द बूमरँग... भाग १

 द बूमरँग... भाग १



ऑफिस सुटायची वेळ झाली होती. संपूर्ण फ्लोअरवर घरी जाण्याची लगबग सुरू होती. कुणी लॅपटॉप शटडाऊन करत होतं तर कुणी दिवसाची शेवटची मिटिंग संपवत होतं, तर कुणी आधीच लिफ्टकडे धाव घेतली होती. रतीही तिची बॅग आवरत होती. रती नेहमी उशिरापर्यंत थांबून काम करायची, तेवढाच तिला ओव्हरटाईम मिळायचा, त्यात अजून एक कारण होतं ते म्हणजे मयूर... तिचा बॉस! पण ती काही केल्या त्याच्या नजरेत येत नव्हती. आज तिला लवकर निघायचं होतं. तिला राजेशला सरप्राईज द्यायचं होतं. काय तर म्हणे आजच्या दिवशी तिने त्याला होकार दिला होता...
रती आणि राजेशला सोबत तीन वर्ष झाली होती. राजेश सिव्हील इंजीनिअर होता, मोठी स्वप्नं पाहणारा, चौकटीत न मावणारा माणूस म्हणा... नियमित नोकरीत स्वतःला दिवसाचे आठ तास बांधून घेणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. काही वर्षं नोकरी केल्यानंतर त्याने स्वतःचा कन्स्ट्रक्शन आणि प्रोजेक्ट कन्सल्टिंग व्यवसाय सुरू केला होता. कधी एखादा प्रोजेक्ट मिळायचा, कधी नवीन टेंडर्सच्या प्रतीक्षेत महिने जायचे... मोठी स्वप्नं होती, मेहनतही होती; पण अजून तो ‘ब्रेकथ्रू प्रोजेक्ट’ हातात यायचा होता, जो त्याच्या करिअरला नवं वळण देईल. रतीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. कारण प्रत्येक अपयशानंतरही राजेश नव्या जोमाने उभा राहत होता...
रती प्रतिष्ठित कंपनीत उत्तम पगारावर ती काम करत होती. त्यामुळे दोघांच्या दैनंदिन गरजा सहज भागत होत्या. पण राजेशच्या महत्त्वाकांक्षेला ते पुरेसं नव्हतं. राजेश मेहनतीला पाहिजे ते फळ मिळत नव्हतं असं त्याला वाटत असायचं. स्वतःचा व्यवसाय उभा करण्याच्या नादात त्याने वडिलोपार्जित मालमत्तेतील बराच भाग गुंतवला होता आणि चांगल्या संधीच्या शोधात तो होता.
ऑफिसमधून निघताना रतीने मुद्दाम राजेशला एक छोटासा मॅसेज पाठवला, ‘आज मला थोडा उशीर होईल.’ मॅसेज पाठवून ती स्वतःशीच हसली. खरं तर उशीर होणार नव्हता. उलट आज ती नेहमीपेक्षा लवकर निघत होती. पण तिला त्याला सरप्राईज द्यायचं होतं. अचानक त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद बघायचा होता. मनात तिचा पूर्ण प्लॅन तयार होता. आधी राजेशच्या ऑफिसमध्ये जायचं. मग दोघांनी थोडं शहरात फेरफटका मारायचा. त्यानंतर त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं. गरमागरम सूप, राजेशची आवडती पनीर टिक्का, आणि शेवटी दोघांनी शेअर करून खायचा चॉकलेट ब्राउनी. मनात विचारांचे बंगले उभे झाले होते आणि तेवढ्यात ऑफिसचा प्यून तिच्या डेस्कजवळ आला.
"मॅडम, सर तुम्हाला केबिनमध्ये बोलावत आहेत.” रतीच्या चेहऱ्यावरचा उत्साह क्षणभर ओसरला... आणि पुढच्या क्षणी तिला हायसं झालं. तिने हातातली बॅग पुन्हा खुर्चीवर ठेवली. एक दीर्घ श्वास घेतला आणि घाईघाईने मॅनेजरच्या केबिनकडे निघाली.
“सर, मला बोलावलं होतं? मी तर आता निघतच होते. काही विशेष काम होतं का?”
मयूर त्याच्या केबिनच्या खिडकीजवळ उभा होता. हातात सिगारेट होती. रातीच्या आवाजाने ती त्याने लगेच विझवली. धुरांच्या वर्तुळांना हाताने सारलं... वळला, त्याच्या खुर्चीत बसला. काही क्षण रतीकडे निरखून पाहत राहिला.
