एक होती भिंगरी... द कमबॅक...भाग ३
भाग १ इथे वाचा- द कमबॅक... भाग १-
भाग २ इथे वाचा एक होती भिंगरी .. भाग २
भाग ३--
जयाने अंगणाच्या कोपऱ्यात पडलेल्या काड्या उचलल्या आणि चुलीकडे वळली. थकली होती, पण मुलांच्या पोटात काही तरी जावं ही धडपड तिला स्वस्थ कशी बसवणार होती. येताना तिने पावं भर गहू चोरून, जवळच्या शेतातून उपटून आणले होते. शेतधनी ओरडला होता मग ती पंधीच्या वाटेने धावत सुटली होती. पांधीतून धावतांना हातावर तुरीच्या झाडांच्या खरखरीत दांड्या ओरबळल्या होत्या, जागोजागी लालसर रेघा उमटल्या होत्या. पण तिला कुठे भाण होतं, उपासमारीच्या वेदनेपुढे सारं काही क्षुल्लक होतं. तिला तर मुलं दिसत होती नजरेसमोर उपाशी, तिची वाट बघत.
कण्या चुलीवर शिजत होत्या पण जायचं लक्ष त्या उकळत्या हंड्यावर नव्हतच मुळी. जळत्या लाकडांकडे बघत ती विचारात हरवली. दुपारचा सारा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर जसा पुन्हा उभा राहिला.
घरी पैस्याची गरज होती म्हणूनच सकाळी मिरचीच्या मळ्यात कामावर गेल्यावर तिने आधी मालकाकडे काही पैसे आगाऊ मागितले होते. खूप विनवण्या केल्यावर मालकाने तिला दुपारी गोदामात येण्यास सांगितलं होतं. दुपारच्या उन्हात काम आटोपून ती गोदामाकडे गेली. गोदामात कोणीच नव्हतं. मिरच्यांचा उग्र वास सगळीकडे जसा येत होता. मालक एका पोत्यावर बसून तिची वाट बघत मिशी कुरवाळत होता. तिला पाहताच त्याने खिशातून दोन शंभर रुपयांच्या नोटा काढल्या आणि तिच्या समोर ठेवल्या. नोटा बघून जयाचा चेहरा फुलला होता. जयाने हात लावताच तिचा हात पकडत तिला स्वतः कडे ओढलं मालकाने. त्याच्या डोळ्यातील ती वासना पाहून जायच्या अंगावर काटे उभे झाले होते. दोघात खेचा-खिची झाली. झटपटीत तिच्या हाताला बाजूला ठेवलेला पाण्याचा पितळी गडू लागला. तिने क्षणाचाही विलंब न लावता तो उचलला, आणि पूर्ण ताकदीने आदळला मालकाच्या टाळक्यावर... तो किंचाळला आणि त्याने तोल सावरायचा आताच जया गोदामाबाहेर पळाली. मालकाने स्वतःला सावरत तिला जातांना धमकी दिली,
"जा, कसं काम करतं ना पायतो म्या! आता तू मोठी सती सावित्री लागून गेलीस काय वं? नवरा तर नाय तुले. कसे मोठे करशील पोरं... नुसत्या मिरच्या तोडून काय होणार हाय तुवं वालं, माजली साली. जाशील कुठं वं.”
ते शब्द अजूनही कानात घुमत होते, ठेकेदाराजवळ गेली, विनवणी करू लागली, "ए दादा, माह्या आता तोवर कामाचे पैसे दे बाबा, जायचं माले, पोरं उपाशी घरी वाट पायत हायत."
ठेकेदार तिच्याशी बोलतच होता तर गोदाम मालक डोक्याला हात लावत तिथे आला आणि त्याने जयाला पैसे नको देऊ असं सांगितलं,
"अरे ही बाय राज्या मले गुंडाळत होती आतमदी. कसल्या बाया कामाला लावतो रे तू?"
आणि मग रागाने जयाकडे बघत म्हणाला,
"ए पांढऱ्या पायाची अवदसा! अशीच करत असल म्हणून नवरा लाजीन डुबून मेला तुह्या. पायतो म्या बी, तुले कोण काम देते त! निघ इथून... नाहीतर देईन हाणून एक."
