द कॉर्पोरेट लॅडर.... लीडरशिप ---

 द कॉर्पोरेट लॅडर.... लीडरशिप --- भाग २१.



माधव निघून गेल्यावर काही क्षण मंजिरी तशीच खुर्चीत बसून राहिली. कॅबिनमध्ये एसीचा आवाज होता, पण आत कुठेतरी एक बोचरी शांतता भरून राहिली होती. काचेत उमटलेलं तिचंच प्रतिबिंब तिला अनोळखी वाटत होतं. इतकी वर्षं स्वतःला कंपनी म्हणून ओळखणारी ती आज पहिल्यांदाच स्वतःला एकटी पाहत होती.
तिने टेबलावर ठेवलेली फाइल उघडली, पण अक्षरं दिसेना. “मॅनेजमेंट रिस्ट्रक्चर” हे शब्द डोक्यात घुमत राहिले. हा बदल बाहेरून अचानक वाटत असला, तरी आत कुठेतरी तो बराच काळ शिजत होता… आणि आपण ते ओळखलंच नाही, ही जाणीव तिला जास्त बोचत होती. माधववर हक्क दाखवणं कदाचित तिला महाग पडलं हेच तिला वाटत होतं. तो समृद्धीला तिच्याजागेवर बघत आहे आणि तसा तयार करत आहे हे ती एवढे वर्ष बघू शकली नाही ह्याचे तिला वाईट वाटत होते. माधवला आपण आपल्या नजरेतून बघत राहिलो पण तो किती पुढचा विचार करत पुढे निघून गेला होता हे समजायला खूप वेळ झाला होता... माधवने तिची जवाबदारी कधीच नाकारली नव्हती पण... हा ‘पण’ मंजिरीने ओळखला नव्हता.
समृद्धीला देखील एक मेल मिळाला, “Please join the Management Round Table Discussion - 6:30 PM.”
तिने स्क्रीनकडे पाहिलं. माझ्यासारख्या असोसिएटला राऊंड टेबल? तिला क्षणभर विश्वास बसला नाही.
माधवने तिला मेसेज केला, “Congratulations. Just be you.”
मिटिंगच्या आधी अचानाक मंजिरी तिच्या डेस्कजवळ आली. खूप दिवसांनी दोघींमध्ये असा शांत सामना झाला.
“समृद्धी, जरा बोलू शकतेस?” तिचा आवाज पहिल्यांदा कोमल, न थंड, न कठोर वाटला समृद्धीला.
समृद्धी उभी राहिली. “हो मॅडम.”
दोघी कॅफेटेरियाच्या एका कोपऱ्यात बसल्या, जिथे काचेच्या भिंतीतून शहराची संध्याकाळ बघत होत्या होती.
क्षणभर शांतता. मग मंजिरी म्हणाली, मावळता सूर्य आहे हा.... बघ अंधार पसरत आहे... संपलं त्याचं आजचं साम्राज्य ह्या वेळी कुणी सूर्याला नमस्कार करत नाही... पण तो उद्या परत नवीन रुपात उगवणार आणि मग सारेच त्या उगवत्या सूर्याला नमस्कार करतील.... माझा सूर्य मावळला समृद्धी... तू जिंकलीस. आणि मी हरले.”
ते ऐकून समृद्धी चकित झाली.
“मॅडम… असं का म्हणता?”
“कारण तू ते साध्य केलंस जे माझ्यापासून निसटत गेलं.... लोकांना जोडणं. त्यांना विश्वास देणं. त्यांच्याबरोबर चालणं.”
समृद्धी काही बोलली नाही. मंजिरी पुढे म्हणाली, “हे सारं मी तुला उघडपणे अडवून केलं नाहीये. पण… हो, तुला बाजूला करायचा प्रयत्न केला. कारण माझ्या मनात भीती होती. माझं स्थान गेलं तर? माझी ओळख? माझं वर्षानुवर्षांचं श्रम… त्यावर तुमची पिढी सरळ येऊन उभी राहिली तर…? मी हरवले होते मी पणात... तुझ्यात मी मला बघत होते अगदी पहिल्या दिवसापासून... पण तू मी नाहीस हेच विसरले..."
तिच्या डोळ्यात ओलावा चमकत होता. “तू मला कधी शत्रू मानलं का गं?”
समृद्धीने शांतपणे मान हलवली.
“नाही मॅडम. फक्त… तुम्ही मला एक गोष्ट शिकवली, या जगात टिकायचं असेल तर स्वतःला गमावता कामा नये. कारण स्वतःला गमवून आपण काही काळ कदाचित मिळालेलं सारं काही अनुभवू शकतो पण ते टिकून राहत नाही... माझ्या लक्षात आले होते तुम्ही मला आणि माधव सरांना काही वेगळ्या नजरेने बघत होत्या... पण माझी मला खात्री होती... मला तेसे करायचे नव्हते... उलट मी त्यांना वरिष्ठ मानायचे, काळजी घ्यायची त्यांची.... आणि कुठल्या क्षणी त्यांना मी मुलीसारखी झाले हे मी ओळखूही शकले नाही.... अर्थात त्यांच्या मनात काय असेल हे त्यांना ठाऊक... पण तेही तुम्ही ज्या नजरेने बघता तसे कदाचित नाहीत हे मी ओळखले होते.... कदाचित माझी परीक्षा होती ती... त्यांनी घेतलेली...”
