आवडती नावडती... द अदर वुमन -भाग १

 आवडती नावडती... द अदर वुमन -भाग १




"मनू, आता झोपं ना बाळा!"
"मम्मा, आज स्टोरी सांग ना... त्या राज्याची, ज्याला दोन राण्या होत्या."
"कुठली गं? आवडती आणि नावडती राणी असलेली का? "
"हो, तीच! मग मी नक्की झोपेन. "
"बरं... पण ही शेवटची कथा हं! सारखं काय गं तुला कथा हवी झोपताना?"
“मम्मा, ही प्लीज सांग ना...”
अरुणाने मोठा सुस्कारा सोडला आणि ती गोष्ट सांगू लागली, "आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. न्यायी, गुणी, सत्यवचनी आणि प्रजाजनांमध्ये अतिशय प्रिय. त्याच्या राज्यात सुख, समृद्धी आणि शांतता नांदत होती. राजाला दोन राण्या होत्या. पण त्या दोघींमध्ये एक मोठा फरक होता... एक राणी होती आवडती आणि दुसरी होती नावडती.
आवडती राणी दिसायला अतिशय सुंदर, नाजूक आणि बुद्धिमान होती. तिला कला, संगीत, नृत्य यांची आवड होती. ती स्पष्ट बोलणारी आणि आत्मविश्वासू होती. राजाचा तिच्यावर जीवापाड प्रेम होता. तिच्या एका हास्यासाठी तो काहीही करायला तयार असायचा. राजाचा खूप जीव होता तिच्यावर. नावडती राणी मात्र दिसायला अगदीच साधी. रूपानं सामान्य, पण मनानं खूप सुंदर. प्रेमळ, शांत आणि समंजस. ती फारशी बोलायची नाही. मनातलं मनातच ठेवायची आणि मग मनाला कुरतडत राहायची. तिचं राजावर खूप प्रेम पण तो तिच्या प्रेमाला अगदीच भाव द्यायचा नाही. दिवसामागून दिवस जात गेली... राजा प्रगती करत गेला... आणि एक दिवस...
अरुणाने हळूच विचारलं, “मनू बाळा, झोपलीस का? "

"मम्मा, पुढे काय झालं? "
अरुणाची पूर्ण कथा सांगून झाली होती. रमली होती ती त्या कथेत, नकळत तिच्या डोळ्यांसमोर त्या दोन राण्या उभ्या राहिल्या होत्या. सहज मनूच्या कपाळावरून हात फिरवला. तिचे केस कुरवाळले आणि म्हणाली, "मनू... झोपली माझी पोर गं! "
तोच मनू ताडकन उठून बसली आणि मम्माला बिलगली, "मम्मा, तू पप्पाची नावडती राणी का गं?”
तो प्रश्न ऐकताच अरुणाच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात विरलं... तशी मनू रडत म्हणाली,
“ते कधी येतच नाही आपल्या घरी. कधी येणार पप्पा घरी? तू किती सुंदर आहेस... अगदी अप्सरेसारखी! मग तू पप्पांची आवडती का नाहीस.”
मनूच्या त्या निरागस प्रश्नाने अरुणा काही वेळ निशब्द झाली आणि तिने पटकन मनूला कुशीत घेतलं. तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि हसण्याचा निष्फळ प्रयत्न करत म्हणाली,
"मनू, अशी भलतीभलती प्रश्न विचारायची नाहीत हं. आपलं काय ठरलं आहे... मी तुझी मम्मा... आणि तू माझं पिल्लू. एवढं पुरे ना बाळा! मम्माला रडवायचं आहे का आता?”
मनूने लगेच नकारार्थी मान हलवली.
“मग बस... तू मोठी झालीस की सर्व सांगेन तुला. ग काय बरोबर आणि काय चूक, ते तुझं तू ठरव."
अरुणाच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या होत्या. काही प्रश्नांची उत्तरं मुलांना देता येत नाहीत... आणि काही उत्तरं देण्यासाठी मुलांनी आधी मोठं व्हावं लागतं.
