द अदर वुमन - अंतिम भाग -आवडती नावडती!!

 द अदर वुमन - अंतिम भाग -आवडती नावडती!!



पहिला भाग इथे वाचा-  द अदर वुमन - भाग १, आवडती नावडती!!

आणि अंतिम भाग 

अरुणाने निर्णय तर घेतला होता, एकटे पालक होण्याचा, पण हा मार्ग सोपा नव्हता. समाजाचे नको असलेले प्रश्न... उगाच नातेवाईकांची कुजबुज... आणि न बोलताही प्रश्न विचारणाऱ्या लोकांच्या नजरा... आणि प्रत्येक वेळी पुढे मुलीच्या वडिलांबद्दल विचारला जाणारा एकच प्रश्नचिन्ह. तिला सगळ्याला सामोरं जायचं होतं. पण आता तिच्या ह्या भीतीपेक्षा तिचं मातृत्व मोठं झालं होतं.
पुढच्या दोन महिन्यांत तिने नोकरी सोडली. घरही सोडलं. डॉक्टरबाईंच्या आधाराने त्यांच्याकडे राहायला आली. दिवस सरत गेले. पोटातला जीव वाढत गेला. आणि अखेर... नऊ महिन्यांनंतर एका सुंदर मुलीने या जगात पहिला श्वास घेतला. मुलगी अगदी हुबेहूब सुधीरसारखी दिसत होती... जे स्वप्न बघितलं होतं ते तिच्या हातात होतं, तेच डोळे, तेच नाक, तोच रंग... त्या क्षणी तिला जाऊन सुधीरला भेटावे असे मनोमन झाले होते. पण मागच्या सहा महिन्यापासून ना त्याने, ना तिने एकमेकांची खबर ठेवली होती. काही महिने डॉक्टरबाईंच्या घरी राहून तिने त्यांच्या मदतीने एक नोकरी मिळवली, नजीक खोली घेतली. आणि मुलीसोबत राहू लागली... आणि अशी राजाची आवडती, नावडती झाली... जिचं पुढे काय झालं हेही राजाला माहित करून घ्यायचे नव्हते.
सुधीरने झालेल्या प्रकारानंतर तिची चौकशीही केली नाही. जणू अरुणा आणि तिच्या आयुष्यात घडलेला तो संपूर्ण अध्याय त्याने सहज पुसून टाकला होता. दोन वर्षे उलटली. अरुणाही आता तिच्या छोट्याशा जगात रमली होती. कुणाला कशी उत्तर द्यायची हेही शिकली होती. पण काही प्रश्न असे असतात की ते काळाबरोबर मरत नाहीत... फक्त मनाच्या एखाद्या कोपऱ्यात शांत पडून राहतात... आणि मग कधी डोकावता कळत नाही... नाही का?
त्या दिवशी शहरातल्या एका मॉलमध्ये ती मुलीसोबत फिरत होती. अचानक समोरून येणारी ओळखीची आकृती पाहून तिची पावलं थबकली. मनाने लगेच उत्तर दिलं, ‘सारिका’... सुधीरची बायको. तिला बघून जशी परत धडकी भरली. तोच प्रसंग परत घडणार म्हणून ती आधीच लपली, आणि सुधीर दिसू नये अशी वागू लागली. पण मन... त्याचं काय करणार. सुधीरच्या मुलीला सुधीरने बघावं असं तिला कितीही मनात नको वाटलं तरी वाटणं साहजिक होतं. नकळत तिची नजर सुधीरला शोधू लागली. तो कुठे दिसतोय का? मुलांसोबत असेल? कॉफी शॉपमध्ये बसला असेल? गाडी पार्क करायला गेला असेल? सारे तर्क तिचे लावून झाले. पण नाही... सुधीर कुठेच नव्हता. मग जरा सावकाश समोर येत मनाला ह्या विचाराने सावरलं, की आज सुधीर नसेल सारिकासोबत. सारिका स्वतःच्या हातात खरेदीच्या पिशव्या सांभाळत, मुलांचा हात पकडून बिल देत होती. आणि अरुणा तिला नुसती बघत होती. आता का कुणास ठाऊक अरुणाने सारिकाचा पाठलाग सुरु केला. आणि नकळत तिच्या मनात अपराधाची जुनी वेदना पुन्हा डोकावली. एकेकाळी जिच्यामुळे स्वतःला दोषी समजत होती... ती स्त्री आज एकटी समोर होती. आणि पहिल्यांदाच अरुणाला तिच्याशी बोलावंसं वाटत होतं. खूप काही विचारावंसं वाटत होतं. खूप काही सांगावंसंही. मन तळमळत होतं. सारिका पुढे चालत होती... नकळत एका ठिकाणी दोघींची नजरभेट झाली... सारिकाने आजनपणे अरुणाच्या मुलीचा लाड केला, म्हणाली, "गोड आहे तुमची मुलगी."
