आणि जेव्हा Ex परत येतो... भाग १
आज अमितला जाऊन तीन वर्ष झाली होती. त्याच्या स्मरणात अरुंधती नेहमीप्रमाणे देवळात जाण्यासाठी निघाली होती. तिचा मोठा मुलगा तिच्या सोबत होता. अर्थ, ज्याला तिने जन्माला घातलं नव्हतंच पण आईपण जन्माने नव्हे तर मायेने मिळतं, हे तिने जगाला दाखवून दिलं होतं. त्याची आई म्हणून ती कुठेच मागे नव्हती. अमितच्या पहिल्या बायकोपासून त्याला तो होता. ती वारली आणि मग अरुंधतीने त्याला अवघ्या वर्षभरापासून संभाळलं होतं. तिने त्याला कधी सावत्र मुलगा म्हणूनच पाहिलंच नव्हतं. तिच्या कुशीत वाढलेला आणि लाडात मोठा झालेला अर्थ दहा वर्षांचा झाला होता. त्याच्यासाठी आई म्हणजे अरुंधतीच होती. त्याला कुठे त्याच्या जन्मादात्रीचा चेहरा आठवत होता.
अरुंधतीला लहान मुलगीही होती जी तिला अमितपासून झाली होती. तिच्या आणि त्याच्या प्रेमाची गोड निशाणी, पण अमितची साथ अरुंधतीला जास्त लाभलीच नव्हती. अवघ्या सहा वर्षाच्या संसारात अर्ध्यावर डाव परत मोडला होता तिचा. पहिला डाव मांडला तेव्हा राजा नकळत निघून गेला होता पण आता तिचा राजा कायमचा तिला सोडून गेलेला होता. @उर्मिला देवेन
मनात विचारांचे असंख्य धागे एकमेकांत गुंतले होते. अमितच्या आठवणींच्या गर्दीत हरवलेली अरुंधती, अर्थला शेजारी बसवून देवळाच्या दिशेने निघाली होती. लहान मुलीला तिने घरी सासूसाऱ्यांकडे ठेवलं होतं. अरुंधती गाडी हळुवार चालवत होती, तिचं मन तीन वर्षं मागे फिरत होतं. अमितसोबतचे क्षण, त्याचं हसणं, त्याचा आवाज... सगळंच पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होतं.
तोच रस्त्याच्या बाजूला मोठा घोळका तिला दिसला, सगळे लोकं जसे ओरडत होते, काही एकमेकांना ढकलत पुढे सरकत होते. कुणी मोबाईलवर व्हिडिओ काढत होतं, तर कुणी फक्त तमाशा पाहत उभं होतं. तिनेही जरा गाडीचा वेग कमी केला, तर कानावर शब्द पडले, “अबे... मर जाएगा! कोई इसको उठाओ... अस्पताल ले चलते हैं!”
अरुंधतीने गाडीला ब्रेक लावला, गाडी बाजूला केली, तसा अर्थ म्हणाला, “मम्मा का गं थांबवली गाडी? लवकर जाऊन येऊ ना देवळात, मग तुला आज ऑपरेशन आहे ना? आणि माझा क्लास आहे फुटबॉलचा. आज सरांनी लवकर यायला सांगितलं आहे.”
“थांब रे जरा.” म्हणत अरुंधतीने आधी फोन काढून रुग्णवाहिका बोलली आणि म्हणाली,
“अरे हो रे, बघ तिकडे गर्दी आहे, बाबा असता तर थांबला असता ना मदतीसाठी? आणि आपण बाबासाठी जातोय देवळात, नाही थांबलो तर कसं वाटेल बाबाला?”
अर्थने मान हलवली आणि तो त्याच्या मम्मा सोबत गाडीतून उतरला. अरुंधतीने पटकन गाडीच्या मागच्या सीटवरून तिची डॉक्टरी बॅग उचलली आणि गर्दीकडे धावत जात मोठ्याने म्हणाली “व्हा बाजूला, मी डॉक्टर आहे, कोण आहे तिकडे? बघुद्या जरा मला.”
