द अदर वुमन - आवडती नावडती... भाग २
भाग १ - आवडती नावडती भाग १
आधीच्या भागाची लिंक पहिल्या कमेंटमध्ये आहे.
अरुणा अजूनही धक्यात होती. दिवसभर विचारांचे वादळ मनात आदळत राहिले. रात्री घडलेला प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर उभा राहत होता. जे घडलं ते स्वप्नं होतं की काय हा विचारही तिला सोसवत नव्हता...शेवटी स्वतःला सावरलं आणि सगळं इथेच विसरायचं ह्या विचारात तिने कसं बसं स्वतःला आवरलं, अनेकदा स्वतःला समजावलं. आणि संध्याकाळी ती तयार झाली आणि प्रॅक्टिससाठी स्टुडिओत पोहोचली.
सुधीर आधीच पोहचला होता. काहीतरी गुणगुणत मोबाईल बघत बसला होता. दोघांची नजरानजर झाली आणि तो स्मित हसला. ती एका कोपऱ्यात बसली तसा तोही अलगद तिच्या शेजारी येऊन बसला. अरुणाच्या छातीत पुन्हा एकदा धडधड सुरू झाली. सुधीर हळूच तिच्या हातांना हात लावत म्हणाला, “कशी आहेस?”
तिने क्षणात हात जरा बाजूला केला. उत्तर दिलं नाही. मग तो म्हणाला, "सुंदर दिसते आहेस तू, तुझा हा गव्हाळ रंग अगदीच मोहात पाडतो मला."
तिने अजूनही काही प्रतिक्रिया दिली नाही. स्टुडिओत काम करणाऱ्या नजरा मात्र त्यना बघत होत्या हे तिच्या लक्षात आलं होतं. तिचं मन अजूनच गोंधळलं, मनात अपराधीपणाची एक बोचरी सल उठत होती. आपण एका विवाहित पुरुषाच्या इतक्या जवळ आलो आहोत ही भावना तिला मनातच खात होती. सुधीर मात्र नेहमीसारखाच बिनधास्त होता, तिला बघत हळूच त्याने हात धरला, " अरु... हे नक्षीदार डोळे किती घायाळ करतात जाणू... तुला काय माहित...? अख्खी रात्र घालवावीशी वाटते ह्या डोळ्यांसमोर."
"सुधीर हात सोड!”
“अरु... असं काय करतेस? काय झालं? माझं काही चुकलं काय गं?”
तिने स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला, “तुझ्या हातात आधीच दुसऱ्याचा हात आहे.... सुधीर... माझं अजून ओझं वाढवू नकोस. आधीच तुटलेल्या नात्याचं ओझं वाहते आहे मी... अजून जवळ नको येऊ."
"हे काय बोलतेस तू? माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर..."
आणि सुधीरने तिचा हात आणखीनच घट्ट पकडला.
"सुधीर दुखतोय हात माझा, सगळे बघत आहेत...प्लीज... सीन क्रिएट करू नकोस."
"अगं, सॉरी... पण तू अशी नको ना बोलू... किती मस्त फील होतं मला तुझ्यासोबत."
तेवढ्यात म्युझिक रूम मधून बोलावणं आलं आणि दोघेही आत गेले. अरुणाने डोळे मिटले.
क्षणभरापूर्वीचं सगळं मनातून बाजूला सारलं. आणि अगदीच मनातून गाण्याच्या शब्दा नी शब्दाला मान दिला. शब्दागणिक ती गाण्यात विरघळत गेली. टेक एकदम परफेक्ट झाला होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण अरुणाच्या मनात मात्र अजूनही वादळ सुरू होतं... कौतुक झालं आणि सगळे रमले त्यांच्या कामात. तेवढ्यात अरुणाने पर्स उचलली आणि सधीरला चुकवत ती स्टुडिओच्या बाहेर निघाली. बराच वेळ सुधीरला ती स्टुडिओच्या आवरत दिसली नाही. तिला तो शोधत राहिला आणि मग तोही तिच्या खोलीकडे निघाला.
अरुणा घरी पोहचली होती. दार लावताच तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. ती सरळ जमिनीवर बसली आणि रडू लागली. इतकी रडली की डोळे लालभडक झाले होते. नाकातून शेंबूड वाहत होता. डोकं ठणकत होतं. छातीत धडधड सुरू होती. जरा गरगरल्यासारखं होत होतं तिला. तेवढ्यात बाहेर गाडी येऊन थांबल्याचा आवाज आला. अरुणाच्या अंगावर काटा आला. पडद्याच्या फटीतून तिने बाहेर पाहिलं. सुधीरची गाडी घराबाहेर बघून क्षणात तिच्या छातीत धस्स झालं. दाराला पाठमोऱ्या शरीराने टेकून ती उभी होती. अंगात ताप भरला होता... भर उन्हाळ्यात तिला थंडी वाजत होती. हात थरथरत होते. मनात विचारांचा महापूर उसळला होता. तोच दारावर थाप पडली, "अरु, दार उघड!"
