आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ५

 आधीचे भाग

भाग १- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग १

भाग २-  आणि जेव्हा Ex परत येतो... भाग २

भाग ३- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ३

भाग 4 आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ४.

भाग पाच इथे वाचा...



भाग ५ -आणि जेव्हा Ex परत येतो...
अरुंधती माधवच्या मनातील विचार ऐकून थक्क झाली होती. ती एकतार त्याच्याकडे बघत उभी होती. माधव तिच्या जवळ आला, “अरु तू इथे? काही हवंय का तुला? जागी कशी झालीस गं तू? आवाज द्यायचा ना मला.”
मंदा काकू पाणी घ्या अरुसाठी. म्हणत त्याने अरुला हात दिला. अरु हळूच म्हणाली, “हम्म, योग्य वेळी जागी झाले मी... आता कसं स्पष्ट दिसत आहे सांर...”
“अरु, काहीही नाही, तू लक्ष नको देऊ, आई काय काहीही बोलते.”
“आई, की तू?”
“मी काय तुझ्यासाठी वाईट विचार करणार? माझं प्रेम आहे तुझ्यावर....”
“प्रेम माझ्यावर आहे?”
“मग काही शंका?”

“अजिबात नाही... प्रेम माझ्यावर नाहीच तुझं, तुझ्यावर आहे.”
“अरु !!! “
आणि मग शांत झाला, “अरु, चल खोलीत हो, आराम कर तू, उद्या आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे ना? सातवा महिना लागणार आहे....”
“हम्म....”
अरु काहीच बोलली नाही. शांत गुमान खोलीत शिरली. ती पूर्णपणे गप्प झाली होती. माधवचं अतोनात प्रेम तिच्यासाठी आता एका कैदेसारखं झालं होतं, त्याच्या पेमपलीकडे त्याला काहीच दिसत नव्हतं... अरु हे सगळं बघून सुन्न झालेली मात्र आता काहीच बोलत नव्हती. सासूने आणि घरच्यांनी तिचा सातवा महिना मोठ्या उत्साहात साजरा केला, माहेरचे आणि सासरचे सारेच तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते, पण अरुचा चेहरा मात्र खुलत नव्हता. तिला समजून घेणारा कुणीही त्या प्रेमाच्या माणसात नव्हता. पण खरं प्रेम अरुला मिळत नव्हतं. तिच्या मनात सतत युद्ध सुरु होतं. आपण माधवला ओळखण्यात चूक केली... आणि आता काहीच बदलू शकत नाही. ही निवड तिची स्वतःची होती मग ती माहेरीही बोलू शकत नव्हती. मनातलं दुःख मनातच दाबत ती दिवसेंदिवस अधिक अबोल होत गेली. खोलीच्या बाहेर पडणंही तिने जवळजवळ बंद केलं होतं. दिवसामागून दिवस सरत गेले आणि बघता बघता नववा महिना सुरू झाला.

संपूर्ण घर नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज झालं होतं. छोट्या छोट्या कपड्यांपासून पाळण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट प्रेमाने आणली गेली होती. सासूबाई तर रोज बाळासाठी नवनवीन वस्तू गोळा करत होत्या. माधवही बाप होण्याच्या आनंदात हरवला होता. पण त्या आनंदात अरुंधतीचं हरवत चाललेलं हसू कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं.
त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे माधव ऑफिससाठी निघून गेला आणि नंतर बराच वेळ अरुंधती बाहेर आलीच नाही. सासूबाईही त्या दिवशी मंदिरात गेल्या होत्या. सुनेचं सुखरूप बाळंतपण व्हावं म्हणून त्यांनी विशेष पूजा ठेवली होती. सासरे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात नोकरचाकर आपल्या कामात गुंतले होते. दुपार सरली, संध्याकाळ झाली... पण अरु खोलीबाहेर आलीच नाही.

संध्याकाळी सासू प्रसाद द्यायला खोलीत शिरली, अरु खोलीत पडून होती. तिने तातडीने सर्वांना बोलावलं, अरुलाही हॉस्पिटलमध्ये हलवलं....पण...
शेवटी डॉक्टरांनी उत्तर दिलं की, बाळ पाच तासापासून उदरात मरून होतं, आणि आता अरुंधतीला वाचवण्यासाठी धडपड सुरु होती. मोठ्यांच्या वस्तीत छोट्या मनांची लोकं राहत होती. अरुंधतीची चिंता आता फक्त तिच्या आई बाबांना होती. बळाचा अंतविधी करून सारेच पाठ फिरवून निघून गेले होते.
अरु अजूनही हॉस्पिटलमध्ये होती, तिचे आई बाबा तेवढे तिच्या जवळ होते. माधव बराच वेळ व्हरांड्यात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत राहिला. राग आणि वेदना यांच्या कचाट्यात अडकलेला तो शेवटी काहीही न बोलता हॉस्पिटलमधून निघून गेला. शेवटी, काय घडलं हे फक्त आता अरुंधतीच सांगू शकत होती...पण ती अजूनही बेशुद्ध होती.