मंजिरी हळूच हसली, पहिल्यांदा खऱ्या अर्थाने.
“आत्ता काय वाटतं तुला?” तीने दीर्घ श्वास घेत विचारले.
समृद्धी बाल्कनीकडे पाहत म्हणाली,
“की हा क्षण मी कमावला. पण हा प्रवास मी एकटीने नाही केला… तुम्ही आणि माधव सर…दोघांनी मला वेगवेगळ्या प्रकारे घडवलं आहे. हे कॉर्पोरेट जग कठीण आहे... इथे रोज स्वतःला सिद्ध करावे लागते. आपल्यावर काहीच येऊ द्यावे लागत नाही... माझ्या कोर्ट मध्ये बॉल नको हीच भूमिका असते इकडे... ती मी तुमच्या दोघांमुळे शिकले.”
मंजिरी जरा हसली, “माधव… तो तुला…”
समृद्धीने गोड शांततेने उत्तर दिलं, “ मॅडम. ते माझ्यावर विश्वास ठेवतात. आणि त्यांची गरज आहे मला... बॉस म्हणून, मार्गदर्शक म्हणून… आणि कदाचित आता आयुष्यभर असेल.”
मंजिरी अवघडली, कदाचित ह्या शब्दात गुंतली पण तरीही आज ती बाहेर आली कारण समृद्धीच्या शांततेत मंजिरीला एक वेगळं उत्तर मिळालं, तिच्यात जळण नव्हती, हाव नव्हती.... पारदर्शकता होती... नवीन पिढी म्हणून माधवचं तिला बघणं योग्य होतं असं तिला वाटत होतं.
६:३० वाजता मॅनेजमेंट राऊंड टेबल सुरू झाली. समृद्धी आत गेली तेव्हा सगळे वरिष्ठ सदस्य उभे झाले.
तिला पाहताच माधव म्हणाला, “Welcome to the next chapter of Ghosla Industries.”
आणि त्या क्षणी मंजिरी दरवाज्यात उभी राहिली. माधवने तिचेही स्वागत केले... कदाचित हा चढता आणि उतरता योग होता... आणि सारेच उभे होऊन टाळ्या देत होते.
समृद्धीच्या पावलांत एक कंपन उठले. तिच्या मागे वर्षानुवर्षांचे संघर्ष, ब्रेकअप, अपमान, बर्नआउट, ओवरटाईम, डेडलाईन्स, आणि त्या सर्वांच्या उजेडात तिने स्वतःला जपलेलं मन.
ती बसली तेव्हा तिच्या आतून एक वाक्य घुमत होतं, “मी मंजिरी नाही… पण तिच्याकडून शिकलेली समृद्धी आहे.”
समृद्धीने दीर्घ श्वास घेतला. तिने मंजिरीकडे पाहिलं. तिला अचानक ती खूप थकलेली वाटली. आज पहिल्यांदाच समृद्धीच्या मनात मंजिरीबद्दल करुणा जास्त होती.
माधवने थेट मुद्द्यावर येत सुरुवात केली.
“घोसला कंपनी पुढच्या टप्प्यात जात आहे. नवी स्ट्रॅटेजी, नवं लीडरशिप मॉडेल… आणि त्यासाठी काही बदल अपरिहार्य आहेत.”
मंजिरीच्या बोटांनी टेबलचा कडा घट्ट पकडला. तिच्याकडे बघत माधव म्हणाला, “Operational leadership आता दोन भागांत विभागणार आहोत,” तो पुढे म्हणाले. “Execution आणि People-centric delivery. Execution साठी सुमित, आणि People-centric delivery साठी… समृद्धी.”
समृद्धी एकदम चकाकली, सुमित तिला काहीच बोलला नाही हे तिच्या लक्षात आलं. पण सुमित भारतात येण्याचे हे एक कारण तिला समजले होते. तरीही क्षणभर खोलीत सारे शब्दच थांबले. समृद्धीला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. People-centric delivery... जिथे टीम, संवाद, विश्वास, आणि व्यवस्थापन येतं… ते तिच्याकडे? क्षणात समृद्धीच्या मनात विचार शिरला, “ ह्याने सरांना सांगितले की काय, पण हा तर सांगणार होता, आणि आता तर झोपला असेल... नाही माधव सरांना अजून तरी काही माहित नाहीच.”
माधवने पुढे बोलायला सुरुवात केली,
“मंजिरी, तुझा अनुभव अमूल्य आहे. पण आता तुझी भूमिका बदलेल. तू Strategic Advisory Board वर राहशील.”
