आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ३...
आधीचे भाग
भाग १- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग १
भाग २- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग २
भाग ३- पुढे वाचा
“का गं चेहरा पडला आहे?” सासूबाईने मैत्रिणी गेल्यावर अरुंधतीला विचारलं.
“आई, मला ना एमबीबीएस पूर्ण करायचं आहे हो, आता काही महिन्याने बाळ होईल, तुम्ही आहातच ना... मग अंतिम वर्ष करते ना...” अरुंधती भीतभीतच बोलली.
पण सासूबाई काहीच बोलल्या नाही. तिचं सर्व ऐकून घेत म्हणाल्या,
“एवढंच ना, गाडी तुला सोडायला आणि आणायला जाईल. काय ते कॉलेजचं करून घे आणि बाळ झालं काही महिन्यात सुरु कर. मला काही हरकत नाही.”
तेवढ्यात हॉलमध्ये बसलेले सासरे म्हणाले, “सहावा महिना सुरु आहे. आता कशाला ही धावपळ.”
सासूबाईने पुढे येत उत्तर दिलं, “अहो, गाडीने जाणार आहे ती, त्यात काय, आणि घरात बसून राहिली तर मन अस्वस्थ राहील आणि त्याचा काय तो परिणाम बाळावर झाला तर हो.”
सासऱ्यांना तरीही पटलं नव्हतं पण बायकोसमोर ते काहीच बोलू शकले नाही. संध्याकाळी माधव घरी आला, तेव्हा परत विषय निघाला, सुरवातीला त्याने स्पष्ट नकार दिला. पण मग बाळाला काही होता कामा नये ह्या विचाराने शेवटी नको म्हणत म्हणत.... माधव तयार झाला. एक दोन वेळा कॉलेजात जाऊन तिने सगळी माहिती जमवली. त्या दिवशी ती अंतिम वर्षाचा फॉर्म भरत बसली होती. सहावा महिन्यामुळे तिच्या चेहऱ्यावरच एक वेगळंच तेज खुललं होतं. इतक्यात माधव मागून आला आणि काहीही न बोलता त्याने अलगद तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवली. त्याच्या त्या श्वासांच्या गर्मीत अरुंधती हलकेच शहारली, मागे वळून तिने त्याला हलकीशी मिठी मारली. आणि त्या क्षणी टेबलावर ठेवलेला अंतिम वर्षाचा फॉर्म हळूच घसरत खाली पडला...
---
“अहो, माधव साहेब, हा फॉर्म भरून देताय ना....” माधवच्या कानावर शब्द पडत होते,
“फॉर्म भरून देताय ना.” नर्स ओरडत होती. माधव मात्र अजूनही भूतकाळात हरवला होता.
शेवटी तिने हात लावला, “साहेब, ठीक आहात ना? काय होतंय तुम्हाला?””
तिने सलाईन तपासली. मग ट्रेमधून औषधं काढून त्याच्या हातात ठेवत म्हणाली,
“अहो, औषधं अजून घेतली नाहीत तुम्ही. आधी ती घ्या. डॉक्टर मॅडमनी वेळेवर औषधं द्यायला सांगितलं आहे.”
माधव भूतकाळातून परत आला. तिच्याकडे निर्विकार नजरेने पाहिलं. एक शब्दही न बोलता त्याने औषधं तोंडात टाकली आणि पाण्याचा घोट घेतला. नर्सने फॉर्म त्याच्यासमोर ठेवला, “हे भरून ठेवा. काही अडचण असेल तर मला सांगा.”
ती निघून गेली. पुन्हा खोलीत शांतता पसरली. माधव खिडकीबाहेर बघत होता. औषधांनी शरीराला थोडा आराम मिळत होता... पण मनाला नव्हता. उद्याची सकाळ त्याला कधी उगवतेय असं झालं होतं. कारण उद्या अरु पुन्हा भेटणार होती. पंधरा वर्षांनंतर समोर आलेल्या त्या एका भेटीने त्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली होती. आता त्याचं हृदय प्रत्येक ठोक्यागणिक एकच नाव घेत होतं... “अरु”
इकडे, अरुंधतीने तिच्या मुलाला पिकअप केलं. आजचा दिवस तिच्यासाठी मनाला अस्वस्थ करून गेला होता. सकाळपासूनच अमितच्या आठवणी मनात दाटून आल्या होत्या. त्यात अचानक माधव समोर आला आणि वर्षानुवर्षं भरून आलेल्या जखमांवरची खपली पुन्हा निघून गेली. आणि मनातील कप्प्यांमध्ये पडून असलेल्या त्या जखमा उघड्या पडल्या होत्या. भूतकाळ तिने मागे सोडला होता... पण आज तो पुन्हा अचानक तिच्यासमोर उभा राहिला होता.
