उंबरा....



“अबे मचमच मत कर यार... निकल अब, झालं न बे, जास्त वेळेचे पैसे जास्त घेते मी.”
“ए माज नको करू, तू नाही त दुसरी... माज दाखवू नको.”
“अबे जा बे, हे जाऊन सांग ना बायकोले, असल हिंमत त, मोठा आला, मी जे करतो ना ते साऱ्या नगरीत माहित आहे. तुझ्या सारखी चोरून करत नाही. चल निघ बे उंबर्याच्या बाहेर. दुसरा लाईनमध्ये आहे.”
तो बडबडत निघून गेला. तिचा पाय उंबर्याला लागला आणि ती थबकली, दार जोरात लावलं, जुन्याच जखमेवर परत मार लागला. झिजलेला उंबराही हलला, जरा पुटपुटली, “साला आपला पण असाच आहे, धक्के रोज लागतात, आतून हलून जाते मी पण जागची हलत नाही. जाऊ दे मरू दे.”
तिने पलंगावर पडलेला गजरा परत केंसांवर माळला. टेबलावरून लिपस्टिक उचलली, गुणगुणत ती लाल भडक लिपस्टिक ओठांवर लावली, ओठाचं चुंबन घेतलं. केसांच्या गालावर बटा नीट करत तिने स्वत:ला चुंबन दिलं. साडीचा पदर टाचत तिने परत जोरात आवाज दिला,

“सल्लू मिया गिऱ्हाईक भिजो अंदर...”
गंगा नाव तीचं, गव्हाळ रंग, रूप साधं, पण तयार झाली की तिच्या त्याच रूपाचे दिवाने तिला बघायला दिवे लागले की अंधाऱ्या नगरीत दिवे घेऊन गर्दी करायचे. अम्मा तिला गल्लीची रौनक म्हणायची. तिच्यासाठी सेठ, साहेब आणि सावकार सदा मोठी रक्कम अम्माच्या गल्ल्यात टाकायचे. तिचा जलवा असा होता की तिच्यासमोर गोरीपान अप्सराही मागे. तिच्या नयनांच्या सागरात आजवर अनेक डुबकी मारायला तिचा उंबराची साल काढत असत.
गंगाचा पदर टाचून झाला होता, अजूनही तिच्या उंबर्यावर कुणाची चाहुल नव्हती. ती पलंगावर पाय पसरून बसली. थकली होती, येणारं गिर्हाईक आजचा तिचा शेवटचा होता. झोप डोळ्यात होती तिच्या, कंटाळून चोळीतून बाहेर डोकावणारे थान तिने चोळीत टाकले आणि जोरात परत आवाज दिला,

“अबे सल्लू मर गया क्या, भेज बोली ना. नाही तर झोपते मी. अम्मा को बता देणा.”
आता ती गजरा काढून फेकणार तोच तिला दाराच्या फटीतून उंबर्या बाहेर हालचाल दिसली. तिने स्वत:ला आवरलं.
डोळे मोठे करत तिने गोल फिरवले आणि झोपेला पळवून लावलं, ती दारावर आली, दार उघडलं, समोर एक प्रौढ पुरुष उभा होता, तिने भाषा बदलली,
“या साहेब.”

ते आत आले. तिने पलंगावर बसण्याचा इशारा केला. लगेच तिने साडीचा पदर काढून फेकला, ती पुढे येत होती, तिला वाटलं होतं वयाचा पुरुष दिसतोय तिलाच काय ते पहल करावी लागले. ते तिला रोखून बघत होते, ती जशी जवळ आली तिला त्यांनी अंगावर ओढलं आणि कचा-कचा खायला सुरुवात केली. सवय होती तिला ह्या सर्व गोष्टीची पण आज थकली होती, शरीर साथ देत नव्हत पण तरीही ती त्या पुरुषाला साद देत होती. त्याचं ते खोलीतलं राक्षसी रूप बघून पुरुषत्वावर मनातच हसत होती आणि त्यालाच तिच्या हसण्यावर फसवत होती. आता त्याने तिच्या टांगा ओढल्या आणि तिने त्याला त्याच्या स्वाधीन केले.
त्याने उरकलं, कपडे केले, तिच्या अंगावर परत हजार रुपये फेकले. जास्तीचे पैसे बघून नुसता तिने चेहर्यावर आनंदाचा आव आणला. तो उंबरा ओलांडून निघून गेला. दार जोरात लावलं. बाहेर जाताच त्याने त्याचा पुरुषी रूबाब नीट केला. हे सारं ती उंबर्याच्या फटीतून पलंगावर पडल्या पडल्या बघत होती. ती तशीच अर्धनग्न साडी गुंडाळून पडून होती. अश्रु डोळ्यात होते पण मजाल त्यांची ओघळण्याची...

स्वत:ला आणि खोलीला आवरून आता झोपावं ह्या विचारत ती उठली, साडी काढून फेकली, नुसता गाऊन घातला, ओठांवरची लिपस्टिक ओरबाडून पुसली, बटांना केसात मागे पिना लावून बांधलं. गजरा काढून फेकला, केसांचा बुचडा बांधला आणि तोंडावर पाणी घेत होती तोच तिच्या दारावर सल्लू आला,
“गंगा बाई, अम्मा गिर्हाईक भेज रही है! तयार हो.”
गंगाने पाणी तोंडावर न फेकता खाली फेकलं, जशी नागीण रागात पालटावी तशी ती दारावर आली,
“क्या बे साले, मेरा टाइम खतम हो गया अब, अम्माला जाऊन सांग जमणार नाही ते.”
“गंगा बाई अम्मानेच बोला है! अन् तुला माहीत आहे अम्मा कुछ सोचके बोली होंगी!”
“थकली रे मी… आणि बघ सगळं काढून टाकलं आता.”
सल्लू हसला, “तसं पण काय अंगावर असते गं खोलीत कुणी असल्यावर! लाव तुझा मेकअप पटकन. मोठी रक्कम भेटली आहे, पाच पट आहे रोजच्या पेक्षा, और अम्मा को भरोसा तुझपे जादा है!”
“पर... थकली बे मी. आता काय मी जवान आहे!”

