भाग २- आणि जेव्हा Ex परत येतो...
पहिल्या भागाची लिंक. इथे वाचा- भाग १ आणि जेव्हा Ex परत येतो...
‘अरु’ ह्या हाकेने अरुंधती बरेच वर्षे मागे गेली होती... जी वर्षे ती जवळजवळ विसरली होती... त्या धूसर जगात शिरताना हळूच तिच्या तोंडून नाव निघालं, “मा...माधव...?”
तसा माधव पूर्णपणे जागा झाला, त्याच्यासाठी तर वेळ थांबला होता, समोर त्याची अरु होती. शब्द गोठले होते पण त्याला अरु हवी होती, तो परत बोलला, “अरु... तू माझी अरु... अरुंधती आहेस ना?”
त्या आवाजाने आता अरुंधतीने त्याला ओळखलं होतं, “तू माधव आहेस तर... हो मी अरुंधती आहे. पण तू असा आणि इथे कसा?”
माधवने जरा स्वतःला सावरलं, “हो, मी जरा म्हातारा वाटतोय गं... असा कसां म्हणतेस ते.”
तेवढ्यात अरुंधतीच्या इशाऱ्याने नर्सने त्याला बसायला मदत केली. अरुंधतीही शेजारच्या खुर्चीवर बसली. तिने तो काय बोलला त्यावर लक्ष दिलं नाही आणि म्हणाली, “हे काय आहे माधव, किती लागलं आहे तुला, आणि तू तर अमेरिकेत होतास ना.. आणि...”
“आणि काहीही नाही अरु... हरलोय गं मी... पण तुला असं माझ्या समोर बघून मनाला खूप आनंद झाला. शेवटी मला त्या परमेश्वराने तुझ्या समोर आणलंच...”
अरुंधती त्याचे रीपोर्ट बघत होती आणि तिचा फोन वाजला, समोरून अर्थचे सर बोलत होते, तिला यायला वेळ झाल्याने त्यांनी फोन केला होता. अरुंधती स्वतःला सावरत उठली, नर्सला म्हणाली, “मी इन्स्पेक्टरशी बोलून घेईल. तुम्ही त्यांना कळवा, हे शुद्धीवर आले म्हणून. काय ते चौकशी करा म्हणावं. मी ह्यांना फारसं ओळखत नाही. माझा असा काही आता संबंध नाही. कधीकाळी होता, आणि काय ते मी बोलते त्यांच्याशी. ह्यांची काळजी घ्या, ह्यांच्याकडून ह्यांच्या घरच्यांना पत्ता, नंबर घ्या आणि कळवा त्यांना. मला अर्थला घ्यायला जायचं आहे. उद्या सकाळी त्यांचे सर्व रिपोर्ट माझ्या टेबलावर हवेत.”
“ओके, मॅडम.”
अरुंधती निघण्यासाठी वळली. माधवने पुन्हा हाक मारली, “अरु...”
ती क्षणभर थांबली... पण मागे वळून पाहिलं नाही. तिने फक्त डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत आवाजात म्हणाली, “मिस्टर माधव, माझं नाव डॉ. अरुंधती अमित राणे आहे. मला डॉक्टर म्हटलं तर आवडेल, इथे एकेरी नावाने मला कुणी बोलण्याची हिंमत करत नाही... तुम्ही हास्पिटलच्या आवारात आहात तेव्हा मर्यादा सांभाळा.”
माधव गुमान पडून राहिला, त्याचे पुढचे शब्द अरुंधतीच्या उत्तराने हरवले होते. काहीच बोलला नाही. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. ती दारातून बाहेर गेली, पण त्याची नजर अजूनही त्या दिशेलाच खिळून होती.
अरुंधती सर्व सूचना देऊन निघून गेली पण माधवच्या मनात खूप प्रश्न होते. अरुंधती ‘अरु’ राहिली नव्हती. त्याने नंतर जरा नर्सला विचारण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही. डॉ अरुंधती राणे ह्यांची सूचना नर्ससाठी जास्त महत्त्वाची होती.
