एक होती भिंगरी- भाग ५

 एक होती भिंगरी....'द कमबॅक' -भाग ५


भाग १ इथे वाचा- द कमबॅक... भाग १-
भाग २ इथे वाचा एक होती भिंगरी .. भाग २
भाग ५ पुढे वाचा

संध्याकाळ होतं आली होती. आकाशात सूर्याची लालसर छटा पसरू लागली होती. भानू काका दुकान आवरण्याच्या तयारीत होते. दिवसभराचा हिशोब मांडून त्यांनी गल्ला बंद केला आणि नेहमीप्रमाणे अरुणच्या घरी तो येईपर्यंत भावनाजवळ जाऊन बसणार होते. या विचाराने ते उठणार इतक्यात वस्तीत एकच गोंधळ उडाला.

क्षणातच धुळीचे मोठमोठे लोट हवेत उडाले. दूरवरून इंजिनांचे कर्णकर्कश आवाज ऐकू येऊ लागले. नेहमीप्रमाणे ह्या वर्षीही गुण्या भाईच्या गाड्यांचा ताफा भरधाव वेगाने गावात शिरला होता. गाड्यांचा वेग इतका बेफाम होता की समोर येणारे माणसं, जनावरं जीव वाचवण्यासाठी बाजूला पळत होती. वस्ती धूळमय झाली होती. आणि एकामागून एक घरांचे दरवाजे धाडधाड बंद होऊ लागले होते. भावना त्याच वेळी बाहेरचं आंगण झाडायला आली होती. समोरच्या काकाने जोरात भावनाला आवाज दिला,
“भावने... ए भावने... घरात हो लवकर, सोड झाडू. चल होय आतमदी.”
पण भावना त्यांच्या ठेल्याच्या आनंदात मग्न होती. त्यात हॉर्नचे कर्णकर्कश आवाज आणि उडणाऱ्या धुळीच्या लोटात काकांची हाक भावनापर्यंत पोहोचलीच नाही. ती अंगण झाडत राहिली आणि काही क्षणात तिची नजर रस्त्यावर गेली. बंदूकधारी माणसं गाड्यांवर उभी दिसताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. झाडू हातातून पडला आणि सारं काही लक्षात आलं. ती घाबरून पडलेला झाडू उचलत आत जायला निघाली होती. पण तोपर्यंत गुण्या भाईच्या गाड्या तिच्या घरासमोर येऊन पोहोचल्या होत्या...
तोच गुण्या भाऊची नजर तिच्यावर पडली. गाडी भरधाव वेगाने पुढे जात होती, पण त्याची नजर मात्र तिच्यावरच खिळली होती. त्याने गाडीच्या खिडकीतून अर्धं शरीर बाहेर काढलं आणि मागे वळून पुन्हा तिच्याकडे पाहिलं. गाड्या धूळ उडवत निघून गेल्या. त्या धुळीतही भावना गुण्या भाईला दिसत राहिली. भावना घरात शिरली पण ती गुण्या भाईच्या काळजातही शिरली होती.

तो वाड्यावर आला पण भावनाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. तिची ती एक झलक गुण्या भाईच्या मनात कुठेतरी रुतून बसली होती. खोलीत येताच त्याने फेका फेक सुरु केली. सिगारेट पेटवली. एक झुरका घेतला... दुसरा घेतला... तरीही त्याचं मन शांत होत नव्हतं. गुण्या भाईला सारखा भावनाचा चेहरा दिसत होता. तिचे झाडू उचलतांना त्याला अलगत दिसलेले स्तन त्याला बेचैन करत होते, तिचं ते नाजूक कोवळं रूप त्याच्या नजरेसमोरून हटत नव्हतं. चेहऱ्यावरची कोवळी लाली त्याला लुभवत होती, विचाराने तो मनातून आक्रमक होत होता, खोलीत येरझाऱ्या घालत होता. समोर ठेवलेला ग्लास त्याने रागाने भिंतीवर फेकून दिला. राहावलंच नाही त्याला स्वतःची मानेला झटका देत त्याने बटाटा भाईला बोलावलं,
“अबे, बटाट्या इकडं ये बे.”
“हो जी भाई.” बटाटा भाई रमची बॉटल खिश्यात भरत आतमध्ये आला.
त्याला बघून गुण्या भाई बोलला, “अबे साल्या हेच करा तुमी. काय बिन कामाचे नाय तुमी.”
“भाई लास्ट होती हे. बोल ना, हुकुम द्या.”
गुण्या भाई काही क्षण गप्प राहिला. मग खिडकीबाहेर पाहत म्हणाला, “अबे सून, आता येत होतो तर एक चिकणी पोरगी पायली बे, तू कायीबिन कर साल्या, आज मले ते पायजे. म्हणजे पायजे बे.”
“भाई, मुश्किल आहे... आज राडा नाय. पोलिसांचा करफींव हाय समोरच्या गावात...”
“चूप बे साल्या... मले काय माहित नाय.”
“भाई, तेंडोली स्टेशनच्या हवालदाराचा फोन आला होता. फालतू लफडा झाला तर लय वंगाळ होयल भाई. आपुन इकडे कायले आलो, शांत रावासाठी ना. अन् अजून गोव्याच्या हवेलीत जावाच आहे इथून.”
“चूप बे साल्या... लय पायले मी पोलीस बिलिस... हरामखोर साले... देना एक खोका भेज... नही बोलेगा तो दो भेज... पण आपून को ओच पोरगी मागता आज. राणी... राणी बनाता उसको मै! काय दिखती बे... साल्या अस्सल माल असते बे इकडे गावात...”