मंजिरीने मनात नसूनही हसून प्रतिसाद दिला. मिटिंग संपली, पण कुणाच्याच मनात ठोस शेवट नव्हता. माधव लगेच घरी निघून गेला.
बाहेर पडताना समृद्धीजवळ मंजिरी आली.
“अभिनंदन,” ती म्हणाली. आवाज स्थिर होता, पण आत काहीतरी तुटल्याचा हलका आवाज समृद्धीला ऐकू आला.
“मॅडम…” समृद्धी काहीतरी बोलणार, तोच मंजिरीने हात वर केला.
“आता काही नाही गं. मला काहीच ऐकायचं नाही आता.”
ती निघून गेली. समृद्धी तिथेच उभी राहिली. आनंद होता, पण तो भारलेला होता. यशाच्या पायरीवर उभं राहिल्यावर खाली पाहिलं की कळतं... कोण कोण मागे राहिलंय.
समृद्धी निघण्याची तयारी करत होती तर मोबाईलवर नोटीफिकेशन आलं, शनायाला भेटायला जायचा दिवस होता आज...
समृद्धीला आज दादाकडे जायचे होते पण आता तिला शनाया भेटायला जाणे जास्त गरजेचे वाटले.
त्या नोटीफीकेशकडे बघत तिला ती सकाळ आठवली, त्या दिवशी नेहमीप्रमाणे समृद्धी सकाळी लवकर पोहोचली होती आणि आल्या आल्या ती वाशरूम मध्ये गेलेली. तिकडे शनाया तिला पडून दिसली होती. तिने तबडतोब अम्बुलांस बोलावून तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. पोलीस आलेली आणि सारं कसं काहीतरी वेगळं झालं होतं.
कुणाला काहीच माहित नव्हतं शनायासोबत काय झालं ते पण तिची अवस्था बघून सगळे जाणून होते काय झालं असेल ते. आधी तर मंजिरीने माधववर संशय घेतला होता पण त्याच्याशी बोलण्यातून तिला समजलं होतं की तो त्या दिवशी प्रियासोबत बाहेर होता.
पोलीस चौकशी झाली, कसून तपास झाला. आणि मग समृद्धीच्या लक्षात आले की बिपाशाने शनायाला नवीन प्रोजेक्टसाठी क्लायंटकडे पाठवले होते आणि शनाया प्रमोशनच्या नादात तिकडे पोहोचली होती. जे झाले ते मर्जीने झाले होते पण त्यानंतर त्या क्लायंटकडून मागणी वाढत होती आणि शनाया ती पूर्ण करू शकणार नव्हती, जेव्हा तिने ह्याला नकार दिला तेव्हा तिच्यावर जबरदस्ती झाली आणि हॉटेलवर त्याचं दिवशी धाड पडल्याने तिला अर्धनग्न अवस्थेत गुंगीचे औषध देऊन काही लोकांनी मोठ्या चतुराईने घोसला कंपनीच्या वाशरूम मध्ये आणून फेकले होते. हा प्रकार एवढा किळसवाणा होता की सारे हादरले होते आणि शनायाच्या मेंदूवर परिणाम झाला होता. त्यात तिची आई आधीच आजारी आणि गावी राहत असायची, तिला हे कळू नये ह्यासाठी समृद्धीने तिच्या आईची काळजी घेणं आणि वेळेत तिला महिन्याला खर्चाची रक्कम पाठवणं सुरूच ठेवलं होतं. त्या प्रकरणामुळे लपून असलेले माधव आणि मंजिरीचे संबंध उघड झाले होते. मिडियाने घोसला कंपनीला नावे ठेवण्यात काही कसर सोडली नव्हती. शेअर घरसले होते आणि बदनामी झाली होती. त्या प्रसंगात समृद्धीने घोसला कंपनीत अंतर्गत अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि काम सुरु राहिलं... हळहळू सारं स्थिरावलं. गुन्हेगार कायाद्याच्या मदतीनेच मोकळे झाले आणि... आता काही महिन्याआधी शनाया जरा बरी झाली होती, म्हणून आज समृद्धी डॉक्टरशी बोलायला जाणार होती.
शनायासाठी जो समृद्धीने लढा दिला होता हो सर्व स्टाफला माहित होता. त्यांनी तो नजरेने बघितला होता. तिच्या लीडरशिपमुळे सारं कसं स्थिरावलं होतं आणि आपसूकच स्टाफचा समृद्धीवर विश्वास वाढत राहिला, आणि मंजिरी टीकेचा विषय बनत गेली.
मधल्या काळात ऑफिसमध्ये दोन स्त्रियांमधली कोल्ड वॉर सुरू होती... पद्धती वेगळ्या, परिणाम वेगळे.
आणि आज… त्याचा निकाल लागला होता.
@followers @topfans पुढचा भाग लवकरच पेजवर....
आधीचे सगळे भाग पेजवर आणि साईटवर आहेत!
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI

Post a Comment

0 Comments