गाडी बंगल्याच्या आवारात शिरताच, ती राणे कुटुंबाची सून, अमितची पत्नी आणि मुलांची आई होती. गप्पशी ती घरात शिरली आणि क्षणात तिने स्वतःला सावरलं. हॉलमध्ये शिरताच अवनी, तिची चार वर्षाची लहान मुलगी तिला येऊन बिलगली, “मम्मा आज आजीने खीर केली आहे. आणि तुला सांगू, आजी ना रडत होती तिच्या खोलीत.”
अरुंधतीने तिला लागलीच उचललं, “असं, मग तू काय केलंस?”
“मी तिला पाणी दिलं, अश्रू पुसले. आणि मग आम्ही दोघींनी बागेतली फुलं तोडली, हार तयार केला, बाबांच्या फोटोसाठी. तुला माहित आहे आजीने बाबांना खीर पण दिली... आधी!! ”
“बऱ, बाबांना आवडायची ना खीर म्हणून...”
“हम्म... मस्त झाली आहे. ते कुठे खातात मीच खाल्ली.”
“असं... बरं... आजोबा कुठे आहेत?”
“अज्जू बाबा ना, त्याच्या कविता ऑनलाईन म्हणून दाखवत आहेत. आजी मला जाऊच देत नाही त्यांच्याकडे. म्हणते, 'शो सुरू आहे. मम्मा, तुला सांगू, अज्जू बाबाही रडला आज, मग मी दोघांना सांभाळलं...”
आणि ती हसायला लागली. अरुंधतीने अवनीच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि सासऱ्यांच्या खोलीकडे निघाली. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडाच होता. आत तिचे सासरे कॅमेऱ्यासमोर बसून त्यांच्या कविता सादर करत होते. शो सुरु होता त्याचा मुलाच्या आठवणीमध्ये. अरुंधती शांतपणे जाऊन एका कोपऱ्यात बसली. त्यांच्या प्रत्येक शब्दातून मुलाची आठवण झिरपत होती. शब्दांमधून वाहणारं दुःख ऐकत तीही त्या कवितांमध्ये हरवून गेली.
कवितेंना दाद देत तीही काहीशी रमली. शो संपला आणि संध्याकाळी सर्वांनी मिळून देवघरात पूजा केली. अमितच्या फोटोसमोर दिवा लावला. अमितच्या आठवणीत घर अमितमय झालं होतं.
रात्र झाली. अरुंधतीने सासूबाईंना आणि सासऱ्यांना वेळेवर औषधं दिली. मग अर्थ आणि अवनीलाही गोष्ट सांगत झोपवलं. संपूर्ण घर शांत झालं. आता तिला निवांत मिळाला होता, बॅग मधल्या वस्तू शोधतांना तो तिचा जुना फोटो तिच्या हातात आला, “अरे, हा आता माझा नाही, माधवला परत करायला हवा. उद्या देते... मी कुठे ती ‘अरु’ राहिले आता... अमित मला अरुंधती म्हणायचा... त्याला माझं पूर्ण नावं घ्यायला आवडायचं... म्हणायचा, 'पूर्ण नावात एक वेगळाच रुबाब आहे. आणि तू माझी आहेस, म्हणून मला तुला पूर्ण नावानेच हाक मारायला आवडतं.’ मी त्याची आहे. माधव तर कधीच मागे सुटला. त्याच्या रंगावर पाणी पडलं आणि अमितचे रंग आयुष्यात आले माझ्या.”
नंतर तिने तिच्या आणि अमितच्या लग्नाचा अल्बम काढला. अगदी मोजक्या घरच्यांच्या उपस्थितीत त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं दोघांनी. अल्बमवरून हात फिरवत ती नकळत हसली. त्या अल्बममध्ये अमितला बघून ती परत त्याच्या प्रेमात पडली. नकळत डोळ्यात आसवांनी गर्दी केली, पण अमितचे शब्द कानावर पडले, “अरुंधती तुझ्या डोळ्यात अश्रूंना जागा नाही. आणि जमलेच तर माझ्या डोळ्यातून गळतील....”
