आधीचे सर्व भाग इथे वाचा...
भाग १- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग १
भाग २- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग २
भाग ३- आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ३
भाग 4 आणि जेव्हा Ex परत येतो... भाग ४.
भाग ५भाग ५
भाग ६- आणि जेव्हा Ex परत येतो...६
भाग ७- आणि जेव्हा Ex परत येतो...
अरुंधतीच्या आयुष्यातील दुःख इथेच थांबलं नव्हतं. बाबांच्या जाण्याने घरात अक्षरशः कोलाहल माजला होता. बाबांच्या पेन्शनवरच घर चलात असायचं, पण आता ते पेन्शनही अर्ध होणारं होतं. लहान भावाचं शिक्षण आता कुठे संपल होतं नी तो नोकरीच्या शोधात फिरत असायचा. सांर कसं अर्ध्यावर सुटलं होतं. घरात पैश्याची चनचन भासत होती. होतं-नव्हतं सारं काही आईने बाबांच्या उपचारासाठी लावलं होतं. कधी सुखाने भरलेलं ते घर आता खर्चाची गणितं मांडत बसलं होतं. आणि मग एक दिवस लहान भावाने अरुंधतीसमोर मेडिकल कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या प्रवेशाचा फॉर्म आणून ठेवला.
“तायडे... आता काही माधव येणार नाही.”
“बाबू... येईल तो... माझा विश्वास आहे. त्याला आवडणार नाही हे.” तिने तो फॉर्म परत अलगद बाजूला सरकवला.
“तायडे.... तो कायमचा अमेरिकेला गेलाय.”
जरा थरथरत पुढे म्हणाला, “लग्न केलंय त्याने... सोड ही आस... तो नाही येणार तुझ्यासाठी आता. तुझं स्वप्न जग, अगं लहान होतीस तेव्हापासून डॉक्टर-डॉक्टर खेळत होतीस. तू डॉक्टरच होणार असं सगळ्यांना अभिमानाने सांगत असायची ना? ते स्वप्न आता पूर्ण कर.. कदाचित तुझं आयुष्य परत उभं राहिल गं... आणि कदाचित आपलंही.”
म्हणत त्याने माधवचा प्रोफाईल तिला दाखवला. फोटोत माधव हसत उभा होता. त्याच्या शेजारी एक तरुणी होती. दोघांच्या हातात लग्नाच्या अंगठ्या चमकत होत्या. अरुंधतीच्या हातातून मोबाईल निसटला. दोन वर्षांपासून मनाच्या कोपऱ्यात जपलेली आशेची शेवटची ज्योत त्या क्षणी विझली होती. इतक्या दिवसांपासून तिने स्वतःला रडू दिलं नव्हतं... आज मात्र तिच्या मनात साचलेलं दुःख बांध फोडून बाहेर आलं होतं. भावाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला सावरलं. त्याने मेडिकलचा फॉर्म पुन्हा तिच्यासमोर ठेवला, अरुंधतीने अश्रू पुसले. पण मेडिकल कॉलेजच्या अंतिम वर्षाची फी भरण्याइतके पैसे घरात नव्हते. मनात जिद्द असूनही ती करणार काय होती, घरात मोठं अजून कुणीच नव्हतं, काम शोधावं आणि मग कॉलेज परत सुरु करावं हा निर्णय तिने भावासाठी आणि आईसाठी घेतला होता.
मुंबईपासून दूर, नाशिकजवळच्या एका छोट्याशा गावात अरुंधतीला एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली. नव्याने आयुष्य उभं करण्याच्या एका आशेन ती भावासोबत आईला घेऊन ती तिकडे राहायला गेली. दिवसभर हॉस्पिटलमध्ये काम करायचं आणि रात्री मेडिकलच्या पुस्तकांमध्ये स्वतःला झोकून द्यायचं, असा तिचा दिनक्रम झाला होता. पगार फारसा नव्हता, तरी प्रत्येक महिन्यात ती काटकसर करून थोडेथोडके पैसे साठवत होती.
इकडे भाऊही नोकरीच्या शोधात होताच. त्याचंही इंजिनिअरिंग झालेलं होतं. आणि त्याला काही महिन्याच्या अथक प्रयत्नाने राणे कन्स्ट्रक्शनमध्ये इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली.
वर्तमान काळ...
अरुंधतीची गाडी राणे सदनच्या आवारात शिरली, गेट उघडताच हेडलाईटच्या प्रकाशात तिला तिचे सासरे अंगणात शतपावली करत दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट काळजी दिसत होती. गाडीचा आवाज येताच सासूबाईही बाहेर आल्या. अरुंधतीने गाडी पार्क केली. बॅग खांद्यावर घेत ती सरळ बाबांकडे आली.
