आधीचे भाग
भाग १- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग १
भाग २- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग २
भाग ३- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ३
भाग 4 आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ४.
भाग ५भाग ५
भाग ६ पुढे वाचा
भाग 6 -आणि जेव्हा Ex परत येतो.
इकडे अरुंधती घरी आली होती, तिच्या सासूबाईचे रिपोर्ट पाहिजे तेवढे समाधानकारक नव्हते. सासू-सासरे दोघेही सोफ्यावर बसून होते आणि अरुंधती औषधी बदलत होती, म्हणाली,
“आई उद्यापासून सकाळी बाबांसोबत जॉगिग सूर करा.”
सासूबाई मिश्कीलपणे म्हणाल्या, “म्हणजे मीही तो स्पोर्ट्सचा पँट घालू, एक रबरी पट्टी डोकं दुखत नसलं तरी कपाळाला बांधू. ती थर्मोसची बॉटल हातात घेऊ. ते तू आणून वर्ष झालेले माझे प्रदर्शनासाठी ठेवलेलं बूट घालू, आणि एक पांढरा टॉवेल उगाचच खाद्यावर ठेवू आणि घरातून पळत निघू.... मला नाही जमायचं, मी ना त्या घरातल्या पाळणाऱ्या मशीनवर धावते.”
त्या स्वतःच हसायला लागल्या.
“अगं, मला नाही जमायचं ते. मी आपली घरातल्या पाळण्याच्या मशीनवर दहा मिनिटं चालते, तेवढंच पुरे.”
बाबा आता जोरात हसले, “मग काय हरकत आहे? करतेस काय सकाळी सकाळी? उठल्यावर आधी देव, मग स्वयंपाकघर, मग वर्तमानपत्र, मग माझ्यावर ओरडणं... त्यापेक्षा माझ्यासोबत बागेत फिरायला चल. निदान मी तरी दोन गप्पा मारेन.”
अरुंधती लगेच म्हणाली, “ते काही नाही, उद्यापासून मी अलार्म लावते. दोघांनीही सकाळी सोबत जायचं आणि यायचं. आणि आई ते ट्रेडमिल मशीन माझ्यासाठी आहे. अमितने अवनी झाल्यानंतर माझ्यासाठी ते खोलीत लावलं होतं. तुम्ही उगाच त्यावर चढू नका. अजून काही नवीन व्हायचं.”
“हो गं, तू पळतच राहतेस ना...मग तूच पळ त्यावर.”
अरुंधतीने हसत मान हलवली. नंतर अर्थला अभ्यासाला बसवलं. सासरे अनवीला शिकवत बसले. सासूबाई घर आवरत होत्या आणि अरुंधती स्वयंपाक करायला गेली. स्वयंपाक आवरून तिने स्वतःच आवरलं. तयारी केली आणि हॉलमध्ये येत म्हणाली,
“बाबा, मला हॉस्पिटलला निघायचं आहे. एक सर्जरी आहे आता. सकाळी काही करणामुळे झाली नाही. आता जायलाच लागेल. आणि यायला उशीर पण होईल.”
“अगं, पण तुझं जेवण.” बाबांनी काळजीने विचारलं.
अरुंधती हसली. “बाबा, आताच अर्थसोबत प्याटीस खाल्लं मी, तेवढी कः भूक नाही, वाटलं तर परत आल्यावर खाते.”
इतक्यात आई तिला हळूच म्हणाली, “तो गेला काय गं आज?”
बाबांनी लगेच नजरेने त्यांना गप्प बसण्याचा इशारा केला. आई थबकली, तिला बघताच अरुंधतीने शांतपणे दोघांकडे पाहिलं, म्हणाली, “माधवबद्दल विचारतायना? हो... आज डिस्चार्ज दिलाय त्याला.”