जणू अमित जवळपास राहून बोलत आहे असाच अरुंधतीला भास झाला आणि अश्रू कुठे गेले कळालही नाही, बाहेर अचानक त्याच वेळी आभाळ भरून आलं. काळ्या ढगांनी जणू गर्दी केली, आणि काही क्षणांतच पावसाच्या सरी धरणीवर बरसू लागल्या. वाऱ्याच्या वेगाने परदे ताल धरून हलू लागले होते, अरुंधती मनातच म्हणाली, “बघ अमित, अश्रू वाहून गेले रे. आता बघ कसं निर्मळ वाटत आहे.”
हात खिडकीच्या चौकटीवर ठेवत नभाकडे बघत ती मनात हळुवार अमितमय झाली होती. अरुंधतीने ती रात्र अमितच्या आठवणीत काढली. अश्रू गाळणार नाही असं वचन तर तिने अमितला दिलंच होतं. पण आता उरलेलं आयुष्य त्याच्या आठवणीत आणि त्याच्या आणि तिच्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी होतं.
अर्थला तिच्यासारखं यशस्वी सर्जन व्हायचं होतं. त्याच्यासाठी त्याची आई सबकुछ होती. आणि अवनी... तिला तर आजोबांचा पिढीजात वारसाच लाभला होता. अवघ्या चार वर्षांची असतानाच ती छोट्या छोट्या कविता, यमक जुळवलेल्या ओळी आणि भन्नाट गाणी तयार करत घरभर धिंगाणा घालत फिरायची. तिच्या प्रत्येक नव्या कवितेची पहिली श्रोता आजी असायची, तर पहिला चाहता आजोबा. आजोबा आणि तिची भन्नाट गट्टी होती. आता ह्या क्षणाला अरुंधती अवनीची गोष्ट आठवून नकळत हसू उमटलं होतं. समोर ठेवलेल्या अमितच्या फोटोला पाहत, त्याच्या आठवणीत तिचा डोळा लागला.
सकाळी अनवी तिला उठवायला आली, म्हणाली, “लेझी मम्मी विल यू गेट अप?” अवनीचा गोड आवाज कानावर पडताच अरुंधतीने डोळे उघडले. समोर अवनी कमरेवर हात ठेवून उभी होती. मागेच अरुंधतीची सासूही खोलीत शिरली, म्हणाली, “अरुंधती, आज हॉस्पिटलला जायचं नाही का गं? वेळ होईल तुला.” बोलताना त्यांनी तिच्या कपाळाला अलगद हात लावला, “अगं बाई, अंग तर तापलंय तुझं!”
“अहो, इकडे या बरं! पटकन या!” , ती जोरात ओरडली
अरुंधती उठली, “आई काही झालेलं नाही, जरा उशिरा झोपले मी...थोडा थकवा आहे. आता अंघोळ केली की बरं वाटेल. आज काही सर्जरी आहेत, जायचं आहे मला.”
सासरेही खोलीत पोहचले होते, अर्थही त्यांच्या मागोमाग धावत आला, म्हणाला, “मम्मा तो कालचा पेशंट कसा आहे गं? शुद्धीवर आला का? माहित झालं का कोण आहे तो?”
सासरे हसत म्हणाले, “अरे हो! आमची अरुंधती तर काल सोशल मीडियावर हिरो झाली होती. तुझा व्हिडिओ पाहिला मी. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सगळीकडे फिरतोय. काय झालं मग त्या पेशंटचं?
“काही विशेष नाही हो बाबा. दारू पिऊन गाडी चालवत होता. अपघात झाला. काय सहानुभूती त्याच्यासाठी, कशाला प्यायची एवढी.”
बोलताबोलता सासऱ्यांची नजर टेबलवर ठेवलेल्या फोटोवर पडली,
“अरे हा तुझा फोटो काय? तुझ्या सारखाच दिसतोय, खूप जुना वाटतोय, आपल्याकडे नाही हा... हम्म... अमितच्या कलेक्शनमधेही नाही दिसला कधी.”
अरुंधतीने पटकन फोटो सासऱ्यांच्या हातून घेतला आणि टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला.
“अहो बाबा, खूप जुना आहे तो... जाऊ द्या ना. मी आधी तयार होते.”
“आई, आज काय करायचं आहे ते सांगा. पटकन करून निघते मी... आज तुम्हा दोघांनाही हॉस्पिटलला यायचं आहे बरं का! चेकअप आहे.”
बाबा तिला थांबवत म्हणाले, “अगं, थांब ना जरा, आम्हालाही बघू दे. आमची सून कॉलेजमध्ये कशी दिसायची ते. अमित एकदा बोलला होता तू मॉडेलिंग करायची म्हणे.”
तोच अवनी खुर्चीवर चढली, ड्रॉवर उघडला आणि फोटो उचलला. अर्थला दाखवत ती त्याच्यासोबत खोलीतून निघून गेली.
