आणि जेव्हा Ex परत येतो... अंतिम भाग

 

भाग ८-  आणि जेव्हा Ex परत येतो...



आधीचे सर्व भाग इथे वाचा...

भाग १- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग १

भाग २-  आणि जेव्हा Ex परत येतो... भाग २

भाग ३- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ३

भाग 4 आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ४.

भाग ५भाग ५

भाग ६-  आणि जेव्हा Ex परत येतो...६

भाग ७ भाग ७

अंतिम भाग पुढे वाचा... 


आजही... आजही तो तिच्यासाठी निर्णय घेत होता. आणि तिच्या डोळ्यासमोर सारं धूसर होत चाललं होतं...  माधव अजूनही भविष्य रंगवत होता... पण त्याच्या लक्षातच आलं नव्हतं— तो अजूनही स्वप्नं एकटाच ठरवत होता. अरुंधतीच्या डोळ्यांतले अश्रू आता दुःखाचे नव्हते... तर एका कडव्या सत्याचे होते.

अचानक बाहेर वातावरण बदललं. सुसाट वारे वाहू लागले. आकाशात विजांनी चकाकत काळ्या ढगांची गर्दी फोडली... आणि क्षणात पाऊस धारा बरसल्या. माधव हळूहळू खिडकीपाशी जाऊन उभा राहिला, “बघ ना, अरु... आज ऋतूसुद्धा साक्ष देतोय... बघ. किती वर्षांनी हा पाऊस मला इतका सुंदर वाटतोय. ही बरसणारी धरती बघ... किती शांत झाली आहे... मी... मीही शांत झालोय... आज मी मला गवसलोय... इतकी वर्षं स्वतःपासूनच पळत होतो. वाटायचं, पैसा आहे, नाव आहे, सगळं आहे... पण खरंतर माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं गं.”

त्याने हळूच मागे वळून अरुंधतीकडे पाहिलं, “तुझ्याविना मी काहीच नव्हतो... अरु. तुला माहित आहे तो परवा झालेला अपघात, मीच... मुद्दाम गाडी आदळली. जगण्याचा कंटाळा आला होता. संपवायच होतं मला सारं काही... पण म्हणतात ना... जिथे आशा संपते तिथेच नवीन सुरूवात होते. आज तू मिळालीस परत, आणि माझ्या ओसाड आयुष्यात पुन्हा वसंत आला. पुन्हा जगावंसं वाटतंय... आता बस तू आणि मी... तुला काहीच त्रास देणार नाही मी आता.”

माधव परत हळूहळू अरुंधतीच्या समोर आला. त्याच्या डोळ्यांत पुन्हा एकदा जुन्या प्रेमाचा ओलावा त्याला दिसला. तो अजून एक पाऊल पुढे आला. तिला आता तो तिला बिलगणार होता तर अरुंधती एक पाऊल मागे सरकली. माधवने परत अंतर कमी केलं. परत जवळ येत तिच्या केसांना हात लावण्याच्या तयारीत म्हणाला, “अरु, आपण किती दिवसांनी एकत्र आलोय...”

त्या एका 'अरु' ह्या शब्दाने... आणि त्याच्या त्या नजीकच्या सहवासाने तिच्या मनात वर्षानुवर्षं बंद असलेले दरवाजे क्षणभर उघडले. मनाचा एक जखमी कोपरा म्हणत होता, “शेवटी तो आला, जखमांवर फुंकर घालायला. हा तोच माधव आहे, ज्याच्यावर तू जीवापाड प्रेम केलं होतंस... आता तो परत गेला तर विस्कटेल तो..."

तर दुसरं मन शांतपणे उत्तर देत होतं, "नाही... तो तुझा भूतकाळ आहे. आणि त्याला सावरायला गेले तर माझा वर्तमानकाळ विस्कटेल... त्याचं काय... मी सगळं मागे टाकून खूप पुढे आली आहे... तो मागे राहिला ह्यात माझी चूक नाहीच...”