माधव घरी येताच संतापाने उसळला. दार आपटतच तो हॉलमध्ये आला आणि थेट आईसमोर उभा राहिला
“काय आई हे? कुठे होतीस तू दिवसभर? तुला माहित होतं ना, अरु गेल्या काही दिवसांत खूप शांत झालेली होती. आणि दिवस भरले होते तिचे, मग का गं गेलीस देवळात? घे आता, पावला तुला देवं...”
तो अजूनच संतापाने म्हणाला, “अरुला तर मी बघतोच. येऊ तर दे तिला शुद्धीवर. मला कळवायच होतं ना, त्रास होतं होता तर, कुणाला तरी हाक मारायची होती तिने.”
माधवच ओरडणं सूर होतं, त्याने घरातल्या सगळ्या नोकरांना हॉलमध्ये बोलावून घेतलं, चौकशी केली, पण कुणालाच काही अंदाज नव्हता, मंदा काकुनुसार, अरुंधती सकाळी झोपायची मग त्यांना तसचं वाटून राहिलं की ती झोपली असावी म्हणून, पण त्यांनीही स्वतः जाऊन चौकशी केली नव्हती. क्षणभर माधवने डोळे मिटले. रागाने त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याला आता एकच प्रश्न आतून पोखरत होता, अरु इतका वेळ एकटी पडून होती... आणि घरातल्या कुणालाच ते कळलं नाही?

त्याची आई मात्र गुमान अश्रू ढाळत होती. तिच्या कानात सतत डॉक्टरचे शब्द घुमत होते,
“अरुंधतीला आधी हॉस्पिटलमध्ये आणलं असतं, तर कदाचित बाळ आज जिवंत असतं. तुम्ही इतके सुशिक्षित, सुसंस्कृत लोक... आणि एवढी हलगर्जी? घरात कुणाचंच तिच्याकडे लक्ष नव्हतं का? बाळाची हालचाल बंद झाली होती, हे कळताच तिला तातडीने आणायला हवं होतं. बाळाला आम्ही वाचवू शकलो नाही... पण आता अरुंधतीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत.”
प्रत्येक शब्द तिच्या हृदयात खंजीरासारखा रुतत होता. सुनेच्या उदरात तिचा नातू पाच तासांपासून मृत पडला होता... आणि ती स्वतः त्याच वेळी देवळात त्याच्या सुखरूप जन्मासाठी देवाकडे साकडं घालत बसली होती. ‘निदान घरी असती तर बाळ वाचलं असतंहा एकच विचार तिचा जीव पोखरत होता. अपराधीपणाने ती घाबरून गेली होती. विचारांच्या त्या भोवऱ्यातच अचानक तिच्या छातीत कळ उठली. आणि पुढच्याच क्षणी ती खाली कोसळली. घरात एकच गोंधळ उडाला. माधवच्या आईला तातडीने हॉस्पिटलला हलवण्यात आलं, डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले... पण हृदयविकाराचा तीव्र झटका त्यांना सहन झाला नाही. अवघ्या दोन तासांत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका दिवसात दोन जीव गेले होते...

आणि इकडे अरुंधतीला जाग आली होती, पण कुणीच नव्हतं, तिचा लहान भाऊ तिच्या जवळ होता. त्यालाही तिला कसं सावरायचं कळत नव्हतं, त्याने डॉक्टरला बोलावलं आणि त्यांनी तिला काहीही न सांगता शांत केलं. नंतर तिची आई इथे आली. तीही गप्प होती. आता मात्र अरुंधती ओरडली, “माधव माधव.... कुणी सांगताय का मला? माझं बाळ कुठे आहे?”
ती रडत ओरडत राहिली. माधव तर तिथे नव्हताच पण तिचे बाबा मात्र तिथे पोहचले. त्यांनी तिला समजावून बाळ झोपलं आहे असं सांगितलं, अरुंधती समजली पण पुढच्याच क्षणी ती पुन्हा अस्वस्थ झाली, “माधव कुठे आहे बाबा...? त्याला बोलवा ना... मला त्याच्याशी बोलायचं आहे...”
आई-बाबांनी कसबसं तिला शांत केलं. खोलीत भयाण शांतता पसलेली होती. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता. ढगांनी गोंधळ घातला होता. ती रात्र भयाण रौद्र रूप घेऊन आली होती. इतक्यात माधव ओरडत अरुंधतीच्या खोलीत आला,
“अरुंधती! काय केलंस हे? तुझ्या खुड्या नादात तू काय गमावलंस, माहित आहे का तुला..? माझं बाळ... माझी आई....”