मनू गुमान झोपली होती. आईला रडताना तीही पाहू शकत नव्हती. एवढ्याशा वयात जणू तिने स्वतःला आवरायला शिकून घेतलं होतं. ती झोपताच तिचा तो प्रश्न मात्र अरुणाला आतून कुरतडत राहिला.
ती मनातच पुटपुटली, म्हणाली, "कथेतली नावडती राणी तिच्या चांगुलपणामुळे आवडती झाली होती आणि आवडती तिच्या स्वभावामुळे नावडती. पण माझ्या कथेत तर आवडतीही मीच आहे आणि नावडतीही मीच."
ओठांवर एक कडवट हास्य उमटलं होतं...जरा मनाला बरं वाटावं म्हणून अरुणा खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर काळोख दाटला होता... अचानक भन्नाट वाऱ्याची झुळूक आली. खिडकीच्या पडद्यांनी एकदम भरारी घेतली... ते आवरत अरुणा तशीच त्या वाऱ्याच्या वेगाला झेलत होती... आणि कुठूनतरी तिचं आणि सुधीरने एकत्र गायलेलं गाणं तिच्या कानावर पडलं. क्षणभर तिचा श्वास अडखळला. त्या सुरांसोबत कित्येक वर्षांपूर्वीचा तो दिवस, ते क्षण, ते हसू, ती स्वप्नं... सगळंच जिवंत होत तिच्यासमोर उभं राहिलं.
अरुणाची नुकतीच सोडचिठ्ठी झाली होती आणि ती स्वतःच्या गायनाच्या करियरसाठी प्रयत्न करत होती. खूप प्रयत्नांनंतर तिला ही संधी चालून आली होती. सुधीरही त्या प्रोजेक्टमध्ये होता. दोघांनाही एकत्र गाणं म्हणायचं होतं. सुधीरचा वडिलोपार्जित व्यवसाय होता, पण त्याला गायनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सांभाळून तो एक दोन प्रोजेक्ट वर्षातून करायचा. अरुणाचा मात्र हा पहिलाच प्रोजेक्ट होता. स्वतःच स्वप्न जगणं हेच तीच आयुष्ष बनलं होतं. सोडचिठ्ठीनंतर तिच्या घरच्यांनीही तिला फारसं जवळ केलं नव्हतं. समाजाचे प्रश्न, नातेवाईकांच्या नजरा आणि सततची कुजबुज यामध्ये ती अधिकच एकटी पडत गेली होती. मग स्वतःचा निर्वाह करण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तिचा हा आटापिटा सुरू होता. नंतर अवघ्या काही महिन्यानंतर आयुष्याचं वास्तव बदललं होतं. नवऱ्याकडून होणारी मारहा, हुंड्यासाठी होणारी मागणी आणि रोजचा मानसिक छळ याला कंटाळून शेवटी ती त्या नात्यातून मोठ्या हिंमतीने मुक्त झाली. ह्या सगळ्या व्यापात तिच्या मनाला अनेक जखमा झाल्या होत्या पण त्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम मात्र तिच्याच माणसांनी केलं होतं. कुणी तिला अपशकुनी म्हटलं, कुणी हट्टी, तर कुणी तिच्याच स्वभावाला दोष दिला. प्रत्येक शब्द तिच्या मनात खोलवर रुतत गेला होता. कडू बोलणं, अपमान आणि दया दाखवणाऱ्या नजरा आता तिला सहन होत नव्हत्या. म्हणूनच कदाचित... काहीतरी नवीन करायचं, स्वतःला नव्यानं उभं करायचं आणि जगाला नव्हे तर स्वतःलाच सिद्ध करायचं, हा ध्यास तिच्या मनाने घेतला होता. आणि त्या ध्यासाची पहिली पायरी होती... हे गाणं....
गायनाच्या प्रॅक्टिसदरम्यान सुधीरशी तीच ओळख झाली. ओळखीचं मैत्रीत रूपांतर व्हायला फार वेळ लागला नाही. दोघांची आवड एकच होती... संगीत. सुरांविषयीची ओढ, गाण्यांबद्दलचे विचार, शब्दांमधल्या भावना समजून घेण्याची पद्धत... सगळंच कुठेतरी जुळत होतं.