क्षणभर ती स्तब्ध उभी राहिली. विरोध करायला हात पुढे सरसावला... पण भावनांनी तो थांबवला. माधवने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याला तिच्या डोळ्यांतला हा क्षणिक गोंधळ होकार वाटला. तो आणखी जवळ सरकला... आणि अरुंधती... मनातून ठाम नकार देत असूनही... त्या क्षणभरासाठी स्वतःच्या भावनांच्या कैदेत अडकून उभी होती...

तो परत जवळ आला, अरु परत मागे झाली, ती मागे होता होता, अमितच्या फोटोजवळ आली. अमितच्या फोटोला बघता बघता फोटोच्या काचेवर पडलेल्या प्रकाशात तिला स्वतःचंच प्रतिबिंब दिसलं... जणू काही तिचं अमित होती...

“अमित आजही अश्रू वाहू दिले नाहीस रे... बघ ना बरसलास... मी शांत झाले. आता कसं सगळं वाहून गेलं... स्पष्ट झालं सारं...”

तिने अमित जवळ दिवा लावला. त्याच दिव्याच्या प्रकाशात तिला सार काही आठवायला लागलं. आई त्या दिवशी तिच्या बाबांच्या फोटोसमोर दिवाच लावत होती, आणि एकाकेकी खाली पडली, अरुंधतीला काहीच सुचलं नाही, ती आईला घेऊन तिच्याच हॉस्पिटलमध्ये गेली, पण डॉक्टर ती नव्हतीच ना, आणि एका रीसेप्शनिस्टला कोण भाव देणार, पण आईची प्रकृती बिघडत होती, हॉस्पिटल ओळखीचं होतं मग कुणाचीही पर्वा न करता ती सांर काही पटापट करू लागली, जोपर्यंत डॉक्टर आले तोवर तिने सार काही मॅनेज केलं होतं. त्या दिवशी अचानक तेच हॉस्पिटल बांधणारा बिल्डर अमित राणेही डॉक्टर सोबत आला होता, डॉकटरने अरुंधतीच्या आईला तपासालं आणि म्हणाले, “कुणी उपचार केलेत यांच्यावर...”


अरुंधती जवळ आली आणि पायाशी बसली, “मी केलेत, क्षमा असावी... माझी आई आहे ती, मी थांबू शकत नव्हती.. तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे... पण... आणि माझ्या पेमेंट मधून तुम्ही कापून घ्या खर्च.”

डॉक्टरानी एक नजर स्टाफकडे बघितलं, तर नर्स म्हणाली, “डॉक्टर तीच MBBS होता होता राहिलं आहे, मग मी तिला मदत केली... माझी काही चूक झाली का?”

“अरुंधती तू रीसेप्शनिस्ट म्हणून काम करतेस इथे. तू आताच कॅबीनमध्ये ये...”

अरुंधतीने एक नजर आईवर टाकली आणि ती डॉक्टरांच्या आणि अमितच्या मागेच कॅबीनमध्ये गेली.

हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर आणि अमितची घनिष्ट मैत्री होती. त्या हॉस्पिटलचे तीन पार्टनर होते. आणि आज त्यांची महत्वाची मिटिंग होती हॉस्पिटल वाढवण्यासाठी, आणि म्हणून आज डॉक्टर हॉस्पिटलला नव्हते.

अमित त्याच्या मित्राला म्हणजे डॉ. सावंतला म्हणाला, “मित्रा मी निघतो, मला आज बाबांना काव्य संमेलनात सोडायचं आहे. आणि अर्थ राहत नाही रे माझ्याशिवाय.”

तो निघणारच होता तर अरुंधती आत शिरली, आणि मग अमित का कुणास ठाऊक तिथेच थांबला. कदाचित अरुंधतीच्या चेहऱ्यावरच्या भावना त्याला तिथून हलू देत नव्हत्या.

