एक होती भिंगरी .. भाग 7

 भाग १ इथे वाचा- द कमबॅक... भाग १-

भाग २ इथे वाचा एक होती भिंगरी .. भाग २
भाग ५ पुढे वाचा एक होती भिंगरी.... भाग ५
भाग ६ पुढे वाचा. भिंगरी भाग ६

आणि भाग ७ पुढे वाचा 



भिंगरी.... 'द कमबॅक' भाग ७
संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि गुण्या भाईची फौज कामाला लागली होती. सोनाचा शोध घेण्यासाठी सगळीकडे जाळं टाकलं गेलं होतं. प्रत्येक तासागणिक गुण्या भाईची अस्वस्थता वाढत होती. अचानक बंगल्यासमोर पोलिसांची गाडी येऊन थांबली. दोन पोलीस अधिकारी खाली उतरले आणि सरळ गुणवंतरावांसमोर जाऊन उभे राहिले.

“साहेब, हा आपल्या मुलीचा पासपोर्ट आहे ना?” इन्स्पेक्टरने हातातला पासपोर्ट पुढे करत विचारलं.
गुणवंतरावांच्या हातातून जवळजवळ पासपोर्ट निसटायची वेळ आली होती. तसा बबनरावं पुढे येत म्हणाला, “हो... पण काय झालं?”
“गुणवंतरावांना आमच्यासोबत पोलीस ठाण्यात यावं लागेल.”
क्षणात वातावरण बदललं. दोघांच्याही चेहऱ्यावरची रंगत उडाली होती. गुणवंतरावांना घाम फुटला होता, दोघांनी एकमेकांकडे बघत ताबडतोब गाडी काढली. पोलीस ठाण्यात पोहोचताच त्यांना एका खोलीत नेण्यात आलं. समोर पांढऱ्या चादरीखाली एक मृतदेह ठेवलेला होता. इन्स्पेक्टरने हळूच चादर बाजूला केली. गुण्या भाईच्या छातीत धडधड सुरू झाली. आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याने थरथरत्या नजरेने त्या मृतदेहाकडे पाहिलं. काही क्षण शांतता पसरली. मग तो एकदम मागे सरकला.
“नाही!... नाही... ही सोना नाही!”
इन्स्पेक्टरने पासपोर्ट पुढे केला, “मग हा पासपोर्ट तिच्याजवळ कसा सापडला?”
पासपोर्ट हातात घेऊन असलेल्या हवालदाराला गुणवंतरावांनी कानशिलात एक जोरदार लावली. स्वतःला सावरत त्याने इन्स्पेक्टरच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं,
“ते तुमचं काम आहे शोधायचं!”
गुण्या भाई संतापला होता, ओरडत म्हणाला, “पासपोर्ट सापडला म्हणजे ती माझी मुलगीच झाली का? चौकशी करा, शोधा! करता काय तुम्ही? उगाच मीडिया बोलवून तमाशा करता. मोठं काम केल्यासारखं दाखवता! एक गोष्ट लक्षात ठेवा... जो माणूस माझ्या पोरीपर्यंत पोहोचला आहे, तो तुमच्या कल्पनेपेक्षा खूप पुढे आहे. आणि जर तो मला आधी सापडला... तर मग तुमच्या पंचनाम्याची गरजच पडणार नाही.”

इतकं बोलून तो ताडताड खोलीतून बाहेर आला, “बबनरावं कोण आहे का नवीन इन्स्पेक्टर, जरा बोल ह्याच्याशी. नसेल होत तर राजीनामा टाक म्हणावं.”
गुणवंतराव फडफडत बाहेर आला, पण त्याला मिडियाला सामोरे जायचे नव्हते. मागच्या दारातून निघून तो बंगल्याकडे निघाला. घरी पोहोचताच गुण्या भाईचा संताप अनावर झाला. समोर जे दिसेल त्याची तोडफोड सुरू झाली. टेबल, खुर्च्या, फुलदाण्या.... सगळं क्षणार्धात जमीनदोस्त झालं होतं. तेवढ्यात बटाटा भाई घाईघाईने एक पेनड्राइव्ह घेऊन आला. आणि दाखवत म्हणाला,
“भाई... फिरसे कुछ मॅसेज है.”
गुण्या भाईने नुसताच कटाक्ष टाकला. बटाटा भाईने थरथरत्या हाताने पेनड्राइव्ह टीव्हीला जोडला. काही क्षण स्क्रीनवर नुसता काळोख दिसला आणि मग एक विकृत आवाज आला.
“काय गुण्या... घाबरलास का? जाऊन आलास पोलीस ठाण्यात? चांगलं केलंस. आता खेळ सुरू झाला आहे. ही बातमी आता खरी होणार आहे. तू स्वतः माझ्याकडे येणार, की तुझ्या पोरीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून पाठवू...?”