“क्या गंगा बाई, अरे पस्तीस वर्षात नवीन पालवी फुटते रूपाला, अजूनही तुझं तेज मारते यार...”
“चल साला, सब तू कमिशन के लिय कर. जा रे, अम्मा को बोल कल मै काम नही करेगी फीर.”
सल्लूने तिला डोळा मारला आणि गुमान अम्माशी बोलायला निघून गेला. गंगाने गाऊन भरकन काढून गुंडाळून कोपर्यात टाकला, ओढून ताडकन ब्लाउज घातलं, साडी पटकन नेसली. पदर टाचायला घेतला पण काय फायदा ह्या विचारात तिने तो टाचला नाही. कंटाळा करत परत ओठांवर लाल भडक लिपस्टिक रेटली. बटांना ओढून केसांतून बाहेर काढलं, जरा पावडर थोपलं, अत्तर कानाशी लावलं. केसांच्या बुचड्याच काय करू असा विचार करत तिने ते मोकळे केले आणि तसेच सोडले. स्वत:ला आरशात बघत होती,

“चायला, भलतीच सुंदर दिसते मी मोकळ्या केसात.”
गाणं गुणगूनायला लागली, “मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे… मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे... मोकळ्या केसात माझ्या...”
अचानक ओठांवर आलेल्या ह्या गाण्याने ती जरा थरथरली, मोकळ्या केसात शिरलेले हात बाहेर आले. मनात साठलेली एक असह्य कातरवेळ तिच्या आठवणीत येणार तोच दारावर आवाज झाला, तिने उंबर्याच्या फटीतून नजर बाहेर टाकली, एक सावली तिला दिसली, दारावर मालदार गिर्हाईक आला ह्या विचारत ती पदर सावरत, येणार्या जांभाईला हाताने टाळत ती दारावर आली, दार उघडलं, तो उंबर्याच्या पलीकडे पाठमोरा उभा होता. पस्तीस चाळीस वयाचा वाटला तिला, गंगाने आवाज दिला,
“या साहेब, मीच गंगा आहे. या...”
ती दार खोलून आत मध्ये आली, ते साहेब खोलीत शिरले, दार उघडच होतं, तिने पटकन जाऊन ते लावलं,
“साहेब आमच्या खोलीत आल्या नंतर दार लावायचे असते. बंद खोलीची दुनिया आहे ही. मजा करायची, तोंडावर पैसे फेकायचे आणि परत न येण्यासाठी उंबरा ओलांडून दार लावायच. काय!”
तो पलंगावर बसला, खोली बघत होता, तेवढ्यात ती परत म्हणाली,
“नाही साहेब काही नाही खोलीत, कॅमेरा वगैरे काही नाही, धोका खाणारे काय धोका देणार हो.”
ती मिश्किल हसली, तो गुमान बसला आहे हे बघून तिने रमची बॉटल काढली, थकली होती, पॅक चढवून आपण सुद्धा थकवा घालवावा असे तिला वाटले होते. ती पॅक तयार करत होती. तो अजूनही तिला बघत होता, म्हणाली,

“साहेब, अम्मा पैसे तुमच्या कडून घेणार आहे, बिनधास्त प्या हो. रमके साथ गम पी जाओ....”
ती नुसती हसली, तिने ग्लास त्याच्यापुढे केला, त्याने घेताना तिच्या हाताला स्पर्श करत तो घेतला, स्पर्शाने परत थरथरली, तिने एकदम पॅक संपवला, तो तिला बघत एक-एक सिप घेत होता, ती केसांच्या बटांशी करांगुळीने खेळत, त्याला मोहक नजरेने बघत म्हणाली,
“अरे साहेब, घ्या हो पटकन आणि करा आता, मला पण...”
त्याने भुंवया उंचावून तिला बघितलं, तिने शब्द मागे घेतले, आणि पदर अंगावरून फेकला, मोकळे केस आवरत तिच्या ओठांवर गाणं परत आलं,

"मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे..."
गंगा सुर लावून गात होती.... आणि त्याच्या हातून ग्लास खाली पडला. तशी ती दचकली आणि थांबली, सावरत म्हणाली, “साहेब, काय झालं? लागलं तर नाही ना तुम्हाला...”
ती पडलेला ग्लास उचलायला पुढे आली आणि तुकडे उचलू लागली, हसत म्हणाली, “साहेब ह्याचे जास्तीचे पैसे पडतील बरका!”
तो उभाच झाला, “कोण आहेस तू?”
ती हसली, “मी! मी गंगा... गंगा बाई! का? अम्मा बोलली नाही माझं नावं... ह्या गल्लीत एकचं गंगा वाहते... जी तुमच्यासारख्या साऱ्यांना पुरून उरते...” ती मिश्कील हसत राहिली.
तो अजूनही भानावर नव्हता, जीभ वळत नव्हती त्याची तरीही तुटक शब्द फुटले, “तू गाणं परत गा... मला हा आवाज ओळखीचा वाटतो आहे.”
“काय साहेब मी काय आशा भोसलेजी नाही हो, बेसुरी हु मै... माझा कुठला आवाज हो... असचं आज मनात आलं अन् ओठांवर बसलं. आपलं काय जे आलं मनात ते ओठात. काय बोलता? मनात काही वेगळं आणि ओठांवर वेगळं जमलं असतं तर इथं असते?”
तो परत भीत भीत त्याच्याच तंद्रीत बोलला, “नाही... मला माहित आहेस तू.... तू...”
पण त्याचे शब्द जणू परत उंबरठ्यावर येऊन थांबले होते.
आता तिलाही त्याचा आवाज कुठेतरी ऐकल्या सारखा वाटला, आणि जरा गरगरलं तिला, सारं कसं क्षणात धूसर झालं, तिने भिंतीला हात टेकले. मग मंद हसली, जरा कुजबुजली, “साला आज एक पेग चढला मला! नाही त तीन चार पेग गटकुनही पूर्ण होश असतो. अन् बेहोष सालं दहा बारांना तर करते मी ..”
ती बाटलीचं लेबल बघत रमली. नजरा चुकवत राहिली. तो तिला अजूनही टक लावून बघत होता. ती जरा गडबडली. तिच्यासाठी तो गिर्हाईक होता, तोही जास्त पैसे देऊन आलेला, मग जरा बेफिकीर म्हणाली, “असं पाहू नको ना साहेब, गाते ना साहेब, पण पैसे लागतील जास्तीचे...” आता जरा अजूनच नाटकी हसली ती. आणि तिने गाणं परत गायला सुरुवात केली...
“मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे…” आता मात्र तिच्या त्या सुरात 'ती' शिरली होती. आवाजात आता ओल मिसळली होती. अलगद गाणं गाताना तिच्या सागरी नयनाच्या किनारीवर पाणी दाटलं. शेवटची काच ती उचलत होती आणि शब्द कानावर पडले...
“गिरू!!!”
आणि तिच्या बोटांना ती काच टोचली. डोळ्यांच्या किनार्यावरच्या लाटेने अचानक जोर धरला आणि अश्रु क्षणात ओघळायला लागले, तिने त्याला बघितलं, बघत राहिली. खोलीत पिवळा उजेड असूनही अंधार झाला होता. तो समोर उभा... नजरेत अनेक प्रश्न आणि ती गंगाबाई!