“भाई सुनो ना, मै काय बोलता...!”
“अबे चल देईन एक ढुंगणावर, निग साल्या, मले सांगू नको... त्या मोठ्या तुटल्या विहिरी जवळची पोरं होती ते... नवीनच कोवळा माल हाय... जा घेऊन ये… लाव पत्ता, अन् ह्या भावान्यायले हाकल इकडून... तुले पाहिजे असल त निवड एखादी ह्याच्यातली अन् सजव तुझीबीन रात, भाई की तरफ से इनाम तुले.”


असं म्हणताच बटाटा भाई जाम खुश झाला होता, जीभीतून लाळ टपकायला लागली होत त्याच्या, क्षणभर कुठली बाला निवडावी हा विचार त्याच्या मनात त्याला गुलाबी गुलाबी करत होता. गुण्या भाईने त्याला असं बघून त्याच्या ढुंगणावर मागून लात मारली आणि बटाटा भाई भानावर आला, बाहेर पळाला. त्याने लगेच गाडी काढली. गाडी जोरात येऊन अरुणच्या फाटका सामोरं थांबली. बटाटा भाई सह अजून चार बंदूक धारी फाटक तोडून आत शिरले. भानू काका आताच काही वेळेआधी बायकोने जेवणासाठी आवाज दिल्याने परतले होते. भावना घरात एकटी अभ्यास करत होती. अरुणला आज वेळ झाला होता.


गुंड घरात शिरत आहे हे भानू काका त्यांच्या ओसरीतून जेवता जेवता बघत होते आणि धावून आले. आणि त्यांनी गुंडांना थांबवण्याचा निर्थक प्रयत्न केला. शेवटी बटाटा भाईने त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते काका खाली कोसळले. सोबत असणाऱ्या एका गुंडाने बघणाऱ्यांना जोरात धमकी दिली, “जिसको जान प्यारी है ओ बाहर ना रहे, नाहीतर हाल ह्या काकासारखे होतील.”
सर्वांचे दरवाजे आणि खिडक्या पटापट लागल्या. अरुण आणि भावना तर आधीच अनाथ होते. कसंतरी वस्ती वाल्यांच्या मदतीने जगत इथवर आले होते त्यात भानू दुकानदाराचे त्यांच्यावर भारी उपकार होते. आज वस्तीतल्या प्रत्येक मनात भावनासाठी खंत निर्माण झाली होती पण कुणीही समोर येत नव्हतं. राहावलं नाही म्हणून तिच्या शेजारच्या मैत्रिणीने तिच्या घरच्या फोनने पोलिसांना कळवलं. पण उशीर झाला होता. वस्तीतलं प्रत्येक घर हळ-हळत होतं. सगळे मनातच अरुणची वाट बघत होते.
भावनाला गुण्या भाईचे माणस ओढत गाडीत कोंबत होते. जरासा जीवं होता भानू काकात तर त्यांनी बटाटा भाईचा पाय ओढला. तर त्याला पायाने चेंदत त्याने भावनाला गाडीत टाकलं. ती ओरडत राहिली आणि भानुकाका त्या गाडीकडे बघत केव्हांच यमसदनी गेले. दुरून अरुण ठेला घेवूनच घरी येत होता. आणि आनंदात होता. पण... गाड्या धूळ उडवत निघून गेल्या आणि, भावना आणि अरुणला दूर करून गेल्या.


