द कमबॅक... भाग २-
भाग १ इथे वाचा- द कमबॅक... भाग १-
दिवस आईच्या कोलाहलात कसाबसा संपला होता. जंयतची जागा भरून काढणे शक्य नव्हते. पण आयुष्य कुठे थांबतं, मनात कितीही नसलं तरी जयाला तिच्या मुलांसाठी जगणं भाग होतं.... रात्र तिने कशीतरी जंयतच्य आठवणीत काढली.
सकाळी काळ्या चहा सोबत आईने उरलेली पोळी दोन्ही पोरांना वाटून दिली आणि म्हणाली, "अरुण्या, शाळेला जाजो बरोबर, दुपारच्याले खिचडी आणून देजो लहानीले, नाहीतर दिवसभर उपाशीच रायल ते, बाईची अंघोळ घालून देजो आणि मगच जाय शाळेले, आज मले यायले वेळ होयल, पल्याडच्या गावात मिरच्या तोडाले चाललो म्या. लय दिवसानं काम भेटलं."
अरुण आईला लाडात म्हणाला, "आय, पैसे येयल त मले एक शर्ट घेऊन देजो, हिवाळा येयेल आता, बाईन शर्ट घातला क माह्यासाठी काय बिन राहत नाय वं."
"अरे अरुण्या तुले शाळेतून भेटणार होता ना ह्या वेळले... काय रे झालं त्याचंवालं?"
"माहित नाय आय… मास्तर म्हणत्या मालच आला नाय म्हणून, नेहमीच्याले तेच बोलत्यात. अन राशन कार्ड मागत्यात ते."
आईने डोक्याला हात लावला, "अरे देवा! म्या तर विसरलोच होतो, कारड तयार कराले देलं होतं म्या, तो बाबू बी ५० रुपये मागून राहिला ना... कोठून आणू रे अरुण्या. काल बापूचा दिवस होता त सामान आणलं न रे आपुन... मिरची तोडून पैसे आले का जातो म्या... तू सांग तुह्या गुरुजीले, देतो म्हणून."
मग तिने अरुणला कुशीत घेत म्हटल,
"बाळ्या, आज बिन हिले तशीच राहू दे घरात, चड्डीवर, रायल ते... तू तुया शर्ट घालूनच जाय, मी वापसिले एखाद सस्ता झबला आणतो हिच्यासाठी. तू तिले लाडी गोडी लावून घालून देजो एखाद जून पोलकं, तुये आयकते ते. माय वालं ऐकत नाही हे पोरगी… ये भावने ते भिंगरी सोड ना वं पोरी."
मग तिने भावनाला कडेवर घेतलं,
"काय वं भावना घालसील न? मग म्या नवीन डरेस आणल. माह्या लाडाच्या लेकीसाठी. काय बाई येवढी गोरी पान पोरं जन्माले आली बाई माह्या घरी पण कशी रायते. काय वं भवाने एखाद मोठ्या घरी जन्मली असती तर राजकुमारी सारखी रायली असती वं तू."
आणि जया डोळ्याच्या किनारी जमलेले अश्रू पदराने पुसू लागली, पोरीला कडेवरून खाली ठेवलं, चुलीजवळ ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीला टोकर लावत परत अरुणला म्हणाली,
"चालली म्या... खिचडी आणजो आठवनीन तुह्या बाईसाठी."
बाहेरून ट्रकचा होर्न ऐकायला आला तशी ती निघाली, ठेकेदार गावातल्या बायका जमा करून मिरची तोडण्यासाठी नेत होता. ट्रकचा वेळ चुकला असता तर तिला गावाबाहेर पायी जाणं अवघड झालं असतं.
जया घरातून सकाळी सहालाच निघून गेली होती. घरात दोन भावंडच होती, समोरच्या छपरीत सकाळची ऊन येत होती दोघेही भांवंड खेळत होते. जेमतेम ८ वाजले असतील आणि भावना भावाच्या मागे लागली,
"दादा, खिचडी कवा आणशील? माले भूक लागली ना."
अरुणने माठातलं थंड पाणी काढलं, त्यात मीठ आणि साखर टाकली, अंगणात असलेल्या निंबूच्या झाडावरून निंबू आणलं. बहिणीला नीबूपाणी वाल्यावाणी निंबूपाणी ह्या ग्लासातलं त्या ग्लासात ओतून तिची मस्करी करत तिच्या समोर करून दिलं. तिने ते गटागटा प्यालं. नंतर तिची आंघोळ घालून दिली. तिला घरची भांडी काढून खेळायला दिली, आणि शाळेची तयारी करत म्हणाला,
"मी हा गेलो आणि खिचडी घेऊन आलो, तू चाय बनव माह्यासाठी तुया खेळण्यातला."