"नाही... तुम्ही निघा... मला बरं नाही ."
"मी डॉक्टरला बोलवू का? तू स्टुडीओमधूनही लवकर आलीस."
"नाही... तुम्ही निघा...प्लीज"
"अरु, दार उघड आधी. बोलायचं आहे मला."
अरु आधीच घाबरली होती. अजून आवाज झाला तर शेजाऱ्यांची दारं उघडायला वेळ लागणार नव्हता. भीतीने तिने दार उघडलं, "प्लीज, निघा तुम्ही. मला नाही बोलायचं तुमच्याशी, आणि इथे येत जाऊ नका ह्यापुढे, बरं दिसत नाही ते."
सुधीरने तिचे जोडलेले हात धरले, आणि काही क्षणात त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला, "तुझं अंग किती तापते आहे, मी आत्ता डॉक्टरांना फोन करतो." आणि त्याने लावलाही.. अरुणाच्या नाही-हो मध्ये डॉक्टर तिथे येऊन पोहोचले. अरुणाला स्वतःवरच राग येत होता. सगळं नकोसं वाटत होतं. तपासणी करून डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आणि स्पष्ट बेड रेस्ट सांगितली. आणि कारण काय तर मानसिक थकवा आणि आजवरची दगदग तिला पुरेसी होती ह्या परिस्थितीत येण्यासाठी. मग काय, सुधीरचा सर्व मुक्काम आता तिच्या घरी होता. तो तिची सर्व काळजी अगदीच मनातून घेत होता आणि ती हे सर्व बघून काहीशी कासावीस झाली होती. मनातले अनंत विचार कुठेतरी बदलत होते की काय ह्या विचारातही तिला अस्वस्थ वाटत होतं. पण सुधीरने तिला त्या काळात कसलाही त्रास दिला नाही. ती पूर्ण बरी होईपर्यंत तो तिकडे थांबला. आणि ज्या दिवशी अरुणा स्वतःच्या पायावर उभी राहून स्वयंपाकघरापर्यंत चालत गेली... त्या दिवशी सुधीरने शांतपणे आपली बॅग उचलली. आणि निघून गेला. सुधीरचं हे रूप अरुणाला का कुणास ठाऊक पण भावलं होतं. त्यात अरुणाच्या मनात त्याच्या बद्दल आदर वाढला असला तरी तिच्या मनात तिच्या नात्याबद्दल सलही वाढत होती.
महिने उलटून गेले. सुधीरने तिला बराच वेळ दिला. दोघांत भेट नव्हती. अरुणा सावरली होती पण मनात अवघडलेली असायची. त्या दिवशी ती अचानक स्टुडीओ बाहेर सुधीरला भेटली आणि तिच्या काळजात परत धडकी भरली.
"हे किती दिवसांनी बघतोय तुला, चल कॉफी घेऊ सोबत. तुझी हरकत नसावी?"
नकळत होकार देत अरुणा सोबत निघाली, कॉफी घेत असतांनाच सुधीर तिला म्हणाला, "मला तू खूप आवडतेस गं. तुझ्यासोबत असताना मला कसं मनमोकळं वाटतं माहितीय? माझ्या प्रत्येक टेन्शनचं उत्तर तुझ्या एका शब्दात सापडतं. तू जवळ असलीस की आयुष्य जरा सोपं वाटायला लागतं."
अरुणाने तिची खाली असलेली नजर एकदम त्याच्यावर रोखली, तसा तसा तो लगेच हसत म्हणाला, “म्हणजे मला असे वाटते, आता जे वाटते ते बोलायला हरकत काय? हो, माझं लग्न झालंय सारीकाशी पण प्रेम नाही ना तिच्याशी. ते तुझ्यावर आहे माझं, आणि काय गं प्रेम असणं म्हणजे लागलीच लग्न करायला हवं काय? तू आणि मी चांगले सहमित्र म्हणून नाही राहू शकत? तुझी सोबत आवडते मला आणि मला माहित आहे, तुलाही मी आवडतो."
अरुणाने नकळत परत नजर खाली घेतली, "पण, तुमच्या बायकोला कळलं तर... तुम्हाला काहीच वाटत नाही का?"
सुधीरने सहज खांदे उडवले, "कळणार कसं? ती मुलामध्ये फार गुंग असते, माझी तिला पर्वाही नसते गं. तिला राजवाड्यात राणी म्हणून राहायचं आहे नुसतं. मी आहे की नाही, त्याने फारसा फरक पडत नाही तिला."
