आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ४...

 आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ४...


आधीचे भाग

भाग १- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग १

भाग २-  आणि जेव्हा Ex परत येतो... भाग २

भाग ३- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ३

भाग 4 इथे वाचा...

...आणि जेव्हा Ex परत येतो!! भाग ४-
आधीच्या भागांची लिंक पेजवर आहे...
आई-बाबा दोघेही विचारात होते. पण कोण आधी बोलणार ह्यातच त्याचं मन अडकलं होतं.
शेवटी बाबाने पेपर हातात घेत आईला म्हणाले, “तू नको ना काळजी करू, अरुंधती भक्कम आहे. अजूनही खूप प्रेम आहे तिचं अमितवर.”
“हो, पण अमित आता आपल्यात नाही... आणि ‘तो’ परत आलाय... तोही आताचं... आता कुठे अरुंधती सावरली. सगळा पसारा तिने हाती घेतला, मला भिती ह्याची नाही की माधव तिला भेटला...”
“मग कसली गं?”

“आपल्या अरुंधतीला त्रास होऊ नये हो. किती कष्टाने सावरली आहे ती. अमित गेल्यावर स्वतःचं दुःख बाजूला ठेवून घर, हॉस्पिटल, मुलं... सगळं एकटीने सांभाळलं. आता पुन्हा जुन्या जखमा उघडल्या तर? आणि काय योगायोग आहे बघा! आता तो हिच्याचं हॉस्पिटलमध्ये कशाला यायला हवा होता, आपल्या शहरात काय हॉस्पिटलची कमी आहे का! आणि हिनेच तिकडे पाठवला म्हणे काल, हिलाच भेटायचा होता. ही पण ना...”
बाबांनी वर्तमानपत्र दुमडलं, “नियतीचे खेळ आपल्या हातात नसतात गं. जाऊ दे, परमेश्वराची जशी मर्जी आता. आपण काय करू शकतो, एवढा सोन्यासारखा मुलगा आपण अपघातात गमावला. अरुंधती वाचली म्हणून आपले नातू पोरके झाले नाहीत. पण तिनेही मोठ्या हिमतीने स्वतःला उभं केलंय ना अमितच्या मागून! त्या दिवशी तिने काय गमावलंय... हे तिच्याशिवाय कुणालाच माहीत नाही. तिच्या नशिबात आता अजून काही सुख लिहिलं असेल तर... शेवटी तिची जशी इच्छा... ती जे ठरवेल, त्यात तिच्या पाठीशी उभं राहायचं.”
“अहो काय बोलता तुम्ही!”