डॉ सावंतानी अरुंधतीला बसायला सांगितलं, “काय गं, कॉलेज का सोडलं? करायचं आहे का परत?”

अरुंधती काहीच बोलली नाही...हळूच म्हणाली, “सर, करेन मी, फिसची रक्कम जमा करत आहे...”

“आणि मी भरली तर...?”

“सर,... मी करेन ना, पण आज मला क्षमा करा आपण... मी आईला तसं ठेवू शकत नव्हती आणि मी तुम्हाला नेहमी बघत आले आहे. मग केलं धाडस.”

“मग हे धाडस रोज कर... उद्याचं मुंबईला निघ, हवं ते कर पण ती MBBSची डिग्री घेऊन इथेच यायचं.”

“सर पण...?”

“पण बिन काही नाही...”

त्यांनी लगेच फोन लावला आणि कॉलेजला चौकशी केली. अमित अजूनही तिकडेच होता त्याला आणि म्हणाला,

“अबे ए, तुझा तो फ्लॅट खाली आहे ना, किल्या पाठवून दे उद्या...”

अमित काहीच बोलला नाही, पण नंतर म्हणाला, “मी जातोय दोन दिवसाने माझी मिटिंग आहे आपल्या नवीन साईटसाठी... हिची हरकत नसेल तर सोडतो मी हिला, आणि कॉलेज प्रवेशाचही बघून घेतो.”

“काय हो अरुंधती मॅडम, तुमचं अंतिम वर्ष बाकी आहे ना?”


“हो, म्हणजे एडमिशन घेतली नव्हती, घेणार होते पण... मग...”

“असु द्या, तुमच्या आई बऱ्या होतात मग आपण निघूया, आणि बघा आता एडमिशन होणार आहेत सूर.”

“अबे साल्या, तू फोन कर त्या डीनला, सांग त्याला हिला पाठवत आहे म्हणून.”

अमित आणि डॉ सावंत एकमेकांची खेचत होते. पण अरुंधती खूप खूश होती, म्हणाली, “सर पण माझं...?”

“पण बिन काही नाही, तुझा पगार सुरु ठेऊ आम्ही... काही हरकत नाही...”

अमित जरा थांबला, म्हणाला, “तू एकटीच आहेस का?”

“नाही, माझा भाऊ आहे, पण तोही आताच त्या नवीन राणे कन्स्ट्रकशनमध्ये लागला आहे, त्याचा पहिला पगारही अजून आला नाही... नवीन आहे मग सांगता येत नाही...”

आता मात्र अमित आणि डॉ सावंत हसायला लागले, डॉ सावंत म्हणाले, “अगं अरुंधती, तू राणे कन्स्ट्रकशनच्या मालका समोर उभी आहेस.”

अरुंधती घाबरली, “माफ करा, मला महीत नव्हत, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतंच, मला इकडचे काही माहित नाही...”

“अगं... अगं, असु दे. हेच राणे कन्स्ट्रकशनचे मालक आहेत. काही काळजी करू नकोस. मला तुझ्यात एक खूप मोठी सर्जन दिसत आहे, एवढ्या बारकाईने इथे कुणीच काम करत नाही. तुझ्या आईला खूप नाजूक अवस्थेते हाताळलं आहेस तू. आम्हाला तू हवी आहेस, डॉक्टर म्हणून, चला अभ्यासाला लागा...”

आणि ते अमितसोबत गप्पा करत कॅबीन मधून निघून गेले. निघतांना अमितची नजर मात्र अरुंधतीवर खिळली होती. तिच्या गालावरची नाजूक खळी त्याला आवडली होती... गप्पा करता करता खूप पुढे जाऊनही तो परत मागे आला, अरुंधती मागे होतीच, तिला बघून म्हणाला, “काही काळजी करू नकोस, तू योग्य माणसाला गवसली आहेस... डॉ सावंतांची नजर जोहरीची आहे.... आणि आता तू त्यांचा हिरा आहेस. तुझं नंबर मी घेऊ ऑफिसमधून की तू देत मला? परवा मी सोडतो तुला, म्हणजे माझे आई-बाबा पण असणारं आहेत सोबत. तुही चल, फ्लॅट मध्ये सोडून देईल, तुझ्या आईलाही घे सोबत, त्या बऱ्या होतीलच हे ऐकल्यावर... काय हसतेस ना आता... हसत जा गं अशी.”


