एक होती भिंगरी. भाग ४

 द कमबॅक...भाग ४


भाग १ इथे वाचा- द कमबॅक... भाग १-
भाग २ इथे वाचा एक होती भिंगरी .. भाग २
भाग ४--- पुढे

जया आत शिरातच बटाटा भाईने दार बाहेरून लावून घेतलं. दार बंद होण्याच्या आवाज तिच्या छातीत धस्स करून गेला. जया घाबरली आणि घाबरत म्हणाली, “अजी, मले जाऊ द्या, पोरं घरी हायत, पैसे द्या जी...” तिचे शब्द पूर्णही झाले नाही आणि गुण्याभाईने तिला ओढलं. मग आतून खूप वेळ पर्यंत तिच्या ओरडण्याचा आवाज येत राहिला. तासभराने दार उघडल्या गेलं. हातात दहा हजाराची रुपयांची गड्डी घेऊन ती बाहेर आली. नजर हलवलेली ती पुढे सरकत अंगणात आली. ती दिसताच बटाटा भाई म्हणाला, “ऐक वं, उद्या यायचं हाय तुला नाहीतर तुझी अख्या गावात बदनामी करू आम्हीं... गुमान वाड्यावर यायचं आणि आपला मोबदला घेऊन जात जायचं. तू बिन खुश अन् भाई बिन. तुह्या पोराले शहरात शाळेत टाकतो म्या काय काळजी नको करू आता तू. अन् पोरीलेबीन शिकवू आपून. तू आता भाईची खास झाली आहेस. खुश हो अन् दरवषी यायचं बुलावा देत जाऊ तुले. आता आमचा मुक्काम दोनच दिवस हाय तेव्हा ये उद्या. निघ आता, अंधार पडत हाय. कुणी बी पायलं नाय तुले, आणि काय बिन झालं नाय, जा गुमान, कर मजा, वाटल ते घे अन् पोरांले भी देजो.”

जया सुन्न होऊन फाटकाच्या बाहेर आली, प्राण नसलेलं शरीर ओढत ती चालत होती, जोरात हंबरडा फोडला तिने, हातातले पैसे तिने रागात फाटकावर फेकून दिले आणि सुसाट धावत सुटली, वाटेत दमुन ती पडली, हातच्या मुठा मोकळ्या करत तिने श्वास मोकळा केला, पोटात भुकेने गोळा आला होता, नजर सोमारच्या डोलणाऱ्या गव्हावर पडली, कच्चे गहू झप झप ओरपले, तोंडात भरले, काही झोऱ्यात टाकले. गहू तोडण्याच्या आवाजाने शेतधन्याने ओरडून आवाज दिला आणि ती पाठीला पाय लावत घरी आली.
कण्या गद-गद करत उकडत होत्या तशी तशी जया मनात उकडत होती. गरम कणी घोट्तांना हातावर उडून चटका लागला तिला आणि ती ताडकन भानावर आली.

मुलांना आवाज दिला. मुलांना कण्या ताटात वाढल्या, तसा तिच्या मनातला कोलाहाला वाढला. निंबू काटलं आणि हाताला लागलं पण लक्ष नव्हतं, मीठ आणि मिरची कण्यांवर टाकतांना हाताला झोंबत होतं पण मनाला लागलेल्या तिखटापेक्षा कमीच होतं. मुलांनी मनसोक्त कण्या खाल्ल्या तशी ती मनात तृप्त झाली. दोन्ही मुलं मायच्या कुशीत निवांत झोपले. पण जयाच्या मनातला ज्वालामुखी पार तिच्यातच फुटत होता. तिला परत उद्या वाड्यावर जायचं नव्हतं पण पर्याय नव्हता. विचारात ती भावना शून्य झाली होती. तिच्या आंतरिक मनाचा केव्हांच खून झाला होता आणि शरीर बेसुध होऊन मुलांकडे बघत होतं.