अरुणा ऐकत शांत होती. तर तो पुढे बोलला, "आणि काय गं तू लग्न केलं होतंस ना? टिकलं नाही ना ते. लग्न म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसतं. कधी कधी तेच सगळ्यात मोठं बंधन होतं. लग्न ना सर्व गोष्टीचा इलाज नसतो. बंधन कशाला हवं. तुही मोकळी आणि मीही."
अरुणाला हे सगळं मनात खटकलं असलं तरी पटलंही होतं. पण त्याचवेळी तिच्या आतला एकटा पडलेला, प्रेमासाठी तहानलेला भाग त्या शब्दांना धरून बसला होता. दिवसामागून दिवस जात गेले. विचार आता रोजचा झाला होता आणि मग हळूहळू ती समीरमध्ये गुंतत गेली. दोघेही सोबत राहायचे, फिरायचे, आवडी निवडी एकचं होत्या मग मस्त जमायचं त्याचं. अरुणाला प्रेमासाठी अधीर असलेला तिचा मनातला कप्पा पूर्ण वाटत होता आणि सुधीरला ती हवी होती...
त्या दिवशी शनिवार होता, मॉलमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. सुधीर त्याच्या बायको मुलांसोबत मॉल मध्ये फिरत होता. अरुणा काही खरेदीसाठी आली होती. हातातल्या पिशव्या सांभाळत ती एस्कलेटरकडे वळली आणि अचानक तिची नजर समोर गेली... ती दचकली, जणू चोरी पकडल्या गेल्यासारखी ती गोंधळली, सैरभैर झाली.
सारिका, सुधीरची बायको त्याच्यासोबत होती. उंच, अगदी बारीक. अंगावर महागडी साडी होती, पण तिच्या कृश शरीरावर तीही फिकी वाटत होती. चेहऱ्यावर थकव्याच्या रेषा होत्या. डोळ्यांखाली काळी वर्तुळं. कपाळावर कायमची चिंता कोरल्यासारखी आणि मनात कदाचित शंकाही. अरुणाची सुधीरशी नजरभेट होताच सारिकाने सुधीर कडे बघितलं आणि सुधीरने असे भाव चेहऱ्यावर आणले की तो अरुणाला ओळखतही नाही. लगेच मुलांकडे वळला आणि काहीच घडलं नाही अशा सहजतेने पुढे निघून गेला. तेवढ्यात अरुणा लपल्या सारखी बाजूला एका खांबामागे सरकली. दूर उभी राहून ती त्यांच्याकडे पाहत राहिली. आपल्याला सुधीरने ओळखही न दाखवल्याच तिला वाईट वाटलं. मग एक नजर तिची परत सारीकावर पडली, तिला बघताच स्वतःला दोषी समजून हळहळली ती. आपण चुकीचं वागतोय हे तिला बोचत होतं, सारिकाकडे बघून तिला सुधीर कदाचित त्रास देत असावा असचं काहीस तिला वाटलं. आणि अचानक तिच्या मनात अपराधीपणाची लाट उसळली. मनात वाटलं, "ही स्त्री माझ्याबद्दल काहीच जाणत नाही... तिला काहीच माहिती नाही...आणि तरीही तिच्या आयुष्यात मी आहे...सुधीर सांगायचा तशी सारिका खरंच नाही...”
आणि स्वतःच्या बाजूने आपण हे सर्व थांबवावं असा तिने मनोमन निर्णय घेतला कारण प्रेम कधीच दुसऱ्या स्त्रीच्या अनभिज्ञ वेदनेवर उभं राहू शकत नाही असे तिला वाटत होते.
घरी आल्यावर अरुणा बराच वेळ शांत बसून राहिली. मन मात्र स्वस्थ बसत नव्हतं.
घरी आली विचारात स्वतःला खूप वाईट बोलली, राहून राहून तिला सारिका आठवत होती. राहून राहून सारिकाचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. तिचं ते नवऱ्याच्या प्रत्येक शब्दाला मान डोलावणं... त्याच्या मागे मागे फिरणं... काहीसं स्वतः मधेच राहणं... हे सगळं अरुणाच्या मनाला कुरतडत होतं. नकळत तिने स्वतःची आणि सारिकाची तुलना करायला सुरुवात केली. सुधीरसोबत असताना आपण कसं वागतो... आठवून तिला सारिकासाठी खूप वाईट वाटत होतं. टीपटिपलेल्या डोळ्यांनी ती खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. बाहेर अंधार गडद होत चालला होता. आत मात्र तिच्या मनात विचारांची गर्दी वाढत होती. ती स्वतःशीच पुटपुटली,
"मी आवडती असूनही माझी ओळख आज समाजासमोर नाकारली, आणि ती नावडती असूनही त्याच्यासोबत पत्नीच्या हक्काने उभी होती. माझ्या समोर त्याने तिला जवळ घेतलं आणि मला ओळखलंसुद्धा नाही, आणि आम्ही दोघीही अवघडलो, ती त्याच्या कुशीत आणि मी लपून. कोण चुकलं माहित नाही. ‘ती’ ,‘मी’ की आमच्यातला 'समजूतपणा'? ज्याला आम्ही प्रेम समजत राहिलो? "
विचारत पहिल्यांदाच तिने सुधीरला गमावण्याची भीती न बाळगता... स्वतःला गमावण्याची भीती अनुभवली होती.
