द कमबॅक... एक होती भिंगरी... भाग १
ती रुपाची राणी...
तो प्रेम दिवाना...
ती प्रतीशोधात पेटणारी..
आणि तो कायद्याचा पुजारी
एक होती भिंगरी... एक होती भिंगरी... तिचं नाव झिंगरी.... एक होती भिंगरी!
<<>>
“अंकित जाधव रिपोर्टिंग सर!“
“सीट इन्स्पेक्टर अंकित. आजपासून तुम्हाला तेंडोली पोलीस स्टेशनचा एरिया बघायचा आहे.”
“येस सर!”
अंकितच्या आवाजात ठामपणा होता. ऑफिसरने काही फाइल्स अंकितकडे सरसावल्या,
“हॅव अ लुक, इन्स्पेक्टर.”
अंकित त्यांना चाळत होता, कागदावरचे शब्द डोळ्यांसमोर होते…आणि तो कुठेतरी मागे हरवला. त्याच्या कानात त्याच्या आईच्या रडण्याचा आवाज घुमू लागला होता. नंतर त्याला त्याच्या बाबांचं शव दिसलं. त्यांना अग्नि देताना तो दिसला आणि मग आईचं त्याच दिवशी जाणं त्याला पोरकं करवून गेलं होतं. अंकित गुंग होऊन फाइल्स बघत राहिला. तोच ऑफिसरने आवाज दिला,
“इन्स्पेक्टर अंकित, आर यू ओके?”
“येस सर! तेंडोली पोलीस स्टेशनचा एरिया दिल्याबद्दल धन्यवाद!”
ऑफिसर आता उठून त्याचा जवळ आले, “अंकित मी तुला लहानाचा मोठा होतांना बघितलं आहे. आज तुला ह्या गणवेशात पाहून अभिमान वाटतोय… तू तुझ्या वडिलासारखा दिसतोस. फक्त चेहऱ्याने नाही… डोळ्यांतली तीच आग आहे तुझ्यात.”
अंकितने हळूच प्रश्न केला, “सर एक विचारू.... बाबा?”
तो काहीच पुढे बोलला नाही पण प्रश्न ऑफिसरला कळला होता. ते लगेच म्हणाले, “तुझे वडील प्रामाणिक होते. इतके प्रामाणिक, की त्याची किंमत त्यांना जीव देऊन चुकवावी लागली. एका गुंडाने… ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला… त्याने विश्वासघात केला आणि ठार मारलं. आम्ही...”
क्षणभर ते थांबले, दीर्घ श्वास घेत म्हणाले, “आम्ही काहीच करू शकलो नव्हतो तेव्हा. आणि आजही तो गुंड समाजात वावरत आहे. तेंडोलीशी तुझं नातं जुनं आहे. तेव्हां भावनेत भरकटून तू काही चुकीचं करू नये हीच अपेक्षा आहे माझी. हे बघ आपल्याला फक्त एका माणसाला पकडायचं नाही आहे.
आपल्याला हे संपूर्ण जाळं तोडायचं आहे.”
त्यांनी टेबलावर पडलेल्या नकाशावर बोट फिरवलं.
“ह्या गोव्याच्या किनाऱ्यापासून… मुंबईच्या बंदरापर्यंत… आणि कदाचित ह्या समुद्राच्या पारही हे जाळं असेल. तस्करी, खंडणी, सुपाऱ्या, मानवी व्यापार… ह्या सगळ्यांचा गुंता इथेच कुठेतरी एका धाग्याने जोडलेलं आहे.”
अंकित लक्षपूर्वक ऐकत होता.
“ह्या भागातले काही कुख्यात गुंड काळाच्या ओघात नष्ट झाले… अशी नोंद पोलीस खात्यात आहे. काही
फाईल्स बंद झाल्या. प्रकरणं संपली. लोक विसरले. पण मला आजही शंका आहे, ही गुंड समाजात वावरत आहेत!”