<<>>
सकाळी अरुण उठला त्याला आई घरात दिसत नव्हती, डोळे चोळत, माय माय करत तो बाहेर आला आणि बघून पार कोसळला. अंगणात असलेल्या कडूनिंबाच्या मोठ्या झाडाला त्याची माय लटकून होती. पोरं अनाथ झाली होती. लहानश्या अरुणला काही कळतही नव्हत, आईच्या पायाशी जाऊन तो रडला त्याच्या रडण्याने भावना उठली आणि तीही रडायला लागली, अरुण धावत शेजारी गेला आणि समोरच्या भानू दुकानवाल्या काकाला घेऊन आला.
सारी वस्ती नाराज झाली होती जयाच्या निर्णयाने. कुणी काही बोलत होतं तर कुणी काही, मिरची ठेकेदाराने गावात बोंब ठोकली होती ती वेगळीच. सांर गावं बोलत होतं पण मुलांना काय कळत होतं.

दोन निष्पाप जीवांना तर काहीच सुचत नव्हतं. भानू काका मदतीला होता तेवढच. अरुण बहिणीला कडेवर घेऊन एका कोपऱ्यातून सांर काही बघत होता. मायच्या लटकलेल्या देहाला पोलिसांनी खाली काढलं आणि तो भावनेला घेऊन धावला. तो रडत होता आणि त्याची बहिण भावना मायला बिलगून होती. भानुकाकाने दोन्ही पोरांना जवळ धरलं आणि बाजूला केलं.
पोलीस, नातेवाईक आणि सर्व येऊन सहानुभूतीचे तर काही तीरस्कारचे शब्द फेकून निघून गेले. बघता बघता माय माती झाली आणि सारच आटपून पंधरा दिवस झाले होती. दोघेच बहिण भाऊ घरात होती, कुणीही मदतीला समोर आलं नव्हतं. दया आली की शेजारी पाजारी खायला काही आणून देत होते, पण आता तेही हळूहळू कमी झालं होतं. बहिण भाऊ भिंगरी खेळत आणि एकमेकाच्या कुशीत झोपत असत. भानू काका अधून-मधून दोघांवर लक्ष म्हणून घरी येत, बायकोच्या लपून खायला देत असत.

मग अरुणने शाळा सुरु केली. त्याच्यासाठी शाळा म्हणजे शिक्षणापेक्षा पोटाची सोय होती. आता शाळेतील शिक्षकही त्याच्या खिचडीच्या तडतडीसाठी बघून खटकत नसत. रोज बहिणीसाठी खिचडी चोरून आणणं आणि तिला भरवणं त्याच काम झालं होतं. शाळेतली रोज मिळणारी खिचडी ह्यावरच ते दिवस काढत होते. बालपण भुकेच्या सावलीत समोर जात होतं. पोटभर अन्न म्हणजे काय, याची आठवणही त्यांना नव्हती. तरीही दोघं भिंगरी खेळायचे, मातीत घरं बांधायचे, कधी झाडाखाली बसून स्वप्नं बघायचे.

बालपण भुकेसमोर हरत होतं, पण पूर्णपणे मरत नव्हतं. रविवार असला की भुकेने तडपडून जात असायचे. कधी कधी तर तीन तीन दिवस उपाशी असायचे. पोटात अन्नाचा कणही पडत नसायचा. अश्यावेळी अरुण मग भावनाला समजावून गावभर फिरायचा, बाजारात बसायचा, कुठे काही पडलेलं, फेकलेलं अन्न उचलून आणायचा, कुत्र्याला टाकलेली भाकरी जरी दिसली तरी अरुण पळत घेऊन येत असायचा. समोरच्या भानू दुकानवाल्याला कधी हे नजरेत आलं की त्याचं काळजी पिळवटून जायचं. हळूच नजरेने बोलत तो बायकोला भीत भीत, तिची नजर चुकवत एखादा टोसचा पुडा नाहीतर बिस्कीट पुडा त्याच्याकडे सरकवायचा आणि त्यांच्या सुट्या निघायच्या.

