उंबरा... भाग २
पहिला भाग- उंबरा भाग १
"मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे..."
गंगा सुर लावून गात होती.... आणि त्याच्या हातून ग्लास खाली पडला. तशी ती दचकली आणि थांबली, सावरत म्हणाली, “साहेब, काय झालं? लागलं तर नाही ना तुम्हाला...”
ती पडलेला ग्लास उचलायला पुढे आली आणि तुकडे उचलू लागली, हसत म्हणाली, “साहेब ह्याचे जास्तीचे पैसे पडतील बरका!”
तो उभाच झाला, “कोण आहेस तू?”
ती हसली, “मी! मी गंगा... गंगा बाई! का? अम्मा बोलली नाही माझं नावं... ह्या गल्लीत एकचं गंगा वाहते... जी तुमच्यासारख्या साऱ्यांना पुरून उरते...” ती मिश्कील हसत राहिली.
तो अजूनही भानावर नव्हता, जीभ वळत नव्हती त्याची तरीही तुटक शब्द फुटले, “तू गाणं परत गा... मला हा आवाज ओळखीचा वाटतो आहे.”
“काय साहेब मी काय आशा भोसलेजी नाही हो, बेसुरी हु मै... माझा कुठला आवाज हो... असचं आज मनात आलं अन् ओठांवर बसलं. आपलं काय जे आलं मनात ते ओठात. काय बोलता? मनात काही वेगळं आणि ओठांवर वेगळं जमलं असतं तर इथं असते?”
तो परत भीत भीत त्याच्याच तंद्रीत बोलला, “नाही... मला माहित आहेस तू.... तू...”
पण त्याचे शब्द जणू परत उंबरठ्यावर येऊन थांबले होते.
आता तिलाही त्याचा आवाज कुठेतरी ऐकल्या सारखा वाटला, आणि जरा गरगरलं तिला, सारं कसं क्षणात धूसर झालं, तिने भिंतीला हात टेकले. मग मंद हसली, जरा कुजबुजली, “साला आज एक पेग चढला मला! नाही त तीन चार पेग गटकुनही पूर्ण होश असतो. अन् बेहोष सालं दहा बारांना तर करते मी ..”
ती बाटलीचं लेबल बघत रमली. नजरा चुकवत राहिली. तो तिला अजूनही टक लावून बघत होता. ती जरा गडबडली. तिच्यासाठी तो गिर्हाईक होता, तोही जास्त पैसे देऊन आलेला, मग जरा बेफिकीर म्हणाली, “असं पाहू नको ना साहेब, गाते ना साहेब, पण पैसे लागतील जास्तीचे...” आता जरा अजूनच नाटकी हसली ती. आणि तिने गाणं परत गायला सुरुवात केली...
“मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे…” आता मात्र तिच्या त्या सुरात 'ती' शिरली होती. आवाजात आता ओल मिसळली होती. अलगद गाणं गाताना तिच्या सागरी नयनाच्या किनारीवर पाणी दाटलं. शेवटची काच ती उचलत होती आणि शब्द कानावर पडले...
“गिरू!!!”
आणि तिच्या बोटांना ती काच टोचली. डोळ्यांच्या किनार्यावरच्या लाटेने अचानक जोर धरला आणि अश्रु क्षणात ओघळायला लागले, तिने त्याला बघितलं, बघत राहिली. खोलीत पिवळा उजेड असूनही अंधार झाला होता. तो समोर उभा... नजरेत अनेक प्रश्न आणि ती गंगाबाई!
तो हताश खाली बसला, “गिरजा? गिरू...”
तिने डोळे पुसले, त्याला नीट बघितलं, उठली, चेहरा हातांनी लपवून कोपऱ्यात जरा वेळ उभी राहिली. बोटातून निघणाऱ्या रक्ताने चेहरा जरा रंगला होता. थरथर कापत होती. तो उठून जवळ गेला, तिच्या थरथरत्या उजव्या हातावर बांधलेली तोरडी त्याला दिसली आणि तो हतबल पलंगावर नि:शब्द बसला... जरा वेळ विलक्षण शांतता होती खोलीत, तिने मनाला घट्ट केलं, हळूच म्हणाली,
“साहेब चुकीचा उंबरा ओलांडला आज तुमी, जा साहेब तुमी, मी अम्माला बोलून रक्कम परत करायला सांगेन... जा तुमी इथून.”
“अगं पण गिरजा, तू इथे कशी?”
“जाऊ द्या ना रमाकांतराव साहेब, नका आठवायला लावू त्या नको असलेल्या आठवणी. कवाच माती टाकली मी. झालं गेलं ह्या गंगेला मिळालं. आपण जा माझ्या खोलीतून.”
“अगं पण तू तर...लग्न!”
“साहेब निघा आपण... काय माझ्या सारख्या धंदेवालीच्या नादी लागता, मी सगळं विसरली आहे, आता तर मलाच माझी आठवत येत नाही. जा तुमी साहेब.”
तो अजूनही तसाच बसून होता. तिने दार उघडलं, आणि जरा रागात म्हणाली, “साहेब निघा बोलली मी. माझे पण काही वसूल आहेत. नाय करायचं काही मला. मला मचमच नको आता...”