आणि फोन वाजला, "अरु सॉरी, मुलं होती गं सोबत... "
"हो... ठीक आहे... पण माझी मी कळली आज मालच."
"काय..? "
"असुदे... "आणि तिने फोन पुढे काहीही न बोलता ठेवला.
सुधीरने परत फोन लावला तिने उचलला नाही. त्याने मेसेज करून ठेवला. काही दिवस प्रक्टिस नव्हती आणि सुधीर कामात व्यस्त झाला होता. त्यात त्याच्या वडिलांचं आजारपण वाढलं असल्याने त्याला अरुणासोबत वेळ घालवायला मिळत नव्हता. फोनवर नुसती विचारपूस असाची. अरुणाही नंतर बरेच दिवस कुठेच गेली नाही, आणि सुधीरही महत्त्वाच्या कामासाठी अमेरिकेला गेलेला मग भेटीही नव्हत्या. आणि महिनाभर शांतता त्यांच्या मध्ये स्थिरावली. दरम्यान, अरुणाच्या आयुष्या नव्याने सुरु करण्याचा निर्णय घेतला, तिच्या गायनकौशल्यामुळे तिला एका नावाजलेल्या शाळेत नोकरी मिळाली. नवीन ठिकाणी राहायला गेली. जरा नवीन खुमारी शिरली होती तिच्यात. शाळा, मुलं, नवीन लोकं, होणारी गायनाची स्तुती सगळं कसं तिला भूतकाळ विसरायला लावणारच होतं.
त्या दिवशी तिला शाळेसाठी निघायला जरा घाईच झालेली, मळमळतही होतं, ताप आल्यासारखं वाटत होतं, आरशात बघितल्यावर कोमेजलेला चेहरा खूप काही बोलून गेला तिला. ठरवलं, शाळेतून येतांना डॉक्टरकडे जाऊन यावं. परत घेरी येताना ती डॉक्टरकडे गेलेली... आणि मग डॉक्टरांनी हसत तिच्याकडे पाहिलं.
"काँग्रॅच्युलेशन्स, अरुणा. तू आई होणार आहेस, तीन महिने झालेत, उद्या मिस्टरांना घेऊन ये, पुढच्या सगळ्या गोष्टी त्यांनाही समजावून सांगते."
"डॉक्टर! कसं? "
डॉक्टर मात्र हसल्या, “अगं हो, काळजी घे. स्वतःची आणि बाळाची."
दवाखान्याबाहेर पडताना तिचे पाय थरथरत होते. अरुणाला पहिल्यांदा आनंदच झालाच नाही. असंख्य प्रश्न डोक्यात घोंघावू लागले. पण दवाखान्यापासून तर घरी पोहचेपर्यंत त्या अनामिक जीवासाठी मनात माया उमलू लागली. घरी येताच तिने कपाटात बंद करून ठेवलेला सुधीरचा फोटो काढला आणि त्याला न्याहाळत बसली, "सुधीरच नाक खूप मोठं आहे आणि गोरा आहे तो. माझं पिल्लू नेमकं कसं असणार? माझ्यासारखं? छे... माझी तर बोटं पण छोटी आहेत... पण... सुधीर म्हणतो नेहमी की मी गव्हाळ रंगाची त्याच्या लाडाची राणी आहे पण....मुलगी झाली तर....रंग माझा नकोच..”
मग क्षणभर ती थांबली आणि मग हसत म्हणाली, “कशीही असू दे... माझी असेल. सुधीरला सांगू? हम्म...तो आला असेलं का अमेरिकेतून.. आलाय, मीचं मागे त्याचे फोन उचललेल नव्हते. वेडीची आहे मी."
मनातल्या मनात हजारो स्वप्नं रंगवत तिने मोबाईल हातात घेतला. आता तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी बातमी ती त्याला सांगणार होती...
पण...
सुधीरची प्रतिक्रिया नेमकी काय असेल?
तो या बाळाला स्वीकारेल?
की अरुणाचं आयुष्य पुन्हा एका अनपेक्षित वळणावर येऊन उभं राहील?
वाचा पुढील भागात... सोमवारी... तोवर स्टे tune …
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
@followers @topfans
See less
0 Comments