अरुणाच्या छातीत धडधड सुरू झाली. पण दुसऱ्या क्षणी अरुणाला हायसं झालं, तीही हसली पण नकळत शब्द निघाले, “सुधीरसारखी आहे...”
ते शब्द उच्चारताना तिची नजर क्षणभर सारिकेच्या चेहऱ्यावर स्थिरावली. सारिकाच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणभर बदलले. पण अरुणाने लगेच स्वतःला सावरलं. “ तिच्या वडिलांसारखी आहे.”
आता सारिकाने फक्त एक फिकटसं हसू दिलं. मग दोघीही आपापल्या बिलिंग काउंटरकडे वळल्या. सारिकाचे मुलं पिझ्झासाठी जिद्द करत होते मग ती समोरच्या पिझ्झा शॉपकडे वळली. मुलांसाठी पिझ्झा घेऊन सारिका एका कोपऱ्यात जाऊन बसली. अरुणाही तिच्या मुलीला घेऊन मुद्दाम तिथे पोहचली. सारीकाशी बोलण्याचा प्रयत्न तिचा सुरूच होता. मनात हजारो प्रश्न होते. वर्षानुवर्षं साचलेले. आणि आज नियतीने जणू तिला संधी दिली होती. आज सारिकाशी बोलायचंच... आज हिला सगळं सांगायचं हे तिने मनोमन ठरवलं होतं.
इतकी वर्षं मनात दडवून ठेवलेलं सत्य आज तिच्या ओठांपर्यंत येऊन पोहोचलं होतं, "माझ्या मुलीला तिचा हक्क मिळायलाच हवा. सुधीरने समाजाच्या भीतीने मला कधी स्वीकारलं नाही. पण ही अजूनही त्याची पत्नी म्हणून जगते आहे. तिला खरं कळायला हवं..." विचारांचं चक्र वेगाने फिरत होतं.
तिने पिझ्झा ऑर्डर केला. समोर सारिकाची मुलं धिंगाणा घालत होती. तिची स्वतःची मुलगीही त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होती.अरुणा कधी सारिकाच्या मुलांकडे पाहायची, कधी स्वतःच्या मुलीकडे. एकेक घास तोंडात टाकत असली तरी तिचं लक्ष खाण्यात नव्हतं. मनात चाललेल्या वादळाने तिची भूकच हरवली होती. त्याच्या अगदी उलट सारिका मात्र निवांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच पोकळी होती. जणू शरीर इथे होतं... आणि मन कुठेतरी खूप दूर... , ना चेहऱ्यावर तेज होतं ना हास्य. उदास एखाद्या मूर्तीसारखी बसून होती. तिला असं बघून अरुणाच मन आता तिलाच खात होतं. तिच्याकडे बारकाईने पाहत होती तर अचानक तिची नजर तिच्या कोरड्या कपाळावर पडली. कधीकाळी कपाळभर टिकली लावणारी, गळ्यात तीन पदरी मंगळसूत्र घालणारी सारिका आज अगदी वेगळी दिसत होती. ह्या विचाराने अरुणा गोंधळली. आणि बराच वेळ झाला तरी सुधीर आला नव्हता... सारिका अधूनमधून बाहेर उभ्या असलेल्या ड्रायव्हरकडे पाहत होती. सारं कसं अरुणाला न समजणार, आकलनापलीकडचं होतं. क्षणभरापूर्वी मनात उसळणारा राग, हक्क, तक्रारी... सगळंच थंडावलं... हळूहळू विचार गोठले. डोळे नकळत भरून आले.