येवढ्या वेळात सर्व कामावरच्या बाया कुजबुजायला लागल्या होत्या. त्यांच्या त्या नजरा तिला टोचत होत्या. समोर अंधार दिसत होता आणि आता हे बघवेना झालं होतं. अपमान, राग आणि भीती त्यात ती असहायता सगळं कसं एकाच वेळी मनात उसळून आलं होतं. दाटून आलेला हुंदका तिने कसाबसा घशात अडकवला. आणि एक शब्दही न बोलता तिने तिथून काढता पाय घेतला. ती झपझप निघाली होती. तेवढ्यात ट्रकजवळ बिडी फुकत असलेल्या चालकाने तिला पाहिलं, बिडी फेकली आणि घाईघाईने तिच्यामागे आला आणि हाक मारत म्हणाला,
“कुठं चाललीस वं जया बाई?”
“अरे दादा नशीब माझं, आता तुला काय सांगू? जाऊ दे घरला जातो. पोरं वाट पायत असत्याल.”
ती वळून निघणार इतक्यात ट्रक चाकलाने तिला पुन्हा थांबवलं,
“अवं म्या ओळखत होता तुह्या धन्याले, लय चांगला माणूस होता जयंत. अन् इमानी होता गडी.”
जायला ऐकून हायसं झालं, ती थबकली, गयावया करत म्हणाली,
“अजी दादा काय काम मिळल काय? पोरं घरी उपाशी हायत जी. शाळेच्या खिचडीवर जगत हायत रोज. उपकार होतील दादा, हा मालक सांगतो तशी नाय मी. माही काय बिन चुकी न्हाय जी, लेकरायची शपथ!!” तिचा कंठ अजूनच दाटून आला.... अश्रू आता थांबत नव्हते.. कसे बसे तिने अश्रू पुसले, डोळ्याची किनार कोरडी केली. आणि तिने त्या ट्रक चालकाचे पाय धरले.
“अवं, पापं लावशीन काय मले, होय दूर... होय.” म्हणत तो दोन पावलं मागे सरकला आणि डोक्याले हात लावत विचार करत होता. काही क्षणात तो म्हणाला,
“बाई एक काम हाय... पण?”
“कसलं दादा... सांगा त.”
“तसा तुह्या धनी भी करत होता, कवा कवा… आपल्या गावातल्या मोठ्या जमिनीवरच्या वाड्यावर भाजीचं पोहचवायचं हाय. मी जाणार होता पण तू जा आता., तिथला गडी तुले चांगले पैसे देईल... पण...”
“पण बिन काय जी... म्या जायल, भाजी नेवाची हाय ना? उपाशी पोरं घरी हायत, म्या काय बिन करल बाबा, म्या जातो.”
“होय वं, पण तेथ जे बिन पायशील ते कोनलेबीन सांगाच नाय त्या... नाहीतर तूवं काही खरं नाय बाई. पाय बापा... जमल तर...”
“दादा, मले काय बीन कराच नाय कोणाच, तसचं करन म्या, मले सोडा तुमी तिकडं... अन् अरुण्याचे बापू जात होते न मंग म्या जायले काय होईल.”
“असं म्हणतस, बसं मग मागं... म्या सोडतो तुले वाड्यावर...”
मग जरा विचार करत म्हणाला, “अवं पण म्या तुले सोडल, तुवं तुले येवा लागल वापस... तुहे वाल घर जवळ हाय वं तेथून.”
“होय होय, हाय... जवळ हाय घरापासनं. उपकार झाले जी. म्या बसते मागं.”
जायच्या सुरात आशा होती. ती ट्रकमागच्या बाजूला जाऊन गुमान बसली. आणि ट्रक वाल्याने गाडी शेतातल्या वाड्याकडे काढली. ट्रक धुळीचा लोट उडवत शेतामधल्या कच्या रस्त्याने पुढे येत मोठ्या वाड्याच्या फाटका पुढं थांबला. उंच भिंती, मोठं लोखंडी फाटक, आजूबाजूला नुसती शेती... दूरू दूर काहीही नाही. आणि वाड्याच्या अंगणात असलेल्या महागड्या गाड्या पाहून जायला क्षणभर दडपण आलं होतं. ट्रकवाला खाली उतरला आणि मागे येत म्हणाला, “बाई ह्या टोपलीत भाजीचं हाय. उचल अन् जाय आत. कोणी विचरलं तर सांग, भाजी घेऊन आलो, बटाटा भाऊने बोलावलं म्हणून.”