<<>>
काही वर्षानंतर...
काळ कोणासाठी थांबत नाही... पण नियतीने लिहिलेली काही हिशेबाची पानं अजून बंद झाली नसतात...
निवडणुकीचे वारे राज्यभर वाहत होते. प्रसिद्ध उद्योगपती गुणवंतरावांच्या आलिशान बंगल्यावर आज राजकीय बैठक होती. बंगल्याबाहेर पत्रकारांची गर्दी जमली होती. विविध राजकीय पक्षांचे नेते आत-बाहेर करत होते. संपूर्ण राज्याची नजर त्या बैठकीकडे लागली होती. कारण आज गुणवंतराव कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, यावर अनेक राजकीय समीकरणं अवलंबून होती. शहरातील चौक, रस्ते, इमारती आणि मोठमोठे होर्डिंग्ज गुणवंतरावांच्या पोस्टर्सनी भरून गेले होते. कुठे ते गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देताना दिसत होते, तर कुठे नशामुक्ती अभियानाचं उद्घाटन करताना. समाजसेवक, उद्योजक, शिक्षणप्रेमी आणि दानशूर व्यक्तिमत्त्व अशी त्यांची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली होती.
गुणवंतरावांची सत्ता केवळ एका शहरापुरती मर्यादित नव्हती तर ती सर्व राज्यात पसरली होती. जगभरातल्या मोठं मोठ्या डॉनशी त्याचे संबंध होते. त्याच्या उद्योगसमूहाचे जाळे संपूर्ण देशात आणि परदेशातही पसरले होते. राजकारणी, उद्योगपती, मोठे अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. अनेकांसाठी ते सध्या यशाचं प्रतीक होते.


अंडरवर्ल्डमध्येही त्याची भारी वचक पसरत होती आणि तो भारतातला ड्रग्सचा मोठा व्यापारी होता. पण समाजात त्याची छबी एक समाजसुधारक आणि एक उदयोगपती म्हणून होती. जागोजागी त्यांचे नशा मुक्ती केंद्र होते, कॉलेज होते, सामाजिक संस्था होत्या. पण त्याचा काळा कारभार अतिशय चतुर पद्धशीर सुरु होता. सीमेपलीकडील गुन्हेगारी संघटना, मादक पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय टोळ्या आणि अनेक कुख्यात गुन्हेगारांशी त्यांचे गुप्त संबंध होते. ड्रग्स आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा व्यापार अनेक राज्यांत त्यांच्या छत्रछायेखाली फोफावत होता. पैसा, सत्ता आणि भीती यांच्या जोरावर त्यांनी एक अदृश्य साम्राज्य उभं केलं होतं. सुपारी घेण्यात तो अतिशय माहीर होता. ज्याची सुपारी त्याच्याकडे आली त्याचं यमसदनीच बुकिंग पक्कं होतं. मोठं मोठे बार आणि हॉटेलमध्ये त्याचा काळा बाजार हमखास चालत असे. राजकीय पक्ष त्याच्या देणगीवर चालत असत मग कुणाची दातखिळी उलत नव्हती आणि जीवाच्या भीतीपोटी कुणी बोलत नव्हतं. पोलीस बांधली होती आणि आतून आताचे सत्ताधारी त्याच्या हातचे पुतळे होते. गुणवंतरावांचे शत्रूही अगणित होते. जे त्याला मारण्यासाठी नेहमी तत्पर होते.



पण चिकनी बाला त्याची कमजोरी होती. जिच्यावर नजर पडली ती त्याला हवी असायची. त्याने वापरलेली स्त्री पुढे त्याच्या मनासारखी वागली तर तो तिला त्याच्या काळ्या धंद्यात समावेश करून घेत असे आणि नाहीच ऐकली तर मारून कुठेतरी गाडत असे किंवा त्याच्या वेशालयात सोडून देत असे.
मागच्या दोन वर्षापासून दुबईचा डॉन साहेबजी ह्याच्याशी गुणवंतरावाची मैत्री झाली. त्या मैत्रीमुळे त्यांचा आत्मविश्वास इतका वाढला होता की ते स्वतःलाच राज्यातील सत्तेचा खरा केंद्रबिंदू समजू लागला होता. साहेबजींशी थेट संपर्क फार कमी लोकांना होता. त्यांच्या साम्राज्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग एका स्त्रीकडे जाऊन थांबत होता. अंडरवर्ल्डमध्ये तिला सर्वजण ‘मॅडमजी’ या नावाने ओळखत असत. डॉन साहेबांची पर्सनल सेक्रेटरी होती ती... आणि अजूनही बरंच काही तिच्या हातात होतं. साहेबजी अनेकांचे ऐकत नसत, पण मॅडमजींचं मत मात्र ते कधीच डावलत नसत. त्यामुळे तिच्या एका फोनची किंमत अनेक कोटींच्या व्यवहारांपेक्षाही जास्त मानली जात असे. आज गुणवंतराव त्याच फोनची वाट पाहत होते. राजकीय बैठकीच्या गोंधळातही त्यांचं लक्ष वारंवार मोबाईलकडे जात होतं. आणि अखेर मोबाईलची रिंग वाजली. गुणवंतरावानी कोपऱ्यात जाऊन फोन वर संवाद साधला,
“मॅडमजी, आपल्याच फोनची वाट होती आम्हाला.” गुणवंत रावं माठ्या आदराने म्हणाले.
“गुणवंत, काय ते निस्तरा, साहेबजी आपल्या पाठीशी आहेत... आणि आम्ही त्यांना पटवून सांगितलं आहे...”