माधवच्या नजरेतून ते डॉ. अरुंधती राणे हे काही केल्या जात नव्हतं. त्या नर्सने वारंवार केलेला तो डॉ राणे हा उच्चार त्याला छळत होता. त्याच्याजवळ पडलेली त्याची हॉस्पिटलची फाइल आणि त्यावर तिचं ते नावं त्याला कोरत होतं. हॉस्पिटलच्या भिंती, परदे आणि कोपरा नी कोपरा तेच नाव बोलत होते... तो गंभीर हसला, “डॉ राणे, अरु, तू शेवटी तुझं शिक्षण पूर्ण केलसं. तुझं स्वप्न पूर्ण केलसं गं, पण हे राणे कोण...?”
मग मनातच पुटपुटला, “मी कुठे एवढे वर्षे तुझी खबर ठेवली. ती कोर्टातली शेवटची भेट होती आपली. पण आता तू समोर आली आहेस तर मला तुचं हवी आहेस.” त्याच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं, दीर्घ श्वास घेत मनातच मनाला तिला सांगू लागला, “आता नाही जाऊ देणार मी तुला. नाही... मी नाही निघून जाणार तुझ्या पासून दूर अरु. तुझा मधु अधुरा आहे गं तुझ्याशिवाय.... तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे अरु... पूर्णपणे अधुरा. तुझ्यापासून दूर राहिल्यावरच प्रेमाची खरी किंमत कळली.”
मनाने विचलित झालेला, शरीरावरच्या जखमांपेक्षा मनावरच्या जखमा जास्त ठसठसत होत्या. माधव कासावीस झाला होता असं अचानक अरुला समोर पाहून. तो कसाबसा उठून बसला. हाताला लावलेली सलाईन सांभाळत त्याने बेडशेजारी ठेवलेला मोबाईल उचलला. स्क्रीन पूर्ण फुटलेली होती, पण कसाबसा तो सुरू झाला. इंटरनेट सुरू करून त्याने हॉस्पिटलचं नाव शोधलं. क्षणात त्याच्यासमोर माहिती उघडली. ‘डॉ. अरुंधती अमित राणे...’ काही क्षण तो नावाकडे एकटक बघत राहिली, हळूच लक्ष पुढच्या बातमीवर गेलं खालील माहिती वाचताच त्याच्या छातीत कळ उठली... ‘डॉ. अमित राणे यांचे अपघातात निधन...’
त्याने पूर्ण बातमी वाचून काढली, दुःखं झालं होतं पण त्याच क्षणी त्याच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात एक विचित्र समाधानही उमटलं. त्या विचाराने तो सुखावला की तो योग्य वेळी अरुंधतीच्या आयुष्यात परत समोर आला... स्वतःवर चिडला, अपराधीपण मनाला बोचलं पण अरुंधतीला पुन्हा मिळवण्याची एक वेडी आशाही वाढली. आता त्याच्या मनात विचारांचं प्रचंड वादळ उठलं होतं. काहीच सुचत नव्हतं. बाहेर संध्याकाळ उतरू लागली होती आणि आत मात्र पंधरा वर्षांपूर्वीचा सूर्य पुन्हा उगवत होता.
आणि त्या मधात विचारांच्या कोलाहलात वाहत होता.... त्याच्या डोळ्यांसमोर कॉलेजचे दिवस जिवंत झाले...
पंधरा वर्षा पूर्वी..
अरुंधती आणि माधव, बारावीत सोबत होते. त्या दिवशी निकाल लागला होता, अरुंधतीला बोर्डात ९०% मिळाले होते, तिला डॉक्टर व्हायचं होतं. आणि माधव फस्ट क्लासमध्ये पास झाला होता. अभ्यास त्याचा कधीच जीव नव्हता. त्याच्या घरचा पिढीजात व्यवसाय होता. वडिलांची एकच इच्छा होती, मुलाने पदवी घ्यावी आणि व्यवसायाची धुरा सांभाळावी. माधवनेही नावापुरता पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. अरुंधतीने मात्र मेडिकल कॉलेजचं स्वप्न गाठलं. पण प्रेम कुठे काही बघत असतं, वेगवेगळ्या मार्गाने जाऊनही मन गुंतली होती. भेटी सुरू होत्या, मनाच्या गाठी पडत होत्या. माधव दिवसेंदिवस अरुंधतीच्या प्रेमात खोलवर बुडत होता...आणि अरुंधती...ती तर कधीची माधवमय झाली होती.