आणि व्हिडिओ अचानक बंद झाला. क्षणभर खोलीत शांतता पसरली. पुढच्याच क्षणी गुण्या भाईचा राग ज्वालामुखीसारखा फुटला, “कोण आहे बे हा साला?”
त्याने समोरचा टीव्ही लाथ मारून फोडला आणि वैतागून ओरडला, “लावा ना बे पत्ता त्याचा! साला, भेजा फाटला माझा. इतकी वर्षं धंदा केला, पण असा खेळ कुणी खेळला नव्हता माझ्यासोबत.”
तो धापा टाकत सोफ्यावर बसला. आणि बटाटा भाईवर ओरडला, “अन् तो नवीन छोकरा कुठं आहे रे? आला नाही अजून?”

तेवढ्यात दरवाजा उघडला आणि समोरून अँकीने एंट्री केली. जड बुटांच्या टापांचा आवाज करत तो आतमध्ये शिरला, त्याचा तो महागडा विदेशी सूट, मनगटावर चमकणारं डिजिटल घड्याळ, आणि चकाचक बूट, सिगारच्या धुळात एक उंच सावली आत येत होती जशी... त्या धुरात गुण्याभाईला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. काही क्षण तो त्याच्याकडे बघत राहिला आणि मग मोठ्याने हसायला लागला,
“हा... हा... हा... साला फंटर!”
तो जरा खुर्चीत रेलून बसत बटाटाभाईकडे बघत बोलला, “अबे, कोण रे हा? विदेशी पाहुणा?”
“भाई, हाच तो... अँकी.”
गुण्या भाईने भुवया उंचावल्या, “हा?”
“हो भाई. नवीन छोकरा. दिखावेपर मत जाओ. छोकरा लय हुशार हाय. आपलं दिमाग आता चालून राहिलं नाय ना... तवा... सुनो ना… मई क्या बोलता.”
अँकी शांतपणे पुढे येत होता. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती, ना घाई. गुण्या भाईने त्याच्याकडे वरखाली नजर टाकली. बटाटा भाई काही बोलणार, तोच गुण्या भाई उठला.
“अबे बोल मत!” म्हणत त्याने क्षणाचाही विलंब न करता अँकीच्या मुस्कटात मारण्यासाठी हात उगारला. पण हात हवेतच थांबला. अँकीने तोंडातली सिगार हवेत उडवली, पुढे झेप घेत गुण्या भाईच्या बरगडीत कोपर घातला आणि त्याच क्षणी गुडघा पोटात रुतवला. धाडकन... गुण्या भाई जमिनीवर आदळला. अड्ड्यावर क्षणात शांतता पसरली. सगळ्यांचे हात बंदुकांकडे गेले. पण अँकीने कुणाकडेही लक्ष दिलं नाही. हवेत फिरणारी सिगार परत तोंडात पकडत तो निवांत मागे वळला. अँकी निघाला होता, त्याच्या गुर्मीत, बेधुंत सिगारेट ओढत.
पहिल्यांदाच कुणी गुण्या भाईला त्याच्या अड्ड्यावर येऊन त्यालाच जमिनीवर पाडलं होतं. त्याने हात वर करून स्वतःच्या माणसांना थांबवलं आणि स्वतःला सावरत म्हणाला, “अबे... रुक!”