तो दाराजवळ आला. तिच्या आवाजाने आजूबाजूच्या बायकाही डोकावायला लागल्या, ती सल्लूला आवाज देणार तोच त्याने दार लावलं, ती अलगद मागे सरकली आणि भिंतीला टेकली, श्वास विस्कटलेला पण नजर अजूनही त्याच्या नजरेत. तो जवळ आला, इतका जवळ की त्याच्या श्वासाची उब तिच्या वाफाळलेल्या चेहऱ्याला जाणवू लागली होती. ती त्याला धक्का देणार तोच त्याने भिंतीवर हात ठेवून तिला बाहुत कैद केलं. दोघांचे हृदय जसे धावत होते. आता मात्र तिने डोळे गच्च मिटले. जणू तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं होतं. तसा तो हळूच बोलला,
“गिरजा, सतरा वर्षानंतर तू समोर आली आहेस माझ्या. आणि ही अशी?”
तिने डोळे उघडले, नजर पुन्हा भिडवली, “नशीब माझं!! जग लहान आहे रमा! बघ बोलले होते मी तुला.”
अचानक तिने परत स्वतःला सावरलं. जसा भूतकाळ तिने मुद्दाम पुसला. त्याने हताश परत प्रश्न केला, “ तू इथे आली कशी? हे काय आहे गिरु? मी काय बघत आहे गं?”
“जाऊ द्या हो साहेब, जे बघत आहात तेच खरं समजा आता.”
“म्हणजे काय गिरु?”
“काय बोलणार... न बरी होणारी जखम आहे ही, कशाला विचारून खपली खरवडता! त्याची ठणक तुम्हाला कुठे जाणवायची. आता हीच जखम मला ह्या आयुष्याच्या जखमेतून मुक्त करेल.”
“गिरू काय बोलत आहेस गं तू!”
“नका घेऊ ते नाव त्रास होतो मला, इथे मला गंगा म्हणतात सारे. गंगा बाई आहे मी.”
ती त्याच्याकडे बघत होती आणि आजवर घडलेला प्रकार तिच्या नजरेसमोर चित्रपटासारखा धावू लावला.
गिरजा नुकतीच बारावी पास झाली होती आणि रमाकांतने त्याची पदवी पूर्ण केली होती, तिच्या घराच्या शेजारी तो शिक्षणासाठी भाड्याने राहत असायचा. वडीलांना तिच्या लग्नाची घाई होती आणि योगायोगाने स्थळ चांगलं आलं होतं तिच्यासाठी. सारं कसं ठरलं आणि दोन महिन्यावर लग्न येऊन ठेपलं. वडिलांची तयारी जोमात होती, पत्रिका, खरेदी सुरु झाली होती.
तिला भीती वाटली की वडील तिचं ऐकणार नाही आणि तिने घराचा उंबरा ओलांडला, त्याला भेटायला गेली.
“रमा, मला त्या मुलाशी लग्न करायचे नाही आहे, आपण लग्न करू आणि बाबा समोर जाऊ, मग जे होईल ते बघू.”
“अगं काय बोलतेस तू, मारून टाकतील तुझ्या गावाचे लोकं आपल्याला.”
“मारू दे ना, सोबत मरू मग...”
“तुला खात्री आहे आपल्याला सोबत मारतील ते, नाही ना...”
आता मात्र गिरजा घाबरली. रमाकांतला बाबा जिवंत सोडणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. आणि दोघांनी पळून जाण्याच्या निर्णय घेतला. गिराजाने घरचे काही दागिने आणि रक्कम सोबत घेतली. रात्री ते दोघेही रेल्वे स्थानकावर भेटले आणि भेटेल त्या रेल्वेने निघाले. दूर गाडी कुठेतरी मुंबईच्या जवळ येऊन पोहचली असे त्यांना वाटले तेव्हा ते दोघे उतरले.
एकमेकांच्या आधाराने दिवस काढला, लोकांच्या नजरा वाचवण्यासाठी गिरजाने मंगळसूत्र विकत घेतलं आणि गळ्यात घातलं. गिरजाला विश्वास होता रामाकंतवर, ती त्याला बोलली, “रमा असं किती दिवस आपण पळत राहणार, आपण जाऊया तुझ्या घरी, तुझी आई तुझं ऐकते म्हणतोस ना?”
“अगं हो, म्हणूनच हिंमत केली ना आपण. जाऊया, पण जरा हा दबदबा शांत होऊ दे”
“लवकर जाऊ ना. असे फिरत राहिलो तर आपण पोलिसांना नक्की भेटू... जग लहान आहे रमा...”
रमाकांतने तिला घेऊन त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. तसा तो श्रीमंत घरचा एकुलता एक मुलगा होता. जळगावात केळीच्या बागा होत्या त्याच्या वडीलांच्या. गिरजा त्याच्या सोबत असल्याने घरी पोलीस पोहचतील हे त्याच्या लक्षात होते. मामला जरा स्थिरावला की तो गिरजाला घेऊन गावी जाणार होता. एक महिना ते मुंबईच्या भागात हॉटेल बदलत राहिले...
पुढील भाग लवकरच पेजवर....
धन्यवाद !! कथा कशी वाटली नक्की कळवा!
लेखाच्या/कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

0 Comments