कदाचित आज अरुणा सत्य सांगायला आली होती. पण इथे ऐकण्यासाठीही एक वेगळी कहाणी तयार बसली होती. बराच वेळ धीर गोळा केल्यानंतर अरुणा उठली. हलकंसं हसून म्हणाली, “अहो, मुलांवर जरा लक्ष ठेवा हं... फार मस्ती करत आहेत. बहुतेक त्या लिफ्टशी खेळत आहेत."
सारिका भानावर आली, तिने घाईघाईने मुलांकडे पाहिलं आणि मग अरुणाकडे बघून शांतपणे म्हणाली, "बरं... बघते मी, धन्यवाद!"
अरुणाने सर्व अश्रू गिळून टाकले आणि ती निघाली... पण एक क्षण थांबली, मागे वळून पाहिलं, मनात परत विचार शिरला, “आज इथे सत्य सांगायला आली होती. पण नियतीने माझ्यासमोर अजून मोठं सत्य उभं केलं. कधी कधी ज्यांच्याविषयी आपण सर्वात जास्त गैरसमज करून घेतो... त्या माणसांच्या जखमा आपल्यापेक्षाही खोल असतात... राहू दे अरु... मनू फक्त तुझी आहे. तू समर्थ आहेस गं... नको त्या जीवाला अजून काही सांगू...”
असं अचानक सुधीरचं कुठंच न दिसणं... सगळंच तिला अस्वस्थ करत होतं. आणि तिने ओळखीच्या लोकांकडून चौकशी केली. जे कळलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अरुणाने सुधीरला आयुष्यातून दूर केल्यानंतर काही महिन्यांतच तो त्याच्या ऑफिसमधल्या सेक्रेटरीच्या प्रेमात पडला होता. आणि एक दिवस... दोघेही कुठेतरी फिरायला निघाले होते. रात्री उशिरा. भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. सुधीर आणि ती जागीच ठार झाले होते. हे ऐकताच अरुणा बराच वेळ स्तब्ध बसून राहिली. तो आता या जगातच नव्हता. पण त्याहून जास्त तिला सारिकासाठी वाईट वाटलं. कारण लोकांकडून तिला आणखी एक गोष्ट कळली होती. सारिका आजही स्वतःलाच त्या अपघातासाठी दोष देत होती. त्या दिवशी तिचं आणि सुधीरचं कधी नव्हे ते जोरात भांडण झालं होतं... पहिल्यांदा ती त्याला बोलली होती आणि रागाच्या भरात सुधीर घराबाहेर पडला होता. आणि मग काही तासात त्याचा तो भीषण अपघात झाला होता. तेव्हापासून सारिका एका न संपणाऱ्या अपराधगंडात जगत होती. पण नियतीचे हिशेब वेगळे असतात, काही माणसं आपल्या चुकांमुळे जात नाहीत... आणि काही नातेसंबंध आपल्या प्रयत्नांनी वाचत नाहीत. हे त्या वेडीला कोण सांगणार होतं.
अरुणाने स्वतःला सावरलं आणि कधीच सारिकाच्या समोर न जाण्याचा विचारात करत तिच्या आयुष्यात परत आली. मुलगी आणि ती हेच तीच जग होतं. मनू पाच वर्षाची झाली होती, तिने वळून मागे बघितलंच नव्हत.