“बाबा, चला आत. किती वेळ झालंय? तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितलं होतं ना मी? झोपायचं लवकर.”
मग ती आईकडे बघत म्हणाली, “आई, तुम्ही अजून जाग्याच का? उद्यापासून जॉगिंग सुरु करायची आहे ना? रात्रभर जागत राहिलात तर माझं प्रिस्क्रिप्शन बदलावं लागेल बरं का... चला चला झोपा.”
“हो गं डॉक्टरबाई... पण आधी तू जेव. तुला वाढते, मग आम्ही दोघं झोपतो.”
आई स्वयंपाकखोलीकडे वळली. बाबाही घरभर एक नजर टाकत खिडक्यांचे पडदे ओढू लागले. एक-एक करून त्यांनी खिडक्या बंद केल्या. अरुंधतीने गाडीच्या चाव्या नेहमीच्या टिकाणी टांगल्या आणि तिचा बॅग डायनिंग टेबलावर ठेवून फ्रेश होण्यासाठी वॉशरूमकडे निघून गेली.
बाबांना बाहेरून होर्नचा आवाज आला. कुणीतरी गेटवर आलं होतं. घरातील नोकरमंडळी केव्हाच निघून गेली होती. बाबांनी गेटची चावी उचलली आणि सावकाश बाहेर गेले. गेटवर माधव उभा होता, त्याने नम्रपणे हात जोडले.
“अहो मी माधव पंडित, मला अरुंधतीशी आजचं महत्त्वाच बोलायचं आहे. मी भेटू शकेन का तिला आत्ता.”
बाबा क्षणभर गप्प राहिले. सकाळी सुमनने व्यक्त केलेली भीती त्यांच्या मनात एकदम भरली. पण माधवच्या चेहऱ्यावर त्यांना पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता.
“हो हो, काही हरकत नाही... या, या तुम्ही...”
बाबांनी गेट पूर्ण उघडलं. त्यांची धडधड वाढली होती. माधवने गाडी पार्क केली, परत म्हणाला,
“अहो मी माधव पंडित, डॉ राणेचा पेशंट आहे. अगदीच महत्वाच बोलायचं आहे त्यांच्याशी. जास्त वेळ घेणार नाही.”
“हो हो... बोला तुम्ही, काय ते सपष्ट करा.”
माधव गोंधळला, “म्हणजे?”
“लपवू नका, तुम्ही कोण आहत हे माहित आहे आम्हाला.”
माधव दचकला, काहीच बोलला नाही, बाबा त्याला घेऊन बाहेरून घराकडे निघाले होते, बाबा शांत आवाजात म्हणाले, “अहो, आमची सुनबाई काहीच लपवत नाही... अर्थात तिचा चेहराही आता वाचता येतो आम्हाला. काय ते बोला तुम्ही.”
माधव निःशब्द झाला. बाबा पुन्हा म्हणाले, “आज हॉस्पिटलमधून परत आल्यापासून ती थोडी हरवलेली दिसत होती. बाहेरून नेहमीसारखी वागत होती, पण तिच्या मनात काहीतरी सुरू आहे, हे आम्हाला जाणवत होतं.”
“अहो मी... तिला घेऊन...”
बाबांनी त्याला मध्येच थांबवलं, “स्पष्टीकरण आम्हाला नको. जे काही बोलायचं असेल, ते अरुंधतीशी बोला. इतकी वर्षं जी गोष्ट बोलली गेली नाही, ती आज मन मोकळं करून सांगा. पण... एक गोष्ट लक्षात ठेवा, मिस्टर पंडित... ती आज पूर्वीसारखी असहाय्य अरु नाही. ती स्वतःच्या पायावर उभी असलेली, स्वतःचे निर्णय घेणारी डॉ. अरुंधती अमित राणे आहे. त्यामुळे तिचा जो काही निर्णय असेल... तो स्वीकारायची तयारी ठेवूनच तिच्यासमोर जा.”
“अहो तिचं प्रेम आहे माझ्यावर... बसं ती बोलत नाही...”
बाबांनी हात दाखवत त्यांना गप्प केलं... ते दोघे हॉलमध्ये पोहोचले होते.