शाळा सुरु झाली की परत खिचडीवर जगणं सुरु होतं होतं. नंतर भानू काकाच्या मदतीने अरुणने भावनालाही शाळेत टाकलं, तीही शाळेत जायला लागली. रोज दोघेही भावंडांच खिचडी वर जगणं सुरु होतं. दोघही बहिण भाऊ मिळून एक डब्बा खिचडी रात्रीच्या जेवणासाठी वाचवून ठेवत असत. दिवस खिचडीच्या वाटेवर उगवायचा आणि रात्र तिला खाऊन काढायचे.
अरुण बहिणीला भूक लागू नये म्हणून तिचा अभ्यास घेत होता. बहिणीला रमवण्यात आता तो हुशार झाला होता. तिलाही कळायचं पण पर्याय काय हेही हळूहळू भावनाला समजत होतं. वयाने लहान दोघेही विचाराने मोठे झाले होते. एकमेकांच्या साथीने घरात राहायचे. दोघात एकमेकांसाठी जाण्याची हट्टी जिद्द दिसत असायची.

सात वर्षाच्या अरुणने समोरच्या भानू दुकानदाराला बोलून पाव विकण्याचा व्यवसाय सुरु केला. सकाळी उठून तो पायीच पावं विकत असायचा, दहा पर्यंत पाव विकून घरी आला की भावनाला तयार करायचा आणि मग दोघेही दिवसभर शाळेत असायचे. शाळेत खिचडीने पोट भरणं आणि अभ्यासात लक्ष देणे हेच त्याचं सुरु होतं. घरी आल्यावर परत रात्री नव वाजेपर्यंत अरुण जरा दूर गल्लीतल्या दुकानात सामानाच्या पुड्या बांधत असायचा. आलेल्या पैस्याने दोघं घरात सामान आणायचे आणि रविवारी अरुण स्वतः भात मांडायचा, बहिणीला आनंदात गोष्टी सांगत भाजी करायचा, दोघेही आकाशातल्या चांदण्या मोजत मस्त जेवण करायचे.

कुणी कपडे देत होतं तर कुणी काही. कुणी शिळपाथ तर कुणी सनासुदीला गोडधोड, अरुण गुमान सगळं ठेवून घ्यायचा. कुणाशीही तो वाकड्यात जाऊन बोलत नव्हता. दिवस रेटत जात होती आणि रात्री सुखासाठी पळत होत्या. दोघेही मोठे होत होते एकमेकांच्या आधाराने.
आता भावनाही भिंगरी खेळण्यात वस्ताद झाली होती मग टक्कर खेळायचे दोघे. अरुण आता तिला भिंगरी म्हणून चिडवत होता. दोघांच्याही मस्तीत गाणं रंगायचं
“एक होती भिंगरी... एक होती भिंगरी... तिचं नावं झिंगरी,.. तिचं नावं झिंगरी....”
आणि अरुण तिला ओरडायचा “ए झिंगरे...”
बघता बघता बहिण भाऊ मोठी झाली होती. अरुणचा पूर्ण वेळ घर चालवण्यात जायचा मग अभ्यास होत नव्हता त्याचा. मग तो दहावी नापास झाला आणि हाताला लागेल ते लहान मोठ्या काम करायला लागला.
चौदा वर्षाची गोरीपान भावना मात्र अभ्यासात हुशार होती. गणित तर तिचा आवडता विषय होता. पाव विकल्यानंतर तिचं हिशोब करून भानुकाकाला हिशोब द्यायची. लहान मुलांना घराच्या आवारात घेऊन शाळा शाळा खेळत असायची, आता घरची कामंही ती करायची, अरुणला आता तिची मदत होत होती. वस्तीत दोघांच सर्वाना नवल होतं. बहिण भाऊ खुखाने राहत होते. आणि वस्तीतले लोकं त्यांना लागेल तशी मदत करत असायची.