“आता काय बोलू मी... पण मला ना अरुंधतीला असं बांधून ठेवायचे नाही आहे... अमितला नाही आवडणार ते.”
“काहीही काय हो बोलता, आता अनवीच ठीक आहे पण अर्थ तिचा पोटचा मुलगा नाही...”
“सुमन!! आलंच कसं तुझ्या तोंडात हे... तिने कधी म्हटल का असं? मला कधी जाणवलं नाही... परत हे घरात बोलता कामा नये.”
“अहो पण सत्य आहे ते... आणि आता तो तिच्या आयुष्यात आला तर हो काय?”
“काही ही होणार नाही. आणि जे होईल, ते योग्य होईल.”
ते उठत म्हणाले, “बघू... प्रत्येकाच्या प्रेमाची कसोटी आहे समज... पण मला माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे.”
इतकं बोलून ते त्यांच्या खोलीकडे निघून गेले. सासूबाई बराच वेळ जागच्या जागी बसून राहिल्या. मनात असंख्य प्रश्न होते... उत्तरं मात्र काळाकडे होती. थोड्याच वेळात त्यांनी घर आवरलं, अवनी तयार होऊन सोफ्यावर उड्या मारत होती, तिला शाळेत सोडलं आणि हॉस्पिटलला जाण्याची तयारी करू लागल्या. परत खोलीत येऊन म्हणाल्या,
“अहो ऐकाना, तुम्ही पण सोबत या, मला बाई हुरहूर वाटत आहे. तो असेल ना तिकडे.”
अगं काय तुझं तो असेल तो आलाय... कशाला महत्व देते तू... हे बघ तो जो कुणी आहे त्याला आपली अरुंधती सांभाळेन... अमितने तिला असचं तयार केलं आहे. उगाच बोलू नको हा.”
“अहो चिडता कशाला... मलाही समजतंय.”
“अगं, पण मी अवनीला घ्यायला जाईन ना... तिची काय शाळा, दोन तासांची तर असते. आणि तू कशाला एवढ्या लवकर निघतेस, थांब ना, येऊ दे अवनीला, सोबतच हॉस्पिटलला जाऊ या.”
इकडे माधव घारीसारखी अरुंधतीची वाट पाहत होता. सकाळपासून त्याच कित्येक वेळा स्टाफला विचारून झालं होतं. पण अरुंधती त्या वॉर्डमध्ये आलीच नव्हती. कुणी त्याला सांगत होतं की मॅडम सकाळपासून सर्जरीत बिझी आहेत तर कुणी म्हणत होतं त्या या वॉर्डमध्ये आज येणारं नाहीत.
घड्याळाचे काटे पुढे सरकत होते... आणि प्रत्येक मिनिट त्याला असह्य वाटत होतं. शेवटी न राहवून स्वतःच्या सलाईन काढून फेकल्या. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं होतं आणि क्षणात वॉर्डमध्ये गोंधळ उडाला. ड्युटी डॉक्टरांना बोलावण्यात आलं. मग डॉ राणेंना तातडीने बोलवण्यात आलं.
काही मिनिटांत अरुंधती वॉर्डमध्ये आली. ऑपरेशन थिएटरमधून थेट आल्यामुळे अजूनही तिच्या अंगावर हिरवा सर्जिकल गाऊन होता. तिने त्याला तपासलं, नर्सकडे वळून म्हणाली,
“नवीन आय.व्ही. लाईन लावा. अँटिबायोटिक बदलूया. आणि पुढची पेन मेडिकेशन अर्ध्या तासाने द्या.”

सूचना देऊन झाल्या आणि ती निघणार तोच माधवने तिचा हात पकडला. त्या स्पर्शाने अरुंधती क्षणभर थांबली. “अरु...”
त्याचा आवाज थरथरत होता.
“अरु, मी चुकलो गं, नको ना मला सोडून जाऊ तू. आपण परत एकत्र येऊया. मला एक संधी दे, आपल्या प्रेमाचा... तो गुलमोहर... परत फुलवू या... अरु...”
तिने शांतपणे स्वतःचा हात त्याच्या हातातून सोडवला. तिच्यात ती शांतता वर्षानुवर्षे अनुभवलेल्या वेदनांनंतर आलेली होती. ती मंद स्वरात म्हणाली,
“मिस्टर पंडित... तुम्ही अजूनही पंधरा वर्षांपूर्वीच्या अरुला शोधत आहात. पण ती अरु... त्या दिवशीच संपली होती. आज तुमच्यासमोर उभी आहे ती फक्त डॉ. अरुंधती राणे. आणि सध्या... मी फक्त माझ्या पेशंटवर उपचार करते आहे. तुमचं काहीतरी चुकतंय.”
“काहीतरी चुकलंय, हे नक्की. त्यासाठी मी तुझा अपराधी आहे गं, पण आता नाही, आता मला सगळं सुधारायचं आहे.”
माधवच्या आवाजात पश्चात्ताप होता. पण अरुंधती मात्र त्याच्याकडे न पाहताच त्याचे रिपोर्ट चाळत होती.
तिने पेनाने काही नोंदी केल्या आणि नर्सकडे वळून म्हणाली, “यांच्या घरचं कुणी आलं असेल तर माझ्या केबिनमध्ये पाठवा.”
“यांच्या काही औषधांमध्ये बदल केले आहेत. त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे.”