भव्य, प्रशस्त हॉल... पण कुठेही श्रीमंतीचं प्रदर्शन नव्हतं. शिरताच एक समाधान आणि शांतीची अनुभूती झाली माधवला. त्या वास्तूत जे समधान जाणवलं ते त्याच्या मनाला कदाचित उत्तर देऊन गेलं होतं. समोरच्या भिंतीवर अमित आणि अरुंधतीचा मोठा फोटो लावलेला होता. माधवची नजर त्या फोटोवर खिळून राहिली. घरात सर्व काही इतकं नीटनेटके होतं की जणू प्रत्येक वस्तू एखादी गोष्ट सांगत होती. खाली एका कोपऱ्यात जमिनीवर अवनीची खेळणी विखुरलेली पडली होती. जणू ती क्षणभरापूर्वीच खेळत उठून गेली असावी. त्याच्याच शेजारी अर्थचं स्टडी टेबल होता. पुस्तकं, वह्या, शाळेची बॅग आणि कंपास... जे आताच आजीने अगदीच नेटनेटकं केलं होतं. सोफ्यावर बाबांची कवितेची वही आणि पेन पडून होता. तिथे तुळशीची माळ ठेवलेली, आणि तिथेच जवळ मेथीच्या भाजीची जुडी पडून होती. सांर काही कसं आनंदात होतं. माधव मनातून त्या वास्तूत शिरताच भारावून गेला होता. त्याला नकळत जाणवत होतं की हे घर नात्यांनी उभं राहिलं आहे. तेवढ्यात अरुंधतीने आईला आवाज दिला आणि स्वयंपाकघराकडे वळत म्हणाली, “आई राहू द्या तुम्ही, मी घेते माझं वाढून...”
आणि तिची नजर माधववर पडली, ती दचकून म्हणाली, “तू... इथे कशाला आलास?”
“अरु तुझ्यासाठी, बोलायचं आहे गं मला... आलोच ना मी शेवटी... तू माझी वाट बघत होतीस मला माहित आहे ते.”
ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत सरळ बाबांकडे वळली, “बाबा, तुम्ही यांना आत घेतलं?”
“अरुंधती, शांत हो जरा, तो स्वतःहून आला आहे. आपल्या दारात आलेला माणूस पाहुणाच असतो. 'अतिथी देवो भव' हे आपणच शिकवतो ना? त्याचं म्हणणं ऐकून घे. काय ते एकदाच स्पष्ट होऊ दे. पुढचा निर्णय पूर्णपणे तुझा असेल... आणि तुझा प्रत्येक निर्णय आम्हाला मान्य असेल. तसाही हा विषय कायमचा बंद कर बेटा आता...”
माधव परत बाबांकडे आला, “राणे साहेब, खरंच आभार तुमचे. मी करेल ना सर्व अरुसाठी... मी.. मी सांभाळेल सर्व. तुम्ही काहीच काळजी करू नका, बसं अरुंधतीला समजवा तुम्ही. मला माहीत आहे. ती फक्त रागावली आहे माझ्यावर. मी उशिरा आलो... खूप चुका केल्या... पण आता त्या सुधारायच्या आहेत. तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर...पण...”
बाबांनी त्याला हात जोडून मध्येच थांबवलं, “माधवराव, मी माझ्या सुनेशी बोलतोय. आणि मी बोललोय आधीच, तिचा निर्णय अंतिम... मी कुठेही मध्ये नाही. आणि आम्ही सक्षम आहोत... आधाराची गरज नाही आम्हाला.”
बोलता बोलता बाबा हळूहळू चालत अमितच्या मोठ्या फोटोसमोर येऊन थांबले. डोळ्यात अश्रुनी गर्दी केली होती. पण वाहणार नव्हतेच ना... ताठ मान ठेवत त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अरुंधतीकडे वळले. तिच्याजवळ येत अलगद तिच्या डोक्यावर हात ठेवला. स्मित हसले, “मी आणि सुमन आमच्या खोलीत आहोत. काही लागलं तर सांग, मुलं कधीचीच झोपली आहेत. बाईही आज घरी गेली आहे. काळजी नको करू. हा बाबा अजूनही खंबीर आहे.”
इतकं बोलून त्यांनी प्रेमाने तिच्या खांद्यावर थोपटलं. आणि ते हॉल मधून निघून गेले. मागेच आईही निघून गेल्या.
अरुंधती माधवला समोर बघून बावरली होती. मनात एकामागून एक भावना उसळत होत्या. राग, वेदना, विश्वासघात, आठवणी... आणि त्याच्यावरच अतोनात प्रेम... सगळंच एकाच वेळी मनात दाटून आलं होतं. आज किती तरी वर्षाने ती त्याच्यासमोर होती. क्षणभर तिला असं वाटलं, जणू मधली पंधरा वर्षं कुठेतरी हरवून गेली आहेत आणि काळ पुन्हा कॉलेजच्या त्या दिवसांमध्ये जाऊन थांबला आहे. माधव आज परत तिच्या पायशी बसून होता. तसाच जसा तो कॉलेजमध्ये असतांना बसायचा. अरु समोर निघाली आणि माधवने तिचे पाय पकडले, “माधव... हे काय करतोयस?” अरुंधती दचकून मागे सरकली.