तो हताश खाली बसला, “गिरजा? गिरू...”
तिने डोळे पुसले, त्याला नीट बघितलं, उठली, चेहरा हातांनी लपवून कोपऱ्यात जरा वेळ उभी राहिली. बोटातून निघणाऱ्या रक्ताने चेहरा जरा रंगला होता. थरथर कापत होती. तो उठून जवळ गेला, तिच्या थरथरत्या उजव्या हातावर बांधलेली तोरडी त्याला दिसली आणि तो हतबल पलंगावर नि:शब्द बसला... जरा वेळ विलक्षण शांतता होती खोलीत, तिने मनाला घट्ट केलं, हळूच म्हणाली,
“साहेब चुकीचा उंबरा ओलांडला आज तुमी, जा साहेब तुमी, मी अम्माला बोलून रक्कम परत करायला सांगेन... जा तुमी इथून.”
“अगं पण गिरजा, तू इथे कशी?”
“जाऊ द्या ना रमाकांतराव साहेब, नका आठवायला लावू त्या नको असलेल्या आठवणी. कवाच माती टाकली मी. झालं गेलं ह्या गंगेला मिळालं. आपण जा माझ्या खोलीतून.”
“अगं पण तू तर...लग्न!”
“साहेब निघा आपण... काय माझ्या सारख्या धंदेवालीच्या नादी लागता, मी सगळं विसरली आहे, आता तर मलाच माझी आठवत येत नाही. जा तुमी साहेब.”
तो अजूनही तसाच बसून होता. तिने दार उघडलं, आणि जरा रागात म्हणाली, “साहेब निघा बोलली मी. माझे पण काही वसूल आहेत. नाय करायचं काही मला. मला मचमच नको आता...”
तो दाराजवळ आला. तिच्या आवाजाने आजूबाजूच्या बायकाही डोकावायला लागल्या, ती सल्लूला आवाज देणार तोच त्याने दार लावलं, ती अलगद मागे सरकली आणि भिंतीला टेकली, श्वास विस्कटलेला पण नजर अजूनही त्याच्या नजरेत. तो जवळ आला, इतका जवळ की त्याच्या श्वासाची उब तिच्या वाफाळलेल्या चेहऱ्याला जाणवू लागली होती. ती त्याला धक्का देणार तोच त्याने भिंतीवर हात ठेवून तिला बाहुत कैद केलं. दोघांचे हृदय जसे धावत होते. आता मात्र तिने डोळे गच्च मिटले. जणू तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं होतं. तसा तो हळूच बोलला,
“गिरजा, सतरा वर्षानंतर तू समोर आली आहेस माझ्या. आणि ही अशी?”
तिने डोळे उघडले, नजर पुन्हा भिडवली, “नशीब माझं!! जग लहान आहे रमा! बघ बोलले होते मी तुला.”
अचानक तिने परत स्वतःला सावरलं. जसा भूतकाळ तिने मुद्दाम पुसला. त्याने हताश परत प्रश्न केला, “ तू इथे आली कशी? हे काय आहे गिरु? मी काय बघत आहे गं?”
“जाऊ द्या हो साहेब, जे बघत आहात तेच खरं समजा आता.”
“म्हणजे काय गिरु?”
“काय बोलणार... न बरी होणारी जखम आहे ही, कशाला विचारून खपली खरवडता! त्याची ठणक तुम्हाला कुठे जाणवायची. आता हीच जखम मला ह्या आयुष्याच्या जखमेतून मुक्त करेल.”
“गिरू काय बोलत आहेस गं तू!”\

“नका घेऊ ते नाव त्रास होतो मला, इथे मला गंगा म्हणतात सारे. गंगा बाई आहे मी.”
ती त्याच्याकडे बघत होती आणि आजवर घडलेला प्रकार तिच्या नजरेसमोर चित्रपटासारखा धावू लावला.
गिरजा नुकतीच बारावी पास झाली होती आणि रमाकांतने त्याची पदवी पूर्ण केली होती, तिच्या घराच्या शेजारी तो शिक्षणासाठी भाड्याने राहत असायचा. वडीलांना तिच्या लग्नाची घाई होती आणि योगायोगाने स्थळ चांगलं आलं होतं तिच्यासाठी. सारं कसं ठरलं आणि दोन महिन्यावर लग्न येऊन ठेपलं. वडिलांची तयारी जोमात होती, पत्रिका, खरेदी सुरु झाली होती.
तिला भीती वाटली की वडील तिचं ऐकणार नाही आणि तिने घराचा उंबरा ओलांडला, त्याला भेटायला गेली.
“रमा, मला त्या मुलाशी लग्न करायचे नाही आहे, आपण लग्न करू आणि बाबा समोर जाऊ, मग जे होईल ते बघू.”
“अगं काय बोलतेस तू, मारून टाकतील तुझ्या गावाचे लोकं आपल्याला.”
“मारू दे ना, सोबत मरू मग...”
“तुला खात्री आहे आपल्याला सोबत मारतील ते, नाही ना...”

आता मात्र गिरजा घाबरली. रमाकांतला बाबा जिवंत सोडणार नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. आणि दोघांनी पळून जाण्याच्या निर्णय घेतला. गिराजाने घरचे काही दागिने आणि रक्कम सोबत घेतली. रात्री ते दोघेही रेल्वे स्थानकावर भेटले आणि भेटेल त्या रेल्वेने निघाले. दूर गाडी कुठेतरी मुंबईच्या जवळ येऊन पोहचली असे त्यांना वाटले तेव्हा ते दोघे उतरले.
एकमेकांच्या आधाराने दिवस काढला, लोकांच्या नजरा वाचवण्यासाठी गिरजाने मंगळसूत्र विकत घेतलं आणि गळ्यात घातलं. गिरजाला विश्वास होता रामाकंतवर, ती त्याला बोलली, “रमा असं किती दिवस आपण पळत राहणार, आपण जाऊया तुझ्या घरी, तुझी आई तुझं ऐकते म्हणतोस ना?”
“अगं हो, म्हणूनच हिंमत केली ना आपण. जाऊया, पण जरा हा दबदबा शांत होऊ दे”
“लवकर जाऊ ना. असे फिरत राहिलो तर आपण पोलिसांना नक्की भेटू... जग लहान आहे रमा...”
रमाकांतने तिला घेऊन त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. तसा तो श्रीमंत घरचा एकुलता एक मुलगा होता. जळगावात केळीच्या बागा होत्या त्याच्या वडीलांच्या. गिरजा त्याच्या सोबत असल्याने घरी पोलीस पोहचतील हे त्याच्या लक्षात होते. मामला जरा स्थिरावला की तो गिरजाला घेऊन गावी जाणार होता. एक महिना ते मुंबईच्या भागात हॉटेल बदलत राहिले...