“रती, मोहिते ग्रुपच्या प्रोजेक्टची फाईल अजून पूर्ण झालेली नाही. उद्या त्यांच्यासोबत आपली फायनल डिस्कशन मिटिंग आहे. आणि एक गोष्ट मी ठरवली आहे...”
रती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली... तसा तो तिला न्याहाळत बोलला, “मला वाटतं हा प्रोजेक्ट तू लीड करावा.”
क्षणभर रतीला आपण नेमकं ऐकलं तरी काय, असंच वाटलं.
“मी...?” तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.
रतीला काही सुचलं नाही, मोहिते ग्रुप हा कंपनीसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा क्लायंट होता. एवढा मोठा प्रोजेक्ट आणि सर तिला लीड करायला सांगत आहेत हे तिच्यासाठी खूप मोठं होतं, पण दुसऱ्या क्षणाला तिलाच वाटलं, “शेवटी माझ्या मेहनतीची दखल घेतली गेली...”
तिने नकळत ओढणीचा पदर बोटांभोवती गुंडाळला.
“सर, ही खूप मोठी जबाबदारी आहे.”
“मग, काय म्हणणं आहे तुमचं? नाही तर मी हा प्रोजेक्ट सिनिअर पाटीलकडे देतो.”
“नाही, नाही सर... मी करेन. फक्त तुम्ही मला गाईड कराल ना? म्हणजे इतक्या मोठ्या प्रोजेक्टचा अनुभव मला तसा फारसा नाही.”
“ऑफ कोर्स,” मयूर हसत म्हणाला.
“मी आहेच. आणि यु नो, सध्या आपल्या कंपनीत बरेच प्रोजेक्ट्स सुरू आहेत. प्रत्येक गोष्टीकडे माझं स्वतःचं लक्ष असणं शक्य नाही. मला एखादा सक्षम लीडर हवा आहे, जो ही नवीन जबाबदारी आत्मविश्वासाने सांभाळू शकेल.”
रती काही बोलणार इतक्यात मयूर त्याच्या खुर्चीतून उठला. टेबलच्या कोपऱ्यावर हलकेच टेकत तिच्याकडे पाहत म्हणाला, “हे बघ रती, तू... सॉरी... तू म्हंटल तर हरकत नसले तुला, राईट?”
“हरकत नाही सर, मी लहान आहे तुमच्यापेक्षा...”
“हे बघ रती, करिअरमध्ये कधी कधी संधी अशी असते की ती दार ठोठावून फक्त एकदाच येतात. त्या वेळी आपण घाबरलो, मागे सरकलो, तर नंतर पश्चात्ताप उरतो.”
रती शांतपणे ऐकत होती. आता तो तिच्या अगदी जवळ आला, “तुझ्यात क्षमता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू कामाला प्रामाणिक आहेस. आणि उद्याची मिटिंग चांगली झाली तर पुढचा रस्ता तुझ्यासाठी खूप वेगळा असू शकतो.”
इकडे रतीच्या मनात एक वेगळीच धडधड सुरू झाली. काही वेळापूर्वीपर्यंत तिच्या डोक्यात फक्त राजेशला द्यायचं सरप्राईज होतं. आता मात्र तिच्यासमोर करिअरची एक मोठी संधी उभी होती... आणि...?
“थँक यू, सर,” ती हळूच म्हणाली.
“मला निराश करू नकोस, बस.”
“अ.. हो... मी पूर्ण प्रयत्न करेन.”
“गुड. माझी इच्छा आहे उद्या तू प्रेझेंट करावं. यू नो, आय नो यू.. तुझ्यात एक वेगळाच स्पार्क आहे. करुणा आणि जयूही चांगलं काम करतात, त्याबद्दल वादच नाही. पण तुझ्या कामात एक नीटनेटकेपणा असतो, एक बारकाई असते. आय रिअली अप्रिशिएट दॅट. आणि शेवटी, टॅलेंटला योग्य संधी मिळाली पाहिजे.. नाही का?”
हे ऐकताच रती अक्षरशः उत्साहाने भारावून गेली होती... तिच्यातली अडकून पडलेली महत्वाकांक्षा डोकावत होती.
“सर, मी नक्की मेहनत करेन. मला हा चान्स हवाच होता. आय विल प्रूव्ह मायसेल्फ.”