“अवनी, बेटा! अगं तो मला परत करायचा आहे, दे बाळा...” अरुंधती तिच्या मागेच गेली. पण अवनी कुठे ऐकणारी होती!
थोड्याच वेळात सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसले. अरुंधतीने सगळ्यांच्या ताटात गरमागरम पोहे वाढले. घरात नेहमीसारखाच निवांतपणा होता. पण तिच्या मनात मात्र माधवचा विचार अजूनही रेंगाळत होता. ती स्वतःच्या ताटात पोहे वाढत होती, तेवढ्यात सासऱ्यांनी अगदी सहजपणे विचारलं, “त्या पेशन्टच नाव, माधव पंडित ना?”
अरुंधती खाता खाता थांबली, हातातला चमचा प्लेटमध्ये पडला, क्षणभर तिचा श्वासच अडखळला, पण सावरत तिने उत्तर दिले, “हो... माधव पंडित.”
सासऱ्यांनी टेबलावर ठेवलेलं वर्तमानपत्र तिच्यासमोर सरकवलं, “अगं, ही बघ... पेपरमध्ये बातमी आली आहे. 'मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती माधव पंडित गंभीर अपघातात जखमी.'”
अरुंधतीने सहज वर्तमानपत्राकडे पाहिलं.
“हम्म.. हो आहेत ते. आता तेवढं माहित नाही मला त्याच्याबद्दल.”
माधवच नावं उच्चारलं जाताच सासूबाईही येऊन बसल्या. जरा वेळ शांतता होती सर्वांमध्ये. नंतर अर्थ आणि अनवी त्यांच्या खोलीत शाळेसाठी तयार व्हायला निघून गेले. आणि बाबा अरुंधतीला म्हणाले, “अरुंधती, तो फोटो... त्यांच्याकडे मिळाला होता का?”
“हो बाबा, पोलिसांना त्याच्या बॅगत सापडला. ते शुद्धीवर यायचे होते तेव्हा पोलिसांनी माझ्याकडे चौकशी केली होती पण मलाही फारसं काही माहित नव्हतं. मलाही अचानक समजलं सांर की तो माधव आहे.”
सासूबाई तिच्याकडे बारकाईने पाहत होत्या. सासऱ्यांनी पुढचा प्रश्न विचारला,
“मग, बोलणं झालं का त्याच्याशी?”
“काही खास नाही, बसं पेशंट ह्या नात्याने बोलले ना... अजून काय! शुद्धीवर येताच त्याने मला ओळखलं. दोन-चार शब्द बोलला... तेवढ्यात अर्थच्या सरांचा फोन आला. मी निघाले. पोलिसांनाही कळवून आले. त्यानंतर भेट झाली नाही.”
“तसं नाही गं, बोल की... काही हरकत नाही आमची, आम्ही काय तुला ओळखत नाही?”
अरुंधतीने त्यांच्या नजरेला नजर दिली, “आता बोलण्यासारखं उरलं तरी काय आहे?”
तिच्या आवाजात ठामपणा होता...पण डोळ्यांत मात्र भूतकाळाची हलकीशी सावली अजूनही होती. सासूबाईंनी तिच्या हातावर अलगद हात ठेवला. तशी ती म्हणाली,
“बाबा, आई, तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग मला काही कशाचीच गरज नाही. काळजी करू नका. आई, दोन वाजेपर्यंत या तुम्ही. माझ्या दोन सर्जरी आहेत, एक वाजेपर्यंत संपतील. मला निघायचं आहे, मी सोडते अर्थला शाळेत. आई, तुम्ही अवनीला सोडा.”
अरुंधती उठली आणि तयारी करून अर्थला घेऊन निघून गेली. आई बाबा परत घरात एकटे होते. दोघांच्याही मनात विचार शिरला होता पण विषय निघत नव्हता... कारण अरुंधतीचा EX परत आला होता... तिचं पाहिलं प्रेम होतं ते....
भाग 4 पेजवर पोस्ट झाला आहे - इथे वाचा https://www.facebook.com/manatlyatalyat/posts/pfbid02VnRJV3AvDY2QK5UoSkSo3iVsmyLV2mHxopsJJVdThWGcSvvii1JDKpKNTefGqsacl
भेटूया लवकरच पुढील भागात शुक्रवारी.... तोवर स्टे connect to मनातल्या तळ्यात...
आधीचे भाग पेजवर आणि वेबसाईटला आहेत. किंवा लिंक पहिल्या commnetला आहे.
©उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

0 Comments