ऑफिसर अंकितच्या अगदी समोर येऊन उभे राहिले. “आणि मला वाटतं…
तुझ्या वडिलांच्या मृत्यूचं उत्तरही ह्याच जाळ्यात लपलं आहे. ह्या फाइल्समधेच कुठेतरी तुला धागेदोरे मिळतील...”
अंकितने त्या फाइल्सच्या गाठ्यातली एक फाइल उचलली, ती बघताच ऑफिसर म्हणाले,
“धिस इज वेरी हाय प्रोफाइल केस, ह्यातला तरुण कदाचित उगाच ह्यात अडकला आहे. आणि मुख्य अपराधी कुणी वेगळाच आहे. पण... पुरावा अपुरा पडला इथे आणि बिचारा उगाच अडकून पडला आहे.”
अंकितने फाइल बघितली आणि म्हणाला, “मला इथून काम सुरू करायचं आहे. तेंडोलीचे धागे दोरे मला इथे सापडतील तर.”
“हा तरुण ठाण्याच्या कैदेत आहे.”
“सो, आधी मिशन ठाणे, मग तेंडोली!”
“ओके, अॅज यू विश, ऑल द बेस्ट! आणि काळजी घे. मी तुझ्यासोबत एक ऑफिसर म्हणून आणि तुझा काका म्हणून नेहमीच आहे. तुझ्या समोरून नाही पण माझी नजर असेल तुझ्यावर.”
“जयहिंद सर!!”अंकित रुबाबात ठाण्याकडे रवाना झाला.
अंकित... ज्याच्यासोबत तेंडोलीत एक इतिहास जोडला गेला होता. तो इन्स्पेक्टर अरविंद जाधवांचा मुलगा होता. एकेकाळी तेंडोलीत गुंडांचं राज्य होतं. गल्लोगल्ली त्यांची दहशत, लोकांच्या चेहऱ्यावर भीती, आणि पोलिसांवर अविश्वास पसरला होता.
अश्यातच इन्स्पेक्टर अरविंदनेची तिथे बदली झाली आणि त्यांनी गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. जवळपास गुंडांना तेंडोलीमधून सळो की पळो करून सोडलं होतं त्यांनी. काहींना जेलमध्ये टाकलं, काहींना गाव सोडायला भाग पाडलं, तर काहींनी स्वतःला पालीसांच्या ताब्यात दिलं. आणि मग एका शरण आलेल्या गुंडाच्या बोलण्यात भावनिक फसले आणि त्यातच त्या गुंडाने त्यांना गोळ्या झाडून यमसदनी पाठवले होते. अंकित तेव्हा दहा वर्षाचा होता, वडिलांच्या मृत्यूची केस त्या वेळी पुरावे आणि पोलीस खात्याने पाठ फिरल्यामुळे बंद झाली होती. आईही राहिली नाही आणि अंकित कसाबसा मामा कडे राहून मोठा झाला. दिवस-रात्र एक करून स्वतःला घडवलं. त्याने पोलिसात जाण्यासाठी कसून मेहनत घेतली. त्याच्यासाठी पोलीस होणं हे केवळ करिअर नव्हतं. ती त्याची प्रतिज्ञा होती.. इन्स्पेक्टर अंकित जाधव, हा त्याचा फक्त पोलीस खात्यात प्रवेश नव्हता… हा त्याचा कमबॅक होता. वडिलांच्या हत्याऱ्यांना शिक्षा… आणि वडिलांचा हरवलेला सन्मान परत मिळवून द्यायचा होता त्याला.
<<>>
विस वर्षा आधी....
जयंतला जाऊन आज वर्ष झालं होतं. जयाने घरच्या दरवाज्यावर टांगलेले त्याचा फोटो अलगद काढला आणि त्याला पदराने धूळ पुसत होती. हात थरथरत होते आणि डोळ्यात पाणी दाटलं होतं. आणि तिच्या डोळ्यांसमोर मात्र पुन्हा तोच दिवस उभा राहिला…
तिच्या साठी तो काळा दिवस होता. सकाळपासून जयंत कुठेच सापडत नव्हता आणि मग गावात एकच गोंधळ उडला. कुणीतरी तिला येऊन सांगितलं, “जयंत सापडला, गावाबाहेर विहिरीत...”
