द कमबॅक... एक होती भिंगरी...भाग ९
आधीचे भाग
भाग १ इथे वाचा- द कमबॅक... भाग १-
भाग २ इथे वाचा एक होती भिंगरी .. भाग २
भाग ३-- एक होती भिंगरी - भाग ३
भाग ४- एक होती भिंगरी - भाग ४
भाग ५ पुढे वाचा एक होती भिंगरी.... भाग ५
भाग ६ पुढे वाचा. भिंगरी भाग ६
भाग ७ इथे वाचाभिंगरी...
भाग ८ इथे वाचा एक होती भिंगरी भाग ८
भाग 9 पुढे वाचा
बेसुध अवस्थेतच भावना गुण्या भाईच्या माणसांसोबत मुंबईला पोहोचली. शरीर जखमांनी ठणकत होतं, डोकं जड झालं होतं. तिला एका जुनाट, अंधाऱ्या गोदामात फेकून देण्यात आलं आणि गुण्या भाई तिथून गोव्याच्या दिशेने निघून गेला.
बऱ्याच वेळाने भावनाला जाग आली. ती कण्हत उठली. अंग तापाने फणफणत होतं. डोकं ठणकत होतं. हातापायांवर ओरखडे होते, कपाळावर सूज होती. अंगावर फक्त तिच्या दादाचा मोठा शर्ट होता. त्या शर्टाला घट्ट कवटाळून ती काही क्षण बसून राहिली. इतकं रडून झालं होतं की डोळ्यांतलं पाणीही आटून गेलं होतं. भाऊ सोबत नव्हता पण त्याचा तो शर्ट तिच्या अश्रूंना पीत होता. ती नकळत त्यात चेहरा खुपसून बसली होती. त्यात अजूनही तिला दादाचा वास जाणवत होता आणि त्याच आठवणीने तिचं हृदय आणखी पिळवटून निघालं होतं. काही वेळाने तिने स्वतःला सावरलं. हळूहळू उठत ती संपूर्ण गोदाम फिरून आली. चारही बाजूंनी उंच भिंती होत्या. लोखंडी रॅकवर जुनी रद्दी, वर्तमानपत्रांचे गठ्ठे, मोडकी फर्निचरं आणि धुळीने माखलेले बॉक्स पडले होते. एकही खिडकी नव्हती. एकच मोठं शटर होतं. आणि ते बाहेरून बंद होतं.
ती प्रत्येक कोपरा तपासत राहिली. कदाचित कुठे एखादी फट असेल, एखादा मार्ग असेल, अशी आशा होती. पण तासभर शोधूनही काहीच सापडलं नाही. शेवटी थकून ती एका कोपऱ्यात जाऊन बसली.
अचानक... खडखडखड...! आवाज झाला. शटर उघडल्या गेलं होतं. भावना दचकली. निपचित पडलेली ती धडपडत उठली आणि रद्दीच्या गठ्ठ्यांच्या मागे जाऊन लपली. क्षणात तिच्या अंगात भीती संचारली. गोदामात काही माणसांचे आवाज घुमू लागले, "ए... कुठं गेली ती? भाईने सांगितलंय, पोरगी पळाली तर आपल्याला जिवंत ठेवणार नाही!"
भावना श्वास रोखून बसली. हृदय जोरात धडधडत होतं पण फार वेळ ती लपू शकली नाही.एका माणसाने रद्दीचा गठ्ठा बाजूला ढकलला आणि ती त्यांना दिसली. क्षणात दोन जणांनी तिला पकडलं. ती झगडली, ओरडली, हात सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या अशक्त शरीरात आता ताकद उरली नव्हती. त्यांनी तिला ओढत बाहेर आणलं. बाहेर उभ्या असलेल्या काळ्या एसयूव्हीच्या मागच्या सीटवर बसवण्यात आलं. भावना घाबरून एका कोपऱ्यात शर्टने अंग झाकत जाऊन बसली.