अमित नुसता बोलत होता आणि अरुंधती बघत होती, बघता बघता तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली, रडक्या आवाजात तिने नंबर दिला, अमित हसला... म्हणाला,  आय हेट टीअर्स... आता इथे त्सुनामी येऊ देऊ नकोस. मीच फोन करतो, मी फोन करतो...” अमितच्या त्या मिश्कील स्वभावामुळे तिच्या रडक्या चेहऱ्यावरचे अलगद हसू आलं होतं.

पुढे वर्षभरात अमित आणि अरुंधती बऱ्याचदा भेटले. दोघांही एकमेकांबद्दल सांर काही माहित झालं होतं, अमितची बायको बाळाला जन्म देताच वारली होती, जाताना त्याच्या बायकोने वचन घेतलं होतं सदा आनंदी राहण्याचं आणि तोच प्रयत्न अमितचा असायचा. पण कधीच खुलत नव्हता. अचानक अरुंधतीच्या आयुष्यात येताच तोही मोकळा होतं चालला होता. अमित अर्थसाठी नेहमीच काळजीत असायचा. त्या दिवशी अर्थची प्रकृती नाजूक झाली होती आणि ही गोष्ट अरुंधतीला कळताच ती लगेच त्याच्या घरी पोहचली होती. तिने अर्थची खूप काळजी घेतली.. अर्थ बरा झाला. आणि मग जे झालं त्यावर कुणाचाच आक्षेप नव्हता, अमितच्या आईने अर्थला अरुंधतीच्या हातात दिलं, “अरुंधती, अर्थची आई होशील का?”

अरुधातीलाही अर्थचा लडा लागला होता, तिने तर तिचं बाळ गमावलं होतं मग तिच्यातली आई अर्थंमुळे जागी झाली होती. अमित आणि अरुंधतीने सर्व संमतीने कोर्ट मॅरेज केलं. दोघांच्या नात्यात अवघडपणा होता पण सहज सहज झाला. अरुंधतीसोबत मुबईला आता अर्थ, तिची आई आणि सासू सोबत राहत होत्या. अमितची ये जा सुरु असायची. अरुंधतीने एमबीबीएस पूर्ण केलं आणि हॉस्पिटलला लगेच रुजू झाली... अमित आणि अरुंधती दोघेही भिन्न व्यवसायातले होते पण मनाने सहज जुळले, दोघांचीही नवीन सुरुवात होती. नातं बहरत गेलं तसे दोघही मोठे होतं गेले.

अरुंधती सर्जन झाली होती तर अमित नावी बिल्डर. अरुंधतीचा भाऊ आता विदेशात नोकरी करत होता. नंतर लग्न करून तो आईलाही सोबत घेऊन गेला. आणि अरुंधती, डॉ सावंत सोबत हॉस्पिटलची ३० % मालकीण झाली होती. अमितला सामाजिक कार्याची खूप आवड होती, त्याने अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, वसतिगृह बांधली होती आणि त्याचा कारभार अरुंधती बघत असायची. दोघीही रमले होते एकमेकात. अर्थ आईच्या मायेत मोठा होतं होता आणि अमित अरुंधती प्रेमात मुरत चालले होते. दोघांही एकमेकांच्या जखमा भरल्या होत्या.


अर्थच्या आयुष्यात आल्याने अरुंधतीला दिवस गेले होते जे तिलाही कळालं नव्हत... आणि जेव्हा माहित झालं तेव्हा आनंद मनामनात होता. तो क्षण अमित खूप जगाला होता. त्याला मुलगीच हवी होती आणि अवनी झाली, कुटुंब पूर्ण झालं होतं...