रमाकांत गर्दीत दिसेनासा झाला आणि गिरजा पार घाबरली. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती पण तरीही नजर तिच्या गर्दीत रमाकांतला शोधत होती. जसा तो दुरून दिसला तसं तिला हायसं झालं. तो धापा टाकत तिच्याकडे परत आला, “गिरु पैसे गेले आता... नाही सापडला तो.”

क्षणात त्याचं लक्ष तिच्या पायावर गेलं, पायाच्या बोटांमधून, रक्त वाहत होतं. त्याने धरून तिला शेजारच्या बाकावर बसवलं. पायाकडे बघताना गिरजाला तोरड्या दिसल्या. तिने तोरड्या काढून रमाकांतच्या हातात दिल्या,
“रमा, हे घे, विक आणि आण पैसे.”
“गिरु ह्या तोरड्या तुझ्या आईने मोठ्या लाडाने तुझ्यासाठी केल्या होत्या ना, शेवटची आठवण म्हणून तू ठेवणार होती.”
“आता ह्या क्षणाला हा एवढाच पर्याय आहे रमा.”
“ नाही गं, राहू दे मी बघतो काहीतरी, नाहीतर आपण असेच जाऊया तिकीट न काढता. काय होते!”
“नाही रे रमा, उगाच पकडल्या गेलो तर पोलीस मागे लागायची आणि तसही माझे वडील गप्प तर बसले नसतील. तुझ्या घरी जाऊ, लग्न करू आणि मग जे व्हायचे ते होऊ देत.”
त्याने एक तोरडी तिच्या हातात दिली, “ठेव एक, आईची आठवण तुझ्या जवळ. मी अशीच करून देईल तुला. नाहीतर हीच परत मिळवेल नंतर...”

ती तोरडी घेत म्हणाली, “ठीक आहे, जा आधी, मी इथेच ह्या बाकावर बसून आहे. इथेच ये, माझ्या पायातली चप्पल तुटली नसती आणि ही ठेच लागली नसती तर मी आले असते रे. मी वाट बघते इथेच. ये तू.”
“चल ना मी पकडतो तुला. तू असलीस की मला धीर येतो.”
“रमा, आहे मी इथे, तू जा आणि लवकर ये.”
रमाकांतने तिचे मोकळे केसं आवरत, तिच्या माथ्यावर ओठ टिपली, “इथेच बसं अजिबात जायचं नाही कुठे, मी ह्या पुढच्या चौकातून येतोच. माझी एक नजर आहे तुझ्यावर.”
ती नजर रोखून नुसती बघत बसली होती. दोन तास झाले पण रमाकांत काही आला नाही. गिरजा जागेवरून उठून त्याला शोधायलाही जाऊ शकत नव्हती. तिला भीती होती की रमाकांत तिला शोधत तिकडे येईल. पाच वाजले होते. सूर्य अस्ताला निघाला होता आणि चंद्राच्या आगमनाची तयारी नभात सुरू होती.
गिरजाच्या मनात असंख्य विचारांच्या ढगांनी गर्दी केली होती. त्या ढगांमध्येही तिला नको असलेले विचारांच्या विजा मनात काहूर वाढवत होत्या. ती कातरवेळ तिला मनातून कुरतडत होती. कासावीस ती तशीच बसून होती.

आता अंधार पूर्णपणे पसरला होता. रेल्वे स्थानकावरून येणारे-जाणारे तिला तिच्याकडे वळून बघत होते. काही कुतूहलाने तर काही संशयाने बघणाऱ्या लोकांच्या नजरा तिला टाळता येत नव्हत्या. काही माणसं तर उगाच थांबून नजर शरीरावर फिरवून निघत होते. भीतीने ती अधिकच घाबरली होती. भीती पोटी आईची आठवण येत होती. मग ती आता मनातल्या मनात घरचा फोन नंबर आठवत होती, कसेबसे नंबर जुळले, समोर फोनबूथ होता. बॅगमध्ये दोन रुपये तिला मिळाले. घरी फोन करायचा, पण काय सांगणार, “मी पळून आले आणि आता रमा मला इथे सोडून गेला...”

ह्या कल्पनेने तिचे पाय मागे झाले. ती आणखी घाबरली. जाऊन परत बाकावर बसली. हातात धरून ठेवलेली एक तोरडी तिने आईच्या आठवणीत हातावर बांधली. पडल्यामुळे पाय आता चांगलाच सुजला होता आता, ठेच लागलेलं बोट ठणकत होतं, प्रत्येक ठणक्या सोबत डोळ्यात पाणी येत होते आणि आता चालता येणे शक्य नव्हते, त्यात मनात शिरणारे विचार तिला अस्वस्थ करत होते... “रमाकांतला काही झाले तर नसेल, बाबांनी त्याला जीवेमारलं तर नाही... पोलिसांनी पकडलं असेल का... नाही नाही तो येईल. मला इथेची त्याची वाट बघयाला हवी... मी की जाऊ त्याला बघायला... आणि तो इकडे आला तर...” ह्या सगळ्या विचारांनी तिचे काळीज जणू थरथरत होते. रात्रीचे नव वाजले होते. गळा कोरडा पडला होता आणि भूकही लागली होती. काहीच सुचत नव्हतं, गुमान ती बाकावर बसून होती. नजरा गर्दीत फक्त आणि फक्त रमाकांतला शोधत होत्या. प्रत्येक दुरून त्याच्या सारख्या दिसणाऱ्या माणसाकडे बघताना तिची आशा वाढायची आणि तो जवळपास आला की निराशा पदरी पडायची. हळहळू रेल्वे स्थानक रिकामं होतं चाललं होतं, लोकांची वर्दळ कमी झाली होती. बारा वाजले होते, थंडीत ती कुडकुडत होती. तिने तिच्या बॅग सह दोन्ही हात स्वतःभोवती आवळून घट्ट केले होते. जीव अक्षरश: मुठीत धरून ती फक्त रमाकांतची वाट बघत होती. तेवढ्यात कुणीतरी मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती घाबरत ओरडली,
“रमा...!”