दिवसभर काम करून अरुन थकला की अंगणात दोघेही बसत असत, आणि निळ्या भोर आकाशाकडे बघून माय आणि बाबुला आठवत असत. आणि मग एखाद्या विमानाचा लाईट आकाशात दिसला की भावना खूप खुश होतं होती, अरुणला म्हणायची,
"दादा मी बसेन हा ह्यात तुझ्यासोबत एक दिवस... ह्या विमानांत. झु झु ......ss..झु....ss"
"हो आधी गणित कर पट पट, उद्यापासून परीक्षा हाय तुही, ह्याबीन वेळला नंबर पहिला आनजो, मग म्या तुले मुंबई पावाले घेऊन जाईन. पुढच्या वर्षी दहावी रायल तुही, गुरुजी बोलत होते तू लय हुशार आहेस म्हणून. चल घे आटूप लवकर. म्या खिचडी अन् ठेचा केलाय, घेऊन यतो, मग जेऊ आपुन,"
आणि परत विमानं वरून उडाल की दोघही ओरडायची. “ये ये ...”
अरुण बहिणीसाठी नेहमी काळजीत असायचा. भावना होतीच सुंदर. वस्तीतले काही उनाड मुलं तिला चिडवत असत. मग तिला तो एकटं सोडतही नव्हता, आणि ती घरी एकटी असली की शेजारी दुकानातल्या भानू काकाला सांगून जायचा. मग काका लक्ष ठेवत असत घरावर आणि भावनावरही. त्यांचाही जीवं लागला होत्या दोघांवर. आजू बाजूचे वयस्कर मंडळी सतत आवाज देत असायचे दोघांना मग सतत कुणाचं ना कुणाचं लक्ष असायचं त्यांच्यावर. हळूहळू अरुनचे काही पैसे जमवले होते, जमलेल्या पैशात अरुण आता स्वतःचा पावाचा ठेला घेणार होता मग तो चौकात जुन्या बाजारात विचारपूस करायला जाणार होता.
“भावने, आज म्या ठेला पावाले जाईन म्हणतो.”
“अरे दादा, मस्तच रे, मग आपली बिन गाडी रायल ना तेंडोलीच्या बाजारात, म्या बिन रायत जायल उभी तुया संग. हिशोब करीन ना मी!”
“नाय नाय, तुले काय बिन गरज नाय, घरीच रावाच... मोठी आली उभी रायतो मने, अभ्यास कर, नंबर पहिला आला पाहिजे या वर्षी बिन.”
भावना नाराज झाली, तर अरुण परत तिच्या जवळ आला,
“अवं माये लाडाचे भिंगरे, घरी राय वं, कायले उनीत हा तुया गोरा रंग काळवतस, येवढी सुंदर हाय माझी बाय... हुशार हाय, जीव लावून अभ्यास कर, म्या हाय ना तुह्यासाठी.”
भावना भावाला ओळखून होती, क्षणात हसली, म्हणाली,
“चाय ठेवला हाय, आणतो म्या.”
अरुण घरातल्या आरश्यात स्वतःचे केसं मोठ्या रुबाबात करत होता आणि तयार होतं होता, भावनाने चहा आणला आणि अरुणने आनंदाने घेतला. भावनाची परीक्षा जवळ होती ती अभ्यासाला लागली, अरुण तिला निघताना परत म्हणाला,
“बाई, भावने, अभ्यास कर, सयपाक म्या करतो आल्यावर, नायतर तर म्या कायतरी आज घेऊन येईन त्या सदाजी धाब्यावरून, आपली गाडी येणारं ना आज. मग कसा!... काय का ते म्हणतात ना... इग्रजीत..”
“सिलेब्रेशन... दादा..”
“हुम्म... तेच ते..”
भावना खूप खुश झाली आणि ओसरीत पट्टी टाकून अभ्यासाला बसली, अरुणने निघताना तिच्या डोक्यावर लाडाने हात ठेवला आणि तो निघाला. फाटक बंद करून बाहेर आला, भानू काका समोर होते. नेहमीप्रमाणे भानू काकाला भावना घरी एकटी आहे हे त्याने सांगितलं आणि लक्ष ठेवण्यासाठी आग्रह केला.
---
कथा लवकरच पहिल्या भागाशी कनेक्ट होईल तेव्हा वाचत राहा... आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या.
आधीच्या भागांची लिंक पेजवर आहे.
---
कृपया कथा C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
@followers@topfans उर्मिला देवेन - मनातल्या तळ्यात
फोटो साभार ai
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७

Post a Comment

0 Comments