“हेच हवंय मला, हा आत्मविश्वास. खात्री आहे, तू नक्की चांगलं करशील. मग सुरू करतेस ना प्रेझेंटेशनची तयारी?”
“हो हो, आत्ताच!”
“गुड. मी माझ्या कॅबीनमध्येच आहे. काही लागलं तर कधीही ये. आणि हो...”
तो थोडा थांबला, “आत्तासाठी ही गोष्ट कुणाला सांगू नकोस. उद्या मिटिंगनंतर आपण अधिकृतपणे सगळ्यांना सांगू.”
“ओके सर, नक्की.”
रतीने उत्साहाने मान हलवली आणि ती जवळजवळ धावतच तिच्या डेस्ककडे आली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद जयूच्या नजरेतून सुटला नाही. तशीही ती तिच्यासाठी थांबली होती. जयू खुर्चीत मागे रेलत म्हणाली, “काय गं? काय म्हणत होता तो बोक्या?”
रतीने लगेच आजूबाजूला नजर टाकली आणि तोंडावर बोट ठेवलं.
“जयू! काहीही काय बोलतेस? कुणी ऐकलं तर?”
“अगं, सहा वाजून गेलेत. ऑफिसची वेळ संपली. आता मी कुणाला घाबरत नाही. आणि तसंही इथे अर्धं ऑफिस त्याला बोक्या म्हणतं.”
“वेडी आहेस तू.”
“खरं सांगतेय. चोरून चोरून मुलींकडे बघत असतो... टूकुर टूकुर... त्याच्या त्या कॅबीनमधून... त्याला वाटतं कुणाच्या लक्षात येत नाही. पण लोकांच्याही नजरा असतात ना. म्हणूनच तर बोक्या म्हणतो त्याला सगळे.”
रतीने हसून विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
“जाऊ दे गं. तू पण ना...”
“बरं, ते सोड. निघायचं ना आता? चल, मी पण आवरत आहे.”
“अगं... मला थोडं काम आहे.”
“काम?” जयूने भुवया उंचावल्या.
“आज? तू तर पाच मिनिटांपूर्वी पळत होतीस घरी जायला.”
रतीने ओठ चावले.
“म्हणजे... थोडी अर्जंट तयारी आहे. उद्याची मिटिंग गं”
जयूने तिच्याकडे संशयाने पाहिलं, “अच्छा... म्हणजे बोक्याने काहीतरी नवीन बॉम्ब टाकलाय वाटतं.”
“काही नाही गं.”
“राहू दे. तुझा चेहरा सगळी स्टोरी सांगतोय. रोजच करतेस गं. किती करशील? ए, तुला काही बोलला का?”
“नाही गं. सर उद्याच्या प्रोजेक्टबद्दल बोलत होते. थोडी तयारी बाकी आहे. तू जा पुढे. मी आठपर्यंत निघेन.”
जयूने सुस्कारा टाकला.
“रती, तू ना, आई झालीस की कळेल. घराची कशी ओढ लागून राहते ते. नजर सतत घड्याळावर असते. माझ्या मुलाला पाळणाघरातून उचलायला उशीर झाला की जीव नुसता कासावीस होतो. सातनंतर ती बाई ज्या नजरेने बघते ना, बस्स!”
जयूने बॅग खांद्यावर अडकवली.
“चल, निघते मी. आणि हो, जास्त वेळ थांबू नकोस. काळजी घे. त्या बोक्यापासून जरा लांबच राहा.”
रती काही बोलली नाही. कॉम्प्युटर ऑन करताना तिच्या मनात एक वेगळीच धडधड सुरू झाली होती.
पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी तिच्या खांद्यावर येणार होती. रतीने दोन तास थांबून प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स पूर्ण करत होती. तिच्यासाठी ही मोठी संधी होती.. मयूरला इम्प्रेस करण्याची आणि यशाची... मयूर म्हणजे तिच्यासाठी एक स्वप्न होता, त्याचा रुबाब, त्याचं राहणं...त्याचं स्थीर वागणं- बोलणं आणि गर्भश्रीमंती सगळं कसं तिला भारी वाटायचं. त्याचं लग्न झालं असल्याने तिच्या गुलाबी स्वप्नांना तिने कधीच गोठवलं होतं... पण ही संधी तिला सोडायची नव्हती...