गिरजा मागे वळली, बघते तर एक मध्यमवयीन बाई होती ती. अंगावर गडद लाल साडी, केसांचा सैल अंबाडा, चेहऱ्यावर हलका पण भडक वाटणारा मेकअप. गिरजा जरा घाबरली पण बाई माणूस समोर त्यात तिच्या डोळ्यात मायेची ओल तिला जाणवली. तशी ती बाई हळू आवाजात म्हणाली, “घोबरू नको पोरी...”
इतका वेळ भीतीने दगड झालेली गिरजा त्या मायेच्या शब्दाने तिला जशी बिलगली. आणि हमसून रडायलाच लागली. तिला प्रेमाने जवळ घेत बाई म्हणाली, “रडू नको पोरी... धीर धर... काय झालं सांग त...?”
ती तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करत होती, रामाने थरथरत सगळं तिला आतापर्यंत घडलेलं सांगितलं. तिने तिचं सर्व ऐकून घेतलं. मग तिने जवळचा डबा उघडला, आणि तिचे अश्रू पुसले, “घे, आधी दोन घास खा.” गिरजाला भूक तर लागली होती, पण घास गळ्याखाली उतरत नव्हता. तरी तिने खाल्लं.
“काय नाव काय त्या पोराचं? कसा दिसतो? मी येते जरा बघून.” तिला दिलासा देत ती रमाकांतला शोधायला गेली. ती सुद्धा बराच वेळ परतली नव्हती. दोन वाजायला आले होते. ती बाई परत आली, तेव्हा तिच्या सोबत अजून दोन बायका होत्या. त्याही प्रेमळ बोलत होत्या. त्या तिला ‘अम्मा’ म्हणत होत्या. ती बाई गिरजाला म्हणाली,
“मला वाटतं तो मुलगा तुला सोडून गेला.”
ते ऐकून गिरजाच्या छातीत धस्स झालं. “नाही… नाही… तसं नाही…”
“अगं बाई, मी शोधून आली न. सोन्याच्या पेठेत, स्टेशनच्या बाजूला, चौकात… कुठेच दिसला नाही. असा कुठलाच मुलगा नाही दिसला. उद्या हवं तर तू स्वतः जा, चौकशी कर. पण आता पहाट व्हायला आली. इथे थांबणं बरं नाही पोरी. चल माझ्यासोबत घरी. सकाळी जाऊन शोधू त्याला.”
गिरजा आधीच घाबरली होती. जराश्या प्रेमाच्या शब्दाने ती विरघळली आणि त्या बाईच्या सोबत निघाली. धास्तावलेल्या गिरजाला ती त्या बाईसोबत कुठे जात होती हेही तिला कळत नव्हते. ती नुसती त्या बाईचा हात धरून चालत होती, पाय दुखत होता, मन कोसळलं होतं, डोकं सुन्न झालं होतं. ती बाई तिला एका जुन्या, अंधाऱ्या वाड्यासारख्या घरात घेऊन आली, “इथे पड. कर आराम. सकाळी बघू.”
दोन दिवस झाले होते, ती बाई खोलीत आली नाही की तिने तिला कुठेच नेलं नाही. एका खोलीत ती पडून होती, ती आवाज देत राहिली पण कुणी उत्तर देत नव्हतं. बाहेरून नुसतं कुजबुजणं, हसणं, पुरुषांचे दबके आवाज... शिवीगाळ... अजूनही काहीतरी विचित्र ऐकायला तिला यायचं. दारं उघडायची, बंद व्हायची. दिवसा भयाण शांतात आणि रात्री झगमग दुनिया तिला त्या खोलीत जाणवत होती. शेवटी गिरजाच्या काही गोष्टी लक्षात आल्या, अंगावर अक्षरशः काटा आला.
कसही करून इथून निघायचं आणि जळगाव गाठायचं असं तिने ठरवलं. रात्री चेहलपहल सुरु झाली आणि कुणीतरी तिच्या दाराची कडी उघडून ठेवली होती. ती हळूच तिथून निघाली, गल्लीबोळ ओलांडत, धापा टाकत, जीव मुठीत धरून ती रेल्वे स्थानकावर पोहोचली. आज तिकडे पोलीस होते, खाकी वर्दी दिसताच तिचे पाय थबकले. एका मनाने तिला पोलीसांकडे जाण्याचा इशारा केला पण दुसर्या मनाने तिला थांबवलं. मनातल्या मनात सुरू असलेल्या युद्धात तिचा पराभव झाला होता. तेवढ्यात समोर तिला अम्माची माणसं दिसली.
दोन बायका… आणि त्यांच्यासोबत एक धिप्पाड गडी. ते तिच्याकडेच बघत उभे होते. गिरजाच्या पोटात गोळा आला. तेवढ्यात एकीने तिचे हात घट्ट पकडले, दुसरीने तोंडात बोळा कुचकला आणि गाडीत कोंबलं. ती परत त्या खोलीत आली, ओक्साबोक्शी रडत राहिली.
स्वतःलाच मिठी मारून ओरडत राहिली, “रमाकांत… असं नाही ना केलंस तू? रमा कुठे आहेस तू?”
बराच वेळाने दार उघडलं, अम्मा रागात आत आली, “अबे पोट्टे, कायले आरडाओरडा करतं, धंद्याचा टाईम आहे. फालतू वर्दी वाले आवाजानं आले ना त वाट लागलं...”
तश्या तिने दोन तिच्या गालफटात लावल्या, गिरजा जमिनीवर पडली. अम्माचं खरं रूप गिरजा बघत होती, तिने पानं थूकलं आणि म्हणाली, “ए भवाने, खूप झालं तुझं नाटक, तो रमाकांत तुला सोडून गेला आहे.”
“नाही…” गिरजाने तशीच पडल्या पडल्या बोलली.
आणि अम्मा चिडली, “पागल है क्या तू रे? एवढं समजत नाही तुला, त्याने मजा केली, मजा... आणि आता तू काही त्याच्या कामाची नसल्याने तो निघून गेला त्याच्या घरी.”
गिरजाने कानांवर हात ठेवले, “नाही… नाही… खोटं आहे… रमा नाही असा.”
अम्मा मिश्कील हसली, “मी माहिती काढली आहे, तो मुलगा त्याच्या घरी सुखरूप आहे.”
प्रत्येक शब्द गिरजाच्या छातीत खंजीरासारखा घुसत होता. एक एक क्षण जणू तिच्याशी गद्दारी करत होता.
अम्माने गडी माणसाला हाक मारली, आणि रमाकांतचे वडिलासोबतचे फोटो तिला दाखवले. गिरजा अक्षरशः कोसळली.
“नाही… नाही… असं नाही होऊ शकत…” ती जमिनीवर बसत रडू लागली.
क्षणात अम्मा पुढे आली. तिने गिरजाचा गळा धरून तिचा चेहरा वर उचलला. ओरडत म्हणाली,
“जमीनदाराचा पोरगा हाय तो! तुझ्यासारख्या छप्पन पोरी वापरून उभा राहीन.. तुला काय वाटलं? खरंच घरी नेणार होता तुला? बायको बनवणार होता?”
गिरजाचे डोळे भरून वाहत होते. अम्मा तिच्याकडे तुच्छतेने बघत म्हणाली, “तुझ्यात हाय काय गं एवढं? ही चमडी? अशी?”
तिने तिच्या गालाला हात लावून झटका दिला.
“ना गोरी, ना काळी… ना नाकात दम, ना डोळ्यात जादू… काय हिरोईन व्हायला निघाली होती त्याच्यासोबत?”
गिरजा हुंदके देत होती. “कशाला मरायला आली होती त्याच्या मागं? आता जा ना… जा घरी!”
अम्मा उपहासाने हसली. “कुठल्या तोंडानं जाणार आहेस?”
अम्मा अजून जवळ आली. आता मात्र तिने शेवटचा विषाचा घोट पाजला, म्हणाली, “तुझ्या बापानं तर गावात तू मेली असं जाहीर केलं आहे.”
खोटं…!”
“खोटं? अगं, पोलीसातही गेले नाहीत ते. काय सांगितलं कुणास ठाऊक तुझ्या त्या होणाऱ्या नवऱ्याला… तुझ्या लहान बहिणीचं लगन आहे ह्या शुक्रवारी.”
अम्माने गडीच्या हातातून लग्नाची पत्रिका हिसकावून घेतली आणि गिरजाच्या समोर फेकली.
“ही बघ, आज हळद असेल तिची.”
अम्मा खोलीतून निघून गेली. गिरजाने थरथरत ती पत्रिका उचलली. काही क्षणात तिच्या हातातून पत्रिका निसटली आणि ती ती तशीच मागे कोसळली.
बेशुद्ध....

