जपानमध्ये फायरवर्कला हानाबी (花火) म्हणतात. हाना म्हणजे फूल आणि बी (Hi) म्हणजे अग्नी. म्हणजेच ‘आकाशात उमलणारी अग्नी फुलं’ असं काही म्हणावं. आपल्याकडे लग्नात, एखाद्या मोठ्या समारंभात अशी फटाक्यांची आकाशात आतिशबाजी आपण बघितली आहे. पण इथे ती सार्वजनिक एखाद्या नदीच्या किनारी... मोठ्या पार्क मध्ये जुलै-ऑगस्टच्या उबदार संध्याकाळी ठराविक वेळेवर घडवून आणली जाते. नदीकिनारी हजारो लोक एकत्र जमतात. अंगावर पारंपरिक युकाता, हातात छोटासा पंखा, आजूबाजूला खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि आकाशाकडे लागलेल्या हजारो नजरा... अगदी वेळेत सुरु होतो हा अग्नी फुलांचा खेळ. काही क्षणांत रंगांची उधळण होते. लाल, निळे, सोनेरी, जांभळे रंग जणू आकाशात फुलांसारखे उमलतात आणि क्षणात विरून जातात. लोकं आनंदाने टाळ्या वाजवता. जल्लोष करत हे क्षण कॅमेऱ्यात टिपतात.
हानाबी ही आधुनिक परंपरा आहे असं म्हणता येणार नाहीच. कारण बारुदचा शोध चीनमध्ये लागल्यानंतर ही कला जपानमध्ये त्या मार्गाने पोहोचली. एदो कालखंडात, १६०३- १८६८ ह्या काळात हानाबी हा प्रकार खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला असं इथे बोलल्या जाते. १७३३मध्ये टोक्योच्या सुमिदा नदीवर झालेल्या भव्य दिव्य अशा हानाबीचा उल्लेख इथल्या इतिहासात विशेष महत्वाचा मनाला जातो. त्यावेळी दुष्काळ आणि साथीच्या रोगांमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच शांतता आणि समृद्धीची प्रार्थना करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. पुढे काळाच्या ओघात अर्थ विस्तारित झाला आणि आज हानाबी एक प्रतिक आहे जो सांगतो की—दुःख कायम राहत नाही; आशेचा एक किरण अंधारालाही उजळवू शकतो.
म्हणूनच जपानच्या संस्कृतीत हा नुसता फटाक्यांचा खेळ नाही तर जीवनातील क्षणभंगुर सौंदर्याची आठवण करून देणार जिवंत अनुभव मानल्या जातो. साकुराच्या फुलाप्रमाणे ही हानाबीची अग्नी फुलंही काही क्षणात विरघळून जातात, पण ती दिव्य भव्यता डोळ्यात कायम साठवून राहते.
कदाचित म्हणूनच जपानी संस्कृती आपल्याला सांगते— क्षण निसटून जातात, सौंदर्य चिरंतन नसतं; म्हणून ते ज्या क्षणी आपल्या वाट्याला येतं, त्या प्रत्येक क्षणाला मनभरून अनुभवावं.
नमस्कार!!
मनातल्या तळ्यात तुमचं सर्वांचं स्वागत आहे.
मी उर्मिला देवेन, मी एक ब्लॉगर आणि सॉफ्ट वेअर इंजिनिअर आहे, घर आणि काम सांभाळून, माझ्या तीव्र लेखणीतून लिखाण करणे हा माझं छन्द आहे. सभवताली घडणाऱ्या घटना, मनाला भेदणाऱ्या गोष्टी, नवीन पाककला, स्त्रीयांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, आईपण, पालकत्व, आपले आयुष्य, गरजा, बदलणारा काळ आणि माझ्या आयुष्याचे कडू गोड अनुभव मला लिखाणासाठी प्रवृत्त करत असतात.
मी इंग्रजी आणि मराठीतून लिखाण करते. माझ्या लेख हे बऱ्याच मॅगझीन, न्यूज पेपर, दिवाळी आकांत, सखीत आणि भारतातल्या आणि आंतरराष्टीय इंग्रजी आणि मराठी ब्लॉगिंग साईट वर प्रसिद्ध होत असतात.वाचकांचा प्रचण्ड प्रतिसाद मला प्रोसाहन देत असतो. माझ्या लेखनातून सर्वाना माहिती आणि प्रोसाहन तसेच आनंद मिळावा हाच प्रयत्न असतो. नुकतच मला Momspresso मराठी ब्लॉगर साईट ने वाचकांची पहिली पसंत म्हूणन गौरवांकित केलंय. प्रतिलिपी ह्या मराठी ब्लॉगिंग साईट वरही वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
.htps://www.facebook.com/manatlyatalyat/
तुमच्या प्रतिक्रिया जाणून घयायला आवडतील.
धन्यवाद!!
0 Comments