अँकी थांबला नाही. तर तो परत ओरडला, “अबे रुक ना बे!”
आता अँकीने अर्धवट मान वळवली. गुण्याभाई हसत बोलला, “कितना खोका लेंगा? ओ तो बता दे. पावर आहे साल्या तुझ्यात.”
अँकीने सिगारचा लांब झुरका घेतला. धूर नाकातून सोडला. मग कानाजवळ हात नेत खाजवत म्हणाला,
“आता आला ना सिधा तू बे...” तो हळूहळू त्याच्याकडे वळला. अजूनही गडी माणसांचे हात बंदूकांवर होते, सर्वांवर नजर फिरत म्हणाला, “पहिले काम... फिर दाम.”
अड्ड्यावरची माणसं त्याच्याकडे बघत होती. त्याने एकाची बंदुक ओढली, “आणि दाम नाही दिले... तर काम तमाम.”
त्याने तिचं बंदूक आता गुण्या भाईवर ताणली, आणि मिश्कील बघत म्हणाला, “काय गेलं का खोक्यात? हाय की नाही? आंघोळ केली होती का आज? पाहून ये काढून ठेवलं असल आंघोळ करतानी की काय ते, का सरकलं घुटण्यात वय वाढल्यान.”
गुण्या भाई गोंधळला होता तर त्याने इशाऱ्यात त्याला डोक्याला आणि गुढग्याला हात लावत समजावून सांगितलं आणि बंदूक समोरच्या माणसाकडे फेकली. आणि पुढच्याच क्षणी बटाटा भाईचं हसू फुटलं. मग एकामागोमाग सगळे हसायला लागले. गुण्या भाईने रागाने सगळ्यांकडे पाहिलं. सगळ्याचं हसू ताबडतोब बंद झालं. अँकी मात्र आधीच दारापाशी पोहोचला होता. गुण्या भाईने पुन्हा जोरात आवाज दिला, “अबे!”
आणि बटाटा भाईला इशारा केला तसा तो धावत गेला आणि त्याच्या हातात सोनाचा फोटो दिला. त्यानेही तो झटक्यात ओढला, एक कटाक्ष टाकला. ओठातली सिगार फिरवली. आणि काहीही न बोलता बाहेर निघून गेला.
“गुण्याभाई खुर्चीत बसत पुटपुटला, “साला... खतरनाक आहे.”
बटाटा भाई हसला, “म्हणलं होतं ना भाई... दिसतो फंटर, पण डोकं आणि हिंमत दोन्ही भारी हाय.”


<<>>
अवघ्या दोन दिवसांत गुण्या भाईचा सगळा व्यापार जवळजवळ ठप्प झाला होता. ज्या नावाने एकेकाळी मुंबईपासून गोव्यापर्यंत लोक थरथर कापायचे, त्याच नावाची आता अंडरवर्ल्डमध्ये खिल्ली उडत होती. ‘स्वतःला डॉन म्हणवतो... आणि स्वतःच्या पोरीला सांभाळू शकला नाही!’ अशा कुजबुजीने अड्डे भरून गेले होते. गुण्या भाईने अनेकांच्या संसारावर घाला घातला होता, अनेकांचे धंदे बुडवले होते, कित्येकांना संपवलं होतं. त्यामुळे त्याच्या दुःखात सहभागी होणारा एकही माणूस नव्हता. उलट सगळे त्याच्या पडझडीची वाट बघत होते. अंडरवर्ल्डमधल्या प्रत्येकाला एकच प्रश्न पडला होता, कोण आहे तो माणूस? कोण आहे तो, ज्याने गुण्या भाईच्या घरात घुसून त्याच्या काळजाचा तुकडाच उचलून नेला? ज्याचं नाव अजून कुणाला माहिती नव्हतं, चेहरा कुणी पाहिला नव्हता, पण ज्याची दहशत थेट गुण्या भाईच्या बंगल्यापर्यंत पोहोचली होती. कित्येक छोटे-मोठे गँगस्टर आता त्या अनोळखी माणसाचा शोध घेत होते. त्याला भेटायचं होतं. त्याच्या गटात सामील व्हायचं होतं.