बेशुद्ध पडलेली गिरजा तिची ती शुद्धीवर आली आणि ढसाढसा रडायला लागली. अम्माने तिला आठवडाभर एकटं सोडलं होतं. आठवडा झाला आणि खोलीत बायका आल्या, तिला तयार करू लागल्या, ती ओरडत राहिली पण कुणीच ऐकत नव्हतं. रात्री कुणीतरी तिच्या खोलीत आलं आणि दार बाहेरून बंद झालं, ती ओरडत राहिली पण काही फायदा नव्हता. अश्या अनेक रात्री ती स्वत:ला त्रास देत राहिली. शरीर अशक्त झालं होतं पण अम्मा तिला सकळी सलाईन चढवायची आणि रात्री मेकअप.

रमाकांतची वाट बघता बघता आता ती थकली होती. मागच्या सहा महिन्यात कुणीच तिच्यासाठी आलं नव्हतं. आता अश्रु आटले होते. तुटून तुकडे झालेली तुकड्यातच स्वत:ला शोधत असायची पण प्रत्येक तुकड्यात ती एकटीच दिसली. शेजारच्या खोलीची तम्मना तिला भेटायला यायची... समोरची जुही तिला भरवत असायची... प्रत्येकीची कहाणी होती जिला काहीच अंत त्यांना दिसत नव्हता, तरीही त्या नुसत्या जिवंत होत्या.
मंदाकिनीला तिची अवस्था बघवत नव्हती, ती तिला रागवतच म्हणाली, “क्यू आयी रे तू वापस, तुझ्या दाराची कडी मीच उघडून ठेवली होती त्या दिवशी.. तू निसटावी म्हणून मी त्या आम्माचा मार खात होत्या त्या दिवशी... तू मर क्यू नही गयी रे उधर... इथं मारण्यापेक्षा तर बरं होतं ना.. इथं ती अम्मा मरू द्यायची नाही तुला तुझं हे शरीर जोवर कामाचं आहे. आणि आता निसटूही द्यायची नाही.”
मध्ये मध्ये सल्लू त्यांच्यात बसायचा, त्यालाही गिरजासाठी सहानुभूती होती, तो तिला बऱ्याचदा बोलायचा, “प्रेम बिन नही होता गिरजा... तुझे क्या ओ जमिदारका बेटा ही मिला था?” त्याच्या अशा बोलण्यातून गिरजाला खूप काही कळायचं, पण आता कुणाला बोलतं करून काहीच परत मिळणार नव्हतं तिला. ती अजूनही कुणाशी बोलत नसायची. शरीरावर आणि मनावर एवढ्यात जखमा झाल्या होत्या की आता वेदनाही बोथट झाल्या होत्या. प्रत्येक घटनेची कडी जोडून जोडून आता डोक्य्यात मुग्या झाल्यासारखं वाटायचं तिला. स्वतःला संपवण्याचे सारे प्रयत्न संपले होते, अम्माची माणसं चोवीस तास तिच्यावर पारख ठेवून असायची. त्यातच तिला हेमाने दारूची सवय लावली. आता त्या नशेत तिच्यासोबत काय होत असायचं हे तिला जाणूनही घायचं नसायचं.
हळहळू रमाकांत तिला सोडून गेला होता हेच सत्य होतं तिच्यासाठी. दगड झाली होती ती आता.. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता, ती अम्माच्या पुढे जाऊन बसली, “अम्मा आता कुणाला आत घ्याचं ते मी ठरवणार! साला तू कोणाले बी पाठवते आतमध्ये. नाही जमणार मला.”
तिला असं नरकात जिवंत बघून तम्मना, जुही, मंदाकिनी आणि हेमा जरा सुखावल्या आणि रुसल्याही होत्या... त्याच्या धंद्यात आता ती कॉम्पिटेटर होणार होती.
अम्मा मात्र हसली, तिने तिचा मुका घेतला, तिला स्वतःच्या हाताने पान बनवून दिलं, “वाह… अब आयी ना लाइन पे तू, तेच तर म्हणते ना मी, तू कशाला विचार करते. हे वय आहे तोवर कामाव.”
गिरजा तिच्या खोलीकडे निघाली होतीच तर अम्माने तिला आवाज दिला, ”ए, गंगा बाई नाव चाललं ना तुला.”
गिरजाने वळून पाहिलं, एक विचित्र हसू आलं तिच्या ओठंवर, “हाँ अम्मा… बिलकुल. गिरजाची राख ह्याच गंगेत सोडली तर मी…
पर गंगा के दर्शन महंगे होने चाहिये. मला सगळंss विसरायचं आहे…”