एकत्र वेळ काढणं एकमेकांशी मनसोक्त गप्पा करणं... एकत्र रियाज करणं, तासन्तास गाण्यांवर चर्चा करणं, नवीन चाली सुचवणं, एखाद्या ओळीवरून वाद घालणं आणि पुन्हा त्याच ओळीवर एकत्र हसणं... कधी नकळत ते दोघं एकमेकांच्या आयुष्याचा भाग बनले, हे त्यांनाही कळलं नाही. त्यातल्या त्यात त्यांनी एकत्र गायलेलं पहिलंच गाणं प्रचंड गाजलं. लोकांनी कौतुक केलं, मुलाखती आल्या...अरुणाला आता बरचं काम मिळणार होतं आणि त्या सगळ्या गोंधळात अरुणा आनंदाने भारावून गेली. अरुणाला आता सुधीरसोबत कसं खास वाटत असायचं. तो जवळ असला की तिच्या मनातली भीती कुठल्यातरी कोपऱ्यात जाऊन बसायची.
आणि मग... त्या रात्री अचानक अरुणाच्या घराची बेल वाजली. रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते. तिने घाईघाईने दार उघडलं तर समोर सुधीर उभा होता. चेहऱ्यावर नेहमीचं मिश्कील हसू... हातात फुलांचा गुच्छ आणि काही पिशव्या.
"आत नाही घेणार का? "
अरुणा जरा गडबडली, "हो... हो... या ना. पण माझ्या ह्या छोटश्या खोलीत..."
"खोली लहान आहे गं, तुझं मन नाही ना? मग येऊ का? "
अरुणाही नकळत हसली, "या... "
सुधीरने फुलांचा गुच्छ तिच्यापुढे धरला, तिएन तो स्मित हसत घेतला. अरुणाने समोरची खुर्ची तिच्या ओढणीने झटकली आणि सुधीरसाठी पुढे केली. तिची थोडी तारांबळ उडाली होती, खोलीत इकडे-तिकडे पडलेल्या वस्तू ती घाईघाईने आवरू लागली. तेवढ्यात सुधीरने समोरचा टेबल ओढला. त्यावर व्हिस्कीची बॉटल ठेवली, पिझ्झा बॉक्स ठेवला आणि म्हणाला, “अरु... जरा ग्लास देशील का?”
अरुणाला आज कित्येक वर्षांनी ‘अरु’ म्हणून कुणीतरी हाक मारली होती. भावूक होता होता जरा हळवपण चेहऱ्यावर आलं होतं. त्या एका शब्दाने मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवलेल्या कितीतरी आठवणी हलक्या हलक्या जाग्या झाल्या. डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या. ती शांतपणे दोन ग्लास घेऊन आली.
"काय? कसली पार्टी ? "
"गं, तू माझ्यासोबत दुसरा प्रोजेक्ट करेते आहेस, माझी सहगायिका म्हणून तुझी निवड झाली आहे."
क्षणभर अरुणा काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यांत साचलेले अश्रू आता लपवणं तिला शक्य नव्हतं. त्या भावनिक क्षणाला सुधीरने तिला संभाळलं. अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"अगं... रडतेस कशाला?"
त्या आपुलकी तिचा बांध फुटला. क्षणभर ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून उभी राहिली. आणि त्याने तिला अलगद मिठीत घेतलं. दोन मनांमधलं अंतर मात्र हळूहळू विरघळत होतं. त्या स्पर्शाच्या मनाभोवती उभारलेल्या भिंती त्या स्पर्शाने हळूहळू कोसळू लागल्या. वर्षानुवर्षं काळोखात हरवलेल्या मनाला जणू पुन्हा प्रकाश सापडला होता. अरुणा त्या स्पर्शाच्या उबेत हरवत चालली होती. लग्न होऊनही कधीही न मिळालेला तो पेमळ स्पर्श तिला त्या क्षणात मोहून गेला. जणू दोघेही मिलनाला तयार होते आणि मग क्षण विरघळली त्या व्हिस्कीची धुंदीत. सगळंच त्या रात्री एकमेकांत मिसळून गेलं. मन मनाला भिडलं... आणि दोन आत्म्यांनी एकमेकांच्या सहवासात विसावा शोधला. सारी रात्र कधी सरली, त्यांच्याही लक्षात आलं नाही. पहाटेच्या पहिल्या सोनेरी किरणांमध्ये सगळंच नव्यानं सुंदर दिसायला लागलं होतं अरुणाला. ती उठून खिडकीपाशी जाणार इतक्यात सुधीरने तिचा हात हलकेच पकडला. "अरु... माझं प्रेम आहे तुझ्यावर... माझ्या आयुष्यात राहशील? कायम?"