काहींना त्याच्याकडून गुण्याचा काटा काढायचा होता. ज्याने गुण्या भाईला गुडघ्यावर आणलं, तो साधा माणूस असूच शकत नाही अशी हवा पसरत होती. राजकीय वर्तुळातही कुजबुज सुरू झाली होती. अनेक नेते गुण्याभाईपासून सावध अंतर ठेवू लागले होते. कालपर्यंत त्याच्या फोनची वाट पाहणारे आज त्याचे कॉल उचलत नव्हते. सोनाबद्दलची प्रत्येक बातमी आता बाजारात सोन्याच्या भावाने विकली जात होती. सगळे वाट बघत होते त्या एका क्षणाची.... ज्या क्षणी गुण्या भाईचं उभं केलेलं साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळेल.
दरम्यान, दुबईतूनही हालचाली सुरू झाल्या होत्या. गुण्या भाईच्या कमकुवत झालेल्या स्थितीचा फायदा घेत दुबईच्या डॉनने ड्रग्सची मोठी लाईन त्याच्याकडून काढून घेतली आणि थेट मछली भाईच्या हवाली केली होती. मछली भाई सुद्धा त्या अनोळखी खेळाडूची आतुरतेने वाट बघत होता... जो अजून कुणासमोर आला नव्हता... पण ज्याने आधीच सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती. अंडरवर्ल्डच्या भाषेत सांगायचं तर... राजा अजून दिसला नव्हता... पण त्याच्या पहिल्याच चालीने संपूर्ण पट हादरला होता. तो राजा होता की राणी? कॉमेंट मध्ये नक्की सांगा...
<<>>
इकडे अँकी तर डबल गेम खेळत होता. एकीकडे त्याला सोनाचा शोध लावायचा होता, तर दुसरीकडे त्या रहस्यमय नव्या डॉनचाही.
गुणवंत रावांनी परत सभा बोलावली पण कुणीच आलं नाही. अवघ्या काही काळात गुण्याच्या भीतीची भिंत कोसळली होती. अंडरवर्ल्ड आणि राजकारण या दोन्ही जगांनी नवीन डॉनचा सूर पकडला होता.. गुण्याच्या नावाने थरथरणारे लोक आता त्या अज्ञात डॉनला सलाम ठोकत होते. दरम्यान निवडणुकीचा प्रसार जोरात सुरु झाला होता. कुणीही आवेदन पत्र मागे घेत नव्हतं. गुण्या भाईच्या नावाने घाबरणारे उमेदवार आता उघडपणे प्रचार करत होते. कालपर्यंत चौकाचौकात लागलेली गुणवंतरावांची भलीमोठी पोस्टर्स उतरवली जात होती. ज्या दहशतीच्या जोरावर गुण्या भाईने साम्राज्य उभं केलं होतं, ती दहशत आता धुळीत मिळाली होती. सर्वाना त्या किडनॅपरची वाट होती. आणि....खुद गुण्याभाईलाही...
सात दिवसांत गुण्या भाईच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं जशी वाढली होती. दाढी वाढली होती. झोप त्याला सोडून गेली होती. त्याने टेबलावरची बाटली उचलली आणि संतापाने भिंतीवर फेकून दिली. गुण्याभाईचा चेहरा लालबुंद झाला होता. तो गर्जला, “लय झालं आता! सात दिवस झाले! ना पोरीचा पत्ता, ना त्या हरामखोराचा! सगळं जग तमाशा बघतंय माझा! आता माझी जुनी इमेज उभी करण्याची वेळ आली आहे.”
त्याने त्याचा तोच वेष घातला आणि बंगल्यातून निघणार होता तोच बटाटा भाईने त्याला रोखलं, ““भाई, खबर आली हाय. अंडरग्राउंड व्हा आता. पोलीस आपके नाम का वॉरंट लेके आ रहे है.”


गुण्या भाईने त्याच्याकडे रोखून पाहिलं, “अबे, पोलीस न टोलिस, घाल त्यायले चुलीत... मी चाललो.”
बटाटा भाईची घाबरगुंडी उडाली होती. “भाई आपल्या बार आणि हॉटेलवर छापे पडले आहेत आणि सर्व माल जप्त झाला आहे. आपका आवेदन रिजेक्ट हो गया है!”
गुण्या भाईने समोरचा टीपॉय लाथेने उडवून दिला आणि मान मोडत ओरडला, “कोण हाय बे साला हा, माझ्या भेजात गेलाय आता… असल दम तर ये म्हणावं समोर... साला पोरीला किडनॅप करून लपून बसला साला, हिंमत नाही साल्यात अन् लोकायची उगाच हिंमत वाढवून रायला.”
तोच दुबई वाल्या डॉन साहेबजीच्या सेक्रेटरीचा फोन आला, गुण्याने तो हळबळीत उचलला, “हॅलो मॅडम जी...”
“हॅलो, काय गुण्या भाई... माल आला नाय... काय नाणं वाजत नाय काय तुझं आता... गुंडला का रे तू पोरीत.”
“मॅडमजी, कोण मागे लागलं, माहित झालं त... त्याची त... अशी फाडतो ना!”
“मग करा ना माहित... साहेबजी विचारात आहेत पैसा कधी पोहचेल म्हणून. नाय तर सौदा संपला समजा.”
“मॅडमजी वेळ वाईट आहे... समजून घ्या, माझी एकुलती एक पोरं, किडनॅप झालेली हाय.”