अमित आणि त्याच्या घरच्यांनी अरुंधतीला कधीच कशासाठी थांबवलं नव्हतं. ती नावाजलेली सर्जन होती. तिला अमेरिकेतील एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी निमंत्रण आलं होतं आणि अमित स्वतः तिला एअरपोर्टवर सोडायला निघाला होता. तिला सूचना देता देता अचानक त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. ट्रकही भरधाव वेगात होता. चालकाला काहीच सुचलं नाही. क्षणाचाही विलंब न करता अमितने पूर्ण ताकदीनिशी अरुंधतीला गाडीबाहेर ढकललं. ती रस्त्याच्या कडेला फेकली गेली... आणि पुढच्याच क्षणी भरधाव ट्रकने अमितसह गाडी अक्षरशः चिरडून टाकली.

सगळं काही क्षणार्धात संपलं होतं. जणू त्यांच्या आयुष्याची स्वप्नंच कोणीतरी निर्दयीपणे चिरडून टाकली होती.

अमितने शेवटचा श्वास अरुंधतीच्या मांडीवर घेतला, शेवटपर्यंत म्हणत राहिला, “हे अश्रू नकोत मला... तू हवी आहेस...

अरुंधती जोरात ओरडली, “अमित.... अमित ........”

ओरडतच ती भानावर आली, “अमित ....”

“अरु काय झालं, हो अमित... अमित आहेच ना आपल्या सोबत....” माधव अरुंधतीला जवळ घेत म्हणाला.

अरुंधतीने माधवचा हात सोडवला, इकडे आई बाबांनाही आता अरुंधतीच्या अमित म्हणून ओरडल्याने काळजी वाटत होती, पण बाबांनी आईला अडवून धरलं होतं.

अरुंधतीने दीर्घ श्वास घेतला. तोच माधव परत अमिच्या फोटोजवळ आला, “अमितराव, मी घेऊन जातोय अरुला, तुम्ही सांभाळलं ह्यासाठी, धन्यवाद... म्हणजे खूप खूप उपकार हो, माझी अरु आधीसारखी भरभरून जगते, आणि मला काय हवंय. परवानगी द्यावी आता. खूप सहन केलंय तिने, अजून मी नाही करू देणार. तुम्ही तिला माझ्यासाठी जपलय. मी कधीच विसरणार नाही. अरु माझी आहे आणि माझीच राहणार. अरु चल.... तुझं सामान बांधूया आपण....”


तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर तिकिट्स मिळाल्या म्हणून मेसेज आला, तो लगेच ओरडला,

“अरु टीकिट्स आल्यात, उद्या सकाळी निघायचं  आपल्याला, सगळ्यांना. म्हणजे आपण आधीही जाऊ शकतो... तू म्हणशील तसं... मुलांना घेऊन जाऊ सोबत... मला काहीच हरकत नाही... अरे मला आता कुणाचीच काही हरकत नाही...”

अरुंधतीने, डायरी काढली, ती काहीतरी शोधात होती, माधव परत बोलला, काय बघतेस, अजूनही डायरी वापरतेस काय गं? मोबाईलवर लिहित जा ना, नोटमध्ये लिही.”

अरुंधती हसली, “माझ्या उद्याच्या सर्व आपॉइनमेंट बघते.”

“हो कर रद्द! अरु चल आपल्याला आताच निघायचं आहे, मला आता एक क्षणही तुला इथे ठेवायचं नाही.”

“माधव तुला जाणून घ्याचं नाही का रे, मधल्या काळात काय काय झालं ते....”

“अरु तू मिळालीस, आणि काय हवंय... मान्य आहे मला खूप सहन केलंस तू... आणि सांग ना नंतर.”

“असं.... तू ऐकणार?”

“अगं....का नाही...?”