अर्धा रस्ता पार झाल्यावर अचानक गाडी एका मोठ्या चौकाजवळ थांबली. भावनाने घाबरतच मान वर केली. तिचे डोळे अजूनही रडून सुजलेले होते. दार उघडलं आणि एक अतिशय देखणी, नीटनेटकी सजलेली बाई तिच्या शेजारी गाडीत येऊन बसली. तिच्या अंगावर भरजरी साडी, हातात सोन्याच्या बांगड्या आणि तिच्या अंगातून मंद अत्तराचा सुगंध दरवळत होता. तिने आधी तिच्या खांद्यावर असलेली शाल भावनाच्या अंगावर अलगद पांघरली. काहीही न बोलता तिला हळूच जवळ ओढलं. भावनाच्या मनातल्या भीतीच्या भिंती थोड्या थोड्या कोसळू लागल्या. त्या बाईने पर्समधून एक डबा काढला. बाईने डब्यातली कचोरी तोडून तिच्या तोंडात भरवली. नंतर बाटली उघडून पाणी प्यायला दिलं. आणि काही क्षणांतच तिच्या कुशीत डोकं ठेवून पडली. ती बाई तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला थोपटत राहिली.
गाडी बराच वेळ धावत राहिली. रात्र अधिक गडद होत गेली आणि शेवटी एका भव्य हवेलीसमोर गाडी थांबली. उंच दरवाजे, मोठं अंगण आणि दिव्यांच्या प्रकाशात उजळलेली ती हवेली एखाद्या दुसऱ्याच जगातली वाटत होती. त्या बाईने तिला अलगद झोपेतून उठवलं, भावना अर्धवट झोपेतच तिच्या हाताला धरून खाली उतरली. तिने वर्षाची होती तेव्हाच मायचं प्रेम गमावलं होतं त्यानंतर माय अन् बाप दोन्ही अरुण होता तिचा, अशी हळुवार माया करणार कुणीही भेटलं नव्हतं पण आज त्या बाईच्या मातेच्या स्पर्शाने ती भारावून तिच्याकडे आकर्षित झाली होती. हात धरून ती तिच्यासोबत ती जिथे म्हणले तिथे गेली आणि एका खोलीत पोहचली. ती बाई तिला म्हणाली, “बेटा मइ इधरकी मालकीण हु. मला इथे सर्व आपा म्हणतात. तू ही म्हटलं तरी चालेल, तू आराम कर. आती मै.”
नंतर ती खोलीतून निघून गेली. भावना घाबरली होती, तिच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. तिच्यासोबत घडलेला प्रसंग आठवणून आठवून तीला हुळहुळी भरली होती. कसे तरी डोळे मिटले की तेच चेहरे समोर येत होते. ती गाडी, तो अंधार, त्या माणसांचे राक्षसी हसू, तिच्या किंकाळ्या... ती घाबरून डोळे उघडत होती, अंगभर वेदना उसळत होत्या. तेरा वर्षांच्या त्या कोवळ्या जीवाला नेमकं काय घडलं होतं, याची पूर्ण जाणीव नव्हती; पण इतकं मात्र समजत होतं की तिचं जग एका रात्रीत उद्ध्वस्त झालं होतं. तिने गुडघ्यात डोकं खुपसलं... रक्ताने शाल भिजत होती. अंग दुखत होतं, ती रडायला लागली,हंबरडा फुटेल इतकी शक्तीही उरली नव्हती. फक्त तुटलेले, वेदनांनी भरलेले हुंदके होते. तेवढ्यात दरवाजा पुन्हा अलगद उघडला. आपा आत आली. आता तिच्या हातात औषध आणि पाण्याचा ग्लास होता. तिने ती नजरेने इशारा करत भावनाला दिलं आणि आराम करायला सूचना देत म्हणाली, “खूप काही करायचं आहे तुला. मला माहित आहे तुझ्यासोबत काय झालंय. मीसुद्धा तुझ्याच वयाची होते, जेव्हा या हवेलीत आले होते. पण तेव्हा माझ्यावर माया करणारं कुणीच नव्हतं... तुला मी आहे. मी उभं करेन तुला. पण आता तू झोप. बाहेर ती माणसं काय बोलत आहेत, ते मला ऐकायचं आहे.”