“अन्, तू आजवर करत होतास त रे ....” मॅडमजी हळूच बोलल्या
“मॅडमजी, काही बोलल्या का तुम्ही, साहेबजीला सांगा ना जरा...”
“काय सांगू! तू आता भाई राहिला नाही म्हणून, बऱ्या बोलाने सांगते, आम्ही त्यापेक्षा वाईट आहोत... पैसे पाठवा... लवकर, वेळेवर, वेळ जाईल तुमची आणि दुसरा वेळ मारून घेऊन जाईल आणि तू सर्व वेळ तोंडावर हात ठेवून ओरडत राहशील. मदत पाहिजे... मदत पाहिजे असा!”
आणि तोच समोरून कर्कश भिंगरी फिरवण्याचा आवाज आला, तसा कॉल कट झाला. जणू काही समोरचा त्याला संकेत देत होता. विचारत गुण्या भाई जरा शांत झालं आणि जोरात परत ओरडला,
“अबे बटाट्या ह्या दुबईवाल्या डॉन साहेबाने केलंय सोनाला किडनॅप. साला हा बिन बाई च्या आळमदी काम करतो. अबे गेली का गोष्ट भेज्यात. मागच्या व्हीडीओमंदी पण भिंगरीचा आवाज होता... अन् ह्या फोनमधूनही तोच आला, शायद हा एकच माणूस हाय...”
“मग काय कराचं भाई?”
“अबे बिनडोक्याच्या, तो तुझा अँकी का टंकी कुठं हाय बे? मोठा कामाचा माणूस म्हणत होता ना, कुठं घुसला बिडात? लावं त्याले फोन.”


बटाटाभाईने फोन लावला, पण अँकीने उचलला नाही. काही वेळाने त्याचा मेसेज होता, जाळं फेकलं आहे मासा अडकणार, जरा वेळ धरी धरा. गुण्याभाईला धीर तर राहिला नव्हता, त्याला त्याचा दुष्मन गवसला होता पण तो दुबईत अन् सोनाचा व्हीडिओ भारतातून येत होता हे काही त्याला कळत नव्हतं.
<<>>
इकडे अँकीचा शोध सुरु होता, तो शोधात मुंबईपासून दूर तेंडोली नजीकच्या लहान खेड्यात पोहचला, आणि तो एका जुन्या मोडक्या घरासमोर थांबला, गाडी घराच्या बाजूला उभी करून त्याने त्याची पिस्तूल हाताशी ठेवली आणि फाटक उघडलं, दबक्या पायाने तो वसरीत आला आणि हळूच दार लोटून आतमध्ये शिरला तोच त्याची हातापायी एका इसमाशी झाली, ज्याचा चेहरा झाकला होता. त्यातून दिसणारे ते डोळे त्याला राहून राहून त्रास देत होते, आणि तो त्या इसमाच्या हातून मात खात होता. शेवटी चलाखीने त्याने त्या इसमाच्या तोंडावरचा नकाब काढला तोच तिचे काळे भोर केस मोकळे झाले, पण बंदुकीच्या नोकावर तिने अँकीला समोर खुर्चीवर बांधलं.
समोर ती रुपाची राणी
आणि तो कायद्याचा पुजारी....
कथेचे दोन्ही नायक समोरा समोर आहेत... नक्की कोण ते ओळखा... पुढचा भाग नक्की वाचा!
----
सादर कथा ही गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर आधारित काल्पनिक कथा आहे. कथानकातील पात्रे, प्रसंग, भाषा आणि घटना यांचा उद्देश त्या जगातील वास्तववादी वातावरण उभे करणे हा आहे.
कथेतील काही संवाद, व्यक्तिमत्त्वे किंवा घटना वाचकांना अस्वस्थ वाटू शकतात. कृपया त्याकडे त्या पात्रांच्या आणि परिस्थितीच्या संदर्भात पाहावे. लेखक कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी, हिंसा किंवा बेकायदेशीर कृत्यांचे समर्थन करत नाही.
कथेचा आस्वाद घेताना तिच्या कथानकाला आणि पार्श्वभूमीला समोर ठेवून वाचन करावे, ही विनंती.
--
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार ai
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७
See less

Post a Comment

0 Comments