इतकंच बोलून तिने पर्स उचलली. सासूबाईंच्या चेहऱ्यावरचं दडपण क्षणात हलकं झालं. त्यांनी नकळत सुटकेचा नि:श्वास टाकला आणि त्या सोफ्यावर टेकल्या. अरुंधती निघून गेली आणि बाबा आईवर ओरडले, “काय गं, कशाला काढलास तो विषय? किती वेळा सांगितलंय तुला, तिच्यासमोर माधवचं नाव काढायचं नाही. अन् तुला करायचं काय आहे?”
“अहो, काही नाही, उगाच काळजी वाटते हो. तो पुन्हा तिच्या आयुष्यात यायला नको.”
“हम्म... तुला तुझी काळजी आहे, आणि तिची?”
“अहो... म्हणजे काय हो. तुम्हीपण.”
“म्हणजे इतकंच, अमित आता ह्या जगात नाही. अरुंधती अजून किती वर्षं अशीच एकटी राहणार? तिला कुठे काही वाटत नसेल का? जोडीदार आयुष्यात नसला ना की आयुष्य कसं वाळवंटासारखं होतं... पण आपली अरुंधती कशी हिमतीने सांर काही आपल्यासाठी करते, बघतेस ना तू! मग का तिला मध्ये मध्ये बोलून त्रास देतेस.?
“अहो काहीही काय हो!”
“मग काय! तुझी काळजी तिची नाही, तुझी आहे... तुला भीती आहे. हे समजतं मला, अरुंधतीच्या जराश्या निर्णयाने आपलं सगळं साम्राज्य हलू शकतं... हे तुलाही माहित आहे. पण मला जेवढं माहित आहे त्यावरून सांगतो, ती कधीच असा तसा निर्णय घेणार नाही, आणि घेतलाही...”
“जर ती स्वतः साठी स्वार्थी झाली तर...” आई पटकन म्हणाली.
“काय हरकत आहे गं...?” बाबा चष्मा पुसत बोलले.
“अहो काय बोलता आहेत तुम्ही?” आईच्या डोळ्यांत पाणी दाटलं.
“मी काय बोलू, सांग! आपला मुलगा तर राहिला नाही... मग तिच्या आधाराने आपण आहोत.”
“मग काय काहीच बोलायचं नाही का?”
“अगं, आपल्याला काही माहित आहे का? ती काय त्याच्यासोबत जाणार आहे का? गाच काहीतरी मनात आणत बसू नकोस. चल, अवनीला जेवू घाल. मी अर्थचा अभ्यास घेतो. परीक्षा जवळ आहे त्याची आता. नको ते विचार करून स्वतःलाही त्रास करून घेऊ नकोस. आपल्या अमितची बायको भक्कम आहे सगळं सांभाळायला.”
सासूबाईंनी दीर्घ श्वास घेतला. बाबांचं म्हणणं त्यांनाही पटत होतं, पण आईचं मन काही सहज शांत होत नव्हतं.
इकडे...
अरुंधतीला सर्जरी संपायला दहा वाजले होते. ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडताना तिने एक सुटकेचा नि:श्वास सोडला. रुग्णाच्या नातेवाईकांशी बोलून, आवश्यक सूचना देऊन आणि केसची नोंद पूर्ण करून ती घाईघाईने पार्किंगकडे निघाली. तोच तिला पार्किंगमध्ये तिच्या गाडीजवळ माधव उभा दिसला, तिने दार उघडता उघडता लावलं, “माधव, तू इथे? अरे आराम करायचा ना! घरी गेला नाहीस?”
“तुला काळजी आहे अजूनही माझी…”
“का नसावी...? माझा पेशंट आहेस तू.”
“घरी जायला हवं तुला, अजून पूर्ण बरा झालेला नाहीस. जखमा भरायला वेळ लागेल. आराम कर.”
माधव कडवट हसला, “कुठलं घर अरु? तू नाहीस ना तिथे...”
“तुझं घर...?”
तो लगेच तिच्या जवळ आला, “अरु, माफ कर गं मला, आपण परत...”
“माधव तू सिमा ओलांडतो आहेस. डॉ राणे म्हणायचं मला. मी पेशंट म्हणून बोलत आहे तुझ्याशी.”
“अरु, एवढ्या सहज संपत नाही प्रेम गं. असं का म्हणतेस?”