“आणि आधी यांचे सगळे रिपोर्ट माझ्याकडे पाठवा. सीटी स्कॅन, एमआरआय, ब्लड रिपोर्ट... सगळं. अजून काही गंभीर दुखापत नाही ना, मला खात्री करून घ्यायचं आहे. जर सर्व काही व्यवस्थित असेल, तर उद्यापर्यंत डिस्चार्जची तयारी सुरू करू.”
माधव तिला बघत हळूच म्हणाला, “काही जखमा कधीच बऱ्याचं करायच्या नसतात काय गं? का अशी विरळ वागतेस तू?”
आता मात्र अरुंधतीने नर्सला जायला सांगितलं, समोरची खुर्ची ओढली आणि त्याच्या बेडजवळ बसली, नर्स निघून गेली होती. आता ते दोघेच होते. ती शांतपणे म्हणाली, “बोला, मिस्टर पंडित... काय म्हणणं आहे तुमचं?”
माधव तिच्याकडे पाहत राहिला, “अरु... आपण सगळं विसरून परत एकत्र येऊ या ना.”
“आणि त्याने काय होईल?”
“आपण पुन्हा सुरुवात करू. मला कळलंय, आता ते राणे जगात नाहीत.”
“पण मी आहे ना, त्यांची बायको...” क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, हम्म, इथे राहून बरचं संशोधन केलेलं दिसते.”
“अगं पण तू किती दिवस असं दुसऱ्यांच करत राहशील... मला आता तू हवी आहेस. अरु विसर सांर. तुझ्यावीणा मी काहीही नाही. थकलोय आता, स्वतः पासून पळत होतो आणि तू समोर आलीस, ह्यात काही तरी त्या परमेश्वराचा इशारा असेल.”
“दुसऱ्यांच? माझा नवरा होता तो, आहे आणि अंतिम क्षणापर्यंत राहिल... इशारे कधीपासून तू ओळखायला लागलास... तब्बल दोन वर्ष वाट पहिली मी, तुझ्या परतीची...पण... आणि आज... पंधरा वर्षांनी माझ्यासमोर येऊन म्हणतोयस, 'चल, पुन्हा सुरुवात करू..”
तेवढ्यात नर्स अवनीला घेऊन आली, “मॅडम अवनी कॅबीनमध्ये थांबायला तयार नव्हती. तुम्हाला शोधात आली ही इकडे.”
“बरं.. आई-बाबा आलेत का?”
“हो मॅडम, आपल्या आई चेकअपसाठी गेल्या आहेत. आणि बाबा... ते समोरच्या पेशंट वॉर्डमध्ये कविता ऐकवत बसले आहेत. मी हिला बघत होते पण ही काही थांबेना.”
अवनी पटपट खोलीतलं सामान बघू लागली, लगेच म्हणाली, “अंकलं, तुम्हाला किती इंजेक्शन्स दिलेत मम्माने, इss... दुखत असेल ना.”
माधव तिला बघून गोड हसला, म्हणाला, “तुझ्या मम्माने मला काहीच त्रास दिला नाही.”