जया वेड्यासारखी तिकडे पळाली. गावानजीकच्या जुन्या विहिरीभोवती लोकांची गर्दी जमली होती. पोलिस गावात पोहचले होते. दोरखंड टाकून काही माणसं आत उतरली होती. विहिरीतून जयंतचं शरीर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
जया विहिरीच्या कडेला एकतार शून्यात बघत उभी होती. जसं तिने जयंतला विहिरीच्या कडेवरून थोडं पाहिलं ती ओक्साबोक्शी रडू लागली होती. महिला पोलीस तिच्या जवळ उभ्या होत्या आणि तिच्याकडून माहिती घेत होत्या. पण तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं, तिचं जग तिथेच विहिरीत बुडालं होतं.
दोन वर्षाच्या भावनाला अरुण मांडीवर घेऊन बसला होता. तिच्या हातात भाकरेचा तुकडा होता, नाकातून वाहणारा शेंबूड हाताच्या पाठीने पुसत ती निवांत तो खात होती.
भिरभिर बघणारा पाच वर्षाचा अरुण तिला आईकडे जाऊ देत नव्हता. काही वेळात जयंतची बॉडी विहिरीतून बाहेर काढल्या गेली. बॉडीवर जखमा दिसत होत्या पण पंचनाम्यात आत्महत्या म्हणून नोंद झाली होती. जया ओरडून सांगत होती, “तपास करा… साहेब, तपास करा… अरुण्याचे बापू असं काही करणार नाही... आत्महत्या नाही साहेब...”
तशीच ती भानावर येत ओरडली... “अरुण्याचे बापू…!” तिचा तो आवाज तिचा आवाज आभाळ फाडून गेला. जया सारं काही आठवून हंबरडा फोडून रडू लागली, "काहून असं केलं तुमी, अन् कराच होतं त आमालेबी सांगत्या न, चारही जीव जावून पडलो असतो त्या विहिरीत, आपल्या चौघालेबी चांग्ल्यान डूबवलं असतं पाण्यात, विहीर माय न."
ती हुंदके देत खाली बसली. हातातला फोटो थरथरत होता. तिचे अश्रू फोटोवर पडत होते.
ती बडबडत होती, “ लोक म्हणतत, तुमी विहिरीत उडी घेतली… पण म्या ओळखते तुम्हाले.
तुमी असे हार मानणारे नव्हते. काहीतरी झालं होतं… कुणीतरी तुमच्यावर डाव खेळला…
आणि म्या… म्या अडाणी काहीच करू शकली नाही…”
तिने कपाळ फोटोवर टेकवलं. घरात तिच्या रडण्याचा आवाज घुमत राहिला.
सहा वर्षाचा अरुण मायले बघून कसासा होत होता. त्याच्या लहानशा मनाला अजून काहीच समजत नव्हतं— बापू गेले, हे कळलं होतं… पण आईला कसं आवरावं हे त्याला नाही उमगत होतं. जवळच त्याची तीन वर्षाची लहान बहिण भावना आईकडे टुकू टुकू बघत पोळी साखरेच्या पाण्यासोबत खात होती. मायला असं रडताना पाहून तिच्याही डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळले आणि हातातली भिंगरी सुटली. केविलवाण्या नजरेने ती कधी बापाच्या फोटोकडे बघायची, तर कधी हंबरडा फोडून रडणाऱ्या मायकडे तर कधी तिला भिंगरी उचलावी वाटत होती.
आजच्या दिवशी तरी पोरांनी पोटभर जेवावं म्हणून आईने घरी सकाळीच पोळ्या केल्या होत्या. लेकरांना पोळी रोज मिळत नव्हती... कसेतरी दिवसं ढकलले जायचे. दिवस ढकलले जायचे.