आणि मग त्याने त्याचा झोरा उचलला, खिचडीचा डब्बा झोऱ्यात भरला. भावनाचा पापा घेतला, तिला लाडाने गोंजारलं. तिचा पॅन्ट बरोबर केला आणि मोडक्या तोडक्या ओसरीच दार समोरून लावून देत तिला हाताने इशारे करत निघून गेला.
शाळा अगदीच पाच मिनीटवर होती मग अरुणच लक्ष राहत होत घराच्या फाटकावर.
शाळा सुरु झाली आणि अरुण खिचडीच्या वासावर पोट भरत दुपारच्या जेवणाची वाट बघत होता. घंटी वाजली, तडक उठून खिचडीच्या लाईन मध्ये लागला, गरम गरम खिचडी मिळाली होती डब्यात, ती घेतली, पटकन डबा झोऱ्यात नेवून ठेवला आणि परत लाईन मध्ये दूसरा डब्बा घेवून लागला, तेवढ्यात त्याला कुणीतरी हटकलं,
"ये तू आताच घेतली ना, झाली खाऊन?"
त्याने काहीच म्हटलं नाही, गुमान परत दुसरा डब्बा समोर केला, पहिल्यांदा दिली होती म्हणून त्याला डब्बाभर दिलीच नाही बाईने. जेवढी दिली होती तेवढी सर्वांसोबत खाल्ली पण त्याच पूर्ण लक्ष घराच्या फाटकावर होतं. त्या फाटकातून त्याला भावना ओसरीच्या दारात उभी दिसत होती. जसा जरा रडण्याचा आवाज आला, तसा तो बाई मी घरून येतो म्हणत पळाला. भावना ओसरीच्या दाराला टेकून होती, अरुण येताच बिलगली,
"दादा भूक लागली, खिचडी देनं... खिचडे दे माले... भूक लागली..."
अरुणने झोऱ्यातून डब्बा गंमत करत जसा काढला तिचा चेहरा फुलून गेला, परत बिलगली भावाला. दोघेही बसले अंगणात. अरुणने पहिला घास तिला भरवला. ती खाण्यात गुंग झाली. नंतर तिने बनवलेला खेळण्यातला चहा त्याने घेतला, मस्त झालाय असं सांगून परत फाटक बंद करून निघून गेला.
शाळेचा मुख्याध्यापक नवीन होता आणि त्याला तो शाळेच्या गेटातून दुपारी आत येतांना दिसला, गुरुजीला शिस्त लावायची होती मग त्यांनी अरुणला थांबवलं आणि एवढ्या वाजता शाळेत फक्त खिचडी खाण्यासाठी येतो म्हणून रागवत, बाहेर कोंबडा व्हायला सांगितलं. अरुण चार वाजेपर्यंत तसाच उभा होता आणि भावना त्याला फाटकाच्या फटीतून बघत होती. तोच नेहमीप्रमाणे गुण्या भाईच्या गाड्या शाळेसामोरून जोरात गेल्या. येवढ्या मोठाल्या गाड्या तेंडोलीत वर्षातून दोन तीन वेळाच येत असतं. ज्यात बंदूकधारी माणसं असायची. आणि ज्या गाड्यांना बघताच लोकं दारं लावून घरात बसायची. गाड्या दिसताच शाळेच्या मास्तराने अरुणला वर्गात घेतलं आणि मग काही वेळात सर्व शांत झाल्यावर शाळा सुटली.
सुट्टी झाली आणि तो घरी आला, भावना त्याला बिलगली, नंतर त्याने स्वतःचा शर्ट काढला आणि तिला घालून दिला, भावनाने खेळण्यातला चहा आणि भावासाठी ठेवलेली खिचडी त्याला दिली. दोघांनीही उरलेली खिचडी सोबत खाल्ली आणि मग अरुण भावनाला भिंगरी फिरवून दाखवाचा आणि ती आनंदाने उड्या मारायची. बहिणीला आनंदी बघून अरुण नवीन नवीन प्रकारे भिंगरी फेकायचा. कधी हातावर कधी ताटावर... अरुण पहिलीत होता आणि सतत गाणं म्हणत असायचा,
“एक होती भिंगरी, तिचं नावं झिंगरी... एक होती भिंगरी...”
त्याला साथ देत भावनाही तोतडया बोलात ते गाणं म्हणत असायची. दोघेही गाणं म्हणत भिंगरी खेळत मायची वाट बघत होते.