तिच्या आवाजातला आत्मविश्वास पाहून लोकांनी लगेच वाट करून दिली. अरुंधती गर्दीत शिरली. इकडे अर्थच्या चेहऱ्यावर मात्र वेगळाच उत्साह होता. त्याला त्याच्या आईचा प्रचंड अभिमान होता. त्याने मोबाईल काढला, कॅमेरा ऑन केला आणि क्षणात फेसबुक लाईव्ह सुरू केलं.
“हॅलो फ्रेंड्स... दिस इज माय ग्रेट मॉम!” तो उत्साहाने बोलत होता.
“ती फक्त माझी आई नाही... ती सुपर डॉक्टर आहे. कुणालाही काही झालं की सगळ्यात आधी धावत जाते. बघा ना... आता पण एका अंकलचा जीव वाचवायला गेलीय. आय अॅम सो प्राऊड ऑफ हर!”....वगैरे त्याची कॉमेंट्री सुरु होती. @उर्मिला देवेन
अरुंधती घोळक्यातून त्या जखमी माणसाजवळ पोहचली, तो रस्त्याच्या कडेला निपचित पडून होता. रक्ताने चेहरा पूर्णपणे माखला असल्याने ओळखल्या जात नव्हता. तिने क्षणाचाही विलंब न करता गुडघ्यावर बसून त्याची तपासणी सुरू केली, डोक्याला गभीर मार लागला होता आणि रक्तस्त्राव सुरूच होता. तिने लगेच डॉक्टरी बॅगेतून आवश्यक साहित्य काढलं. जखम स्वच्छ केली, रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला आणि डोक्यावर घट्ट पट्टी बांधली. तेवढ्यात रुग्णवाहिका सायरन ऐकू आला. लोकं बाजूला झाले, अरुंधतीने स्वतः स्ट्रेचरवर त्याला चढवायला मदत केली.
तिने पॅरामेडिक्सना सूचना देत त्यांना तिच्याच हॉस्पिटलला पाठवलं. त्या रुग्णवाहिका निघून गेल्यावर तिची नजर बाजूला पडलेल्या एका काळ्या बॅगेवर गेली. बहुधा ती त्या जखमी माणसाची असावी म्हणून तिने ती उचलली. तिने तात्काळ पोलिसांना फोन लावला.
जे घडलंय ते सांगून तात्काळ कारवाही करायला सांगितलं. फोन ठेवून ती गाडीकडे वळली.
इकडे अर्थ मात्र भारावून गेला होता. त्याने मोबाईल अजूनही हातातच धरला होता.
फेसबुक लाईव्हवर तो अभिमानाने अजूनही बोलत होता,
"फ्रेंड्स... ही माझी मम्मा! मला माझ्या मम्माचा खूप खूप अभिमान आहे. आणि माला तिच्यासारखं व्हायचं आहे. लव यु मॉम!" त्याच्या त्या निरागस शब्दांवर लाईव्ह कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत होता. काही मिनिटांतच हजारो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला अनेकांनी फोरवर्ड केला. अर्थ आनंदाने प्रत्येक कमेंट वाचत आनंदी होत होता. आज त्याची मम्मा हिरो झाली आहे...
दोघेही गाडीत परत बसले, देवळाच्या दिशेन निघाले. वाटेत अर्थ साऱ्या प्रतिक्रिया मम्माला वाचून दाखवत होता. देवळात पोहल्यावर दोघांनी अमितसाठी प्राथना केली. अमितच्या स्मरणार्थ काही दान करण्यासाठी तिने सामान आणलं होतं तेही तिने मंदिरात पुजाऱ्याला दिलं. तिथून निघून ती मंदिराजवळच्या आश्रमात गेली, आश्रमातल्या लोकांसाठीही तिने भेटवस्तू आणल्या होत्या. अर्थने त्या सर्वांना दिल्या. जरा वेळ ती त्या आश्रमातल्या बगीच्यात एकटीच फिरत होती. हा आश्रम अमितच्या विशेष जिव्हाळ्याचा होता. तो दरवर्षी इथे येऊन वृद्धांना आणि अनाथ मुलांना मदत करायचा. त्याच्या जाण्यानंतर तीच परंपरा अरुंधतीने जपली होती. अमित होता तेव्हा ती नेहमी तिथे त्याच्या सोबत येत असायची.