“थँक्स मॅडमजी.... आपली अशीच कृपा असू द्या... “
“हुम्म... पण साहेबजींचा एक निरोप आहे.”
“आदेश करा मॅडमजी!”
“चार खोके पाठवा.”
तोच मोठयाने कुणीतरी टेबलवर भिंगरी फिरवत होतं. गुणवंतरावांना आवाज ऐकू येत नव्हता. कान किर्रर्र झाले होते. तरीही ते फोन कानाला लावून होते. आणि फोन कट झाला. नंतर गुणवंत रवांनी घोषणा केली आणि सभा संपली.
संध्याकाळ पर्यत सर्वीकडे बातमी होती...‘प्रसिद्ध उद्योगपती गुणवंतराव देशमुख यांची राजकारणात अधिकृत एंट्री!’ ‘गुणवंतरावांचा स्वतंत्र पक्ष जाहीर!’ टीव्ही स्क्रीनवर गुणवंतराव पत्रकार परिषदेत बोलताना दिसत होते. त्यांच्या मागे नव्या पक्षाचा झेंडा फडकत होता. या एका निर्णयाने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून असलेले अनेक राजकारणी हादरले होते. बंद दरवाज्यांआड बैठका सुरू झाल्या होत्या. काही जण त्यांच्या पक्षात जाण्याचा विचार करत होते, तर काही जण त्यांना रोखण्याचे मार्ग शोधत होते आणि आता त्यांची हाजी हाजी करणारे त्याला मारण्यासाठी मार्ग शोधात होते.


कारण समोर त्याला कुणीच काही बोलू शकत नव्हतं. मग लाचारीत बऱ्याच राजनेत्यांना निवडनुकीतून आवेदन पत्र मागे घ्यावे लागणार होते. सर्वाना धक्का बसला होता गुणवंत रावांच्या निर्णयाने. राजनेते सुन्न झाले होते तर मिडिया बोलती झाली होती.
दरम्यान, त्यांच्या बंगल्यावर जल्लोषाचं वातावरण होतं. बंगला फुलांच्या हारांनी, बुके आणि अभिनंदनाच्या संदेशांनी भरून गेला होता. देशभरातून फोन आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. मात्र या सगळ्या गडबडीत गुणवंतराव स्वतः एका वेगळ्याच कारणाने उत्सुक होते. आज त्यांची एकुलती एक मुलगी सोना अमेरिकेतून मायदेशी परत येणार होती. सगळीकडे कडेकोट बंदोबस्त होता. पण सोनाला किडन्याप करण्याची तयारी विमानातच झाली होती, विमानात असणाऱ्या एयर होस्टसने तिच्या जेवणात औषध मिळवलं होतं, ज्याने तिला काही वेळानंतर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि विमानातल्या पायलेटने इमर्जन्सी लँडिंग नेपाळ मध्ये केली. लँडिंग होताच तिला हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं. तिच्यावर उपचार करणं सुरु झाले आणि विमान परत मुबंईतकडे निघालं.
इकडे गुणवंतराव आणि त्यांची पूर्ण फौज वाट बघून कंटाळले आणि शेवटी अनाउन्समेंट झाली की फ्लाईट नेपाळमध्ये इमर्जन्सी थांबून मुंबईसाठी रवाना झाली म्हणून. गुणवंतरावाना त्याच्या मुलीबद्दल त्याच्या सूत्रांकडून कळालं आणि त्यांनी लगेच नेपाळमध्ये जमवा जमाव सुरु केली. पण वेळ निघून गेली होती. गुणवंतरावांची एकुलती एक मुलगी जिला त्याने लोकांच्या नजरेतून दूर सुखरूप ठेवलं होतं ती किडन्याप झाली होती. कीडन्याप करणाऱ्यांनी मोठ्या फितुरीने सोनाला हॉस्पिटल मधून बाहेर काढून गुप्त मार्गाने भारतात आणलं होतं. आणि गुणवंत रावांची माणसं तिला नेपाळच्या कोपरया कोपऱ्यात शोधत होती.


संपूर्ण अंडरवर्ड दणाणला होता आणि उदयोग जगतात हाहाकार माजला होता. कुख्यात गुंड आणि संपूर्ण राज्यावर सत्ता गाजवणाऱ्याच्या मुलीचा किडन्याप ही खूप मोठी न्युज होती. खुद्द गुणवंतराव हैराण झाला होता आणि पेटून उठला होता....
पुढचा भाग लवकरच...

कथा कथा म्हणून वाचावी.... मनात येईल तश्या comment करू नये!
कृपया कथा C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार ai
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७

Post a Comment

0 Comments