अरुंधती परत स्मित हसली, “असो, उद्या मला दोन सर्जरी आहेत, अर्थचा पहिला पेपर आहे दिवाळी परीक्षेचा... बाबांचं काव्य संमेलन आहे रात्री ऑनलाई. आईच्या काही रिपोर्ट्सही मिळणार आहेत. माझं गेस्ट लेकचर आहे साऊथ मेडीकल कॉलेजला...”

“सर्व रद्द कर... उद्या आपण निघतोय....”

“माधव, किती वेळपासून फक्त तूच बोलत आहेस, मला एकदातरी विचारालंस का, मला काय हवं आहे... सर्व स्वतःचे मनोरे बांधत गेलास... हाच फरक आहे तुझ्यात आणि अमितमध्ये.”


“अरु... तू माझी आहेस गं... म्हणून ना, त्यात काय?”

“मग... गृहीत धरलंस!”

“अगं तसं नाही, बरं, तू म्हणशील तसं.... मी ना हा इथे राहायलाही तयार आहे बघ.”

अरुंधती हसली, आणि मग म्हणाली, “चल निघ... खूप बोललास... जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर बोलत नव्हतास... किती वाट पहिली मी, अगदीच प्राण कंठाशी आले होते माझे. पण तू आला नाहीस... आणि आज मी खूप आनंदात आहे तर आलास परत मला तुझ्या नरकात घेऊन जायला.”

“अरु मला माफ कर गं, मला आता काहीच फरक पडणार नाही... तू तुझी डॉकटरकी मुळीच सोडायची नाही.”

“पण मला आता तुझ्या असल्यानेही फरक पडतो.... तुला काय वाटलं? अमित या जगात नाही तर मी परत तुझ्याकडे सहज येईल... काय समजतोस रे, आता तुला म्हणून सांगते, अमित होता ना तेव्हा मी जेवढी त्याच्या प्रेमात होते ना त्यापेक्षा जास्त तो नसताना आहे... त्याच्या प्रत्येक कार्यात मी आहे... का कुणास ठाऊक माहित होतं त्याला... प्रत्येक गोष्ट मला सांगून गेलाय... त्याची स्वप्नं जगायची आहे... आणि ती तुझ्यासोबत नाही जगता येणारं मला...

काय म्हणालास तू, अर्थला तू अमेरिकेला पाठवशील... अरे, तो ह्या संपूर्ण संपत्तीचा वारस आहे... राणे कन्स्ट्रक्शन त्याचं आहे. हा त्याला आता माझ्या सारखं सर्जन व्हायची इच्छा आहे. पण अनवी आहे... तिच्यातही अमितचं धाडस आहे. मी आजही राणे कन्स्ट्रक्शनचे महत्वाचे निर्णय घेते, बाबा फक्त जाऊन येतात ऑफिसमध्ये, किती कमावलंय त्याने बघ ना तो नाही तरी कंपनी अगदीच तशीच चालते जशी तो असताना चालायची... माणसं जिंकली त्याने. तुझं काय? कोण आहे तुझ्यासोबत? इथे ह्या घरात माझ्या रक्ताचं कुणीच नाही पण... माझ्या रक्ताचा एक बुंद जरी पडला ना तर आसवांची नदी वाहेल इथे. असो तुला हे कळायचं नाही.”

“अगं पण... मी सुधारलोय.”

“नाही रे... तू तसाच आहेस... अजूनही.... काही बदल नाही तुझ्यात.”

“पण आपली ही भेट.”

“बसं काही हिशोब बाकी राहिला होता... असं समज...”

“अरु...”

“बसं!! मला अरु म्हणू नकोस... मी डॉं. अरुंधती अमित राणे आहे... अरु असा निर्णय कधीच घेऊ शकली नसती... असं मला अमितने केलंय... आणि मी फक्त त्याची आहे.”

“अरु तू समज ना... अगं हे सगळे वापर करत आहे तुझा.”

“आणि तू नाही करणार?”