“अरु तुझी मुलगी आहे का गं?”
“हो माझी आणि अमितची. आणि मला मोठा मुलगाही आहे, अर्थ. दहा वर्षांचा. माझं मोठं घर आहे, आणि सगळी लोकं माझी आहेत, ह्या हॉस्पिटलची ३०% मालकीण आहे मी. परमेश्वराने मी जे गमावलं, त्यापेक्षा कितीतरी जास्त परत दिलं आहे.”
आणि ती अवनीला घेऊन निघून गेली. माधव अजूनही शून्यात बघत राहिला. पण त्याला अजूनही तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेम दिसत होतं. तिच्याशी बोलायचं होतं त्याला... पण अवनीसमोर नको म्हणून तोही गप्प झाला होता. त्याची घुसमट त्याला खात होती. अस्वस्थ झाला होता. अरुंधतीला सोडून तो तिथेच राहिला पण अरुंधती खूप पुढे निघून गेली होती,
“अरु वेळ झाला गं मला यायला, पण हा काही तर संकेत असेल ना, तुला विसरण्याचा खूप प्रयत्न केला मी, दूर पळत राहलो, माफी मागायची हिंमत झाली नाही आणि आज तुझ्या समोर आलो तर... तू माझी राहिली नाही... हे कसं मान्य करू मी... नाही मला एकदा तुझ्याशी बोलायचं आहे... तू हे वरवर बोलत आहेस... तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर...”
माधव अजूनच कासावीस झाला होता. त्याचं मन उत्तर शोधत होतं, मनात म्हणाला, “माझ्यावर अतोनात प्रेम करणारी, मी एवढ्या दिवसांनी समोर भेटूनही जराही पाझरली नाही. मला जरासं काही झालं तरी अश्रू गाळत बसणारी एवढी भक्कम कशी?”
मनात विचारांचे असंख्य धागे एकमेकांत इतके गुंतले होते की, प्रत्येक विचार त्याला पुन्हा पुन्हा अरुंधतीकडेच खेचत होता. छातीत घुसमट वाढत होती. त्याला वाटत होतं, आताच उठावं... तिच्यासमोर जाऊन उभं राहावं... फक्त तिच्याकडे बघत राहावं. त्याचा ठाम समज होता की, तिच्या मनातलं प्रेम अजून पूर्णपणे संपलेलं नाही. ती त्याच्याकडे पुन्हा एकदा बघेल, तिचं कठोर झालेलं मन वितळेल... आणि ती त्याचं ऐकून घेईल. तोच, परत त्याच्या खोली बाहेरून अवनीचा आवाज आला, ती वॉर्डभर इकडे तिकडे फिरत होती आणि अरुंधती तिच्यावर ओरडत होती.
विचारांनी ग्रासलेला माधव जरा स्तब्ध बसून राहिला. अचानक त्याच्या मनात एक विचार आला, “अवनी, अरुंधतीची मुलगी आहे! तिला मुलगाही आहे असं म्हणाली होती ती, पण... हे कसं शक्य आहे? पण... अवनी तर...? नाही काही तरी गडबड आहे. मुलगा नसेलच तिचा पण अवनी कशी तिची असू शकते? हम्म, अरु पण ना, काहीही सांगते मला, माझी अरु तर... नाही... काहीतरी आहेच मध्ये. असं कसं? अरु आणि आई? शक्यच नाही... मग मी?”
माधव विचारात अनेक विचार शोधायला लागला, काय सुटलंय हे शोधात होता. पण गवसत नव्हतं.
उत्तरांच्या शोधात त्याचं मन नकळत पंधरा वर्षं मागे निघून गेलं.
“अरु कशाला भरतेस गं फॉर्म? आपलं बाळ येऊ देत ना. काय गं गरज ह्याची आता?”
“अहो माधवराव, बाळ पण येईल आणि सर्वच नीट होईल, मी बोलले आईशी, त्या म्हणाल्या मला त्या करतील सर्व बाळाच म्हणून. आणि मी कुठे जातेय आत्ताच... जरा काही प्रोसेस आहेत करून घेते. माझं पाहिलं पिल्लू आहे. माझा छोटा माधव.”
“ए, मला तर अरुंधती हवी आहे छोटाशी... ही तू आहेस ना, जरा माझं ऐकत नाहीस, बघ माझी मुलगी माझंच ऐकणार...”
“काय रे! तू तर म्हणाला होतास ना, छोटा माधव येतोय म्हणून... मी आपली आस लावून आहे... मला ना तुझं प्रतिबिंब हवंय... बघ मग?”
“असं....”