अरुंधती गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांत प्रश्न होते. अरुंधतीच्या आईने माधवला थांबवण्याचा प्रयत्न केला पण काही फरक पडला नाही, रागात विजेच्या वेगाने तो येऊन अरुंधतीवर आदळणार तोच तिचे बाबा तिच्यासमोर उभे झाले... अरुंधतीला बाबांनी आता कुशीत धरलं होतं. ती टक लावून बघत होती माधवकडे. माधव आरोप करत राहिला आणि अरुंधती हळूहळू शून्यात हरवत गेली. जणू तिच्या मनातले सगळे आवाज एका क्षणात कायमचे थांबले होते. ती पाषाणाच्या मूर्तीसारखी निश्चल झाली.
घाबरून बाबांनी तिला अलगद पलंगावर टाकलं आणि डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सूर केले. समोर अरुंधतीची अवस्था पाहून माधव क्षणभर घाबरला. पण काहीही न बोलता तो मागे वळला आणि खोलीबाहेर निघून गेला.
अरुंधतीची आई त्याच्या मागे धावत आली, आवाज देत राहिली, “अहो माधवराव, थांबा हो! अरुला गरज आहे तुमची, माधवराव... माधवराव थांबा हो.. माधवराव...”

माधवने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या पावलांचा आवाज कॉरिडॉरमध्ये विरत गेला... आणि त्या आवाजासोबतच अरुंधतीच्या आयुष्यातला एक अध्यायही संपला.
वर्तमानकाळ...
“माधवराव, आपल्या डिस्चार्जचे पेपर तयार झाले आहेत. आपल्याला उद्या सकाळी डिस्चार्ज मिळतोय.”
नर्स माधवला सांगत होती. पण माधवचं लक्ष तिच्याकडे नव्हतं. तो अजूनही भूतकाळात अडकला होता. अरुंधतीच्या आईचा तो आवाज... तिची आर्त हाक... पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमत होती. ह.... आज इतक्या वर्षांनी त्या आवाजातलं दुःख समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता... शोधत होता... त्या एका क्षणी नेमकं काय घडलं होतं... कोण चुकलं होतं... पण आता त्या विचारलाही अर्थ उरला नव्हता...
विचारांची एक कडी दुसऱ्या कडीला जोडत तो भूतकाळ उलगडण्याचा प्रयत्न करत होता. वर्षानुवर्षे जे प्रश्न त्याने स्वतःपासून लपवून ठेवले होते, ते आज एकामागोमाग त्याच्यासमोर उभे राहत होते. आणि त्याच क्षणी... त्याच्या आईचे अखेरचे शब्द कानात घुमले.
“माधव... नव्याने सुरुवात कर... अरुला माफ कर... आणि तिचंही ऐकून घे... फक्त तिचीच नाही... आपली सर्वांची चूक आहे...”
माधवला आज आईचे ते शब्द आतून पोखरत होते. का ऐकलं नाही आईच, म्हणून संतापला होता. समोर डिस्चार्जचे पेपर ठेवले होते पण त्याला त्याने अरुंधतीच्या अंगावर फेकलेले घटस्फोटाचे पेपर दिसत होते.
कॉरिडॉरमध्ये अवनीचा खेळत होती. त्या गोड आवाजाने विचारांच्या गर्तेत हरवलेला माधव उठला. दाराकडे गेला. अरुंधतीही तिच्यामागे हसत धावत होती, तिचा तो गळ्यातला स्टेथोस्कोप तिच्या मंगळसुत्रासोबत गुंतून होता आणि आनंदाने हलत होता. खूप आनंदी दिसत होती ती. तिला असं बघून माधवला साऱ्या प्रश्नाची उत्तर जणू गवसली होती.