इथल्याच प्रत्येक वाटेवर अमितच्या पावलांचे ठसे अजूनही तिला जाणवत होते. त्या बगीच्यातल्या हिरवळीवर फिरतांना कितीतरी स्वप्न त्यांनी सोबत बघितली होती. मग तिथे फिरून तिच स्वप्न ती परत परत बघत होती. आज अमित नव्हता... पण त्याची स्वप्नं अजूनही जिवंत होती. ती स्वप्नं तो अरुंधतीला देऊन गेला होता.
अर्थ ने हाक मारली, “मम्मा वेळ होतोय गं, निघूया?” @उर्मिला देवेन
अरुंधती आवाजाने स्वप्नातून बाहेर आली. आणि निघाली, अर्थला त्याच्या क्लासला सोडून ती हॉस्पिटलकडे निघाली, आज तिला एक महत्वाच ऑपेरेशन करायचं होतं. सगळे तिची वाट बघत होते. ऑपरेशन थिएटरची तयारी सुरू होती. ती तिच्या केबिनमध्ये पोहोचली, तोच नर्स घाईघाईने आत आली. तिला म्हणाली, “गुड मॉर्निंग मॅडम, सगळी टीम तयार आहे. पण... सकाळी जो अपघातग्रस्त पेशंट आला होता ना?”
"त्याचं काय?"
"त्याच्या नातेवाईकांचा अजून काहीच पत्ता लागलेला नाही. आपणच त्याला इथे पाठवलं होतं, म्हणून सगळे आपलीच वाट बघत होते."
“अरे हो, विसरले होते मी, ती बॅग होती त्याची, बघा त्यात काही असेल तर आणि कळवा त्याच्या नातेवाईकांना. पोलिस येऊन गेलेत ना?”
“हो मॅडम, त्यांनी FIR नोंद केली पण तेही आपल्याला भेटण्यासाठी परत येतो म्हणून गेलेत.”
“बरं, मी भेटते त्यांना ह्या ऑपेरेशननंतर, आले तर सांगा मला परत. तोवर ही बॅग बघा नाहीतर पोलिसांना सांगा बघायला. आणि... त्या पेशंटला शुद्ध आली का?”
नर्सने नकारार्थी मान हलवली, “नाही मॅडम. डोक्याला खूप खोल जखम आहे. रक्तस्रावही बराच झाला होता. बहुधा अपघाताच्या वेळी तो दारूच्या नशेत होता. ज्युनिअर डॉक्टरांनी जखमेवर टाके घातले आहेत. सध्या त्याला आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवलं आहे.”
“व्हायटल्स कसे आहेत?”
“आता स्थिर आहेत. शुद्धीवर आल्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करू.”
“ठीक आहे, त्याच्या प्रकृतीत काहीही बदल झाला, किंवा तो शुद्धीवर आला, तर मला लगेच कळवा. मी ऑपरेशन थिएटरमध्ये असेन.”
“येस, मॅडम.”
नर्स बाहेर निघून गेली. अरुंधतीने एक दीर्घ श्वास घेतला, ऑपरेशनचा गाऊन घातला आणि ऑपरेशन थिएटरकडे पावलं वळवली. दोन तास उलटून गेले होते. अत्यंत गुंतागुंतीचं ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण करून अरुंधती तिच्या केबिनमध्ये आली. चेहऱ्यावर थकवा होता, पण एका रुग्णाचा जीव वाचवल्याचं समाधानही होतं. दोन पोलीस अधिकारी आधीपासून तिची वाट पाहत बसलेले दिसले. सकाळची तीच नर्सही बाजूलाच उभी होती.
अरुंधतीने खुर्चीवर बसत हलकंसं हसून विचारलं, “काय म्हणता इन्स्पेक्टर साहेब? काही पत्ता लागला का त्या पेशंटचा?”
इन्स्पेक्टर म्हणाला, “मॅडम तेच विचारतोय आम्ही, तुम्ही ओळखता का त्याला?”
“अहो नाही, मी देवळात जायला निघाले होते, रस्त्यात अपघात झालेला दिसला. डॉक्टर म्हणून जे माझं कर्तव्य होतं ते केलं. ह्यापेक्षा मला काही त्याच्याबद्दल माहीत नाही. त्याचा काही फोन बिन असेल ना? किंवा बॅगेत काही मिळालं नाही का? ओळखपत्र, आधार कार्ड... काही?”