माधवचा आवाज कातर झाला होता. अरुंधतीने गाडीचं दार उघडत शांतपणे उत्तर दिलं,
“मिस्टर पंडित, मला उशीर होत आहे. माझ्या घरी सगळे वाट बघत असणार माझी.”
“कुठलं घर गं? उगाच लादून घेतलं आहे तू सगळं. दुसऱ्यांच करत आहेस. तो मुलगा तुझा नाही... आणि ती मुलगी... मला नाही वाटत तुझी असेल म्हणून...”
अरुंधतीचा हात दारावरच थांबला. ती हळूहळू त्याच्याकडे वळली.
“मिस्टर पंडित, तुम्ही सिमा ओलांडत आहात...”
“नाही... तुला सीमा ओलांडायला सांगतो आहे... अमित राहिलाच नाही आता... अजून किती दिवस त्याच्या आठवणीत स्वतःला कैद करून ठेवणार आहेस? आणि मी परत आलोय गं... ”
अरुंधतीने त्याच्याकडे काही क्षण शांतपणे पाहिलं.
“मिस्टर पंडित, स्वतःची काळजी घ्या... गरज आहे तुम्हाला.”
“अरु, ऐकून तर घे... मी तू जे म्हणशील ते करेन गं, मला मान्य आहे तुझी डॉक्टरकी... तुझी प्रत्येक गोष्ट... मी सांभाळेल ना सर्वाना, काहीच कमी नाही गं मला, आपण सगळ्यांना आपल्या बंगल्यावर घेऊन जाऊ.... पण तू मला हवी आहे... विचार कर ना गं, अजून खूप मोठं आयुष्य पडलंय तुझ्यासमोर.”
अरुंधतीच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. ती फक्त एवढंच म्हणाली,
“मिस्टर पंडित, निघते मी.”
अरुंधतीने गाडी सुरु केली आणि माधवने नकळत काचेवर हात ठेवला. गाडीची काच अलगद वर सरकू लागली. त्याने हळूच बोट मागे घेतलं. क्षणभर दोघांच्या नजरा भिडल्या...
अरुंधतीने गाडी पार्किंगमधून काढली आणि निघून गेली. अरुंधतीच्या मनात विचार शिरला होता. माधवच्या नजरेत पश्चाताप तिला दिसत होता. त्याच्यावर खूप प्रेम होतं तिचं पण भूतकाळ म्हणून तिने त्याला कधीच मनातून काढून टाकलं होतं. आणि आज माधव एवढ्या वर्षाने परत माझ्या समोर का आला हेच तिला कळत नव्हत. नियतीचा खेळ होता
की आयुष्य पुन्हा एखादी परीक्षा घेणार होतं? हेच तिला कळत नव्हतं... परत वाहवत तर जाणार नाही ना असा विचार तिच्या मनात वादळ उठवत होता.
तिच्या मागेच माधवही निघाला. त्याला तर जिद्द चढली होती. काय घडलंय हे त्याला जाणून घ्यायचं होती. अरुंधतीच कर्तव्य बोलतय, ती का बोलत नाही हे त्याला महित करून घ्यायचं होतं. त्याला तिच्या आवाजात वेदना जणवत होती... पण ती त्याच्यासाठी होती का?
गाडी वळवताच अरुंधतीच्या डोळ्यासमोर वेगाने चित्र धावू लागली. त्या रात्री माधव अरुंधतीला भेटायला आलेला होता. गाडी अरुंधतीच्या माहेरी येऊन थांबली, आणि माधव आपटतच तो घरात शिरला आणि थेट अरुंधतीच्या खोलीकडे गेला होता.
“अरु, आहेस कुठे? इथे माझ्या आयुष्याची माती करून तू गुमान आरामात आहेस. तुला कल्पना आहे का, समाधान निवासात काय चाललं आहे. आता नुसता कोलाहल माजला आहे घरात. आई राहिली नाही... बाबा कुणाशीच बोलत नाही आहेत. तू... तू... तुझ्यामुळे झालं हे सांर... स्वतःवर लक्ष देता येत नव्हतं का...? डॉक्टर होणार होतीस ना तू? मग तुझी ती डॉक्टरकी कुठे गेली होती? स्वतःच्या बाळालाही वाचवू शकली नाहीस...”