तीही विरघळली, त्या अबोल्यात नकळत स्वीकार होता तिचा. आयुष्यात पहिल्यांदाच तिला कोणीतरी तिला असं प्रेमाने काही म्हटलं होतं. मग काय सकाळी उगवणाऱ्या सूर्याबरोबर तिच्या आयुष्यातही एक नवीन पहाट उगवली होती...
सकाळचे जेमतेम आठ वाजले असतील, तर सुधीरचा फोन वाजला.
सुधीर ने खूपच गडबडीत उचलला, "हा बोल सरिता... मी ना, जरा कामानिमित्य बाहेर आहे. प्रक्टिसला उशीर झाला गं, मग रात्र स्टुडिओमध्येच काढली. अगं, काही नाही, हा बघ निघतोच आता... मुलांना शाळेत सोडतो मी, पोहोचतोच त्या वेळेपर्यंत."
सगळं ऐकून अरुणा काहीशी मंद झाली... तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू विरत गेलं. काही क्षणांपूर्वी ज्या नात्याला ती मनापासून खरं मानत होती, त्याच नात्याच्या पायाखालची जमीन अचानक सरकली होती. कॉल संपला आणि सुधीर अगदी सहजपणे मोबाईलमध्ये काहीतरी पाहू लागला. अरुणा मात्र त्याच्याकडेच पाहत राहिली. तिच्या ओठांवर शब्द आले, पण आवाज मात्र आत कुठेतरी अडकून राहिला. शेवटी तिने कसाबसा विचारलं,
"सुधीर... तुझं लग्न झालेलं आहे?"
तो अगदी सहजपणे म्हणाला,"हो, दोन मुलं आहेत मला. फार गोड आहेत." आणि तो मोबाईल बघण्यात गुंगंही झाला. पण अरुणाच्या आत मात्र त्या चार शब्दांनी वादळ उठलं होतं.
ती थरथरत बोलली,"अरे... तू मला सांगितलं पण नाही काही आणि मी तुझ्यात वाहवत गेले रे.. काल रात्री..."
शेवटचे शब्द तिच्या ओठांवरच विरले... पुढे ती निशब्द झाली.
सुधीर स्वतःचा शर्ट घालत अगदीच सहजपणे बोलला, "अगं, तुला माहित नव्हतं का? मला वाटलं, तुला माहित असेल... आपल्या प्रोजेक्टमध्ये सर्वांना माहित आहे... आणि असू दे आता माहित झालं ना! चल, मी निघतो.. भेटू संध्याकाळी, आज प्रॅक्टिस आहे, लक्षात आहे ना?"
त्याच्या आवाजात ना अपराधीपणा होता, ना संकोच. जणू काही घडलंच नव्हतं. जाताना सुधीरने अरुणाला गच्च मिठी मारली. सर्व अगदीच बिनधास्त बोलून तो निघून गेला. आणि अरुणा जागीच उभी राहिली. काही क्षण ती दाराकडे निर्विकारपणे पाहत राहिली. तिच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली होती, पण एकही विचार धड आकार घेत नव्हता.
काल रात्रीचं सगळं एखादं स्वप्न होतं असचं तिला वाटतं होतं. तिचं मन त्या सत्यावर विश्वास ठेवायलाच तयार नव्हतं. काल रात्री ज्या माणसाच्या कुशीत ती स्वतःला विसरून गेली होती, तो कुणाचातरी नवरा होता. दोन मुलांचा बाप होता. आणि हे सत्य तिला आज सकाळी, इतक्या सहजपणे कळलं होतं…
पुढील भाग गुरुवारी पेजवर नक्की वाचा...
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ... @topfans @followers

Post a Comment

0 Comments