“खूप वेळ झालंय, मी तुझी वाट खूप बघितली पण माझी वाट बदलली आता... आता परत त्या वाटेवर जायचं नाही... जे होईल ते आता अरुंधती राणेच होईल.... निघ तू... माझे आई-बाबा माझी काळजी करत असतील. उगाच त्यांची प्रकृती बिघडायची आणि मग धावपड होईल.”

माधव पुरता नाराज झाला होता. अरुंधतीच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या वर्षानुवर्षे जपलेल्या भ्रमाचे थर एक-एक करून गळून पडत होते. त्याच्याकडे आता कोणतंच उत्तर नव्हतं.

अरुंधती खिडकीत आली, नभाकडे बघत स्मित हसली... माधव मात्र अजूनही निघाला नव्हता... आता अरुंधतीने दाराकडे बोट दाखवले, “निघा आता मिस्टर पंडित.... आपला वेळ संपला. मी जास्त वेळ पेशंटशी घरी बोलत नाही. नाहीतर मला पोलीस बोलवावे लागतील.”

आणि तिने बाबांना आवाज दिला, “बाबा अहो मोठ्या गेटची किल्ली घेऊन या, पाहुणे निघत आहेत.”

आई-बाबा तर झोपलेच नव्हते, बाबा आले आणि त्यांनी किल्या अरुंधतीच्या हातात दिल्या,

“बाबा तुम्ही गेट खोलून द्या, मिस्टर पंडित निघणार आहेत.”

अरुंधती हॉलमधून तिच्या खोलीत निघणार होती, तर जरा अमितच्या फोटोजवळ थबकली, फोटोत बघत राहिली, म्हणाली, “तुचं दिलीस ना एवढी शक्ती माझ्यात... जोवर आहे तोवर फक्त तुझी आहे. तो ex म्हणून आला होता आणि तसाच परत गेला... चला उद्याची तयारी करते.”

माधव निघून गेला. आई-बाबा हॉलमध्ये गुमान गप्प बसून होते. अरुंधतीला काहीही विचारण्याची हिंमत तर नव्हतीच त्यांची पण सांर काही कळालं होतं. आई बाबाकडे बघत होती आणि बाबा आईकडे, अरुंधती सहज पाण्यासाठी स्वयंपाक खोलीत आली आणि तिची नजर आई-बाबांवर पडली,

“आई-बाबा, झोपा आता... वेळ किती झालाय...”

आई गुमान उठून अरुंधतीच्या जवळ आली, “अरुंधती ह्या किल्ल्या आहेत वाड्याच्या आणि तिजोरीच्या... तुचं खरी मालकीण आहेस ह्याची.”

“आई... अहो मी कशी ठेवणार...”

“नाही म्हणू नकोस... आणि तसही मी उद्यापासून जॉगिंग सुरु करते... तू म्हणतेस म्हणून सूट घालायला सुरवात करणार आहे, मग कुठे खोचू... तु ठेव मला नको आता... मी आपली तू जे म्हणशील ते करेन.”

बाबानेही अरुंधतीच्या खांद्यावर हात ठेवला... अरुंधती काहीच बोलली नाही, तिने किल्ल्या ठेवून घेतल्या. आणि म्हणाली, “अलाराम लावते आहे. मी उठणार नाहीच पण दोघांही उठायचं आणि जॉगिगला जायचं...”

बाबा हसत आईला घेऊन त्याच्या खोलीत गेले.... हॉलमध्ये अमित फोटोतून सांर काही बघत होता... हलक्या वाऱ्याने त्याचा हार हलत होता आणि घरात टांगलेल घंट्या हळुवार वाजत होत्या. रात्र शांत झाली होती.... निसर्ग मोहक झाला होता.... अरुंधती आज परत अमिच्या प्रेमात पडली होती...

कथा कशी वाटली नक्की कळवा... भेटूया नवीन कथेसोबत. 

कथा कशी वाटली नक्की कळवा... भेटूया नवीन कथेसोबत.

©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

Post a Comment

0 Comments