“माधव, माझं ऐकून तर घे. मी येत घरी. मी सांभाळते ना सगळं. मलाही वाईट वाटत आहे रे, आई... आई तर...” अरुंधतीचा आवाज गहिवरला. अश्रू डोळ्यात गर्दी करू लागले होते.
माधव उपहासाने हसला, “असं? तुला वाईट वाटत आहे? तुला तर ते बाळच नको होतं ना! जा... आता खुशाल कर तुझं ते मेडिकल. स्वतःचं बाळही वाचवू शकली नाहीस, आणि म्हणे लोकांचे जीव वाचवणार!”
अरुंधतीचे अश्रू ओघळू लागले होते, “माधव, आपण शांतपणे बोलू ना नंतर.. तू आधी शांत हो, आपल्या घरी जाऊ या...चल मी तयार होते.”
तो संतापाने तिच्यावरच ओरडला, “आपल्या? तू येणारं नाही आहेस. कोणतं आपलं घर? तू आता त्या घरात पाऊलही ठेवायचं नाहीस. समजलं?”
“माधव... ऐक ना...”
“काय ऐकू... ज्या दिवशी तू त्या घरात आलीस, त्या दिवसापासून 'समाधान निवास'चं समाधानच निघून गेलं. माझं बाळ गेलं... माझी आई गेली... माझं सगळं संपलं. आता तुझा सावलीसुद्धा त्या घरावर पडू नये!”
क्षणाचाही विलंब न करता माधवने हातातले सोडचिठ्ठीचे कागद अरुंधतीच्या अंगावर फेकले. कागद हवेत भिरभिरत तिच्या पायाशी येऊन पडले. अरुंधती नुसती त्यांच्याकडे पाहत राहिली. डोळ्यांत अश्रू दाटल्यामुळे अक्षरंसुद्धा धूसर झाली होती. माधव पुन्हा संतापाने ओरडला,
“ऐकून घे नीट, माझ्या घरात तू अजिबात नको आहेस मला... आणि हे बघ, तुझ्या डॉक्टरांनी हे रिपोर्ट्स दिलेत.”
त्याने रिपोर्ट्स तिच्यासमोर फेकले, “वाच त्यात काय लिहिलंय. तू... तू आता कधीच आई होऊ शकणार नाहीस!”
निघताना तो जोरात ओरडला, “आणि आजपासून... आपला संबंध संपला. सगळं संपलं. माझ्यासाठी तू मेलीस. माझ्या आयुष्यात तुझी आता काहीच जागा नाही. माझ्या कोणत्याच कामाची तू उरली नाहीस... मग कशाला हवी आहेस मला?”
क्षणभर अरुंधती निशब्द झाली होती. अरुंधतीने थरथरत्या पावलांनी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला.
“माधव... काय बोलत आहेस तू! माझं प्रेम आहे तुझ्यावर... आणि... खरंच... तू माझ्याशिवाय राहू शकशील?”
“प्रेम? कळतंय का तुला? प्रेम म्हणजे फक्त स्वतःची स्वप्नं पूर्ण करणं नसतं. प्रेमात समोरच्याच्या इच्छेलाही तितकीच किंमत असते. मी तुला कितीदा नाही म्हणालो होतो त्या कॉलेजला जायला... पण तुला तर डॉक्टर होण्याची जिद्द चढली होती!”
अरुंधतीचे अश्रू थांबत नव्हते.
“माधव... पण शेवटी तुझीच इच्छा मान्य केली होती ना मी. मी माझं शिक्षणही बाजूला ठेवलं होतं. तू हे रिपोर्ट्स पूर्ण वाचलेस का? डॉक्टरांनी सांगितलं होतं... बाळच खूप नाजूक होतं. त्याचं जगणंच कठीण होतं. त्यात माझी काय चूक होती रे? माझ्या आत्येबहिणीचंसुद्धा पहिलं बाळ वाचलं नव्हतं. म्हणून काय तिचा संसार मोडला? म्हणून काय तिच्या नवऱ्याने तिची साथ सोडली?”