तो दिवस माधवच्या वाढदिवसाचा होता. दोघांनी दिवसभर एकत्र फिरत, हसत, भविष्यातली कितीतरी स्वप्नं रंगवली होती. प्रेमाच्या धुंदीत हरवलेल्या त्या दोन मनांनी त्या दिवशी नात्यातली शेवटची सीमाही ओलांडली. त्या क्षणी त्यांना उद्याची जाणीव नव्हती... फक्त एकमेकांवरचं प्रेम दिसत होतं. अवघ्या काही आठवड्यांत अरुंधतीला कळलं... अरुंधतीला दिवस गेले होते. तिच्या करियर समोर ते बाळ तिला नकोच होतं पण माधव तसा नव्हता. माधवला मात्र हे कळताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. उलट त्याला अरुंधतीला त्याच्यापासून दूर ठेवायचं नव्हतं. तिचं असं करियरसाठी तळतळ करणं त्याला मनात पटत नसायचं पण तरीही तिच्या प्रेमापोटी तो सगळं जाऊ दे म्हणून सोडून द्यायचा पण आता त्याला अरुंधतीला थांबवण्यासाठी कारण मिळालं होतं.
“अरु, ऐक ना गं, मला हे बाळ हवं आहे.”
अरुंधतीच्या डोळ्यांत अश्रू दाटले, ती नुसती शब्द ढकलत म्हणाली, “मधु... पण माझं मेडिकल? माझी स्वप्नं? आणि तू... अजून शिक्षण पूर्ण केलं नाहीस.”
माधव हसला, “म्हणजे? मला काय गरज आहे गं? माझ्या बाबांचा इतका मोठा व्यवसाय आहे. तो मी सांभाळणारच आहे. आपल्याकडे कशाचीच कमी नाही. आणि तुला तर माहित आहे बाबांनाही तू पसंत आहेस, माझी आई खूप खुश आहेच आपल्या नात्यासाठी, अजून काय हवं गं आयुष्यात?
अरुंधती शांत होती. माधव तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला, “तू डॉक्टर झालीस तर मला आनंदच होईल. पण त्यासाठी आपलं बाळ...?”
त्याचं वाक्य अर्धवटच राहिलं. अरुंधती हळू आवाजात म्हणाली, “नाही मधु. हे एवढं सोपं नाही. मेडिकलचं शिक्षण थांबलं तर माझं सगळंच संपेल. मी लहानपणापासून फक्त एकच स्वप्न पाहिलंय... डॉक्टर होण्याचं.”
“स्वप्नं पुन्हा पाहता येतात, अरु... पण हे बाळ... आणि काय तू मेडिकलं शिकून नोकरी करणार ना? अरे आपल्याकडे लोकं कामाला आहेत आणि तू काय बाहेर नोकरी करणार काय? ते काही नाही, मी उद्या माझ्या बाबांना सांगतो तुझ्या घरी बोलायला.”
“मधु, नको ना रे, माझं लहानपणा पासूनच स्वप्न आहे रे हे. पण...”
“काही पण नाही आता, एका जीवाचा प्रश्न आहे. माझं बाळ आहे ते, मला हवंय... आपल्या प्रेमाची निशाणी आहे ती. आणि काय गं माझीही स्वप्न आता तुझी आहेत ना... मला बाबांचा बिजनेस खूप वाढवायचा आहे, तोही तुझ्या सोबत.”
“अरे, पण माझं अंतिम वर्ष आहे. मेडिकलचं शिक्षण खेळ नाही. आणि लोकं... लोकं काय म्हणतील?”