“व्हय दादा”, जया उतरत बोलली. तिने टोपली डोक्यावर घेतली अन् लोखंडी फाटक ढकलत आत शिरली. फाटकाजवळ उभ्या असलेल्या बंदुकधाऱ्याने थांबवलं तिला, तर म्हणाली,
“ताजी भाजी घेऊन आलो जी म्या. बटाटा भाऊने सागितलं होतं मले.”
बंदूक वाला तिला सोबत घेऊन बटाटा भाऊकडे आला आणि म्हणाला, “बटाटा भाई ए औरत सब्जी लेकर आयी है!”
“हा... हा... ये इकडे, ठेव भाजीचं,” बटाटा भाऊ तिला म्हणाला. आणि मग तो पैसे काढत होता तर त्याची नजर तिच्यावर स्थिरावली, तिला निरखून पाहत म्हणाला,
“तू... जयंतची बायको काय वं?”
जायला जसं धस्स झालं, “होजी!!”
ती घाईघाईतच पदर सावरत बोलली, “पैसे द्या मले लवकर, पोरं वाट बघत हायती, उपाशी हायत माहे पोर, जाऊ द्या मले जी.”
“हो... हो... देतो बसं जरा. दम घे, हे घे कोला पी. मी आलोच पैसे घेऊन आतून.” म्हणत तो आतल्या खोलीत गेला.
पैसे मिळतील ह्या आशेने स्वप्न बघत एका कोपऱ्याला चिपकून बसली होती. मन मुलापर्यंत जाऊन आलं होतं आणि मेंदू पैसे कधी हातात पडतील ह्यावर लक्ष ठेवून होतं. मन बोललं,”पाचशे रुपये बोलला होता तो ट्रकवाला, म्या कानी तांदूळ अन् गहू आणलं आता, लेकरं पोटभर जेवतील. माह्या अरुण्याला शर्ट घेऊन देईल बाराजारातून....” विचारात ओठांवर हसू आलं होतं तिच्या पण वारंवार दरवाज्याकडे पाहत होती.
इकडे बटाटाभाईने आतमध्ये येऊन गुण्या भाईला सांगितलं,“भाई, अस्सल गावराण माल पाठवला आहे जग्या ट्रक वाल्यानं. काय म्हणता, चाखताय का?”
“अरे साला!! अपुन के तरफसे खोका भेज दो उसको, कामाचा माणूस साला तो, बराबर ओळखतो बटा मला.”
गुण्या भाईच्या तोंडातून जशी लाड टपकत होती आता, तो खुर्चीतून अर्धा उठत म्हणाला, “अन् त्या गावरण ठेच्याला पाठव आतमदी… साल्या ह्या मेकअप लपेटलेल्या चिकण्या काय बिन कामाच्या नाही.” गुण्या भाई जोशात मिशीवर हात फिरवत होता. बटाटा भाई गुण्या भाईच्या जवळ गेला आणि कानात म्हणाला, “भाई, हे जयंतची घरवाली हाय.”
“कोण जयंत बे?”
“भाई... तोचं ज्यानं मागल्या वर्षी तुमच्या आईटमचा खून बघितला होता. आणि अपुनने त्याले त्याच्या घराजवळच्या विहिरीत फेकला होता.”
“अबे... तो काबे...”
गुण्या भाई सावकाश उठला आणि खिडकीपाशी गेला. पडद्याच्या फटीतून त्याने बाहेर बसलेल्या जयाकडे पाहिलं, “आयला... एवढी सुंदर बायको होती काबे त्याले! लयस चिकणी दिसते रे हे. च्यामारी साऱ्या आयटम फिक्या बे.”