इन्स्पेक्टरने उत्तर न देता फाईल उघडली. त्यातून एक जुना, किंचित फिकट झालेला फोटो काढला आणि अलगद अरुंधतीच्या टेबलावर ठेवला. अरुंधतीने सहजपणे तो फोटो हातात घेतला... आणि पुढच्याच क्षणी तिचा श्वास अडखळला. हळूच म्हणाली, “हा फोटो?”
“हा फोटो त्या इसमाच्या बॅगेत होता, आपला आहे कदाचित. मागे नाव आहे आपलं.”
अरुंधती चकित झाली, तिने फोटो पुन्हा हातात घेतला. काही क्षण तो न्याहाळत राहिली.
“हो... हा माझाच फोटो आहे. खूप जुना आहे. कॉलेजमध्ये असताना मी मॉडेलिंग करायचे. बहुतेक त्याच काळातला असेल. पण... तो त्या माणसाकडे कसा आला, हे मला खरंच माहीत नाही. त्या काळात अनेक फोटोग्राफर्स, एजन्सी आणि मासिकांमध्ये माझे फोटो जायचे. तिथून कुठूनही त्याच्यापर्यंत पोहोचला असेल.”
इन्स्पेक्टर तिच्याकडे बारकाईने पाहत होता.
“म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत नाही?”
अरुंधतीने ठामपणे उत्तर दिलं, “नाही हो. कमीत कमी मला तरी आठवत नाही.”
इन्स्पेक्टरने तो फोटो तिच्या हातातून घेतला, “मॅडम, म्हणूनच विचारत होतो तुम्हाला, तुम्ही ओळखता का त्याला?”
“अहो माहित नाही, शुद्धीवर येऊ द्या, बघूया काही ओळख निघाली तर. पण आता मला माहीत नाही.”
“ठीक आहे, मॅडम. तो शुद्धीवर आल्यावर आम्ही पुन्हा चौकशी करू.”
इन्स्पेक्टरने फोटो पुन्हा टेबलावर ठेवला, फाईल बंद केली आणि नर्ससह बाहेर निघून गेला.
आणि अरुंधती विचारात पडली. तो फोटो घेऊन ती आठवत होती. आता तिलाही उत्सुकता होती त्या इसमाच्या शुद्धीवर येण्याची. अर्थला पिकअप करण्याचा वेळ झाला होता, तिने फोटो पुन्हा टेबलावर ठेवला, कारची चावी उचलली आणि केबिनच्या बाहेर पडण्यासाठी उठली. तोच नर्स आली, “मॅडम त्या पेशंटला शुद्ध आली आहे.” @उर्मिला देवेन
क्षणभर अरुंधती जागच्या जागी थबकली. तिच्या हातातली कारची चावी नकळत घट्ट पकडली गेली. अरुंधती तशीच निघली, त्या माणसाला बघताच म्हणाली, “कसं वाटतंय आता? मी डॉ. अरुंधती राणे. सकाळी तुमचा अपघात झाला होता. आम्ही तुम्हाला इथे आणलं.”
तो तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करू लागला. डोळे अजूनही धूसर होते. पण अरुंधतीने प्रश्न परत केला, “कोण आहात आपण, आपलं कुणी असेल तर सांगा. तुमच्या घरच्यांचा नंबर द्या. आम्ही त्यांना लगेच कळवतो. आणि हा माझा फोटो कसा आपल्याकडे?”
तो काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहिला. तिच्या आवाजाने जणू त्याच्यात परत श्वास भरले होते, अत्यंत क्षीण आवाजात तो पुटपुटला, “अरु... अरु...”
आता मात्र अरुंधती बावरली, अरु ही हाक ऐकून तिला पंधरा वर्ष झाली होती. मनाचे तार मनातच जुळत होते. सारं समोर धूसर होत चाललं होतं...
पुढचा भाग लवकरच... कथा आधी पोस्ट केली होती पण परत नवीन स्वरुपात पोस्ट करते आहे.
©उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
@followers @topfans

0 Comments