“हे कुणी सांगितलं तुला ?”
“आss... आई सांगत होती.”
“हे असले कारण देऊ नको. तुला ते बाळ ठेवायचंच नव्हतं. सुरुवातीपासूनच नव्हतं. तू... तूच मारलंस माझ्या बाळाला आणि माझ्या आईलाही...अरे किती किती जीवं होता तिचा तुझ्यावर.”
“अरे निदान आईसाठी तरी असा बोलू नकोस. माझं खूप प्रेम होतं त्यांच्यावर....त्या तर मला म्हणायच्या बाळ झालं की तुझ्याशी बोलतो म्हणून.”
“मग तू ठेवलंस का तिला जिवंत. तू तसं मोडकं तोंड घेऊन भरल्या घरात फिरायची ना... गुमान स्वतःला डांबून बसायची ना...आता बस आयुष्यभर तुझ्या आईच्या घरी.”
“माधव शांत हो ना तू, चल मी आताच जाऊया आपण घरी.”
“खबरदार... ह्या कागदांवर सह्या कर आणि तुझा माझा संबंध संपला. तुला काय हवं ते सांग, देईल मी, समजेल माझी हौस भागली....फेकेन मागशील तेवढे.”
माधव जोशात निघून गेला. अरुंधती इथेच खाली पडून बसून राहिली. प्रेमाची बोली लावली हे तिला मनात लागलं होतं. ते पडलेले कागद उचलताना तिला काहीच सुचत नव्हतं.
तीन महिने झाले होते, पण माधव फिरकला नव्हता. अरुंधती दोनदा ‘समाधान निवासात’ जाऊन आली होती पण तिला गेटवरुन आत मध्ये जाऊ दिलं नव्हतं. तशी सक्त ताकीद दिली होती माधवने गेटवर.
तिने वेगळेपणासाठी नकार दिला होता मग कायदेशीर रित्या वेगळे होणं अवघड झालं होतं माधवसाठी. मग त्याने नको नको आरोप करून अरुंधतीला भाग पाडलं होतं. शेवटी दोन वर्षाच्या लढाईनंतर अरुंधती आणि माधव वेगळे झाले होते. पण अरुंधतीची आस अजूनही कायम होती. तिला मनातून आशा होती की माधव नक्की परत येईल,
“तो जरा तापट आहे, अजून राग गेला नाही त्याचा, आईला गमावलंय त्याने. माझा माधव माझ्याशिवाय राहणं शक्यचं नाही....”
असं म्हणत ती तिच्या आई-बाबांना समजवायची. पण दोन वर्ष झालीत माधव काही परताला नव्हता. नंतर कुणाकडून समजलं की तो अमेरिकेत कायमचा स्थायिक झाला. तरीही अरुंधती मनातल्या मनात स्वतः ला खुडत असायची. तिच्या अशा शांत आणि खुडत राहाल्यामुळे बाबांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांची प्रकृती तर सुधारली पण होतं नव्हतं ते सांर काही लागलं होतं आणि मग आणि शेवटी उपचार वेळीच न मिळाल्याने ते वारले.
बाबांच्या जाण्याने अरुंधती पूर्णपणे पोरकी झाली होती. एका बाजूला नवऱ्याने नातं तोडलं होतं, दुसऱ्या बाजूला मुलगा गमावला होता... आणि आता वडिलांचं छत्रही कायमचं हरपलं होतं... पण तरीही अरुंधतीला माधवची वाट होती... आणि तो आज असा अचानक पुढे आला होता.
पुढला भाग लवकरच...
आधीचे भाग पेजवर आहेत, लिंक पहिल्या commnetला आहे. किंवा तुम्ही पेजवर वाचू शकता.
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ... @followers @topfanss

0 Comments