पलटतांना तिने परत भावनाला बघतील, ती रक्ताने भिजली आहे हे तिच्या लक्षात आलं मग ती परतली आणि खोलीतलं कपाट खोलून त्यातले तिने कपडे काढले. भरा भरा कपडे फेकल्या नंतर तिला एक सूट भावनाच्या मापाचा दिसला तो तिने भावनाकडे फेकला, “हा घाल आता नंतर मी तुझ्यासाठी मागवते कपडे.”
ती खोलीतून निघून गेली. भावना शब्दहीन झाली होती, दादाला आठवत गुमान कपडे बदलले. आणि गप्प पडून राहिली.
भावना एका वेश्यालयात पोहचली होती, जे गुण्या भाईच होतं. इथे असणारी प्रत्येक स्त्री ही त्याच्या वासनेचा शिकार होती आणि ह्या दलदलीत फेकल्या गेली होती. आपा हे वेशालय भाईच्या मर्जीने चालवत होती. त्याच्यासाठी बायको पुरवत होती. तीही तिच्या हातून घडलेल्या गुन्ह्यांमुळे भीतीने सारं काही गुण्या भाईचं ऐकत होती. पण आज भावनाला बघून तिला ती आठवली आणि मनात ममता जागृत झाली होती तिच्या. ती गुण्या भाईच्या माणसांकडे आली, इशाऱ्यात तिने त्यांना प्रश्न केला तर ते म्हणाले,
“आपा, ए लडकी भाई की जाणं है! खास तयार करो इसे. पुरा खयाल रखा जाये, पर मानली नाय तर सांगा... आपल्या नेहमीच्या जागी नेऊन गाडून येऊ, हुकूम हाय भाईचा तसा, पटली तर सेट नाहीतर गड्यांत फेक.” आणि तो फिकीर फिकीर हसायला लागला.
गुण्या भाईची माणसं हसत होती आणि आपा मनात जशी धकधकत होती, तिला तिचं उभं आयुष्य आठवत होतं. स्वतःला शांत करत ती त्यांना म्हणाली, “हा जी! जैसा भाई बोले तैसा, पण पोरीची काही हिस्ट्री!, कोण हाय? कुठून आली? नाय म्हणजे हमकु कूछ लोचा नाही मंगता ना.”
“हाय ना, भाईला तिची मायबी पसंत होती, चाखली एकदाच पण तिनं आत्महत्या केली. मग ही पोरं गावली भाईला १० वर्षांन. अजून एक, हिच्या बापाला भाईच्या सांगण्या वरून आम्हीच विहिरीत टाकलं होतं, भाईच्या हातून त्या चंपा आयटेमचा खून होतांना पायलं होतं त्यानं गावाकडे.”
त्यातला एक परत म्हणाला, “भाऊ हाय एक पण तोही मारला असलं बटाटा भाईन तिकडं, नायतर काही केलं असेल त्याचं, आपा तू काळजी नको करू, कोणी बी येणार नाय तुझ्या दारात पोरीसाठी. ना पोलीसची झंजट हाय, ना कोण्या नातेवाईकांची... कर पोरीला तयार… एकदम फटाका. जालीम दिसली पाहिजे... हाय बिन गोरी चीट, भाई बोलले, जवान झाली की घेऊन ये तिले... आपा आता तुझा राज गेला, तू म्हणत होतीस ना तुह्या वाणी कुनीबी नाय इथे म्हणून, मग हाय ना तुले तोड ही पोरं... अरे जवानीत आल्यावर अप्सरा दिसल... अप्सरा!! भाईची त किस्मत हाय”
आपा स्मित हसली, काहीच बोलली नाही, मुजरा करत तिने त्यांना तिथून निघून जाण्याचा इशारा केला.
भाईंचे माणसं निघून गेले आणि आपा तिच्या बैठकीत गुमान गप्प बसली, जरा वेळाने तिने भावनाकडे जाऊन डोकावलं, ती अजूनही एका कोपऱ्यात बसली होती. रडत होती, दुःखाने कणहत होती. आपाने जेवण मागवलं आणि घेऊन ती तिच्या खोलीत शिरली, “बेटा, जेवून घे, तुला बरं वाटेल. उद्या मी डॉक्टरला बोलावलं आहे.”
“दादा, माझा दादा येईल ना?”