<<>>
अंधार पडायला लागला होता आता दोघेही आईची वाट बघत होते. तसं जयाने फाटक झोरात उघडलं, दोघही तिला बिलगली. तीही तेवढ्याच ताकतीने मुलांना बिलगली होती. बिलगताच मनाला शांती भेटवी अशी ती काही क्षणासाठी शांत झाली होती. बिलगल्यामुळे तिच्या गळ्यातली काळ्या मण्याची माळ तुटून एक एक मणी खाली पडत होता. जयाचा अवतार काहीसा बदललेला होता, डोळे लाल होते, केसं विस्कटलेली होती, ब्लाउज फाटलेलं...ओठ कोरडे पडले होते. धावत आल्याने धापा टाकत होती. अंगावर वरपांडे पडले होते. शरीर कापत होतं, अश्रू अटकले होते, मन हुंदके देत होतं. गळ्यात आवंढा दाटला होता.
जयाने कसाबसा आवंढा गिळला, बिलगलेल्या मुलांचे झपा झप मुके घेतले, अरुण जरा गोंधळला, मायच्या हृदयाचे ठोके त्याला जाणवत होते. एव्हाना माय असं काही करत नाय ह्या विचाराने तो मायच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला,
"माय, काय झालं वं? तू बरी हायस ना? काय होत हाय तुले?"
जया काहीच उत्तरली नाही. स्वतःला जरा सावरलं जयाने, मुलांना बाजूला केलं, हातात टांगून असलेला झोरा पुढं जाऊन समोरच्या भिंतीला टांगला. गप्प राहूनच ती पाण्याच्या माठाकडे पाय धुवायला वळली, पण तिने थंड्या पाण्याचा माठ अंगावर घेतला. अरुण अजूनही मायला बघत अवाक होता. त्याला हे सगळं अजूनही काही समजत नव्हत. ती ओलीच खोलीत शिरली... बराच वेळ बाहेर आली नाही. काही वेळाने तिने साडी बदलतच म्हणाली,
"अरुण, खिचडी आणली होती काय रे लायनीसाठी?”
अरुणला आवाज ऐकून बरं वाटलं होतं पणअरुणला कळलं होतं की माय उत्तर टाळत हाय ते. ती खोलीतून आवरत बाहेर आली आणि तो तिच्या माग मागं फिरत होता, तर ती परत म्हणाली,
“काय रे बाळ्या, आणली होतीस ना खिचडी?”
आता मायचा नेहमीचा स्वर ऐकून अरुणला बरं वाटलं आणि त्याने तिच्या मागे फिरणं बंद केलं. तो भावना जवळ जाऊन बसला आणि म्हणाला, “हो वं माय, माह्या लाडाच्या बहिणीले काय उपाशी ठेवीन वाटलं तुले. तू बी ना... काय बिन बोलतस.”
“हो रे माझ्या राज्या, असाच बहिणीची काळजी घे रे माह्या लेका. तिले तरी कोण हाय तुझ्याशिवाय माह्या बाद. चल हात पाय धुवा, म्या कण्या वरून देतो आता. खा आणि झोपा बरं लवकर. आता माया काय बिन विचार करू नका.”
अरुणचा जीव अजूनही कण्यानंमध्ये होता तो कुतूहलाने म्हणाला, "आई उद्या बी रायल न कण्या सकाळसाठी."
आईने त्याच्या गालाला हात लावला, "उद्या ची उद्या, आज खाऊन झोपा, उद्या पासून तुमचं तुमालेच पहाच हाय."
"माय, काहून असं बोलतं हायस वं, म्या तुले आल्यापासून पाहून रायलो."
"काही बिन नाय रे... खिचडी नाही का आणत तू शाळेतून अन् खातस बिन... म्हणून म्हटलं. उद्या मले लय लवकर जायाच हाय. अन् कधी येल म्या माय मले बिन माहित नाही राज्या. मग तुलेस पायावं लागल ना लायनिले."
जया विचार करत कण्या वरण्यात व्यस्त झाली, दोघही खेळायला लागली, आणि पोटभर कण्या खायच्या आहे म्हणून आनंदात होती. त्यांचा तोच नेहमीचा खेळ सुरु झाला, अरुण भिंगरी फेकत होता, आणि गाणं म्हणत होता आणि भावना टाळ्या वाजवत उड्या मारत आनंदाने त्या गाण्यावर नाचत होती.
“एक होती भिंगरी... एक होती भिंगरी... तिचं नावं झिंगरी,.. तिचं नावं झिंगरी....”
पुढचा भाग लवकरच...
पहिल्या भागाची लिंक commnetमध्ये आहे आणि पेजवर सुद्धा आहे.
कृपया कथा C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार ai
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७
See less
.png)
0 Comments