एक नजर त्याने तिला तारलं आणि परत मोठा श्वास घेत म्हणाला, “बिचारी बे, कसा बे तू, आण न तिले माह्याजवळ, असा सोन्याने सजवतो ना क... दे पाठवून आतमध्ये. काय रसरस जवानी हाय तिची... कायले तडपत हाय तिले...”
“जी भाई, पण जरा जपून, लय गरजू वाटते भाई, प्रेमानं घ्या तिले. बापा बिन पोर पोसत आहे बिचारी. काळीज नाजूक झालंय कदाचित. दोन मुलं आहेत म्हणे तिला” बटाटा भाई काळजीत बोलून गेला.
“तुले मोठी पडलीहाय तिची... अबे मेरेकू शिकवता क्या बे, ए लडकी लोग को हटा इधरसे... मस्त माहोल बना, अन् पाठव तिले...”
अन् मग हळूच म्हणाला, “काय बे मुलगी हाय का तिले?”
“भाई, लय लहान हाय तिची पोरं अजून... तुम बी ना... कूच बी...मत सोचा इतना...”
“जाऊ दे, होऊ दे मोठी... मग बघू तिले बी आता मायले त बघू दे आदी, काय बे, म्या जरा पोट खाली करून येतो. अन् सून, एक पेक बनव जबरदस्त वाला.” गुण्या भाई वाशरूममध्ये जात बोलला.
गुण्या भाई वाशरूमकडे निघून गेला आणि बटाटा भाईने खोली साफ करायला लावली. तो बाहेर आला तेव्हां, जया एका कोपऱ्यात बसून कुठेतरी पोहचली होती. तो दिसताच, भानावर आली, जागेवरून उठली आणि हात जोडून म्हणाली,
“अजी पैसे देता ना जी, पोरं वाट बघत हायती. जाऊ द्या मले, लय वेळ होईल बघा मंग. दुकाम बिन बंद होत्यात लवकर. अनाचा कण नाय घरी, घेऊन जाईन जी.”
“अवं हो, म्या मोठ्या भाईले सांगाले गेलो होतो, जयंतच ऐकून सुन्न झाले ते. भेटायचं म्हणत्यात. पाय, घे भेटून, मदत बिदत करत्याल त. म्हणजे म्या आपला सांगतो तुले, म्या ओळखत होतो जयंतले. अन् आपल्या भाईचा त लय विश्वासू गडी होता. मागच्या खेपेले नाव काढत होते त्याचं...”
“हव का जी... अवं पण म्या कशी... राहू द्या जी, मले माह्या कामाचे पैसे द्या, म्या जातो.”
“जाय व बाई भेटून घे न इथवर आली त. एखाद मोठी मदत करतील तुले, समाजसेवा लय करतात भाई, तुहे दिवस चांगले जातील, आपला भाई लय मोठे मोठे काम करतो... जावा तुमी आत मध्ये. पाच मिनटाच काम.”
“असं म्हणता, पण मले भीती वाटते जी. राहूद्या तुमी... पैसे द्या जी म्या जाते. आमी गरीब माणूस, काय करायचं नाय मले. आजच्या नी पोरं जेवली क उद्याची उद्या जी.”
तोच गुण्या भाईने जोरात आवाज दिला, “अरे नाही म्हणत असेल तर जाऊ दे तिला, बिचारीचे पोरं वाट बघत आहे. मी तर तिच्या मुलाच्या शाळेच्या खर्चासाठी बोलत होतो. आपण उद्या पाठवून ठेवू रक्कम. जयंतच्या पोरांसाठी एवढं त करू शकतो. जाऊ दे बाईला. उगाच थांबवू नकोस बे, समजत नाही का तुले रे. जाने दे ना. अंधार झाला आता, वस्तीत जायले बी भीती वाटल.”
जया ह्या आवाजाला फसली आणि तशीच आत डोकावत बोलली, “नायजी तसं नाय... साहेब... पण...”
बटाटा भाईने नजरेने तिला आत जाण्याचा इशारा केला. आणि ती सरळ खोलीत जरा दचकत, भीत भीत आत गेली.
-----
पुढचा भाग लवकरच...
आधीच्या भागांची लिंक पेजवर आहे.
कृपया कथा C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार ai
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७
.png)
0 Comments