आणि माधवने अरुंधतीला अलगद उचलून घेतलं, फॉर्म पायाने कुचकरला गेला होता. अलगद अरुंधतीला पलंगावर टाकताना पायाने त्याने पलंगाच्या आत ढकलला. नंतर त्याने तिला औषधी दिल्या. हाताच्या खुशीवर झोपवलं. तिचाही डोळा लागला, आणि तो त्याच्या आईकडे आला, “आई, आई कुठे आहेस तू? तू अरुला म्हटलंय, अंतिम वर्षाचा फॉर्म भरायला?”
“अरे पण काय झालंय? करू देत ना, घरी एवढी माणसं आहेत, होईल की सगळं, करतो म्हणाली ती मग काय.”
“आई तुला कळत नाही का? अगं ती माझ्या बाळाची आई होणार आहे, ह्या घराण्याचा वारस आहे तिच्या उदरात.”
बाबा घरात शिरले होते तर म्हणले, “मी नाही बोललो होता, पण राणीसाहेब.”
“अहो काय होतं हो, डॉक्टर होऊन करेल की घरी डॉक्टरकी, करू द्या, आपण काय तिला बाहेर पाठवणार काय? एक डॉक्टर हवाच ना घरात. आणि तू तयार झाला होता ना आता काय झालं असं?”
“मीच हो म्हणालो होतो त्या दिवशी, तिला डॉक्टरकडे न्यायचं होतं आणि उगाच तिचा मूड जाऊ नये ना म्हणून... आणि ती, लगेच लागली कामाला. हुम्म, अगं डॉक्टरांनी लाईन लावू आपण, पण अरु नाही... उगाच कॉलेज, मग ते काय मुलांशी बोलणं... काय घाणेरडेपणा असतो मेडीकलच्या मुलांचा... रात्रभरच्या ड्युट्या... प्रॅक्टिकल. माझा मित्र आहे ना, सांगत असतो, काही लाज नसते त्याच्यात. काय काय करून मोकळे होतात ह्या फिल्ड्चे लोकं. उगाच मला अरुला गुंतवायच नाही त्यात. काय कमी आहे तिला. बोट ठेवेल ते समोर आणेल मी तिच्यासाठी, प्रेम आहे माझं तिच्यावर....”
“अगं बाई, हे काही मला माहित नाही बाबा... तुझं प्रेम आम्हालाही प्रियच आहे.”
“ते काही नाही, अरु कुठेही जाणार नाही, मी तिला सांगतो तसं... काय करायचं ते घरात करावं म्हणा... काय घरात कमी आहे का? हा एवढा मोठा पसारा तिलाच सांभाळायचा आहे. कुठे वेळ मिळणार तिची ते डॉक्टरी करण्यासाठी?”
आई मान हलवत म्हणली, “तेही ठीक, बघ बाबा, तुला जे योग्य वाटत आहे ते, मला तर काही हरकत नाही. मी तर तिला बोलले, गाडी रोज असेल तिच्यासाठी म्हणून. आता नवीन मुलींना का आणि कसं म्हणून अडवायचं! मला काही तिच्याशी वाईट घ्यायचं नव्हतं, तू आणि ती काय ते बघा. मी आहेच सोबत. जसा तू मला प्रिय तशी तीही.”
“ते काही नाही, अरु मला घरात हवी...” माधव ओरडत म्हणाला.
आणि त्याच्या खोलीच्या पायऱ्या चढत होता, तोच त्याची नजर अरुवर पडली, तिने खोलीच्या दारात उभं राहून खाली बैठकीत घडलेला सारा प्रकार ऐकला होता.
त्या क्षणी माधवला हे कुठं कळत होतं की, प्रेम म्हणजे कुणाला आपल्या चौकटीत बंद करणं नसतं. त्याच्या स्वप्नांना आपल्या मनातल्या भीतीपेक्षा मोठं मानणं असतं...
पुढचा भाग सोमवारी....
आधीचे भाग पेजवर आहेत, लिंक पहिल्या commnetला आहे. किंवा तुम्ही पेजवर वाचू शकता.
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
@followers @topfans
See less

Post a Comment

0 Comments