आपा स्मित हसली, “हो येईल, तू आधी जेव, अगं येईल... पण तुला आधी जेवावं लागेल ना?”
आपा सांगण्यावरून भावना जेवली, औषधीची गुर्मी चढली आणि ती झोपली. दिवसं उजेडात येत होते आणि रात्री अंधारात लवकर शिरत होत्या. आपा भावनाची खूप काळजी घेत होती.
आता ती रोज विचारात होती की तिचा दादा कधी येईल आणि तिला कधी घेऊन जाईल. आणि आपा रोज तिला काहीतरी बोलून गप्प करत होती. हळूहळू भावना तिथलं सर्व बघायला लागली, हळूच खोलीतून बाहेर बघायला लागली. वर्ष झालं पण दादा काही आला नव्हता. आणि आपाने तिला कुणाला हातही लावू दिला नव्हता.
एक दिवस तीने स्वतःच तिथून निघून दादाकडे जाण्याचा विचार केला, खोलीच्या बाहेर आली, सर्व कामात व्यस्त असतांना ती हळूच रस्त्यावर आली. काहीच सुचत नव्हतं, बस स्टॅन्ड शोधत होती तर भाईच्या माणसांनी तिला पकडलं आणि परत आपाकडे नेऊन आपटलं,
"आपा, ध्यान काहा है तेरा. ए बाहर एस टी स्टॅन्ड की तरफ थी! क्या तुम! भाईको पता चालता तो तुम भी और हम भी वही गड्डे मे होते."
आपाने आता भावनाला ओढत खोलीत नेलं, “काय गं बाई, तुला कळत नाही का? आता तू इथून निघूच शकत नाही, अन् निघायचं असेल ना तर हिंमत ठेव, मार्ग निघेल.” मी आहे ना.”
“पण मले माह्या दादाकडे जायचं हाय. माह्या दादा काऊन येत नाय, तो मनला होता येयीन म्हणून. तो कुठे हाय.” आणि ती परत रडायला लागली.
“तो माहित नाही मला, पण मला तुला वाचवायचं आहे. कदाचित मारला असेल ह्या लोकांनी म्हणून आला नाही ना तुला घ्यायला... तू इतना मत सोच ना बेटा!”
भावना ओरडून ओरडून रडायला लागली, आपा तिला शांत करत होती. मग ती आपाला म्हणाली,
“मग मालेबीन मरायचं हाय, माझावाला बापू विहिरीत पडून मेला, आईने टांगून घेतलं, भावाला मेला म्हणत हायसं तू , आता म्या काय करू जगुन?”
आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. मनाने सैरावैरा झाली होती, अश्रू थांबत नव्हते. आपा काही क्षण शांत बसून तिच्याकडे बघत होती... जरा वेळ ती तिच्या बालपणातही शिरली आणि मग अचानक तिच्या आवाजात कणखरपणा आला, “काय करू म्हणजे? मरायचं? एवढंच सुचलं तुला?”
भावना दचकून तिच्याकडे पाहू लागली. आपा उठून तिच्यासमोर उभी राहिली, “तू अजून जिवंत का हायस माहित आहे?”
भावनाने नकारार्थी रडतच मान हलवली. आपाचा आवाज आता थरथरत होता, पण त्यात ज्वाला होती. ती जोरात म्हणाली, “कारण तुझं काम अजून संपलं नाही. घे बदला, तुला बदला घ्याचा आहे म्हणून तू जिती हायस, तुला माहित नाही तुझ्या बापूने विहिरीत पडून आत्महत्या नाही केली, त्याला भाईच्या लोकांनी विहिरीत फेकलं होतं. तुझ्या सोबत जे गुण्या भाईने केलं ना तेच तुझ्या आईसोबत त्याने केलं होतं आणि नेहमी करणार होता म्हणून तिने स्वतःला समपवलं... तुझा भाऊ, तुला सोडवतांना कदाचित मारला गेला, अन् जिता असेल तर हे लोक त्याला जगू देणार नाहीत. आता सांग तू ही मरणार की ह्या सर्वांचा बदला घेणार गुण्या भाईकडून... काय म्हणतील तुझे माय बापू...आणि तुझा दादा?”