पंचनाम्यात स्पष्ट नमूद होतं, ‘जयंतने न पाहावल्या गेलेल्या आर्थिक अडचणींमुळे आणि दीर्घकाळ आजाराने त्रस्त मनस्थितीत आत्महत्या केलेली आहे.’ जयाच्या मनाने ते कधीच मानलं नव्हतं तिने. जयंत असा हार मानणारा नव्हता, हे ती ओळखून होती.
पण… मनाने हे मानलं नसलं तरी आधारासाठी तिने मानलं होतच ना... मग जयाने सुद्धा ते खरं मानलं होतं. गेले बरं झालं सुटले त्रासातून असं म्हणून ती स्वतःला समजवत राहायची. कारण तिला कुठे काय माहित होतं की नेमकं काय घडलं होतं त्या रात्री ते. आणि जाणून तरी काय करणार होती ती. तिचं कुणी ऐकणार नव्हतंच ना! गावातल्या पंचायतीपासून तर पोलीस ठाण्यापर्यंत गुण्या भाईचे माणसं होते. त्याच्या नावाने लोक हळू आवाजात बोलायचे. सत्ताधाऱ्यांशी उठबस करणारा, पोलिसांना खिशात ठेवणारा,गावात त्याचा शब्द म्हणजे कायदा असा तो... आणि गरीब माणसाचा जीव? तो तर त्याच्या दारातल्या धुळीसारखा होता.
गुण्या भाई जेव्हा गावात यायचा, तेव्हा त्याच्या गावाबाहेरच्या मोठ्या फार्महाऊसवर रात्रभर दिवे पेटलेले असायचे. मोठ्या मोठ्या गाड्या गावात धूळ उधळत शिरायच्या, शहरातून आलेली माणसं तिकडे जमायची. दारू, नाच गाणी, आणि… मुली त्याच्या फार्महाऊसवर असायच्या. आणि गावात शांतात पसरायची. गावातल्या बायकांनी तिकडे बघायचंही नाही, असा अलिखित नियमच होता जणू. तो असा शहरातल्या मुली घेऊन मजा मस्ती करायला आला असला की जयंतच मात्र काम तिकडे लागायचं, त्याच्या फोर्महाउसवर ताजी भाजी पोहोचवणं, गावरान कोंबडी नेऊन देणं, कधी दुध, कधी अंडी. पैसे जास्त मिळायचे. आणि गुण्या भाईचा विश्वास होता त्याच्यावर, “जयंत भरोसे का आदमी है…”
असं तो म्हणायचा. मग फार्महाऊसवर काही लागलं, की निरोप थेट जयंतलाच यायचा.
पुढील भाग... लवकरचं...
प्रिय वाचक... ही कथा आधी वेगळ्या पद्धतीने पोस्ट केली होती आता तिलाच वेबसिरीज सारखी लिहिण्याचा प्रयत्न आहे... पात्र अनेक असतील पण सगळी कुठेनाकुठेतरी जुळतील.... तेव्हा स्टे कनेक्ट to #मनातल्या तळ्यात
कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
@followers @topfans
फोटो साभार fb/प्राजक्ता माळी कान्स लूक
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७
तळटीप- माझी प्रत्येक कथा पूर्ण पोस्ट होते. तुमचा एखादा भाग सुटला तर पेजवर येऊन नक्की शोधा, लिंक तुम्हाला मिळेल. किंवा पूर्ण भाग वेबसाईटवर सुद्धा असतात. कधी कधी एखादा भाग टाकायला वेळ लागतो तेव्हा समजून घ्या. तसा लिखाण माझा व्यवसाय नाही. ऑफिस, घर सांभाळून आवड म्हणून मी विषय गुंफते. तुम्ही प्रतिसाद देता आणि माझी लेखणी बहरते. खूप खूप धन्यवाद!!
लेखाच्या/कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव..
.png)
0 Comments