गंगा काही वर्षात नावाजली, ती गल्ली आता गागा नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली होती. गंगाचा वेळ मिळणे म्हणजे आनंद असायचा तिच्याकडे येणाऱ्यांचा. तिने गिरजाला मागे टाकले होते. तिच्या आतलं निरागसपण चिरडलं होतं, कंबर ओलांडत जाणारे ते काळेभोर केस, ज्यांत अम्माने जबरदस्तीने मोगऱ्याचा गजरा गुंफायला शिकवलं होतं. सुरवातीला तिला त्या वासाने घराचं अंगण आठवायचं पण धंदा आता पोटासाठी पाहिजे झाला होता. बिंदू एवढी टिकली लावणारी आज कपाळभर लाल टिकली मोठ्या मिजासात लावायची. चापून चुपून साडी नेसणारी आता अंगही झाकत नव्हती. हसायला तिलाही यायचं पण हसू मात्र ओठांच्या उंबऱ्यावर अडकायचं. हळुवार सूर कसा मादक झाला होता... ही गंगा लोकांसाठी आईटम होती पण तिच्या वेदनेला वास येत होता...
एखाद्या बाईचं पूर्ण आयुष्य बदलावं असा पुरेसा काळ... सतरा वर्ष... झाले होते तिला गंगा बाई जगत. प्रत्येक दिवस ती माणसं अंगावर घेऊन झोपत होती... तो भार, ती यातना... त्या शरीराने भोगली होती. स्वतःला संपवून तिने स्वतःचं सारं बाजारात विकलं होतं. डुबता काळ जवळ येत होता तिचा आणि तिचा त्रास आता थांबणार होता. मिळेल तेवढे पैसे जमा करण्याच्या नादात ती दहा-बारा गिर्हाईक घेत असायची.
धंदेवाल्या बायकांचं वय उतरलं की काय होतं ते ती बघून होती. कालपर्यंत जुहीवर नोटा उधळल्या जात होत्या, आणि आता गंगाला तिला गल्लीभर शोधावं लागायचं आणि ती एखाद्या कोपऱ्यात बीडी ओढत बसलेल्या दिसायची. मंदाकिनीला रोग चिकटला होता आणि ती काहीच दिवस जगणार होती. आणि तम्मनाने नव्या पोरींवर नजर ठेवत दलाली सुरु केली होती. तिला असं काहीच करायचं नव्हतं, अम्मा सारखी मागे लागली होती पण तिला दुसरी अम्मा व्हायचे नव्हते. अंधारात ती स्वतःलाही इथेच कुठेतरी बघत होती निदान काही पैसा हातात राहावा म्हणून तिच्यात तिच्यासाठी जरा तळमळ वाढली होती आणि अचानक रमाकांत असा समोर आला.
त्या दिवशी रमाकांत तोरडी घेऊन सोनाराकडे आला होता. सोनाराशी बोलत असतानाच, दुकानाबाहेर त्याला गावातले दोन ओळखीचे दिसले. मनात भीती शिरली आणि का कुणास ठाऊक तो त्यांच्यापासून लपत राहिला. आणि काही वेळात वडिलांची माणसं त्याला पकडायला आली होती. शेवटी त्या माणसांनी त्याला गाठलं आणि त्यांनी त्याला अक्षरशः उचलून गाडीत कोंबलं. गाडी भरधाव जळगावकडे निघाली होती. तो गिरजाबद्दल सांगत राहिला पण त्यांनी काहीच ऐकलं नाही. घरी पोहोचताच बाबांनी त्याला घरात ओढलं.
आणि पहिल्याच क्षणी कानाखाली लावली, “अबे लेका, अशा पळून येणाऱ्या मुली जमीनदाराच्या सुना होत नाहीत...”
रमाकांत ओरडत राहिला, पण बाबांनी काहीच ऐकलं नाही, त्याला चांगलंच हाणलं अन् खोलीत कोंडून ठेवलं. शेवटी अन्न पाणी सोडल्याने त्याला खोलीतून बाहेर काढलं. आईच्या विनंतीला मान देत बाबांनी त्याची बाजू ऐकून घेतली. त्याच्या समाधानासाठी त्यांची गडी माणसं गिरजाला शोधायला पाठवली. आठ दिवस ती माणसं रमाकांतला घेऊन रेल्वे स्थानकावर, सोनाराकडे, आजूबाजूच्या गल्ल्यांत तिला शोधत राहिले पण ती काही दिसली नाही. माणसं रमाकांतच्या वडीलांची विश्व्श्नीय होती, रमा म्हणेल त्या ठिकाणी गेली पण मुंबईच्या काही गल्ल्या त्यांनी मुदाम्म सोडल्या होत्या...