दादा ऐकताच भावना पुन्हा ढसाढसा रडू लागली. आपा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,
“दादाचा लय जीव हाय ना तुझ्यावर?”
भावनाने हुंदका देत मान हलवली.
“मग त्याच्यासाठी जग, स्वतःसाठी जग. आणि त्या गुण्या भाईला दाखव की त्याने एका पोरीचं आयुष्य बरबाद केलं नाही... तर स्वतःच्या विनाशाची बीजं पेरली आहे.”
भावना सारं ऐकून भावनाशून्य झाली होती, अनाथ तर ती आधीच होती पण आता भावाचाही पत्ता नव्हता... जगून काय करायचं हा तिला प्रश्न होता. तिला असं तुटल्या सारखं बघून आपा म्हणाली, “ नही समझा ना, तो हे घे, जहर हाय, कुछ नही, मिठा है... एक घुट पिऊन घे आणि संपव सारं. नाहीतर ह्या आयुष्याचं जहर पी आणि हो ह्या जगावर राज्यकर्ती... निवड तुझी, मरायचं की मारायचं, जिंकू द्यायचं की जिंकायचं... मरतात तर सारेच पण त्याला मारून आणि हरवून मर, ज्याने तुला मरणाच्या दारात उभं केलं... आपली निवड आपलं आयुष्य ठरवते असं म्हणतात.”
म्हणत ती जोरात हसली, आणि तिच्या गालाला हात लावत, लाड करत म्हणाली, “नियतीने तुला ह्या वेशालयात आणून उभं केलं, निवड तू केली नाही, पण आता तू निवड कर... आणि काय ग! बदला काय आदमीच घेऊ शकतात? आपण नाही? स्त्री काहीही करू शकते पण ती चार भिंतीत राहणारीच का? भिंती तर इथे ह्या वेश्यालयातही आहेत... आणि दगड, सिमेंटच्या आहेत... काय फरक आहे? त्या स्त्रियांनी केली तर त्या महान आणि आपण काही केलं तर आपण नुसती घाण...”
बोलता बोलता ती शांत झाली, “आपा म्हणता इकडे मला, बघ तुला कशी उभी करते ते त्या भाईच्या समोर... साला नामर्द, लहान लेकराले पण सोडत नाही. गुण्या तुझी उलटी गिनती सुरु कर हरामखोरा...”
ती ओरडत खोलीतून निघून गेली. भावना बघतच राहिली, समोर जहराची बॉटल होती आणि कदाचित चवीला गोड पण आयुष्याचं महाजहर... त्यापेक्षाही कडू आहे हे तिला माहित झालं होतं, मनात निश्चय केला हात पुढे करून तिने विषाची बॉटल उचलली, आणि जोरात समोरच्या भितींवर फेकली... आणि गाणं म्हणायला लागली,
“एक होती भिंगरी... एक होती भिंगरी... तिचं नावं झिंगरी... तिचं नावं झिंगरी.... भिंगरी एकापायावर फिरते... मीही फिरणार आणि समोरच्याला माझ्या नोकाने गड्डा करून तिथेच दाबणार आणि परत त्याच जागी घुमणारं .... भिंगरी ....”
आणि ती जोरात ओरडली ... “भिंगरी...”
पुढचा भाग लवकरच...
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७
----
सादर कथा ही गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर आधारित काल्पनिक कथा आहे. कथानकातील पात्रे, प्रसंग, भाषा आणि घटना यांचा उद्देश त्या जगातील वास्तववादी वातावरण उभे करणे हा आहे.
कथेतील काही संवाद, व्यक्तिमत्त्वे किंवा घटना वाचकांना अस्वस्थ वाटू शकतात. कृपया त्याकडे त्या पात्रांच्या आणि परिस्थितीच्या संदर्भात पाहावे. लेखक कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी, हिंसा किंवा बेकायदेशीर कृत्यांचे समर्थन करत नाही.
कथेचा आस्वाद घेताना तिच्या कथानकाला आणि पार्श्वभूमीला समोर ठेवून वाचन करावे, ही विनंती.
--
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार
.png)
0 Comments