नजरा स्वतः कडे वळल्या, मनात विचारांचा कोलाहाल उठला, ज्यात तो गुन्हेगार म्हणून स्वतः उभा होता. तिची नजर आपल्यावर पडेल, या भीतीने तो क्षणात दाराआड झाला. परत आपल्या बेडवर येऊन बसला, पण नजरेसमोर अजूनही तेच दृश्य होतं... गळ्यातला स्टेथोस्कोप... आणि त्यात अलगद गुंतलेलं तिचं मंगळसूत्र...ते दोघांचं मिलन त्याच्या काळजाला भेदून गेलं. तो स्वतःशीच पुटपुटला,
“तुझा आनंद इथे होता... आणि मी तोच तुझ्यापासून हिरावून घेत होतो.. पण चूक आता उमगली मला अरु... प्रेम म्हणजे फक्त समोरच्याला स्वतःजवळ ठेवणं नसतं... त्याच्या स्वप्नांना जगू देणं असतं. त्याच्या आनंदाला जपणं असतं. तेच खरं प्रेम... आणि तेच मला कधी समजलंच नाही.”
दीर्घ सुस्कारा सोडत तो टेकला. घरचं तर कुणी नव्हतच त्याच्या सोबत. त्याचा विश्वासू मॅनेजर येणारं होता त्याला घरी घेऊन जाण्यासाठी. पण का कुणास ठाऊक आज त्याला अरुंधतीशी बोलल्या शिवाय जायचं नव्हतं.
पण अरुंधती, डॉ राणे होती. तिला भेटण्यासाठी योग्य कारणच लागत होतं. कासावीस झाला, नर्स खोलीत आली, तर म्हणाला,
“सिस्टर, अरुंधती....म्हणजे डॉ राणे... त्या आहेत का?”
“राणे मॅडम? त्या तर आताच निघून गेल्या, त्यांचे सासू-सासरे आले होते ना, आणि तसंही, त्या आपल्या हॉस्पिटलच्या मोठ्या मॅडम आहेत. त्या फक्त सर्जरी आणि महत्त्वाचे पेशंट बघतात. बाकीच्या पेशंटसाठी आमच्याकडे जुनिअर डॉक्टर आहेत. तुम्हाला काही हवं असेल तर मी लगेच त्यांना सांगते.”

आणि ती रजिस्टरमध्ये ड्युटीची नोंद करत होती. माधवने तिच्याकडे पाहिलं, “मोठ्या मॅडम... मग त्या येणार नाहीत का आज?”
“हम्म... आता तर नाही. पण रात्री त्यांना एक सर्जरी आहे. त्यासाठी येतील. तुम्हाला तर डिस्चार्ज झालंय ना...”
माधव शांत झाला, तेवढ्यात सेक्रेटरी सायशा आणि त्याचा मॅनेजर आले.
“ओह, माय डार्लिंग, किती लागलंय रे तुला. आता ना मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. माझ्याशिवाय.” सायशा धावत आली आणि माधवला अलगद मिठी मारली. मॅनेजर नर्ससोबत बिल, डिस्चार्जची कागदपत्रं आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बाहेर गेला.
सायशाने माधवच सामान आवरलं, सोबत आणलेल्या बॅगमध्ये ठेवलं. माधव शरीराने डिस्चार्जसाठी तयार होता... पण मन अजूनही त्या हॉस्पिटलमध्येच अडकलं होतं. कसातरी निघाला, बाहेर निघतांना हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठा संगमरवरी फलकावर संस्थापकांची यादी लागली होती, त्यात अमित राणे मोठ्या अक्षरात लिहून होतं. आणि खाली डॉक्टरांच्या यादीत डॉ. अरुंधती अमित राणे...
माधवच्या काळजात तीव्र वेदना झाल्या होत्या.... मन अजूनही शोधात होतं, त्याने काय सोडलं होतं जे अमितने जपलं हे त्याला आता जाणून घ्यायचं होतं.... जरा थबकला, मॅनेजरला म्हणाला, “गाडी एखाद्या हॉटेलकडे घ्या. मला आज बोलायचं आहे तिच्याशी.”
मॅनेजर काहीच विचारलं नाही, तोही अरुंधतीला ओळखून होताच. त्यालाही सांर काही माहित होतं. माधवच काय काय झालं अरुंधतीच्या मागून हे त्यालाच माहित होतं. न बोलता त्याने गाडी हॉटेलकडे वळवली. सायशाही माधव सोबत त्याच्या खोलीत थांबली होती. आज तिची जादू काही माधववर चालत नव्हती. माधव गुमान गप्प होता. त्याला अरुंधतीला आयुष्यात परत आणायचं होतं. विचारात होता आणि त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार एकच चेहरा येत होता...अरु... डॉं अरुंधती!!

पुढचा भाग पेजवर आहे.
आधीचे भाग पेजवर आहेत, लिंक पहिल्या commnetला आहे. किंवा तुम्ही पेजवर वाचू शकता.
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai

स्टे कनेक्ट, स्टे सेफ... @topfans @followers


Post a Comment

0 Comments