आता मुलांच्या हट्टाने आणि आईच्या अनेक विनवण्या नंतर बाबांनी काही माणसं गिरजाच्या गावीही पाठवली. ते परत आले आणि सोबत गिरजाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले होते. रामकांतने पत्रिका पहिली तेव्हा त्याला अश्रु अनावर झाले होते. ती सुखरूप, सुरक्षित आहे ह्या विचारत तो हळूहळू स्थिरावला पण तिला विसरला नव्हता. गिरजाची ती तोरडी त्याने विकलीच नव्हती, ती तो सतत खिशात ठेवत असायचा. आईने त्याच्या लग्नासाठी खूप मागे लागली असायची पण त्याला लग्न करायचे नव्हते... शेवटी तीही राहिली नाही आणि रामकांत आईच्या रोजच्या मागे लागण्यापासून सुटला होता. वडिलांनी नाना उपाय केले, मोठं मोठ्या लोकांच्या मुली रमाकांत पुढे उभ्या केल्या पण रमाकांत वीरघळला नव्हता. त्याला लग्नच करायचे नव्हते. शेवटी कर्माची फळ जिथंच्या तिथंची भोगावी लागतात हेच खरं. उतरत्या वयात दम्याच्या आजाराने बाबांचा तो दहाडणारा आवाज हरवला. त्यांचा तो जमीनदाराचा दरारा आता राहीला नव्हता. शेती ओसाड पडली होती. काही केळीच्या बागा फुलत होत्या शेमजुरांच्या भरोशावर. आणि हा अवलिया तीच केळी घेऊन ह्या गावातून त्या गावात फिरत असायचा. त्या दिवशी तो मुंबईत केळीचा ट्रक घेऊन आला होता आणि गावातून शहरात आलेले मित्र भेटले होते. नशेत मित्रांनी त्याला छेडलं, आणि तो तसाच त्या नशेत मुंबईच्या ह्या गंगानगरीत शिरला होता.
आणि आज.... न बोलता दोघांच्या नजरा पाण्याने भिजल्या होत्या. सतरा वर्षाच अंतर.. रमाकांत तिच्या जवळ आला, ती नकळत एक पाऊलं मागे सरकली, त्याने जवळ जाऊन परत तिचा हात पकडला, अधिकाराने तो बोलला जसा, “चल माझ्यासोबत. इथे नाही राहायचं तू.”
तिने हात सोडवला, नजर खाली होती, “साहेब ह्या उंबर्या बाहेरची दुनिया बघायची आता हिंमत नाही राहिली. आता इथच जगणे आणि मरणे. निघा तुमी... आता मला तुमच्या सोबत येता येणार नाही...”
ती थांबली, श्वास रोखून तिने त्याच्याकडे पहिले, “पण तुमी माझा हा उंबरा ओलंडला? बायको कमी पडते वाटते जमिदाराला...”
तो परत जवळ आला, तिने त्याला थांबवलं, “गिरू... माझं खूप प्रेम होतं गं तुझ्यावर.. आजही आहे.”
“साहेब इथे येणार मला रोज हेच म्हणतो...”
“तुझं प्रेम होतं ना माझ्यावर?”
ती हसली, “प्रेम !! प्रेम नावाची कात मी कधीच टाकली आहे साहेब. आता ना ती चढत... ना मला आंधळी करत.”
“गिरु असं नको ना बोलू, तू अजूनही माझ्या मनात आहेस गं?”
“पण माझ्यात तर मनचं नाही... ते मेलं कधीचं. आता नुसतं शरीर फिरतं.”
त्याने तिचा परत हात धरला. आता हातावरची तोरडी त्याला रूतली, त्याने हात सैल केला, “चल जाऊ या आपण कुठेतरी दूर... सोबत राहू गं. मला काहीच ऐकायचं नाही आहे.”
“पण मला सांगायचं नाही आहे...”
“गिरु चल माझ्यासोबत...”
तिने हात झटकला, “नको साहेब, भीती वाटते आता पळून जाण्याची. माझ्या सारख्या धंदेवाली सोबत तुमी काही जगू शकणार नाही आणि मला सेठ सोबत राहणे जमणार नाही, मला तर रोज दहा बारा माणसं हवी असतात, त्याशिवाय मला झोप येत नाही...”
“गिरू गप्प हो!” तो ओरडला.
तिने हात जोडले, “निघा सेठ. तुमी जिला शोधत आहात ती मी नाही. गंगा बाई नावं आहे माझं. ह्या उंबर्या बाहेर माझी काहीच किंमत नाही पण हा माझा उंबरा ओलांडायला लोक मोठी किंमत मोजतात. आणि रोज मी तुम्हाला परवडायची नाही.”
रमाकांत तिच्याकडे रोखून पाहत राहिला. आता तिनेही त्याच्या डोळ्यांत नजर रोखली. आणि पहिल्यांदाच आवाज चढवला,
“साहेब, ह्या उंबऱ्याची साल कधीच काढू नका ह्यापुढे. निघा तुमी.”
तो हाताश शेवटच बोलला, “ तुझं प्रत्येक वेळी ऐकायलाच हवं का गिरु?”
तिने त्याला रोखून बघत दार उघडलं. त्या नजरेत राग नव्हता पण तिची देहबोली कठोर भासत होती. तसा सल्लू आणि गडी माणसं धावत आले. तिने त्यांना नजरेनं रोखलं. रमाकांतला तिने हाताने जाण्याचा इशारा केला. तो नि:शब्द झाला होता आणि ती आतून ढवळून निघाली होती. तो मनात नसूनही दारावर आला, भारी मनाने त्याने उंबर्यावर पाय ठेवला. ती तशीच मूर्तिमंत उभी राहिली, डोळ्यांत साठलेलं पाणी तिची फसवणूक करत होतं जणू... पण... आता काही होणे शक्य नव्हते. रमाकांतच्या डोळ्यांतही धूसरपणा दाटला होता.

साठलेल्या अश्रूंमुळे त्याला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. कसं बसं स्वत:ला सावरण्यासाठी त्याने खिशातून हात बाहेर काढला आणि दाराची चौकट धरली, त्या गडबडीत खिशातून गिरजाची तोरडी बाहेर पडली, गंगाच लक्ष गेलं, क्षणभर तिचा श्वास अडकला... पण दुसऱ्या क्षणी तिने शून्यात बघत दार लावलं. तशी ती निर्जीव खाली बसली, ती उंबऱ्यावर पडलेली तोरडी तिला दिसत होती. जणू आज गिरजा उंबऱ्यावर होती. एका हाताच अंतर होतं तिच्यासाठी, पण...
उंबर्याच्या फटीतून तिला तो तिकडे बराच वेळ थांबलेला दिसला. त्याच्या हालचाली बघत राहिली.
स्वत:ची चूक शोधत दोघंही रडत होते ती उंबर्याच्या आत.... आणि तो उंबर्याच्या बाहेर.
आणि मध्ये…

एक उंबरा... जो त्यांनी कधीतरी प्रेमासाठी ओलांडायचा ठरवला होता, पण नियतीने आयुष्यभरासाठी त्यांच्यात उभा केला.
समाप्त!!!
---
कथा कशी वाटली नक्की कळवा आणि नवीन कथेसाठी पेजला नक्की फॉलो करा... लवकरच भेटूया नवीन कथेसोबत.... तोवर स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
लेखाच्या/कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
@followers @topfans
फोटो by AI
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७

Post a Comment

0 Comments