इकडे मयूर तिला त्याच्या केबिनमधून बघत सिगारेटवर सिगारेट ओढत होता. मनात गुरगुरत होता, “ही ना खूप वेगळी आहे. जाळ्यात अडकवावं लागेल हिला. स्वतःहून काही माझ्याकडे काम व्हावं म्हणून येणारी नाही. जरा स्वतःला प्रेझेंट करावं लागेल मला. हरकत नाही, जरा तिच्या कलाने घ्यावं लागेल. पण आयटम मस्त आहे यार... पटली ना की जमलं माझं... चला मयूर, लांडोर फसवायची आहे. मी मोर आहेच. आणि हिला हेरलं तर हिची किंमत वाढेल माझ्यामुळे, आणि मग... ह्या बिनडोक लांडोरीवर माझी मर्जी चालेल... हा... हा... हा...”
आता आठ वाजले होते. त्याने त्याचा लॅपटॉप बॅगेत टाकला. एक सिगारेट परत पेटवली. केबिनच्या खिडकीतून रतीकडे बघत त्याने ती संपवली. बॅग खांद्यावर घेतली, गाडीची चावी हातात फिरवत तो कॅबिनच्या बाहेर आला. रती अजूनही बसून काम करत होती. तिला न बघितल्यासारखं करत तो आधी पुढे गेला. रती मात्र त्याला बघून उभी राहिली. तेवढ्यात त्याने मागे वळून पाहिलं.
“अरे, तू अजून इथेच आहेस होय? अगं, राहू दे ना. उद्या कर. मिटिंग चार वाजता आहे. तुझ्याकडे भरपूर वेळ आहे.”
“सर, बस झालंच आहे माझं. उद्या मग मी प्रेझेंटेशनची प्रॅक्टिस करेन.”
“वॉव! ग्रेट. कॅन आय सी?”
“शुअर, सर. काही करेक्शन असतील तर सांगा.”
मयूरने शेजारची खुर्ची ओढली आणि तो प्रेझेंटेशन बघू लागला. रतीही त्याच्या शेजारी उभी राहिली. काही मिनिटं स्लाइड्स बघितल्यानंतर तो म्हणाला, “ग्रेट! तू सगळे पॉइंट्स व्यवस्थित मांडले आहेत. नो कॉमेंट्स.”
रतीच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं होतं. तसा तो परत स्लाइड्स बघत बोलला, “फक्त एक गोष्ट कर. हे सगळं एकदा नीट अलाइन कर. कंटेंट उत्तम आहे, पण प्रेझेंटेशन दिसायलाही आकर्षक हवं ना.”
तो पुढे हसला, “म्हणजे बघ, आपण सुंदर असलो तरी थोडासा मेकअप करतोच ना? तसंच आहे हे.”
स्क्रीनकडे बोट दाखवत तो म्हणाला, “जस्ट मेक इट मोअर प्रेझेंटेबल. मेकअप इट!!”
“ओके सर, नक्कीच!”
“राहू दे. तू लॅपटॉप घरी घेऊन जा आणि घरी पूर्ण कर. चल, मी तुला सोडतो.”
रतीला परत हायसं झालं. मयूरशी जवळीक साधण्याची संधी समोरून होती. तेवढ्यात मयूरच्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर नाव पाहताच तो हसला.
“चला, आमच्या धर्मपत्नींचा बुलावा आला. आता निघायलाच हवं.”
असं म्हणत त्याने फोन उचलला.
“हॅलो सानी... हो, हो, निघालोच आहे. बस, अर्ध्या तासात पोहोचतो. तू जेवायला बस. मी आलोच. हो हो, घेऊन येतो तुझं आवडतं श्रीखंड. आणि पिल्लू झोपलं का? बरं! सोनूसाठी आईसक्रीम घेतो मी.”
मयूरची बायको सानिका, दिसायला सुंदर, अतिशय श्रीमंत घरची मुलगी. दोघांना एक मोठी बारा वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा होता. मुलाची प्रकृती जरा नाजूक होती, त्याची सतत काळजी घ्यावी लागत असल्याने तो झाल्यापासून सानिकाने कंपनीत येणे
सोडले होते. तिचा पूर्ण वेळ मुलाचं करण्यात जात होता. त्या मयूरही कामात अधिक व्यस्त असायचा.
मयूर फोनवर बोलत होता आणि रतीच्या मनात गोंधळ उडाला होता....
बघूया पुढल्या भागात काय होते ते... नक्की वाचा...
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

Post a Comment

0 Comments