“असु दे गं, कोण कुठले लोकं. लोकांच काय मनावर घेतेस. तू एक वर्षाचा ब्रेक घे, नंतर पुन्हा शिक्षण पूर्ण कर, पण ही वेळ नको ना जाऊ देऊ. आणि माझं बाळ हवं आहे मला, लग्न करतोय मी तुझ्याशी. मग कुणाच्या बापाला काय म्हणायचं असेल ते म्हणू दे. मला त्याची पर्वा नाही?”
अरुंधती त्याच्याकडे नुसतीच पाहत राहिली. एक बाप होण्याचं पहिलं स्वप्न दिसत होतं. माधवने तिला अलगद मिठीत घेतलं. त्या श्वासांच्या गर्मीत, आणि प्रेमाच्या गुर्मीत, त्याच्या बाहुपाशात ती नेहमीप्रमाणे विरघळून गेली. त्या मिठीत तिला एक सुरक्षितता जाणवत राहिली.. माधवने अलगद अरुंधतीच्या पोटावर हात ठेवला. क्षणभर दोघेही शांत झाले. अजून त्या छोट्याशा जीवाची हालचाल जाणवण्याइतका काळ झाला नव्हता... पण दोघांच्याही मनाने त्या जीवाची चाहूल अलगद अनुभवली होती.
माधवच्या चेहऱ्यावर नकळत बाप होण्याचं पहिलं हास्य उमटलं. तो तिच्या कानाजवळ अलगद कुजबुजला, “काय मिसेस पंडित... छोटे माधवराव येणार असं दिसतंय. मग काय म्हणणं आहे आपलं?” अरुंधतीही हसली. तिने त्याचा हात घट्ट पकडला आणि पोटावर ठेवत म्हणाली, “छोट्या माधवरावांचे होणारे बाबा... आधी तुमच्या बाबांना आमच्या घरी पाठवा. माझ्या बाबांशी बोलून लग्न ठरवा. मगच ऐकणार ही मम्मा ह्या बाबांचं, हो की नाही रे बाळा...”
हळुवार संवादात हरवली अरुंधती आणि मग लग्नाचा तो भव्य सोहळा. सगळं कसं आनंदात, ना कुठला विरोध, ना रुसवे-फुगवे, ना मनातली कटुता. दोन कुटुंब एकत्र आले होते. माधवच्या आई-वडिलांनी अरुंधतीला मुलगी म्हणून स्वीकारलं होतं, तर अरुंधतीच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतही मुलीचं सुख पाहून समाधान होतं. सप्तपदीच्या प्रत्येक फेरीत दोघंही एकमेकांच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारत होते. लग्नानंतर तर माधव तिचा अक्षरशः जीव जपत होता. सारच कसं आनंदमय आणि सुंदर होतं... की जणू नियतीने त्यांच्या आयुष्यात फक्त आनंदच लिहून ठेवला होता.
काही महिने नकळत वाऱ्याच्या पंखांवर बसून उडून गेले. एक दिवस अरुंधतीच्या मेडिकल कॉलेजमधल्या मैत्रिणी तिला भेटायला आल्या. सुरुवातीला गप्पा घरापुरत्याच होत्या.
मग हळूहळू विषय कॉलेजकडे वळला. अंतिम वर्ष... क्लिनिकल पोस्टिंग... प्रॅक्टिकल...
परीक्षेची तयारी... कोणाचा किती अभ्यास झाला... सगळ्या उत्साहाने बोलत होत्या.
अरुंधती फक्त ऐकत होती. पण प्रत्येक शब्द तिच्या मनात जुन्या स्वप्नांना पुन्हा जागं करत होता. त्या गेल्यानंतर ती बराच वेळ विचारात हरवून बसली. मी एवढ्या सहज हार मानली का?, अजून काहीच संपलेलं नाही. मी गरोदर आहे... पण लग्न झालेलं आहे. यात चुकीचं काय आहे? अशा विचाराने तिच्या मनाने निर्णय घेतला.
मैत्रिणी गेल्या आणि तिने सासूकडे गोष्ट काढली... पुढे काय झालं नक्की वाचा.. पुढील भागात... बुधवारी ह्याच वेळेवर ... पेजवर!
©उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

0 Comments