माधवने मान खालीच ठेवली, “मी एवढंच करू शकतो आता... जेव्हा तू बोलायला तयार होतीस तेव्हा मी ऐकायलाच तयार नव्हतो. पण आज मी बोलायला आलोय... आणि तू शांत झाली आहेस.”
“वेळ कायम सारखी नसते रे... ती तुझी वेळ होती... पण तू तयार नव्हतास. आज माझी वेळ आहे.. आणि... ”
“अरु... मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. खूप थकलोय आता... स्वतःपासून खूप दूर पळत राहिलो... किती वेळा वाटलं तुझ्याकडे यावं... माफी मागावी... पण हिंमतच झाली नाही. आई मला बोलली होती, ‘अरुंधतीची चूक नाही रे... एकदा तरी तिचं ऐकून घे.’ पण... मी... अरु तुला तर माहित आहे ना मी असाच आहे म्हणून. पण, आता मी सुधारेल गं. तू म्हणशील तसं जगीन.”
आज त्याचा आवाज तिच्यापुढे बोलताना थरथरत होता, “नियतीने पुन्हा मला तुझ्या समोर उभ केलंय. अमित... तोही ह्या जगात नाहीच ना. आणि मी तयार आहे सगळं स्वीकारायला. आपण मुलांना उत्तम शाळेत देऊ. मी... मी तुझ्या आई-बाबांचीही जवाबदारीने काळजी घेईल. पण तू नको ना गं दूर जाऊ आता. मलाच कळाल नाही, समाधान निवासात त्याची सम्राज्ञीच नव्हती मग कसं समाधानी असेल ते. तू त्या वस्तूची मालकीण आहेस. बाबाही जाताना बोलून गेले... ‘अरुला परत आण, तिचं ऐक. तिची चूक नाह....’”
अरुंधती हळवी झाली, अरुंधतीच्या डोळ्यांत पाणी दाटून आलेलं, ती हळू आवाजात म्हणाली, “...बाबा?”
“बाबा नाही राहिले गं, वर्षभरापूर्वी.... तेही आईकडे निघून गेले. आता ते भलंमोठं समाधान निवास मला खायला उठतं. अरु... आपण आपलं साम्राज्य परत उभं करूया. देशील ना मला साथ....?”
अरुंधतीच मन भरून आलं होतं. माधव तिच्या पायाशी बसून माफी मागत होता,
“अरु आपण अर्थला खूप मोठ्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन देऊया. पुढे यूएसएला पाठवू त्याला. त्याचं भविष्य आपण घडवू. आणि... आणि इवलीशी अवनी....ती तुझी मुलगी आहे ना...? मग ती माझीही. किती गोड बोलते ती. पहिल्याच भेटीत मन जिंकून गेली माझं. बाबा म्हण्याला सांगेन मी तिला.... तिला बाबा आठवत नसेल नाही... आणि तुझे आई-बाबाही आपल्या सोबत राहू शकतात. मला काहीच हरकत नाही. मी ना आताच समाधान निवासात सगळ्या व्यवस्था करायला सांगतो.”
माधव एकदम उठला. त्याच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी उत्साह दिसत होता. त्याने खिशातून फोन काढला आणि मॅनेजरला कॉल लावला आणि मॅनेजरला सांगायला लागला,
“साने... ऐका. मॅडम आणि माझी खोली रिनोव्हेट करायला सांगा. वरच्या माळ्यावर अनवी बाळाची खोली सज्ज करा. तिला गुलाबी रंग आवडेल बहुतेक... सगळ्या सोयी उपलब्द करा खोलीत... खाली स्टडीच्या शेजारची खोली अर्थसाठी तयार करा. त्याला अभ्यासासाठी मोठं टेबल, लायब्ररी... सगळं हवं. हॉललगतची खोली... ती आई-बाबांसाठी. त्यांना जिना चढायला त्रास होईल.”
“अरु... ती खोली यौग्य राहील ना गं... तुझ्या आवडीची खोली आहे ती... हो ना?”
माधव आवेशात बोलत होता. अरुंधती त्याला नुसती बघत होती, काहीच बोलली नाही. अरुंधतीच्या डोळ्यात अश्रुनी गर्दी केली होती. आणि माधवला ते आनंदाचे अश्रू वाटले... त्या क्षणभरासाठी स्वतःच्या भावनांच्या कैदेत अडकून अरुंधती उभी होती...
अंतिम भाग इथे वाचा.... भाग अंतिम
आधीचे भाग पेजवर आहेत, लिंक पहिल्या commnetला आहे. किंवा तुम्ही पेजवर वाचू शकता.
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ.

0 Comments