--
मनू खोकली आणि ती तिच्या आठवणीतून बाहेर आली. खिडकीपासून धावत ती मनूजवळ आली.
“मनू... बरी आहेस ना?”
मुलीच्या कपाळावर तिने अलगद ओठ टेकवले. एका हाताने तिचे केस कुरवाळले आणि दुसऱ्या हाताने स्वतःच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पुसले. मनू पुन्हा शांत झोपली होती... पण अरुणाच्या मनात मात्र वादळ सुरूच होतं. मनाने प्रश्न केला, "आता सारिका कशी असेल? सगळं ठीक असेल ना तिचं...?"
एक विचार पुन्हा तिच्या मनात डोकावून गेला, “सारिका... ती ना आवडती होती, ना नावडती. तरीही शेवटपर्यंत सुधीरच्या नात्यात अडकून राहिली... आणि मी... मी कधीकाळी आवडती होते. पण किती सहज नावडती झाले. इतकी सहज की पुन्हा कधीच आवडती होऊ शकले नाही.”
अरुणाने मनूच्या गालावरून हात फिरवला. मनातला अपराधीपणा अजूनही डोकं वर काढत होता, मनात विचारांना काही केल्या थांबणे नव्हते, "मनूला कसं सांगायचं हे सगळं?मोठी झाल्यावर समजून घेईल का ती मला?तिच्या नजरेत मी चुकीची ठरेन का?"
अशा अनेक प्रश्नांचे काटे अजूनही टोचत होते. आणि मनात पुटपुटली, “कदाचित सारिकाला माझ्याबद्दल माहिती असेल... कदाचित नसेलही... पण एक गोष्ट मात्र खरी. सारिकाच्या दुःखाला मीही जवाबदार आहेच ना... सुधीरला मात्र आवडती मी आणि नावडती ती अश्या दोघीही हव्या होतोच, एक समाजात मिरवण्यासाठी आणि एकी समोर मिरवण्यासाठी. पण माझा मी मार्ग बदलला आणि सुधीर कायमचा सारिकाच्या आयुष्यातून निघून गेला. आता न ती आवडती ना मी, आम्हीं आहोत फक्त माता.... मातृत्वासाठी कायम खंबीर. आपापल्या लेकरांसाठी जगणाऱ्या... आजच्या जगातल्या आवडती आणि नावडती ज्यांना राजा नकोय.... मिरवण्यासाठी..."
अरुणाने स्वतःच्या आणि मनूच्या अंगावर पांघरून घेतलं, मनुला घट्ट कुशीत घेतलं, मनात हसली, " मी तर माझ्या मुलीची आवडती .... "
आणि निवांत झोपली. तिच्यामते ती आई म्हणून कोणत्याही राज्याच्या राणीपेक्षा अधिक श्रीमंत, खंबीर आणि पूर्ण होती. अरुणा आज कोणाची आवडती नव्हती. कोणाची नावडतीही नव्हती. ती फक्त एका छोट्याशा मुलीची आई होती. आणि तेच तिचं खरं ‘राणीपण’ होतं.
स्त्रीच एक असही रूप, आवडती आणि नावडतीच, आजही काही पुरुषांना दोन बायका हव्या असतात... मानो या ना मानो... अजूनही आपल्या समाजात अशा दडलेल्या वास्तविक कथा आहेत. या कथा वर्तमानपत्रात छापल्या जात नाहीत किंवा बाहेर येत नाहीत. त्या घरांच्या चार भिंतीत दडलेल्या असतात. कधी एखाद्या सारिकाच्या शांत डोळ्यांत... तर कधी एखाद्या अरुणाच्या गोठलेल्या अश्रूंमध्ये.
समाप्त...
कथा आवडली असेल तर comment नक्की करा....
परत भेऊया नवीन कथेसोबत, तोवर स्टे कनेक्ट
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...



Post a Comment

0 Comments