांच्या डोळ्यात पाणी होते पण गोठले होते, नुसत्या मानेने होकार देत त्यांनी समृद्धीचा हात सुमितच्या हातात दिला. आणि समृद्धीला काय हवं होतं. सुमितच्या आग्रहाने दादा नी वहिनी घोसला प्लेसच्या पार्टीत जायला तयार झाले होते.

इकडे घोसला प्लेसला वर्दळ वाढली होती. आणि सारेच सुमितची वाट बघत होते. सुमित समृद्धीला सोबत घेऊन आत शिरला, तसे सगळे चकित झाले. माधव समृद्धीला बघून सुखावला पण ती सुमितसोबत कशी ह्याचे क्षणभर त्याला आश्चर्य वाटले. समोर जाऊन त्याने स्वागत केले पण प्रश्न तसाच मनात राहिला. सुमितने समृद्धीच्या दादा वाहिनीचा सुद्धा परिचय करून दिला. आता सगळ्यांच्या मनात प्रश्न होते. आणि आबासाहेबांनी घोषणा केली, सर्वांचे आजच्या पार्टीत स्वागत आहे, विशेष म्हणजे समृद्धीच्या दादा आणि वहिनीचे, मी त्याच्या घोसला परिवारात स्वागत करतो. आता मात्र माधव आणि प्रियाला राहवले नाही, ते आबासाहेबांच्या जवळ आले, आणि तसे ते आनंदाने म्हणले, माधवा, आपल्या सुमितने समृद्धीला पसंत केले आहे बायको म्हणून आणि मला खात्री आहे तुम्हा दोघांना समृद्धी पसंत आहे.

माधव क्षणभर समृद्धीकडे बघत राहिला, कधी तो तिच्याकडे बघत होता तर कधी सुमित कडे, तशी प्रिया बोलली, “तर हे कारण आहे तुझं भारतात शिफ्ट होण्याचं... तेव्हाच मी आणि माधव विचार करत राहिलो की कधीच भारतात न येण्याचं बोलणारा तू कसा काय यायला आणि कंपनीत काम करायला तयार झाला.”

तशी प्रिया समृद्धीच्या नजीक आली, “आणि तू कधी बोलली नाहीस गं, काय? नाही मला तू पसंत आहेस पण असं काही होऊ शकते ह्याचा मात्र अंदाज नव्हता.”

माधव आबासाहेबांच्या नजीक आला, “आबा तुम्हाला कसे माहित झाले आणि हे सर्व म्हणून घडवून आणलं का?’

“अरे मग, तू नुसता सुमितशी बोलतो पण मी त्याच्या मनातलं सहज बाहेर काढलं... अरे आपला सुमित प्रेमात पडला आहे समृद्धीच्या... आणि हे मागच्या सहा महिन्यापासून जोरात सुरु आहे....पण कौतुक आहे ह्या समृद्धीचं तिच्या वागण्या बोलण्यात कधीचं जाणवलं नाही आणि म्हणून मी होकार दिला सुमितला. हे दोघं भविष्य आहेत घोसला कंपनीचं.”

“आणि प्रिया तुला तोड आहे सुनबाई तुझी... काय आणा ते पारंपारिक कंगण आणि द्या सुनबाईला.”

समृद्धीला हे सारं अजूनही खरं वाटत नव्हतं. तसा तिचं हात धरून उभा असलेल्या सुमितने तिला चिमटा काढला आणि हळूच म्हणाला, काय करून दाखवलं ना... आता बघतो कशी नाही म्हणतेस ते.”

समृद्धी लाजत सगळ्यांच्या नजरा चुकवत म्हणाली, “तुला कधी नाही बोलले का मी... मी पण बघते ना तुला.”

पार्टीत घडलेला सुखद धक्का आता सर्वाना आनंद देत होता आणि वाऱ्याच्या वेगाने सर्व स्टाफ पर्यंत पोहचला.

मंजिरी पार्टीसाठी निघणार होती तोच तिला कुशलला फोन आला आणि सगळा प्रकार समजला. आनंद होता की स्वतःच्या अपयशाचे शिखर...  ती रडायला लागली होती.... ती जे मिळवू शकली नव्हती ते समृद्धीच्या वाटेला समोरून चालत आले होते. एका सामान्य घरच्या मुलीला घोसला परिवाराने सून म्हणून स्वीकारले मग नक्कीच समृद्धीत काहीतरी असणार हे मानायला आता मंजिरी तयार होती. निशिबावर विश्वास तिचा नव्हता आणि समृद्धीला तिने समोर घडतांना बघितले होते. शांत झाली आणि तिने केलेल्या आयुष्यातील चुका आता मान्य केल्या तिने. समृद्धीसाठी आनंदी होती.

तो दिवस घोसला ग्रुपसाठी खूप आनंदाचा आणि भाग्याचा होता. सुमित आणि समृद्धीचे लग्न पुढल्या महिन्यात ठरले होते. दोन्हीकडे लग्नाची तयारी सुरु होती आणि सुमित समृद्धी कंपनी वाढण्यासाठी प्लानिंग करत आयुष्याशी प्लानिंग करत होते. दोघेही प्रक्टिकल विचार करत होते मग विचारांना दुमत असले तरीही आदर होता. आणि हीच त्यांच्या नात्यातील पक्की साखळी होती.

घोसला कंपनीचा स्टाफ ते मालकीण हा प्रवास खूप साधा नव्हता, आणि ठरवलेला नव्हता फक्त समोर येणाऱ्या आवाहनांना समोर जात तिच्या पुढे आला होता. त्याची जाणीव तिला होती. हे सगळं तिच्या  मेहनत, संघर्ष आणि मूल्यांचं फळ होतं आणि पुढेही सारं टिकवून राहण्यासाठी हेच महत्वाच आहे हे समृद्धीला माहित होतं.

लवकरच नवीन नाती आणि जबाबदारी सारं काही हातात घेताना तिने आता मंजिरीची जबाबदारीही घेतली होती. लोकांसाठी मंजिरीवर पाय ठेवून समृद्धीने ही कॉपोर्रेट सीडी चढली असली तरी तिच्यासाठी मंजिरी तिची गुरु होती... एवढंच!!

© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो by AI

Post a Comment

0 Comments